बाईने आई व्हायलाच हवं. तेच तर तिच्या स्त्रीत्वाचं प्रमाण! मग त्यासाठी तिने एखाद्या अघोरी बाबाकडे जावं, अमुक व्यक्तीच्या बागेतले आंबे खावेत, मुलगा हवा असेल तर सम तारखेला मिलन होईल याची काळजी घ्यावी, फर्टिलिटी क्लिनिकच्या वाऱ्या कराव्यात, लाखो रुपये आणि आयुष्यातली अनेक वर्षं खर्च करावीत, कायमची आजारपणं मागे लावून घ्यावीत, अंगारे धुपारे जो जे सांगेल ते गपगुमान करावं. वाट्टेल ते करावं, पण आई व्हावं…
…हे सगळं कोणी म्हणत नाही, पण बालपणापासून कानांवर पडत आलेलं असतं.
‘आमचं काही म्हणणं नाही, पण तिचीच इच्छा आहे, तर काय करणार…’ असेलही या वाक्यात तथ्य. माणूस कितीही बुद्धिमान असला, तरी आहे या सृष्टीचाच घटक. आपल्या आजुबाजूची झाडं, प्राणी यांच्यातही पुनरुत्पादनाची नैसर्गिक ऊर्मी असते, तशी ती माणसात नसेल कशी? पण एखाद्या मांजरीला पिल्लू होत नसेल किंवा एखाद्या झाडाला फळं फुलं येत नसतील, तर ते जेवढं नैसर्गिक तेवढंच एखाद्या दाम्पत्याला बाळ न होणंही नैसर्गिक. उपचार उपलब्ध आहेत, तर प्रयत्न करण्यात गैर काहीच नाही, पण हे प्रयत्न किती ताणावेत यालाही काही मर्यादा असल्या पाहिजेत. शरीराशी खेळ होईल अशा स्तराला जाण्याचं टोक का गाठलं जात असावं?
‘सगळं छान आहे, पण बिच्चारीला मुल-बाळ नाही.’
‘अरे बापरे, याही महिन्यात आले?’
‘तीन वर्षं झाली, आणखी किती प्लॅनिंग करणार?’
‘तुझ्या अमुक मैत्रिणीची मुलगी पाच वर्षांची झाली, तू कधी गुडन्यूज देणार?’
‘बाळ नाही झालं तरी चालेल, पण दत्तक वगैरे नको, काय माहीत कोणाचं असेल…’
‘एक मूल होऊ दे, मग सगळं कसं रुळावर येईल बघ.’
‘एवढी इस्टेट आहे, पण काय फायदा, वंशाला दिवाच नाही.’
मुला-मुलींनी अगदी काहीच कळत नसतं त्या वयापासून ही वाक्य ऐकलेली असतात. बाळ होतं कसं, हे माहीत नसतं तेव्हापासूनच बाईला बाळ व्हायलाच हवं हे त्यांच्या मनावर सतत बिंबवलं गेलेलं असतं, बहुतेकदा नकळतपणेच. मुलांच्या आयुष्यात शाळा येते, टीव्ही येतो, चित्रपट येतात, साहित्य येतं, समाजमाध्यमं येतात. या साऱ्यात जिथे जिथे मातृत्वाचा उल्लेख येतो तिथे तिथे उदात्तीकरणही हमखास येतं. मानवी भावविश्व काही पोकळीत आकार घेत नसतं. आजुबाजूच्या प्रत्येक घटनेचा, ध्वनीचा, दृश्याचा अमीट ठसा त्यावर उमटत असतो. मातृत्वाच्या प्रतिमेचे असे अनेक ठसे मुलांवर उमटत आलेले असतात. काही फिके काही ठसठशीत. यातून निर्माण झालेल्या प्रतिमेत आपण बसू शकत नाही, हे लक्षात येतं तेव्हा ते मान्य करणं फार कठीण जातं.
मग सुरू होतं तपासण्यांचं चक्र. या चक्राचं चक्रव्यूह होऊन बाई कधी त्यात अडकून पडते, ते तिचं तिलाही समजत नसावं. आणि हो, बहुतेकदा बाईच अडकते. आपलं नाव बाळाच्या नावामागे लावण्याचा हक्क ज्या पुरुषांना परंपरेने दिला, त्या पुरुषाचीही बाळ होण्यात काही भूमिका असते, याचा अशावेळी सोयीस्कर विसर पडतो. तोही याच समाजातून आलेला असल्यामुळे बाळ होणं म्हणजे आपलं पौरुष सिद्ध होणं, हे गृहीत धरून बसलेला आणि बाळ होत नसेल तर आतून काहीसा धास्तावलेला असतो. डॉक्टरांनी दोघांनाही चाचण्या करायला सांगितलं, तरी ते टाळण्याची काही प्रमाणात तरी मुभा पुरुष मिळवतात.
पूर्वी-
‘एक तरी मुलगा हवा होता.’
‘अरे बापरे! चौघी बहिणीच?’
‘पण काय फायदा, वंशाचा दिवा नाही देऊ शकली.’
अशी वाक्य कानांवर येतात. पण वंशाचा दिवा लावायचा की पणती, हे तिच्या हातात असतं का? हातात तर कोणाच्याही नसतं, पण मुलगा होणार की मुलगी हे ठरवणारं गुणसूत्र पुरुषाचं असतं, हे निश्चित! एक्स-एक्स गुणसूत्रं एकत्र आली तर मुलगी होते आणि एक्स-वाय गुणसूत्रं एकत्र आली तर मुलगा होतो. पण आईकडून केवळ एक्स गुणसूत्रं मिळतात. वडिलांकडून मिळालेल्या शुक्राणूमध्ये एक्स किंवा वाय गुणसूत्र असतं. म्हणजे वडिलांच्या शुक्राणूमध्ये कोणतं गुणसूत्र आहे, यावर बाळाचं लिंग ठरतं. हे सारं शाळेत शिकवलेलं असतं. पण पिढ्यांगणिक शिक्षणाचा अधिकाधिक प्रसार होत असताना आपण आजही शालेय स्तरावरचं साधं विज्ञान लक्षात ठेवण्यास वा स्वीकारण्यास तयार नाही. असं असताना बाळ न होण्याला आपणच किंवा आपणही कारणीभूत असू शकतो हे पुरुषाने स्वीकारणं फारंच दूर.
त्यामुळे मग बाई बिचारी ‘मी बाळ देऊ शकत नाही,’ या न्यूनगंडात घुसमटत राहते. देऊ शकत नाही म्हणजे काय? कुटुंबियांनी अपेक्षा ठेवणं ठीक मात्र धोषा लावणं कितपत योग्य? शेवटी बाळ हवं की नाही, हे केवळ आई-वडीलच ठरवू शकतात. येता जाता चौकशा करणं, फुकटचे सल्ले देणं, अमुक डॉक्टरकडे जा, ती गेली तिला झालं, तमूक खा, वजन कमी कर, नोकरी गरजेचीच आहे का असले प्रश्न विचारून भांडावून सोडणं हे संवेदनशून्यतेचं लक्षण आहे.
नवनिर्मिती ही अतिशय लोभस प्रक्रिया असते. एका शरीरात दिवसागणिक दुसरा जीव वाढत असतो. निसर्गाचा हा आविष्कार अनुभवणं हा खरोखरंच अतिशय आनंददायी अनुभव. पण अशा गुंतागुंतीच्या उपचारांतून गेलेल्या अनेक महिला या सुंदर प्रक्रियेचा मनसोक्त आनंदही घेऊ शकत नाहीत. केलेल्या खर्चाची, यावेळी पुन्हा काही अघटीत घडणार नाही ना, या भीतीची टांगती तलवार सतत डोक्यावर असते. काही जणींना या भीतीपोटी नोकरी-व्यवसाय सोडून घरी बसावं लागतं. ज्यांना ते शक्य नसतं, त्या दुहेरी लढा देत राहतात. सारं काही सुरळीत पार पडलं तर ठीक, पण पुढच्या एखाद्या टप्प्यावर काही अघटीत घडलं, तर आई होता होता राहिलेली ती स्वतःलाच दोष आणखी नैराश्यात ओढली जाते.
अलीकडे काही तरुण दाम्पत्य बाळ होऊ न देण्याचा निर्णय घेतात. बाळ हवंच हा हट्ट जेवढा नैसर्गिक तेवढंच बाळ नकोच हा ठाम निर्णयही नैसर्गिक. जगाला वाटतं म्हणून त्यांच्यावर दबाव आणत राहणं, एकतरी मूल हवंच, म्हातारपणी कळेल वगैरे सांगून त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करणं किंवा अशी कशी ही विचित्र पिढी म्हणत लेबलं लावणंही तेवढंच असंवेदनशील.
शेवटी बाळ होणं ही प्रक्रिया नऊ महिन्यांची. संगोपन मात्र प्रदीर्घकाळ सुरू राहतं. जन्माला आलेला एक ‘प्राणी’ (प्राणीच तो) वाढवणं, त्याच्यावर आपल्याला आकलनाप्रमाणे योग्य ते संस्कार करणं, जगाकडे, जीवनाकडे पाहण्याची सुंदर सकारात्मक दृष्टी देणं, विविधरंगी अनुभव देणं, त्यातील माणूसपण जागं करणं- ठेवणं ही प्रक्रिया तिघांनाही समृद्ध करणारी असते. मग त्या नऊ महिन्यांच्या अनुभवाचा एवढा अट्टहास कशासाठी? उपचार घेऊनही बाळ होत नाही म्हटल्यावर दत्तक घेण्याचा पर्याय स्वीकारण्यास काय हरकत आहे? काही दाम्पत्य यात बराच वेळ दवडतात आणि काही तर दत्तक घ्यावं की नाही, या मतभेदांमध्ये ती संधीही गमावून बसतात. आपले जैविक अंश नसले म्हणून काय झालं एक छान व्यक्ती घडविण्याचा अनुभव आपण घेऊच शकतो, ही समजुतदार भूमिका घेतलेली अनेक कुटुंब सुखी आयुष्य जगताना दिसतात.
शेवटी साधा सरळ हिशेब मांडावा… एका जिवाला जन्म देण्याच्या अट्टहासापायी अस्तित्त्वात असलेल्या जिवावर अन्याय करणं, कितपत योग्य आहे, याचा विचार या चक्रव्यूहात अडकलेल्या प्रत्येक महिलेने, तिच्या कुटुंबियांनी आणि समाज म्हणून सतत भुणभूण करण्याचा हक्कच मिळाल्याप्रमाणे वागणाऱ्या प्रत्येकाने करावा…
vijaya.jangle@expressindia.com