डॉ. पार्थ मजुमदार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विज्ञान समजून घेण्याच्या आणि विज्ञानाचे शिक्षण देण्याच्या क्षेत्रामध्ये काही विलक्षण घटना गेल्या महिनाभरात घडल्या आहेत. आपल्याला माहीत आहे की आपला डोळा एक जटिल अवयव आहे आणि तो आपल्याला पाहण्यास सक्षम करतो. इतका गुंतागुंतीचा अवयव कसा निर्माण झाला? याबद्दलचे अगदी अलीकडे तज्ज्ञांची मान्यता पावलेले संशोधन आपल्याला असे सांगते की, बॅक्टेरियाने दान केलेल्या जनुकामुळे आपल्या ‘दृष्टी’ला सक्षम केले आहे. याबद्दल या लेखात लिहीनच, पण त्याआधी विज्ञान-शिक्षणाच्या क्षेत्रातील एका तातडीच्या विषयाबद्दल.

हा विषय पाठ्यपुस्तकांचा. ‘सीबीएसई’ मंडळाची पाठ्यपुस्तके ठरवणाऱ्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’ने (एनसीईआरटी) माध्यमिक स्तरावरील विज्ञानाच्या अभ्यासक्रमाविषयी केलेल्या सूचनांबद्दल आम्ही- सुमारे दोन हजार वैज्ञानिक, संशोधक यांनी २० एप्रिल रोजी केंद्र सरकारला पत्रही लिहिले आहे. सर्वच पाठ्यपुस्तकांचे ‘तर्कसंगत सुसूत्रीकरण’ करण्याचा एनसीईआरटीचा निर्णय मूळचा २०२२ च्या मे महिन्यातील असल्यामुळे तो कसा जुनाच आहे. अगदी काही टक्केच भाग पुस्तकातून आता वगळला गेला आहे आणि तोही ‘कोविड-१९’नंतरच्या काळात विद्यार्थ्यांवर पडणारा भार कमी करण्याच्याच हेतूने… शिवाय नवे ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२०’सुद्धा ‘विद्यार्थ्यांवरील भार कमी करून प्रयोगातून शिक्षण, सर्जनशीलता यांवर भर’ देते… हे सारे जरी मान्य केले तरीही जे फेरफार कधीच पटणारे नाहीत, त्यांबद्दल हे पत्र आहे.

पाठ्यपुस्तके आणि अभ्यासक्रमात ‘एनसीईआरटी’ने सुचवलेला हा फेरफार गंभीरच आहे. ‘आनुवंशिकता आणि उत्क्रांती’ या प्रकरणाचे नाव बदलून आता ‘आनुवंशिकता’ असे केले जाईल. जैविक उत्क्रांतीच्या अभ्यासाविषयीच्या संकल्पना आणि पद्धतींचे जवळजवळ सर्व संदर्भ काढून टाकले जातील आणि विशेष म्हणजे डोळा- दृष्टी आणि रंग जाणण्याची आमची क्षमता- यावरील चर्चा काढून टाकण्यासाठी काही शिफारशीदेखील ‘एनसीईआरटी’ने केल्या आहेत. या शिफारशी तर्कहीन आहेत असेच मी ठामपणे म्हणेन. हद्द म्हणजे ‘कोविड-१९’ची महासाथ संपली तरी अभ्यासक्रमातली ही गंभीर काटछाट तशीच कायम राहिली आहे.

‘प्रयोगातून शिक्षण’ म्हणजे ‘अनुभव आणि निरीक्षण’ यांवर आधारित शिक्षण. जैविक उत्क्रांतीचा सिद्धान्त मांडणारा चार्ल्स डार्विन हा स्वत:देखील अनुभव आणि निरीक्षणातून कसे शिकावे, याचा एक आदर्श ठरतो. आपण जे अनुभवतो, निरीक्षणातून ज्या नोंदी करतो त्याचा सर्जनशील अर्थ कसा लावायचा हे आजही चार्ल्स डार्विनकडून शिकता येईल, हे कोणीही नाकारू शकत नाही. तरीही, ‘एनसीईआरटी’ने चार्ल्स डार्विन आणि उत्क्रांती या विषयावर कुऱ्हाड चालवली आहे.

डार्विनचा डोळा!

आता पुन्हा आपण या लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या, ‘दृष्टी’विषयक संशोधनाकडे वळू. डोळा कसा विकसित झाला? याबद्दलचा अभ्यास चार्ल्स डार्विननेही केलेला आहे आणि त्याचा महाग्रंथ ठरलेल्या ‘ऑन द ओरिजिन ऑफ स्पीसीज’ या पुस्तकामधील ‘ऑर्गन्स ऑफ एक्स्ट्रीम परफेक्शन ॲण्ड कॉम्प्लिकेशन’ या शीर्षकाच्या एका विभागात डार्विन लिहितो, “वेगवेगळ्या अंतरांवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता, वर/ खाली/ कोणत्याही कोनात पाहण्याची चपळता, प्रकाश पाहण्याचीच नव्हे तर प्रकाशाचे विकीरण जाणण्याची तसेच विविध रंग ओळखण्याची क्षमता हे सारे गुण असणारा डोळा केवळ ‘नैसर्गिक निवडीच्या तत्त्वा’मुळे तयार होऊ शकतो या विश्वासाला… जरा मोकळेपणाने सांगायचे तर, उच्चकोटीचा मूर्खपणाच म्हणता येईल” परंतु पुढे त्याच विभागात डार्विन लिहितात, “… बदलत्या जीवनाच्या परिस्थितीत एखाद्या प्राण्याला अवयवामध्ये काही बदल जर उपयोगी पडत असतील, तर नैसर्गिक निवडीद्वारे परिपूर्ण आणि जटिल डोळा तयार होऊ शकतो यावर विश्वास ठेवण्यात काहीही अडचण नाही…”

डोळा प्रकाश गोळा करतो, विविध किरणांना केंद्रित करतो आणि त्याचे विद्युतीय संदेशांमध्ये रूपांतर करून मेंदूपर्यंत पाठवतो, नंतर मेंदू या संदेशांचे प्रतिमेत रूपांतर करतो. पण मुळात डोळा काम कसे करतो? ‘डोळ्याचा पडदा’ किंवा ‘दृष्टिपटल’ हा भाग डोळ्याच्या भिंतीच्या आतील पृष्ठभागावर असतो, त्यावर प्रकाश-ग्राही पेशी (फोटोरिसेप्टर्स) असतात. पुढल्या ‘दृश्य (किंवा दृक्) – संदेशवहना’च्या प्रक्रियेत ‘व्हिटॅमिन ए’ महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. पेशींचा एक पातळ थर दृष्टिपटलात असतो, पण महत्त्वाचे म्हणजे या पेशींमध्ये एक जनुक कार्यरत असते आणि ते ‘इंटरफोटोरिसेप्टर रेटिनॉइड-बाइंडिंग प्रोटीन’ (‘आयआरबीपी’) तयार करत असते. जेव्हा प्रकाश रेटिनामध्ये फोटोरिसेप्टरवर आदळतो तेव्हा ‘व्हिटॅमिन ए- समूह’ आकुंचन पावतात. नंतर ‘आयआरबीपी’ या समूहांना सरळ होऊन सामान्य कार्य करण्यात मदत करते.

सर्व पृष्ठवंशीय प्राण्यांच्या डोळ्याला ‘दृष्टी’ मिळते, ती या ‘आयआरबीपी’च्या कार्यामुळेच. पण हे ‘आयआरबीपी’ आले कुठून? कॅलिफोर्निया विद्यापीठातील रेणवीय जीवशास्त्र विभागाचे प्राध्यापक चिन्मय कल्लुराया व अन्य तिघा जीवशास्त्रज्ञांचा शोधनिबंध याच महिन्यात, १० एप्रिल २०२३ रोजी ‘प्रोसीडिंग्ज ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस’ या विज्ञान-संशोधन पत्रिकेत प्रकाशित झाला, त्यातून ‘आयआरबीपी’चा उलगडा झाला. तो असा की, आयआरबीपी हासुद्धा उत्क्रांतीचाच टप्पा आहे! काही बॅक्टेरियांमध्ये आढळणारे ‘पेप्सिडेस’ नावाचे जनुक ५० कोटी वर्षांपूर्वी सर्व जिवंत पृष्ठवंशीयांच्या पूर्वजांत हस्तांतरित झाले होते. पेप्सिडेस जनुकामध्ये काही रेणवीय बदल झाले त्यामुळे ‘आयआरबीपी’ हे – प्रकाश-संवेदनशील रेणूंना एकत्र आणणारे- विशेष प्रोटीन तयार करणारे जनुक तयार झाले. अशाप्रकारे, आपली पाहण्याची क्षमता बॅक्टेरियापासून झालेल्या ‘उत्क्रांती’वर अवलंबून असते.

पुन्हा डार्विनचे शब्द आठवून पाहा : “…बदलत्या जीवनाच्या परिस्थितीत एखाद्या प्राण्याला अवयवामध्ये काही बदल जर उपयोगी पडत असतील, तर नैसर्गिक निवडीद्वारे परिपूर्ण आणि जटिल डोळा तयार होऊ शकतो यावर विश्वास ठेवण्यात काहीही अडचण नाही…” – हे त्या वेळी डार्विनचे अनुमान होते. पण ते आता सिद्ध होत आहे.

विचारशक्तीला चालना

शाळांमध्ये उत्क्रांतीच्या शिकवणीवर कुऱ्हाड पडल्यास आपल्या क्षमता कशा वाढल्या, अवयवांचा विकास कसा झाला आणि पिढ्यांमध्ये फरक का पडतो, याबद्दलच्या तथ्यांमध्ये रस घेऊन त्यांचा अभ्यास करणे शक्य होणार नाही. आपल्या सभोवतालच्या सजीवांमध्ये एक विलक्षण विविधता आपल्या लक्षात येते. ही विविधता कशी आली? आपण जीवांचे साम्य कसे स्पष्ट करू शकतो ? हे सारे प्रश्न उत्क्रांतीवादाशी संबंधित आहेत.

किशोरवयीन मुलांना उत्क्रांतीवादाचा अभ्यास करू न देणे म्हणजे संबंधित प्रश्न विचारण्याची त्यांची क्षमता मर्यादित करणे आणि त्यावर उत्तरे शोधण्यासाठी साकल्याने विचार करण्याची त्यांची क्षमताच खुंटवण्यासारखे ठरेल. मुलांना उत्क्रांतीची संकल्पना शिकण्यास सक्षम करणे हे केवळ जीवशास्त्रातला धडा म्हणूनच नव्हे, तर विचारशक्तीला चालना कशी द्यायची याचा वस्तुपाठ म्हणूनही आवश्यक आहे.

आजची मुले ज्या परिस्थितीचा सामना करत आहेत आणि ज्या अनुभवांना तोंड देत आहेत, ते सारे त्यांच्या पालक किंवा शिक्षकांच्या जगापेक्षा खूप वेगळे आहेत. या मुलांच्या जगात बदल झपाट्याने, सातत्याने घडतो आहे. त्यांच्यासाठी, ‘बदल हा धोका म्हणून न पाहता संधीचा कारक म्हणूनही पाहाता येतो’ – हा उत्क्रांतीच्या धड्यातील एक मूक संदेश आहे. विद्यार्थ्यांना उत्क्रांती शिकण्यापासून वंचित ठेवणे म्हणजे त्यांना एका शक्तिशाली संकल्पनेपासून वंचित ठेवणे आहे, जी आपल्या जीवनाबद्दलच्या समजामध्ये उत्कृष्ट सुव्यवस्था आणि सुसंगतता आणते.

‘अमेरिकन असोसिएशन फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स’ या संस्थेने वैज्ञानिक साक्षरतेसाठी काही पायाभूत अपेक्षा (बेंचमार्क) प्रकाशित केल्या, त्यात “सर्व मुलांनी नैसर्गिक निवडीद्वारे उत्क्रांतीची संकल्पना समजून घेणे, त्याचे समर्थन करणारे पुरावे आणि युक्तिवाद आणि इतिहासातील त्याचे महत्त्व समजून घेणे हे शैक्षणिक ध्येय असले पाहिजे”- ही अपेक्षादेखील आहे. लक्षात घ्या- आपल्या मनुष्यबळाची स्पर्धा अमेरिकेशीही आहे… अशा काळात आपण जाणूनबुजून आपल्या मुलांच्या ज्ञानाची वाढ खुंटवणार का?

लेखक ‘राष्ट्रीय विज्ञान अध्यासना’चे प्राध्यापक असून कोलकात्यातील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल जिनॉमिक्स’शी स्थापनेपासून संबंधित आहेत.