शहिदांच्या पत्नींना ‘वीर नारी’ असे संबोधले जाते. सैनिक कल्याण विभागाच्या नोंदीनुसार अशा वीर पत्नींची संख्या भारतात २६ हजारांपेक्षा अधिक आहे. वीरगती प्राप्त झालेल्या सेनानींच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांचे आयुष्य सुकर व्हावे म्हणून सरकारतर्फे त्यांच्या विधवा पत्नीला म्हणजेच वीर नारीला कौटुंबिक निवृत्तीवेतनासह अनेक सेवा सुविधा व सवलती दिल्या जातात. काही जणींना अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळते. पण शहीद झालेल्यांचे देशसेवेचे कार्य अपूर्णच राहिल्याची खंत काही संवेदनशील वीर नारींना सतत जाणवत राहते आणि ते कार्य आपण पूर्ण करावे असे त्यांना वाटते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रवींदरजीत रंधावा आणि सबिना सिंग या दोन तरुण वीर नारी माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. पी. मलिक यांच्या पत्नी रंजना मलिक यांना दिल्ली येथील लष्करातील कर्मचारी/ अधिकारी व त्यांचे कुटुंबीय यांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या ‘आर्मी वाईव्ज वेल्फेअर असोसिएशन’ च्या ऑफिसमध्ये भेटायला गेल्या. पतीचे देशसेवेचे कार्य पूर्ण करण्यासाठी संरक्षण दलात कार्य करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली व त्यासाठी आवश्यक ती तरतूद करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. युद्धात शत्रूंशी लढताना, दहशतवाद्यांचा बिमोड करत असताना अथवा अपघातात ज्यांना अकाली वीरगती प्राप्त होते अशा शहीदांच्या वीर नारींची संख्या वाढत आहे.

वयाची अट आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे अनेक वीर नारींना संरक्षण दलात जाता येत नाही. तेव्हा इच्छुक वीर नारींना विशेषतः तरुणींना ही संधी उपलब्ध करून द्यावी असे रंजना मलिक यांनी आपले पती जनरल व्ही. पी. मलिक यांना सुचवले. जनरल मलिक यांनी संरक्षण मंत्रालयाला विनंती करून अशी परवानगी मिळवली. या परवानगी बरोबरच केंद्रीय कर्मचारी निवड आयोगाच्या मुलाखतीपर्यंत पोहचण्यासाठी आवश्यक असणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या एकत्रित संरक्षण सेवा परीक्षेत सूट मिळवून तसेच वयोमर्यादा काही प्रमाणात शिथील करून घेण्यात आली. या नवीन तरतुदींमुळे अनेक वीर नारींना अभिमानाने भारतीय संरक्षण दलात पदार्पण करून देशाची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. ही संधी प्रथम लष्करात व वायू दलात देण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर नौदलात. आत्तापर्यंत जवळजवळ ५० वीर नारी संरक्षण दलात रूजू झाल्या आहेत. अशी संधी देणारे भारतीय संरक्षण क्षेत्र हे जगातील पहिले आहे.

संरक्षण दलात पदार्पण करण्याची संधी मिळताच इच्छुक वीर नारींनी पती निधनाचे दु:ख बाजूला सारून, तसेच अडचणींना न जुमानता मोठ्या जिद्दीने अभ्यास व मेहनत करून भारतीय संरक्षण दलातील प्रवेशासाठी आवश्यक निवड समितीच्या परीक्षा व मुलाखती दिल्या. त्या उत्तीर्ण झाल्या आणि त्यानंतर कमी कालावधीच्या कार्यासाठीच्या आयोगाचे (शॉर्ट सर्व्हिस कमिशन) ११ महिन्यांचे अतिशय खडतर प्रशिक्षण चेन्नई येथील आर्मी ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी (OTA) मध्ये यशस्वीपणे पूर्ण करून लेफ्टनंट म्हणजे संरक्षण दलातील अधिकृत अधिकारी म्हणून रूजू झाल्या.

रविंदर जीत रंधावा या मेजर सुखविंदर जीत सिंग रंधावा यांची पत्नी. सुखविंदर यांना जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांशी मुकाबला करत असताना वीरगती प्राप्त झाली. सबिना सिंग यांचे पती हेलिकॉप्टरचे पायलट होते. ते हेलिकॉप्टरच्या एका दुर्घटनेत मृत्युमुखी पडले. रवींदर जीत व सबिना सिंग या दोघींनी संरक्षण दलात दाखल होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मुलाखतीत देऊन चेन्नई येथील ११ महिन्यांचे प्रशिक्षण सप्टेंबर १९९८ मध्ये यशस्वीपणे पूर्ण केले आणि लेफ्टनंट पद मिळवले. एप्रिल १९९८ मध्ये वीरगती प्राप्त झालेले सुखविंदर जीत सिंग रंधावा यांना मिळालेला कीर्ति चक्र पुरस्कार त्यांची पत्नी रविंदर जीत या वीर नारीने चेन्नई येथील आपल्या प्रशिक्षणाच्या गणवेशात स्वीकारला.

रविंदर जीत रंधावा आणि सबिना सिंग या दोघी पहिल्या वीर नारी आहेत ज्यांनी पतीच्या मृत्यूनंतर स्वतः भारतीय सैन्यात पदार्पण केले. या दोघींची दुर्दम्य इच्छाशक्ती, निर्धार व धाडस यांपासून स्फूर्ती घेऊन अनेक वीर नारी सैन्यात दाखल झाल्या. अशाच आणखी काही शूर वीर नारी सेनानींबद्दल आपण जाणून घेऊ.

स्वाती महाडिक

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पोगरवाडी नावाच्या एका छोट्याशा गावातील स्वाती महाडिक या अतिशय साध्या कुटुंबातील महिला. भारतीय लष्करात कार्यरत असलेले कर्नल संतोष महाडिक यांच्या त्या पत्नी. पतीने प्रोत्साहन व साथ दिल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एम. ए. झालेल्या स्वाती यांनी ऑटिझम असलेल्या मुलांसंबंधीचे विशेष प्रशिक्षण घेतले. केंद्रीय विद्यालयामध्ये त्या शिक्षिकेचे काम करत होत्या. कर्नल संतोष महाडिक काश्मीरमधील कुपवाडा येथे लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांना हुसकावून लावण्यासाठी सीमेवरील शोध मोहिमेचे नेतृत्व करत असताना १७ नोव्हेंबर २०१५ रोजी त्यांच्या पथकाची दहशतवाद्यांशी चकमक झाली. या पथकाने हाजी नाक्याच्या घनदाट जंगलात त्यांचा पाठलाग केला. तेथे लपलेल्या अतिरेक्यांकडून अनपेक्षित गोळीबार झाला आणि या चकमकीत कर्नल संतोष महाडिक गंभीर जखमी होऊन त्यांना आपले प्राण गमवावे लागले. कर्नल संतोष महाडिक यांच्या अतुलनीय पराक्रमाबद्दल मरणोत्तर ‘शौर्यचक्र पुरस्कार’ स्वाती महाडिक यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारला. त्याच वेळी स्वाती यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्धार केला. अवघ्या नऊ महिन्यांत अभ्यास करून स्वाती परीक्षा व मुलाखतींमध्ये उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर चेन्नई येथील ११ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून त्या लष्कराच्या दारूगोळा व हत्यारे बनवणाऱ्या विभागात ९ सप्टेंबर २०१७ रोजी लेफ्टनंट या पदावर रूजू झाल्या.

भाग्यश्री पाटील

भाग्यश्री पाटील या कर्नल विश्वास कुमार यांच्या पत्नी ज्यांचे २०१८ साली कर्तव्य बजावत हृदयाच्या तीव्र झटक्याने निधन झाले. भाग्यश्री यांना अमेरिकेचा व्यावसायिक वैमानिकांचा परवाना मिळालेला असूनही त्यांनी पतीच्या निधनानंतर एक महिन्याच्या आत भारतीय सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. आवश्यक त्या परीक्षा, मुलाखती आणि चेन्नई येथील प्रशिक्षण यात यशस्वी होऊन भाग्यश्री यांनी लेफ्टनंट म्हणून ९ मार्च २०१९ रोजी भारतीय संरक्षण दलात पदार्पण केले.

गौरी महाडिक

कंपनी सेक्रेटरी आणि वकीलीचे शिक्षण घेतलेल्या मुंबईच्या गौरी या भारतीय सैन्यातील मेजर प्रसाद महाडिक यांच्या पत्नी. अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमारेषेजवळील तवांग येथे कार्यरत असताना ३० डिसेंबर २०१७ रोजी मेजर प्रसाद महाडिक यांच्या बराकीला आग लागली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. गौरी महाडिक यांनी पती प्रसाद महाडिक यांच्याप्रमाणेच निष्ठेने देशाची सेवा करण्याचा निश्चय करून भारतीय सेनेत भरती होण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांनी कंपनी सेक्रेटरीची नोकरी सोडली आणि सैन्यात भरती होण्यासाठीच्या परीक्षा व मुलाखतीमध्ये विशेष गुणवत्तेसह उत्तीर्ण झाल्या. चेन्नई येथील प्रशिक्षण पूर्ण करून ७ मार्च २०२० रोजी गौरी महाडिक लेफ्टनंट या पदावर रुजू झाल्या.

कणिका राणे

कणिका राणे या मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नी. ९ ऑगस्ट २०१८ रोजी जम्मू – काश्मीर येथे बांदीपोरा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी करणाऱ्या अतिरेक्यांना रोखण्यासाठी झालेल्या चकमकीत मेजर कौस्तुभ राणे शहीद झाले. त्यांना मरणोत्तर देण्यात आलेला ‘शौर्य पुरस्कार’ स्वीकारताना पत्नी कणिका राणे यांनी स्वतः संरक्षण दलात पदार्पण करण्याचे ठरवले. कणिका या एका बहुराष्ट्रीय कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत असतानाच भारतीय सेनेच्या परीक्षेत आणि मुलाखतीत उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर चेन्नई येथील प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून २१ नोव्हेंबर २०२० रोजी लेफ्टनंट म्हणून भारतीय सैन्यात भरती झाल्या.

शालिनी सिंग भादुरिया

शालिनी सिंग या मेजर अविनाश भादुरिया यांच्या पत्नी. मध्यम वर्गीय राजपूत घराण्यातील शालिनी यांचा विवाह वयाच्या १८ व्या वर्षी झाला. त्यावेळी त्या महाविद्यालयात पदवीच्या प्रथम वर्षात शिकत होत्या. आतंकवाद्यांच्या कारवाया निपटून काढणाऱ्या राष्ट्रीय रायफल गटासमवेत जम्मू काश्मीरमधील दोडा येथे दहशतवाद्यांशी लढत असताना मेजर अविनाश यांना २८ सप्टेंबर २००१ रोजी वीरमरण आले. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराने जखमी झालेल्या अवस्थेतही मेजर अविनाश यांनी चौघांना ठार केले. यामुळे प्रभावित झालेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी उरलेल्या सर्व दहशतवाद्यांना ठार केले. पतीच्या निधनानंतर शालिनी यांनी महाविद्यालयीन शिक्षण सोडून सैन्यात भरती व्हायचे ठरवले. त्यावेळी दोन वर्षाच्या मुलाची आई असलेल्या शालिनी यांचे वय होते २३ वर्षे. पतीच्या निधनानंतर अवघ्या तीन महिन्यांत परीक्षा, मुलाखती व प्रशिक्षण यांमध्ये शालिनी यशस्वी झाल्या आणि ०७ सप्टेंबर २००२ रोजी त्या लेफ्टनंट म्हणून संरक्षण दलात रूजू झाल्या. राजस्थान, झांशी आणि दिल्ली इथे पाच वर्षांच्या सैन्यातील सेवेनंतर आपल्या मुलाच्या देखभालीसाठी लेफ्टनंट शालिनी यांनी संरक्षण दलातील नोकरी सोडून अपूरे राहिलेले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर एम.बी.ए.चे शिक्षण घेऊन बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करू लागल्या. २०१७ साली शालिनी यांनी ‘मिसेस इंडिया’ या स्पर्धेच्या कार्यक्रमात ‘क्वीन ऑफ सबस्टन्स’ हा पुरस्कार मिळवला.

रिया नेहरा

रिया नेहरा या लेह येथे तैनात असलेल्या भारतीय सैन्यातील तरुण अभियंता अधिकारी कॅप्टन सोमेश श्रीवास्तव यांच्या पत्नी. ०४ मार्च २००१ रोजी मनाली-लेह सेक्टरमध्ये बर्फ हटवण्याच्या ऑपरेशनमध्ये कॅप्टन सोमेश श्रीवास्तव यांना कर्तव्य बजावताना वीरमरण आले. रिया यांनी अल्पावधीतच आपल्या धाडसी पतीचा वारसा पुढे नेण्यासाठी सैन्यात सामील व्हायचे ठरवले. त्यासाठी आवश्यक त्या परीक्षा, मुलाखती व चेन्नई येथील प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून ०७ सप्टेंबर २००२ रोजी लेफ्टनंट म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

प्रिया सेमवाल

प्रिया सेमवाल या भारतीय लष्करातील नाईक अमित शर्मा यांच्या पत्नी. स्वतः फक्त १० वी पर्यंत शिकलेल्या नाईक अमित शर्मा यांनी प्रियाला विवाहानंतर शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहनासह सर्वोतोपरी पाठिंबा दिला. अरूणाचल प्रदेशातील तवांगनजीक नाईक अमित शर्मा दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी ‘ऑपरेशन ऑर्किड’ या मोहिमेत कार्यरत असताना २० जून २०१२ रोजी शहीद झाले. प्रिया यांच्यासाठी हा फार मोठा आघात होता. प्रिया लवकरच या धक्क्यातून बाहेर आल्या ते त्यांनी लष्करात भरती होण्याच्या निर्णयाने. कुटुंबातील सदस्यांचा विरोध पत्करून त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. आवश्यक त्या परीक्षा व प्रशिक्षण यामध्ये यशस्वी झाल्यावर १४ मार्च २०१४ रोजी प्रिया सेमवाल यांची भारतीय सैन्यात लेफ्टनंट या पदावर नियुक्ती झाली. भारतीय सेनेतील एका जवानाच्या पत्नीने अधिकारी म्हणून नियुक्त होण्याचे प्रिया सेमवाल हे एकमेव उदाहरण आहे. आज लेफ्टनंट प्रिया सेमवाल यांच्या नावाला ‘कॅप्टन’ हे पद जोडले गेले आहे.

रुची वर्मा

रूची वर्मा या मेजर विनीत वर्मा यांच्या पत्नी. आसाम राज्यातील बारीपाडा गावात कट्टरतावाद्यांविरोधातील अभियानात मेजर विनीत वर्मा यांना ३० एप्रिल २०१३ रोजी वीरगती प्राप्त झाली. काही दिवसांतच रूची या दु:खातून सावरल्या आणि त्यांनी भारतीय सैन्यात दाखल होण्याचे ठरवले. त्यांच्या आई- वडिलांनी या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला. रूची यांनी आवश्यक त्या परीक्षा, मुलाखती व प्रशिक्षण यांमध्ये यश मिळविले आणि १४ मार्च २०१४ रोजी त्या लेफ्टनंट म्हणून भारतीय सेना अधिकारी झाल्या.

संध्या वधवा

संध्या वधवा या नौसेनेतील लेफ्टनंट कमांडर कुंतल वधवा यांच्या पत्नी. संध्या वधवा यांचे वडील नौसेनेत कमांडर होते त्यामुळे सैनिकाची पार्श्वभूमी असलेल्या घरात त्या वाढल्या. संध्या नौसेनेच्या शाळेत शिक्षिकेची नोकरी करत होत्या. कमांडर कुंतल वधवा कोलकाता युद्ध नौकेवर अभियांत्रिकी अधिकारी म्हणून कार्यरत होते. ७ मार्च २०१४ रोजी युद्धनौकेवरील यंत्रसामग्री असणाऱ्या विभागाची अग्निशमन क्षमतेची नियोजित चाचणी करत असताना कार्बन डाय ऑक्साईडच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने त्या वायूची गळती झाली आणि तो वायू कमांडर कुंतल यांच्या शरीरात गेला. त्याचवेळी त्यांच्या डोक्याला दुखापतही झाली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. संभावित धोक्याची कल्पना असल्याने चाचणीपूर्वी त्यांनी तेथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना नौकेवरील त्या जागेवरून दूर जायला लावल्याने मोठी जीवितहानी टळली. पतीच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशीच संध्या यांनी नौसेनेत भरती होण्याचे ठरवले आणि कोलकाता युद्धनौकेच्या कमांडरना तसे कळवले. ४० वर्षे वयाच्या संध्या यांचा निर्धार पाहून संरक्षण मंत्रालयाने त्यांच्यासाठी वयाची अट शिथिल करून सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाचा अर्ज भरण्याची परवानगी दिली. अर्ज मंजूर झाल्यानंतर बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन केरळ राज्यातील एझिमाला येथील भारतीय नौदल अकादमी (आशियातील सर्वांत मोठी आणि जगातील तिसरी सर्वांत मोठी नौदल अकादमी) इथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या १४ मार्च २०१५ रोजी लेफ्टनंट कमांडर झाल्या. नौदलासाठी लागणाऱ्या साधनसामग्रीच्या पुरवठ्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. त्यानंतर त्यांना मुंबई येथील हमला या भारतीय नौसेनेच्या नौकेवर विशेष प्रशिक्षण घ्यावे लागले.

लेफ्टनंट कमांडर संध्या वधवा यांना २०१५ साली भारताच्या ६६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी संचलनामध्ये लष्कराच्या पहिल्या महिला तुकडीत सहभागी होण्याची संधी मिळाली. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासमोर इतर १४४ महिला अधिकाऱ्यांसोबत संध्या यांनी संचलन केले. त्याच वर्षीच्या अखेरीस, लेफ्टनंट कमांडर संध्या वधवा यांनी पती लेफ्टनंट कमांडर कुंतल वधवा यांना त्यांच्या उत्कृष्ट धैर्य, नेतृत्व आणि राष्ट्रसेवेतील सर्वोच्च बलिदानासाठी मरणोत्तर प्रदान करण्यात आलेला ‘नौसेना शौर्य पुरस्कार’ विराट या नौकेवर झालेल्या समारंभात स्वीकारला.

ही केवळ काही उदाहरणे. याव्यतिरिक्त निधी मिश्रा दुबे, नीता देसवाल, सुष्मिता पांडे, नीरू संब्याल, संगीता माल, गरीमा अब्रॉल, निकिता कौल दौंडियाल, ज्योती नैनवाल, कोरोल रिगझिन, हरवीन कौर काहलोन, रेखा सिंग अशा अनेक वीर नारींनी पतीच्या निधनाचे दु:ख बाजूला सारून आज देशसेवेला वाहून घेतले आहे. शहीदांच्या पत्नी म्हणून प्रशिक्षणासाठी व भरतीसाठी या वीर नारींना कोणतीही सूट मिळत नाही. जे नियम इतर उमेदवारांसाठी असतात ते सर्व नियम या स्त्रियांसाठीही लागू असतात. आवश्यक शारीरिक व मानसिक जडण घडण, तत्परतेने निर्णय घेण्याची क्षमता, संघटन कार्य आणि धीरोदात्त वृत्ती यांच्यावर प्रशिक्षणाच्या काळात भर दिला जातो. स्त्रिया प्रतिकूल परिस्थितीशी धैर्याने लढतात आणि आपल्या सामर्थ्याने सर्वांना चकित करतात, हे या महिला सेनानींनी सिद्ध केले आहे. प्रत्येक वीर नारीची पार्श्वभूमी व परिस्थिती वेगळी होती. कोणाचे शिक्षण झालेले होते, कोणाचे अर्धवट झालेले होते. कोणी लहानशा गावात रहात होत्या तर कोणी शहरात. काहींना परीक्षेची तयारी करत असताना अर्थार्जनही करावे लागत होते, काहींना आपल्या मुलांना हॉस्टेलवर ठेवावे लागले, तर काही जणींच्या आई-वडीलांनी किंवा सासू सासऱ्यांनी ती जबाबदारी स्वीकारली. मातृत्वापेक्षा राष्ट्रत्वाला प्राधान्य देऊन या वीर नारींनी आपल्या मुलांना राष्ट्रप्रेमाचे बाळकडू पाजले. आपल्या पतीच्या गणवेशाचा व त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचा सन्मान राखला. धारातीर्थी पडलेल्या जवानांच्या धीरोदात्त पत्नींची ही आदर्श उदाहरणे सर्व वीरमाता आणि वीरपत्नींचे धैर्य वाढवणारी आणि पुढील पिढीला प्रेरणा देणारी आहेत.

anaghashiralkar@gmail.com