संत साहित्याचा काळ आहे इसवी सनाच्या १७व्या-१८व्या शतकापर्यंतचा. तोपर्यंत कुठेही बायकांसाठी आणि इतरांसाठी शाळा नव्हत्या. स्त्रियांना बंदी होती लिहायला- वाचायला. पण बायका रचना करायच्या थांबत होत्या का? संत रचना बायकांच्या आहेत. निरनिराळ्या जाती- जमातीच्या संत आमच्याकडे इसवी सनाच्या ७व्या-८व्या शतकापासून भारतभर त्या १६व्या -१८व्या शतकापर्यंत आहेत. भारतभर सांगतेय मी, नुसत्या महाराष्ट्रात नाही. या सगळ्या बायकांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी नवरेपणाला झुगारून दिलेलं आहे. काश्मीरच्या लाल दीदी- लल्लेश्वरीने म्हटलेलं आहे. ‘‘वस्त्र लेवुन विरळ हवेचे नृत्य करितसे लल्ला मोदे।’’ मला इतर वस्त्रांची गरजच नाही. दक्षिणेकडची अक्कमहादेवी आहे. तो एक परमेश्वर हा माझा. ही भूमिका सर्व संतांची आहे. महाराष्ट्रातलं फार मोठं उदाहरण म्हणजे संत बहिणाबाई! शिवुर गावची होती ती. तीन वर्षांच्या या मुलीचं तीस वर्षांच्या पुरुषाशी लग्न झालं! त्याचं तिसरं लग्न. विठाबाईची अवस्थाही तशीच, लहानपणी लग्न झालेलं, पती हा लंपट. हे कुठल्याही पुरुषाच्या बाबतीत जसं असावं तसं, ती अबोध बालिका, आणि तिने निरागसपणे वर्णन केलेलं आहे- ‘भ्रतार हो मजसि, ओढितो एकांती। मध्यरात्री जाणा समयासी ।। ओढोनिया बहुत मारितो मजसि, भोगावे मजसि म्हणोनीया।।’ या मराठी संत स्त्रिया आहेत. म्हणजे आजसुद्धा जिथे प्रश्न निर्माण होतात आणि आमचे सुप्रीम कोर्टातले, उच्च न्यायालयांमधले न्यायाधीश वाद घालत असतात की पतीने जर अत्याचार केला किंवा पतीने जर तिच्या परवानगीशिवाय संभोग केला तर तो गुन्हा मानावा का नाही, तो बलात्कार मानावा की नाही? इथे विठाबाईने हे सांगितलेलं आहे. तेव्हा काळाच्या किती पुढे गेलेल्या या सगळ्या आमच्या संत स्त्रिया होत्या. याकडे आमचं कुणाचं फारसं लक्षच नाहीये.

ज्यावेळेला १९७५ मध्ये स्त्री मुक्ती वर्ष नावाची भानगड आली त्यावेळेला लोक सांगू लागले की हे स्त्रीमुक्तीचं वारं ‘पाश्चिमात्यांकडून आलंय’ त्यावेळेला मला मोठं आश्चर्य वाटायला लागलं. कारण माझ्याकडे या सगळ्या परंपरेतल्या स्त्रिया होत्या ना! मी म्हटलं हे पाश्चिमात्यांच्याकडून आलेलं नाही, आमच्या बायका फार जबऱ्या होत्या हो!

आणखी एक मोठी संत बाई, सोयराबाई तिचं नाव. तिने एक अतिशय मूलभूत मुद्दा सांगितला. स्त्री मुक्ती, स्त्री स्वातंत्र्य याच्या चर्चा आजही राजकारणामध्ये चालतात. धर्म पंडितही चर्चा करत असतात. काय तर अमुक मंदिरामध्ये स्त्रियांनी जावे की नाही जावे? त्यांना प्रवेश मिळावा की न मिळावा? कारण का, स्त्रियांचा विटाळ होतो. आता विटाळ दोन प्रकारचा असतो, आपल्याकडे दोन प्रकारचे विटाळ. एक विटाळ म्हणजे जातीपातीचा विटाळ. अमुक जातीचा माणूस उच्चवर्णीयाला शिवला तर विटाळ होतो आणि दुसरा स्त्रीचा, निसर्ग धर्माने दिलेली मासिक पाळी तिची! त्यालाही विटाळच म्हणायचं. आता ही सोयराबाई कुठल्याही शाळा कॉलेजात गेली नाही, कुठल्याही स्त्रीमुक्तीवालीकडे गेली नाही, तिला कुठली सिमोन दि बोव्हा माहिती नव्हती. ती काय म्हणते? ‘देहाचा विटाळ, देहीच जन्मला, शुद्ध तो जाहला कवण प्राणी।। उत्पत्तीचे मूळ विटाळाचे स्थान। कोण देह निर्माण नाही जगी।।’ असा मला एखादा माणूस दाखवून द्या की जो विटाळाच्या स्थानातून जन्माला आला नाही.

आता आजही एखादा म्हणतो की माझा जन्म जैविक नाही वगैरे, त्याच्यावर आपण किती विश्वास ठेवायचा हा भाग वेगळा, परंतु त्याचा भांडाफोड या आमच्या संत कवयित्रींनी १३-१४व्या शतकामध्ये केलेला आहे, ज्यावेळेला लिपी आणि लिहिण्यावाचण्याला त्यांच्या जीवनात स्थान नव्हतं. यांना स्त्रीमुक्तीच्या उद्गात्या आणि झेंडा फडकवणाऱ्या म्हणायचं की नाही? आजच्या स्त्री मुक्तीच्या विचारांना मागे सारतील अशाप्रकारचे विचार आमच्या या संत स्त्रियांनी निरनिराळ्या जातीजमातीच्या स्त्रियांनी मांडले. ज्यांना आपण अंत्यज जाती, दुय्यम जाती म्हणतो, त्या जातीच्या स्त्रिया ज्यावेळेला बोलतात त्यावेळेस त्यांची विचारशक्ती, प्रतिभाशक्ती आणि संवेदनशीलता, भाषेवरचं त्यांचं प्रभुत्व या सगळ्या किती मोठ्या गोष्टी आहेत! निर्मितीच्या दृष्टीने, ज्याला आपण कला म्हणत असतो ती कला म्हणजे दुसरं काय असतं? संवेदनशीलता नेमक्या शब्दात उतरवणं, याच्यासाठी जी प्रतिभा लागते, ती प्रतिभा या बायकांकडे उपजत आहे आणि ती अनुभवातून परिपक्व झालेली आहे.

Story img Loader