इथे परंपरांचे डोळस पालन आहे आणि प्रायोजकांना अवास्तव महत्त्व नाही…

अनिल दत्तात्रेय साखरे

विम्बल्डनचे दिवस आता सुरू झालेले आहेत. दरवर्षी जून महिन्यामध्ये ब्रिटिश उन्हाळा सुरू होतानाच्या काळात सुरू होणारा हा टेनिसप्रेमींचा जागतिक शाही सोहळा, १४५ वर्षाची भव्य परंपरा असलेला. जूनच्या आपल्या अंगाखांद्यावर खेळू देणाऱ्या त्या हिरव्या खेळपट्ट्या, त्यातही जगभरात आपला मान-मरातब आणि आब राखून असलेले- यंदा शताब्दी साजरी करणारे विम्बल्डन चे शाही ‘सेंटर कोर्ट’ यांचा हा सोहळा जुलै महिन्यातील दुसऱ्या शनिवारी आणि रविवारी रंगणारे अंतिम टेनिस सामने, विजयी खेळाडूंचे होणारे भावभावनांचे प्रदर्शन आणि अत्यंत शिस्तबद्ध रीतीने पण आपले राजशिष्टाचार,परंपरा सांभाळून साजरा होणारा पुरस्कार सोहळा, त्यामध्ये उपस्थित राज परिवारातील सदस्य आपल्या पदाचा कुठलाही बडेजाव दाखवत नाहीत, की सुरक्षारक्षक, पोलिसांची धावपळ नाही, मैदानावरील खेळाडूंचे पसरलेले चेंडू जमा करणं आणि त्यांना सर्विस करण्यासाठी चेडू देत राहणारे अशा बॉल बॉईज वा गर्ल्सशी सहज रीतीने, पण शालीनतेने संवाद करणारे राज परिवारातील सदस्य बघितले की, आमच्या येथील आमदार खासदारांच्या बडेजावाची कल्पना येते.

१८७७ पासून ते आजपर्यंत गवताच्या हिरवळीवर ग्रास कोर्टवर हट्टाने म्हणा किंवा ब्रिटिश परंपरेनुसार खेळवली जाणारी, जगभरच्या चार ‘ग्रँड स्लॅम स्पर्धां’मधील एक जागतिक आणि मानाची स्पर्धा म्हणजे विम्बल्डन. पूर्वीच्या काळी बंद स्टेडियममध्ये टेनिस सामने होत, १९६८ पूर्वी फक्त हौशी खेळाडूंना या स्पर्धेमध्ये भाग घेता येत असे, पण त्यानंतर जगभरातील सर्वच व्यावसायिक खेळाडूंना पण या स्पर्धेमध्ये भाग घेण्याची परवानगी मिळाली, त्यामुळे देश-विदेशातील सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेमध्ये भाग घेतात, त्यामुळे खेळाचा दर्जासुद्धा उंचावतो आणि प्रत्येक खेळाडूसाठी आणि त्यांच्या देशासाठी या स्पर्धेमध्ये विजय मिळवणे एक मोलाची आणि अभिमानाची गोष्ट ठरते. त्यावेळी विजेत्या खेळाडूना पुढील वर्षी थेट प्रवेश मिळत असे, १८८४ पासून प्रथम महिलांसाठी सिंगल्स आणि मग डबल सामने सुरू झाले.

जुलै महिना इंग्लंडमध्ये उन्हाळा सुरू होण्याचा कालावधी, त्यावेळी इंग्लंडमध्ये स्ट्रॉबेरीचे उत्पादनही तयार झालेले असते, त्यामुळे या स्पर्धेच्या वेळी स्ट्रॉबेरी क्रीम खाणे हा एक आनंदाचा आणि उत्सवाचा भाग ठरलेला आहे. इतका की, मागील वर्षी विम्बल्डन स्पर्धेच्या काळात जवळपास ४० हजार किलो स्ट्रॉबेरी आणि १५ हजार किलो क्रीम विकले गेले ! इंग्लंडचे राजघराणे या स्पर्धेशी सुरुवातीपासूनच जोडले गेले. राज परिवाराकडून स्पर्धेला प्रायोजकत्व मिळाले. त्यामुळे स्पर्धेच्या नियम, अटींप्रमाणेच काही जुन्या परंपरासुद्धा कसोशीने पाळल्या जातात, स्पर्धेसाठी खेळाडूंना पांढऱ्याच रंगाचे कपडे वापरावे लागतात, स्टेडियसाठी गर्द हिरवा आणि जांभळा याच दोन रंगांचा वापर आजही होतो. विम्बल्डनमध्ये इतर खेळांप्रमाणे खेळाडूंना आपल्या अंगावरील वेशभूषेत कुठल्याही ‘ब्रँड’चा वापर करता येत नाही, अगदी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्याही बंद खोक्यात, ब्रँड दिसू नये अशा बेताने ठेवल्या जातात. आजच्या जाहिरात युगामध्ये पण विम्बल्डन स्पर्धेत मोजक्या दोन प्रायोजकांची मोजकीच जाहिरात केली जाते, इतर खेळाप्रमाणे स्टेडियमभर वाटेल त्या जाहिराती झळकावल्या जात नाहीत, हीदेखील ब्रिटिशांची एक खासियत. हिरव्या आणि जांभळ्या रंगाचे कपडे घातले बॉल बॉईज आणि गर्ल्स हाही एक कुतूहलाचा विषय. खेळाडूंच्या हातातून सुटलेला बॉल त्यांना आणून देणे हे त्यांचे काम, त्यासाठीच्या त्यांच्या हालचाली अत्यंत शिस्तबद्ध, वागणे कोणाच्याही नजरेत येऊ न येण्यासारखे अलिप्त. त्यांची निवड इंग्लंडच्या शाळाकॉलेजांतून केली जाते आणि स्पर्धेच्या सहा महिने आधीपासूनच प्रशिक्षण सुरू होते.

परंपरा आहे, पण इथे बडिवार नाही म्हणून परंपरेचा काचदेखील नाही. उलट, परंपरा आणि आधुनिकता यांचा मिलाफ विम्बल्डनमध्ये दिसतो. १९०७ पासून स्टेडियममध्ये राज परिवारातील लोकांना स्पर्धा बघण्यासाठी रॉयल बॉक्स बनवण्यात आला, त्यासोबतच राजघराण्यातील कोणी व्यक्ती स्पर्धेला हजर असतील तर त्यांना वाकून अभिवादन करण्याची परंपरा होती, पुढे २००३ चाली प्रिन्स विल्यम्स यांनी ही प्रथा बंद पाडून, केवळ राणी किंवा राजा हजर असतील तरच त्यांना मानवंदना देण्याची प्रथा चालू ठेवली. विम्बल्डनचे प्रेक्षकही खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अगदी मोजून टाळ्या वाजवणारे, पाऊस सुरू झाला तरी छत्र्या उघडून शांत बसणारे, फुटबॉलसारखा विनाकारण कडकडाट नाही ,गोंधळ नाही… खेळाचा पूर्ण आनंद घेऊन आपली खानदानी क्रीडासंस्कृती दाखवून देणारे.

विम्बल्डनसारखी क्रीडांगणे कधीच कोणाला ‘नशिबाने’ विजयश्री अर्पण करत नाहीत. खेळाडूच्या मानसिक, बौद्धिक, शारीरिक क्षमतेची आणि चिकाटीची कसोटीच इथे लागते. विम्बल्डनचा चंदेरी चषक आणि रोझवॉटर डिश आपल्या मजबूत हातात पकडून, चुंबन घेऊन दोन्ही हात उंच उभारून विजयाची ललकारी यंदा कोण देणार, याची प्रतीक्षा आहेच. पण खेळातले विजेते बदलत राहिले तरी, मूल्ये बदलत नाहीत हे विम्बल्डनने ओळखले आहे.

क्रिकेट, फुटबॉल आदी खेळांचे बेसुमार व्यापारीकरण आणि या खेळांच्या संघटनांतला सत्ता आणि पैशाचा खेळ आपण गेल्या दोन दशकांत पाहिलेला आहेच. पण विम्बल्डन बदलत नाही, हेही दरवर्षी दिसत राहाते आणि क्रीडासंस्कृतीचे खानदान म्हणजे काय याचीही आठवण त्यामुळे कायम राहाते.

anilsakhare5499@gmail.com

Story img Loader