संत साहित्याचा काळ आहे इसवी सनाच्या १७व्या-१८व्या शतकापर्यंतचा. तोपर्यंत कुठेही बायकांसाठी आणि इतरांसाठी शाळा नव्हत्या. स्त्रियांना बंदी होती लिहायला- वाचायला. पण बायका रचना करायच्या थांबत होत्या का? संत रचना बायकांच्या आहेत. निरनिराळ्या जाती- जमातीच्या संत आमच्याकडे इसवी सनाच्या ७व्या-८व्या शतकापासून भारतभर त्या १६व्या -१८व्या शतकापर्यंत आहेत. भारतभर सांगतेय मी, नुसत्या महाराष्ट्रात नाही. या सगळ्या बायकांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी नवरेपणाला झुगारून दिलेलं आहे. काश्मीरच्या लाल दीदी- लल्लेश्वरीने म्हटलेलं आहे. ‘‘वस्त्र लेवुन विरळ हवेचे नृत्य करितसे लल्ला मोदे।’’ मला इतर वस्त्रांची गरजच नाही. दक्षिणेकडची अक्कमहादेवी आहे. तो एक परमेश्वर हा माझा. ही भूमिका सर्व संतांची आहे. महाराष्ट्रातलं फार मोठं उदाहरण म्हणजे संत बहिणाबाई! शिवुर गावची होती ती. तीन वर्षांच्या या मुलीचं तीस वर्षांच्या पुरुषाशी लग्न झालं! त्याचं तिसरं लग्न. विठाबाईची अवस्थाही तशीच, लहानपणी लग्न झालेलं, पती हा लंपट. हे कुठल्याही पुरुषाच्या बाबतीत जसं असावं तसं, ती अबोध बालिका, आणि तिने निरागसपणे वर्णन केलेलं आहे- ‘भ्रतार हो मजसि, ओढितो एकांती। मध्यरात्री जाणा समयासी ।। ओढोनिया बहुत मारितो मजसि, भोगावे मजसि म्हणोनीया।।’ या मराठी संत स्त्रिया आहेत. म्हणजे आजसुद्धा जिथे प्रश्न निर्माण होतात आणि आमचे सुप्रीम कोर्टातले, उच्च न्यायालयांमधले न्यायाधीश वाद घालत असतात की पतीने जर अत्याचार केला किंवा पतीने जर तिच्या परवानगीशिवाय संभोग केला तर तो गुन्हा मानावा का नाही, तो बलात्कार मानावा की नाही? इथे विठाबाईने हे सांगितलेलं आहे. तेव्हा काळाच्या किती पुढे गेलेल्या या सगळ्या आमच्या संत स्त्रिया होत्या. याकडे आमचं कुणाचं फारसं लक्षच नाहीये.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा