अनघा शिराळकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय सैन्यात भरती होण्यास स्त्रियांना मज्जाव असण्यापासून भारतीय नौदलातील महिला लेफ्टनंट कमांडर्सनी जागतिक महासागर परिक्रमा करण्यापर्यंतचा प्रवास प्रेरक आणि थरारकही आहे. नौदल दिनानिमित्त (४ डिसेंबर) महिलांच्या या वाटचालीचा वेध…

स्त्रियांनी सर्वच क्षेत्रांत आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. संरक्षण क्षेत्रही त्याला अपवाद नाही. भारताचा इतिहास साक्ष देतो की स्त्रिया उत्तम राज्यकारभार आणि राज्याचे संरक्षण करू शकतात. अनेक स्त्रियांनी राज्यकारभार तर केलाच आणि त्याबरोबर प्रत्यक्ष सशस्त्र युद्धातही शत्रूंशी दोन हात केले. त्यासाठी त्यांनी रीतसर शिक्षण व खडतर प्रशिक्षणही घेतले होते. शस्त्र चालविण्याचा सराव केला होता. ब्रिटिश राजवटीत भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातसुद्धा अनेक स्त्रिया सक्रिय होत्या.

ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय संरक्षण क्षेत्रात प्रथम ‘सैन्यदलातील शुश्रूषा (नर्सिंग) सेवा’ सुरू झाली. पहिले महायुद्ध (१९१४-१८) आणि दुसरे महायुद्ध (१९३९-४५) या काळात सुमारे ३५० स्त्रिया सैनिकांची शुश्रूषा करीत होत्या. यामध्ये एस. एस. कौला, नूर इनायत खान, कल्याणी सेन या तीन स्त्रियांची कामगिरी विशेष होती. या युद्धात काही स्त्रिया धारातीर्थी पडल्या, काहींना तुरुंगवास भोगावा लागला तर काही बेपत्ता झाल्या. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांविरुद्ध नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखालील ‘आझाद हिंद फौजे’मध्ये ‘राणी झांशी रेजिमेंट’ ही फक्त स्त्रियांची पलटण होती. त्यामध्ये लक्ष्मी स्वामिनाथन व जानकी देवर या दोघी सेनापती होत्या.

हेही वाचा >>> ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ पाळला गेलाच पाहिजे…

१९५० सालच्या संरक्षण कायद्याप्रमाणे भारतीय सैन्यात भरती होण्यास स्त्रियांना मज्जाव होता. १ नोव्हेंबर १९५८ पासून ‘सैन्य संस्था’ हा स्त्रियांसाठीचा पहिला अधिकृत विभाग तयार झाला. पदवीधर स्त्रियांना भारतीय सैन्यात अधिकारी पदावर भरती करण्याचा ऐतिहासिक निर्णय १९९२ साली घेतला गेला. त्याची अंमलबजावणी १९९३ साली पाच वर्षांसाठी ‘विशेष भरती योजने’अंतर्गत होऊ लागली. कालांतराने या योजनेचे रूपांतर ‘कमी कालावधीसाठीची भरती’ (‘शॉर्ट सर्व्हिस कमिशन’)मध्ये झाले. ही भरती तीन प्रकाराने होते, (१) लोकसेवा आयोगामार्फत (२) लोकसेवा आयोगाविना आणि (३) तांत्रिक पद्धतीने. लोकसेवा आयोगामार्फत केलेली भरती ही फक्त अतांत्रिक (नॉन टेक्निकल), लोकसेवा आयोगाविना होणारी भरती ही नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) व जज अॅडव्होकेट जनरल (जेएजी) मार्फत होणारी असते. तांत्रिक भरती ही अभियंता पदवीधारकांसाठी असते. २००८ साली सैन्यदलातील कायदा व शिक्षण या विभागांसाठी कायम स्वरूपाच्या अधिकार पदावर नियुक्ती होऊ लागली. ही भरती जज अॅडव्होकेट जनरल (जेएजी) आणि आर्मी एज्युकेशन कॉर्प्स या प्रवाहात (स्ट्रीम) झाली.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये पदवीधर होण्यासाठी फक्त मुलांनाच प्रवेश मिळत असे. मुलींसाठी प्रवेश परीक्षाच नव्हती. त्यांची कनिष्ठ पदांसाठी थेट तर अधिकारी पदांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरती होत असे. हा भेद नष्ट व्हावा, यासाठी २०२० साली एक याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने २०२१या शैक्षणिक वर्षापासून मुलींना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या प्रवेश परीक्षेस बसण्याची व उत्तीर्ण मुलींना प्रवेश देण्याची परवानगी दिली. पहिली तुकडी २०२५ या शैक्षणिक वर्षी प्रशिक्षण पूर्ण करेल.

भारतीय सेनेतील अधिकारी वर्गातील पुरुषांची संख्या आहे १२ लाख तर स्त्रियांची संख्या आहे सहा हजार ८००. गेल्या पाच वर्षांपासून स्त्रियांचा सहभाग वाढत आहे. नौदलात अनेक प्रकारच्या सेवांसाठी स्त्रियांची विविध पदांवर नियुक्ती केली जाते. अलीकडच्या अहवालानुसार भारतीय संरक्षण क्षेत्रात भूदलात ३.८० टक्के, हवाई दलात १३.०९ टक्के तर नौदलात ६ टक्के स्त्रिया आहेत.

कमांडर ही रँक मिळविणाऱ्या डॉ. बार्बरा घोष या भारतीय नौदलातील पहिल्या महिला अधिकारी आहेत. डॉ. बार्बरा या वैद्याकीय अधिकारी म्हणून कायमचे कमिशनिंग मिळालेल्या पहिल्या महिला आहेत. भारतीय सैन्यातील लेफ्टनंट जनरल हे दुसऱ्या क्रमांकाचे पद मिळवणाऱ्या व नौदलातील व्हाइस अॅडमिरल हे पद मिळवणाऱ्या पुनिता अरोरा या पहिल्या महिला. त्याआधी त्या पुण्यातील सशस्त्र सेना वैद्याकीय महाविद्यालय (आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज) येथील पहिल्या महिला कमांडट आणि सैन्यासाठी वैद्याकीय सेवेच्या (आर्म्ड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेस) अतिरिक्त महासंचालक (अॅडिशनल डायरेक्टर जनरल) होत्या. गरजेप्रमाणे दल बदलण्याची संधी फक्त सशस्त्र सेना वैद्याकीय महाविद्यालयच देते. पुनिता अरोरा यांचा लेफ्टनंट जनरल ते व्हाइस अॅडमिरल हा प्रवास थक्क करणारा आहे. थ्री स्टार रँक मिळविणाऱ्या भारतीय सेनेतील महिला अधिकाऱ्यांपैकी त्या एक आहेत.

लेफ्टनंट कुमुदिनी त्यागी आणि सबलेफ्टनंट रिती सिंग यांची १७ जणांच्या तुकडीमध्ये नौदलात हवाई ऑब्झर्व्हर म्हणून निवड झाली. त्या सर्वांना ‘विंग्ज’ ही उपाधी देऊन गौरविण्यात आले. सबलेफ्टनंट शुभांगी स्वरूप या भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला पायलट. डॉरनिअर २२८ या खास विमानाने टेहळणी करण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर होती. व्हाइस अॅडमिरल सर्जन आरती सरीन या तिसऱ्या आणि व्हाइस अॅडमिरल सर्जन शैला मथाई या थ्री स्टार रँक मिळवणाऱ्या चौथ्या महिला आहेत.

लेफ्टनंट नवजोत कौर यांना पहिली महिला रसद पुरवठा अधिकारी म्हणून मध्य हिंदी महासागरावर आयएनएस कार्डीफ येथे तैनात केले. त्याचप्रमाणे लेफ्टनंट करिष्मा शिरवळे या पहिल्या महिला आहेत ज्यांची कॅम्पबेल उपसागरातील आयएनएस बाझ येथे रसद पुरवठा अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मुख्य सैन्य तळापासून दूर असलेला हा अंदमानच्या समुद्रातील दक्षिणेकडील हद्दीचा शेवटचा तळ आहे. कामोरता बेटांवर असलेल्या अंदमान आणि निकोबार कमांड या संयुक्त सेवांच्या अंतर्गत हे नौदल तळ कार्यरत आहेत. शत्रूवर टेहळणी करण्यासाठी दक्षिणेकडील या भागात गोळीबार करण्याचा नियमित सराव करावा लागतो. लेफ्टनंट कमांडर प्रेरणा देवस्थळी या भारतीय नौदलाच्या युद्धनौकेच्या पहिल्या प्रमुख अधिकारी झाल्या. रानीपेट जिल्ह्यातील अरक्कोनम येथील नौदल हवाई स्टेशन राजली येथे ७ जून २०२४ रोजी पार पडलेल्या परेडमध्ये सबलेफ्टनंट अनामिका बी. राजीव या भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला हेलिकॉप्टर पायलट ठरल्या.

नौदलातील सहा महिलांनी ‘नाविका सागर परिक्रमा’ ही जागतिक महासागर परिक्रमा २०१७-२०१८ या वर्षात केली. यामध्ये वर्तिका जोशी, स्वाती पाथ्रापल्ली, प्रतिभा जामवाल, पायल गुप्ता, ऐश्वर्या बोडापत्ती आणि विजया देवी शौरग्राकपम या सहा महिला लेफ्टनंट कमांडर्स सहभागी होत्या. या परिक्रमेची तयारी तीन वर्षे सुरू होती. २०१४ साली ५०० महिला नौदल अधिकाऱ्यांमधून या सहा जणींची निवड झाली होती. या निवड झालेल्या सहाजणींना तीन वर्षे अतिशय खडतर प्रशिक्षण घ्यावे लागले. त्यामध्ये जहाज चालक, प्लम्बर, इंजिनीअर, डॉक्टर, स्वयंपाकी इत्यादी कामांचेही प्रशिक्षण समाविष्ट होते. मूलभूत सैद्धांतिक अभ्यासाचे प्रशिक्षण मुंबई आणि केरळ येथील विविध नौदल प्रशिक्षण केंद्रांत देण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे २०१६ साली म्हादेई नावाच्या तारिणीवर (नेव्हल सेलिंग वेसल- आयएनएसव्ही) प्रत्यक्ष अनुभवाचे प्रशिक्षण कॅप्टन दिलीप दोंदे यांनी दिले. कॅप्टन दोंदे यांनी एकट्याने अशा प्रकारची परिक्रमा केली होती. त्यानंतर कॅप्टन अतुल सिन्हा यांच्या देखरेखीखाली गोवा ते दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन अशी २२ हजार समुद्र मैलांची सफर पोरबंदर, मुंबई, कारवार, मॉरिशस मार्गे ४३ दिवसांत पूर्ण केली. ही सफर म्हणजे प्रत्यक्ष समुद्र सफरीचे अतिशय पद्धतशीरपणे दिलेले प्रशिक्षणच.

सहा महिला लेफ्टनंट कमांडर्सची नाविका सागर ही परिक्रमा १० सप्टेंबर २०१७ रोजी सुरू झाली. २५४ दिवसांत २२ हजार ६०० समुद्र मैलांचा म्हणजेच ४०,००० किलोमीटरचा प्रवास केला. त्या काळात ही तारिणी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फाकलँड आणि दक्षिण आफ्रिका येथील पोर्ट्स्, दोन वेळा विषुववृत्त आणि अटलांटिक, पॅसिफिक आणि हिंदी महासागर हे तीन महासागर पार करून २१ मे २०१८ रोजी गोव्याला परत आली. या संपूर्ण प्रवासात अनेक नैसर्गिक आपत्ती व अडथळ्यांना तसेच तांत्रिक समस्यांना तोंड द्यावे लागले. हवामान, पर्यावरण व इतर बाबींच्या नोंदी एकत्र केल्या गेल्या. अनेक देशांनी या संघाचा गौरव केला. परम विशिष्ट सेवा पदक आणि वीरचक्रप्राप्त व्हाइस अॅडमिरल मनोहर आवटी यांच्या प्रेरणेने ही नौदल महिला संघाची परिक्रमा पार पडली. या महिला संघाला राष्ट्रपतींच्या हस्ते नारीशक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले. नॅशनल जिऑग्राफिक व भारतीय नौदल यांच्या संयुक्त प्रयत्नांतून या परिक्रमेवर माहितीपटही तयार केला गेला.

दुसरी नाविका सागर परिक्रमा भारतीय नौदल तारिणीने २४ नोव्हेंबर २०२४ रोजी ऑस्ट्रेलियाच्या फ्रेमंटल येथून सुरू झाली. भारतीय नौदलाच्या दोन अनुभवी महिला अधिकाऱ्यांसह लेफ्टनंट कमांडर दिलना के. आणि रूपा ए. ही परिक्रमा पार पाडत आहे. गोवा येथे नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी २ ऑक्टोबर २०२४ रोजी या परिक्रमेसाठी झेंडा दाखवला. या परिक्रमेच्या आठ महिन्यांच्या कालावधीत, सहभागी महिला अधिकारी केवळ पवन ऊर्जेवर अवलंबून राहून, इतर बाह्य साहाय्याशिवाय २१ हजार ६०० सागरी मैलांचा खडतर प्रवास करतील.

नौदलातील महिला अधिकाऱ्यांच्या दोन्ही नाविका सागर परिक्रमा ही भारताच्या नौदल इतिहासातील महत्त्वाची कामगिरी आहे. या परिक्रमा म्हणजे महिला सबलीकरण आणि आत्मनिर्भरता या भारताच्या धोरणांचे उत्तम उदाहरण आहे.

anaghashiralkar@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women empowerment in indian navy women power in indian navy women in defence forces zws