माणिकराव खुळे (निवृत्त शास्त्रज्ञ, भारतीय हवामान विभाग)
यंदा म्हणावी तशी थंडी नाही, असे म्हणताना किमान थंडी जाणवू लागली आहे, याविषयी समाधान मानावे, अशी जागतिक हवामानाची स्थिती आहे. पंजाब, हरियाणातील वेगाने वाहणारे वारे वक्राकार होत महाराष्ट्रात शिरले, तरच महाराष्ट्रातील तापमानात लक्षणीय घट संभवते. अन्यथा महाराष्ट्रात थंडीच्या कडाक्याऐवजी साधारण थंडी जाणवेल..
दक्षिण भारतातील केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तसेच पुदुच्चेरी, काराईकलमध्ये जवळपास गेले ७५ ते ८० दिवस सुरू असलेल्या ईशान्य मान्सूनचा जोर संक्रांतीदरम्यान ओसरला. तेथील हिवाळी पावसाचा हंगाम या वर्षी १४ जानेवारीला आटोपला आहे. तसा हा मान्सून डिसेंबरमध्येच निघून जावयास हवा. पण या वर्षी उशीर होत आहे. तेथील मान्सून बाहेर पडला रे पडला, की महाराष्ट्रातही थंडीसाठी पूरक वातावरण निर्माण होते. १४ जानेवारीला, ईशान्य मान्सूनच्या निर्गमनातून, विषुववृत्त समांतर पूर्वेकडून येणाऱ्या हंगामी ‘पुरवी’ वाराझोताचा प्रभावही त्यामुळे कमी होईल. आणि विषुववृत्तादरम्यान पूर्व-पश्चिम हवेचा कमी दाब असलेले ‘आंतरकटिबंधीय अभिसरणीय परिक्षेत्र’ (इंटर ट्रॉपिकल कॉनव्हर्जिग झोन) विषुववृत्तावरील (शून्य डिग्री अक्षवृत्त) त्याच्या सरासरी जागेपासून काहीसे दक्षिणेकडे म्हणजे १० अंश दक्षिण अक्षवृत्तापर्यंत (दक्षिण गोलार्धात) सरकेल. त्यामुळे महाराष्ट्रातही हवेच्या उच्च दाबाच्या टेकडयांना छेदून जाणारी काल्पनिक उंचावरील रेषा म्हणजे पोळही (रिज) दक्षिण भारताकडे सरकेल.
हेही वाचा >>> भारतीय संरक्षणदलांनी पुढेच जावे; पण जरा मागचेही पाहावे…
काश्मीरमध्ये ‘चालाई कलान’ बर्फवृष्टीविना
सरकलेल्या ‘पोळ’मुळेच उत्तरेकडून महाराष्ट्रात घुसणाऱ्या थंड वाऱ्यांसाठी हवेच्या उच्च दाबरूपी काल्पनिक भिंतीचा अडथळा दूर होऊन महाराष्ट्रात काहीशी थंडी वाढत आहे. येथे ‘काहीशी थंडी’ असा उल्लेख केला, कारण सध्या अस्तित्त्वात असलेल्या ‘एल-निनो’च्या प्रभावामुळे, एकापाठोपाठ वाहणारे झंझावात हे कमी तीव्रतेनेच वाहत आहेत. त्यांचा कमकुवतपणा, तसेच दक्षिण अक्षवृत्ताकडे म्हणजे देशात जम्मू, काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये शिरणाऱ्या ‘सैबेरिअन अतिथंड हवेच्या लोटा’अभावी काश्मीरमध्ये सध्या सुरू असलेला ४० दिवसांचा (२१ डिसेंबर ते ३१ जानेवारी) ‘चालाई कलान’चा उच्च थंडी व बर्फ पडण्याचा हंगामी कालावधीही बर्फवृष्टीविना कोरडा जाताना दिसत आहे. एकूणच उत्तर भारतातही सध्या थंडीची तीव्रता कमीच आहे. म्हणूनच महाराष्ट्रातही कडाक्याच्या ऐवजी साधारण थंडी जाणवेल, असा अंदाज आहे.
सणांचे प्रयोजन
निसर्ग कालक्रमणाप्रमाणे २२ डिसेंबर या दिवशी पृथ्वीच्या दक्षिण टोकाकडील साडेतेवीस दक्षिण अक्षवृत्ताचा म्हणजे पृथ्वीचा मकरवृत्ताचा जास्तीत जास्त भाग हा सूर्यासमोर असतो आणि दक्षिण गोलार्धातील टोकाकडचा हा भाग १५ जानेवारीपर्यंतच्या (२२ डिसेंबर ते १५ जानेवारी) २५ दिवसांच्या संक्रमण कालावधीत मकरवृत्तावरच म्हणजे साडेतेवीस दक्षिण अक्षवृत्तावरच जाणवतो. या महिनाभराच्या कालावधीला ‘झुंझुरमास’, ‘धनुर्मास’, ‘धुंधुर्मास’ किंवा ‘शून्यमास’ही म्हणतात. म्हणूनच थंडीसाठी पोषक अशा शाकाहारी खाद्याचा आहारात समावेश करून वेगळया पद्धतीने हा कालावधी साजरा केला जातो. सूर्याचा धनू राशीत प्रवेश होतो म्हणून ‘झुंझुरमासा’बरोबर ‘धनुर्मास’ही म्हणतात. मात्र संक्रांतीच्या दिवशी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो. म्हणून या दिवसाला मकर संक्रांत म्हणून संबोधले जाते.
भौगोलिक रचनेमुळे पंजाब, हरियाणा या राज्यांतील रहिवासी तेथील अतिथंड हवामानाला व एकंदरीत जनजीवनाला कंटाळलेले असतात. तिथे संक्रांतीदरम्यान शेकोटी किंवा आगटी लावतात, तिला तेथील स्थानिक ‘लोहोरी’ म्हणतात. या लोहोरीभोवती सारे एकत्र येतात. थंडीचा त्रास टाळून तिचा उपभोग घ्यावा, हा यामागचा उद्देश असतो. अशा थंडीला सुरुवात होते म्हणून ‘लोहोरी’ साजरी करतात. महाराष्ट्रात शेतकऱ्यांची शेतात साजरी होणारी ‘येळ’ (वेळ) अमावस्या याच कालावधीत येते. शास्त्रीयदृष्टया या कालावधीतील सकाळच्या वेळेस हवेत प्राणवायूचे प्रमाण अधिक असते. ओझोनचा थर उत्तम असतो. म्हणून तर आहारविहार जाणीवपूर्वक केला जातो. त्या दिवसानंतर म्हणजे मकरसंक्रांतीनंतर पृथ्वीचा कल हळूहळू विषुववृत्ताकडे वाढून आणि तो ओलांडून पुन्हा उत्तर गोलार्धातील भाग सूर्यासमोर अधिक येणे (उत्तरायण) वाढत जाते.
‘सैबेरिअन चिल’ व उत्तरेतील थंडी
आता या नेहमीच्या कालचक्रानुसार वर स्पष्ट केल्याप्रमाणे, निसर्गनिर्मित घडामोडींबरोबरच, उत्तर ध्रुवावरील बर्फाळ, आक्र्टिक, अतिथंड हवेचे उच्च दाब अक्षवृत्त वर्तुळीय पट्टाही त्यामुळे दक्षिणेकडे म्हणजे रशियन अक्षवृत्ताकडे सरकतो. त्यामुळे थंड हवा ही भारताकडे लोटली जाते. परिणामी आपल्याकडे जम्मू, काश्मीरमध्ये हवामान अतिथंड होते. त्या भागात बर्फवृष्टी होते. पश्चिम झंझावाताबरोबरच या ‘सैबेरिअन चिल’चे स्थलांतर हे उत्तरेकडे थंडी वाढण्याचे एक प्रमुख कारण असते. म्हणून तर पंजाब, हरियाणा आणि राजस्थानच्या काही भागांत सध्या सकाळच्या वेळी धुक्याची चादर, तर काही भागात अति नव्हे, पण थंडीची लाट जाणवत आहे.
सध्या या भागात पहाटेचे किमान तापमान २ ते ५ अंशांदरम्यान आहे. पहाटेचे हे किमान तापमान सरासरीपेक्षा १ ते ४ अंशांनी कमी झाले आहे. याच पंजाब, हरियाणा, राजस्थान भागात पश्चिम दिशेकडून पूर्वेकडे ताशी २५० ते २८० किमी वेगाने वाऱ्याचे झोत वाहत आहेत. त्यातील काही वारे वक्राकार होऊन महाराष्ट्रात शिरले, तर पुढील काही दिवसांत येथील तापमानातही लक्षणीय घट होईल, अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा >>> राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने शिक्षक प्राध्यापकांचे काम कमी होईल की वाढेल?
‘एल-निनो’चा विसर?
सकाळी, संध्याकाळी राज्य धुक्याच्या दाट चादरीत लपेटले जात आहे. त्यामुळे दृश्यमानता २५ ते ५० मीटरवर येऊन ठेपली आहे, तर पुढील पाच दिवसांत काही भागांत ‘भू-स्फटीकरणा’चीही शक्यता नाकारता येत नाही. प्रसारमाध्यमांद्वारे सध्या महाराष्ट्रातील थंडीबाबतचा ओरडा कानी येत आहे. ‘सध्या थंडी जाणवते आहे’ असे जरी वाचनात किंवा कानावर येत असले, तरी सध्या पहाटेचे व दुपारचे, असे दोन्हीही किमान व कमाल तापमान हे अजूनही सरासरी तापमानाच्या पातळीत नसून, अधिकच आहे. खरे तर थंडी चाचपण्याच्या नादात आपणही चालू कालावधी हा ‘एल-निनो’चा आहे, हे विसरत आहोत. आणि म्हणून तर आपण सहज म्हणतो, ‘यंदा म्हणावी तशी थंडी नाही!’ कशी असेल? जागतिक पातळीवरील सध्या सुरू असलेल्या वातावरणीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जशी थंडी असावी तशीच आहे. थंडीविषयी चर्चा होत आहे, हेच खूप आहे, हेही ध्यानात घ्यावे, असे वाटते.
त्यातही आता, उद्या आणि परवा म्हणजे बुधवार-गुरुवारी (१७-१८ जानेवारी) विदर्भातील गोंदिया आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांत पुन्हा काहीसे ढगाळ वातावरण असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणून तेथील थंडी दोन दिवसांकरिता जाईल. संक्रांतीदरम्यानच्या या काळात थंडी जाणवत असली, तरी सध्या १७ ते २१ जानेवारीपर्यंतच्या पुढील पाच दिवसांत महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान हे १२ अंश (सरासरीइतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या अंशाने अधिक), तर दुपारचे कमाल तापमान २८-३० अंश (म्हणजे सरासरीपेक्षा एखाद्या अंशाने अधिक) दरम्यान असू शकते, असे वाटते.
महाराष्ट्रात रब्बी हंगामातील भरड धान्ये, शेतपिके ही या कालावधीत फलधारणेच्या म्हणजे दाणा भरण्याच्या अवस्थेत, तर काही हुरडा अवस्थेत असतात. या कालावधीत पिकांच्या मुळांना वाढीसाठी जमिनीखाली मोकळी हवा व जमिनीच्या वर निरभ्र आकाशातून प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेतून अन्नद्रव्य निर्मितीसाठी स्वच्छ सूर्यप्रकाश मिळणे गरजेचे असते. म्हणून इतर प्रणालीतून वातावरणीय अडथळयाविना नेहमी असतो तसा स्वच्छ थंडीचा काळ शेतीसाठी महत्त्वाचा मानला जातो.
manikkhule@gmail.com