जगातील सर्व धर्माचे संस्थापक पुरुष आहेत. असा धर्म वा पंथ नाही की जो स्त्रीने स्थापन केला आहे. म्हणून पुरुषनिर्मित सर्व धर्मांनी स्त्रियांना आचारण, धर्म, नीती वगैरे सांगितले आहे. दुसऱ्या बाजूने विचार केल्यास प्रत्येक धर्म पुरुष वर्चस्ववादी आहे. कारण कुठल्याही धर्माने स्त्री पुरुष समानता सांगितली नाही. ही बाब पुरुषांचे वर्चस्व दर्शविणारी आहे. स्त्री ही पुरुषांपेक्षा श्रेष्ठ सोडाच, बरोबरीची असते, असे एकाही धर्माने सांगितलेले नाही.
जे नवे धर्म निघतात त्यातही आम्ही स्त्रीला समान दर्जा देऊ असे म्हटलेले दिसत नाही. ख्रिश्चन, इस्लाम, हिंदू या सर्व धर्मात स्त्रीला दुय्यम स्थान आहे. बुद्ध धम्म चातुर्वर्ण्य, जात, विषमता मानत नाही. तो प्रमुख धर्म आहे अशा चीन, जपान इ. देशात देखील स्त्री दुय्यमच आहे. भारताच्या बौद्ध धर्मीयांच्या वागणुकीतही समानता नाही. स्त्रियांना स्वातंत्र्य नाही. त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्व विकासाला महत्व दिले जात नाही. एकूण काय तर आजची धर्मव्यवस्था पुरुषसत्ताक, पुरूषवर्चस्ववादी आहे.
हेही वाचा >>>धनगर आरक्षणाच्या पल्याड…
चातुर्वर्ण्य व स्त्री
भारतातील वैदिकांनी जी चार वर्णांची उत्पत्ती सांगितली आहे, ती पूर्णतः पुरुषी आहे. ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मण, बाहुतून क्षत्रिय, मांड्यांतून वैश्य व पायातून शूद्रांची उत्पत्ती झाली, असे ऋग्वेदातील ‘पुरुष सूक्त’ सांगते. या चार वर्णात स्त्रीची उत्पत्तीच सांगितलेली नाही. मुळात ब्रह्मा नावाच्या पुरुषाच्या मुख, बाहू आदी अवयवांपासून खरंतर कुणाचा जन्म कसा काय होऊ शकतो? मग स्त्रीची उत्पत्ती ही वर्णबाह्य आहे काय? आहे तर तिच्या उत्पत्तीला कारण कोण? ती कशी निर्माण झाली, याचे उत्तर अजून तरी तथाकथित पंडित देत नाहीत. मग असे आहे का की, त्यावेळी समाज केवळ पुरुषांचाच बनला होता आणि स्त्रियांची निर्मिती नंतर झाली ? या वरून वर्ण निर्मितीसंबंधी ऋग्वेदातील पुरुषसूक्त किती अवैज्ञानिक आणि पुरुषसत्तावादी आहे हे स्पष्ट होते.
आरपार शूद्रत्व
नंतरच्या काळात स्त्रीला शूद्र म्हटले आहे. अर्थात तिचा दर्जा आणि ब्रह्माच्या पायातून प्रसूत झालेल्या शूद्रांचा दर्जा सारखा दाखवला आहे. म्हणजे स्त्रीचे स्थान वरच्या तीन वर्णापेक्षा खाली दाखवले आहे. ब्राह्मण कुटुंबातील स्त्री ही माय असते, बहीण, बायको, मुलगी असते; पण ती मुंज न झाल्याने द्विज नसते, ब्राह्मण नसते, अर्थात शूद्र असते. त्याचप्रमाणे क्षत्रिय घरातील, वैश्य घरातील स्त्री त्या त्या वर्णातील पुरुषाच्या बरोबरीची मानली जात नाही आणि शूद्र घरातील स्त्रीसुद्धा समानता उपभोगू शकत नाही. अर्थात, वर्णव्यवस्थेने स्त्रीसाठी आरपार दुय्यमत्व आरक्षित करून ठेवले आहे. कलियुगात ब्राह्मण आणि शूद्र असे दोनच वर्ण आहेत, अशी मेख ब्राह्मणांनी मारून ठेवल्यामुळे आता कुणी क्षत्रिय, वैश्य उरले नाहीत.
या देशातील सर्व हिंदू गणल्या गेलेल्या स्त्रियांवर शूद्रत्वाचा शिक्का आहे. म्हणून शूद्रीकरणाविरुद्धचा लढा हा ९५ टक्के स्त्रीपुरुषांचा लढा होऊ शकतो. अर्थात, ज्यांना हिंदू म्हटले गेले आहे आणि ज्यांना हे दुय्यमत्व भोगावे, जगावे लागत आहे त्या सर्वांचा यात समावेश होऊ शकतो.
स्त्री हिंमत बांधत आहे
आज स्त्रियांमध्ये जागरुकता येत आहे. स्त्रीस्वातंत्र्यासाठी, स्त्रीपुरुष समानतेसाठी आवाज उठायला लागला आहे. काही स्त्री संघटना पुरुष वर्चस्वाविरुद्ध कंबर कसत आहेत. जागतिक पातळीवर, युनोच्या माध्यमातून स्त्री परिषदा, स्त्री हक्क परिषदा होत आहेत. जगातील सर्व देशांतील स्त्रिया एकत्र विचारविनिमय करत आहेत. मार्क्सच्या म्हणण्याप्रमाणे जगातील कामगार एक झाले नसले तरी स्त्रिया एकत्र येऊ शकतात. कारण त्यांचे दुय्यमत्व सर्व धर्मांनी ठरवून दिले आहे.
स्त्री श्रेष्ठत्व
प्रत्येक धर्माने स्त्रियांसाठी आचार नियमावली (कोड ऑफ कंडक्ट) निर्माण केली आहे. स्त्री शक्तीचा उठाव झाला तर त्यांनीसुद्धा पुरुषांसाठी आचारधर्म निर्माण करावा. दुसऱ्या अर्थाने, स्त्रियांनी स्त्रीप्रधान धर्म स्थापन करावा. अलीकडच्या काळात म. जोतिराव फुले असे एक क्रांतिकारी पुरुष झाले, ज्यांनी निक्षून सांगितले की, ‘स्त्री ही पुरुषांपेक्षा श्रेष्ठ आहे.’ बसवेश्वरांनीही स्त्रीचा दर्जा पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे असे म्हटले होते. परंतु प्रत्यक्षात आज ती स्थिती नाही. अर्थव्यवस्था सरंजामी असो, भांडवली असो की साम्राज्यशाहीवादी असो, स्त्रीप्रधानव्यवस्था मात्र निर्माण झाली नाही.
संपन्नता प्रगतीसाठी
आशियाई देशांत स्त्रीचे गौणत्व जादा प्रमाणात आहे. त्यामानाने पश्चिमी देशात स्त्री जास्त मोकळी आहे. तिचा सामाजिक वावर तेवढा बंदिस्त नाही. तिला शेव, पदर किंवा बुरख्यात स्वतःला झाकून घ्यावे लागत नाही आणि म्हणून सामाजिक उत्पादनात तिचा वाटा मोठा आहे. ज्या ज्या देशात स्त्रीचा उत्पादनात, शिक्षणात आणि सामाजिक आदानप्रदानात जास्त सहभाग असतो, तिथली भौतिक, वैज्ञानिक, औद्योगिक प्रगती ही जास्त प्रमाणात झालेली दिसते. म्हणजे सामाजिक, आर्थिक वा भौतिक संपन्नता ही स्त्रीच्या मुक्त सहभागाशिवाय गाठता येत नाही. त्यासाठी आता मागास देशातील स्त्रियांनी पुढे यायला पाहिजे. हिंमत करायला पाहिजे. पुरुषी बंधने पुरुषांनाही मागे ठेवतात. स्त्रीला दुय्यम ठेवल्याने देश मागे राहतो; हे वास्तव पुरुषांनी स्वीकारले पाहिजे. आपल्या मानसिक कक्षा रुंदावल्या पाहिजेत. धर्माचे नाव सांगून, नैतिकतेचा मुद्दा पुढे करून, चारित्र्याची पुरुषी मानसिकता स्त्रीवर लादणे सोडून दिले पाहिजे. तिचा स्वतंत्र वावर म्हणजे समाजविनाश होय, हा संकुचित विचार सांडायला पाहिजे.
हेही वाचा >>>लेख : ‘एक असण्या’चा श्रीलंकेतला ‘अर्थ’
धर्मसंस्थापक व्हा
पुरुष धर्मसंस्थापक होत असतील तर आज ज्या स्त्रिया हिंमत करत आहेत, ज्या स्त्रियांच्या मनात समानतेची आस आहे त्यांनी एकत्र येऊन धर्म स्थापन करायला काय हरकत आहे ? पुरुषप्रधान समाजव्यवस्थेला ‘और एक धक्का’ का देऊ नये? इतिहासात आजवर जे घडले नाही ते घडवून आणण्याचे श्रेय स्त्रीला यामुळे घेता येईल.
मानवी समाजातील दुःख, दैन्य, गुलामी, विषमता यांच्यापासून मुक्तता मिळावी म्हणून काही धर्मांची स्थापना झाली. या न्यायाने आता स्त्रियांनी धर्मसंस्थापक व्हायला पाहिजे. कारण स्त्रियांनी जे भोगले, जी गुलामी अनुभवली ती पुरुषी गुलामीहून कितीतरी भयानक होती व आहे. त्यामुळे त्यांना धर्मसंस्थापक म्हणून पुढे येण्यात काहीही गैर नाही. पण… पण हे होईल ? त्यांना पुरुष वर्ग तसे करू देईल ?
chaudhari.nagesh@yahoo.co.in