सौम्यरेंद्र बारीक
दुसऱ्यांदा अमेरिकेची सत्ता सांभाळताना बलाढ्य तंत्रज्ञान कंपन्यांशी ट्रम्प कसे वागतात याकडे सगळ्या जगाचे लक्ष लागून राहिले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून ट्रम्प यांची पुन्हा निवड झाल्यामुळे, बलाढ्या टेक कंपन्यांच्या प्रमुखांना आणि तेथील कर्मचाऱ्यांना नवीन वास्तवाचा सामना करावा लागणार आहे. कारण त्यांच्यापैकी बऱ्याच जणांनी सामान्यत: डेमोक्रॅटिक पक्षाला मतदान केले होते, काहींनी कमला हॅरिस यांना जाहीरपणे पाठिंबा दिला होता तर काही जण कुंपणावर बसले होते. त्या सर्वांना ट्रम्प यांच्या नवीन कार्यकाळात आपल्या भूमिकेचे परिणाम भोगावे लागणार आहेत.
ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात, तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक हालचाली घडल्या. त्यात मेटा, गुगल, ॲपल आणि ॲमेझॉन या सारख्या कंपन्यांविरुद्धच्या अविश्वास कारवाईला सुरुवात झाली; चीनबरोबर व्यापार युद्ध झाले. त्यात अमेरिका-निर्मित उच्चतम हार्डवेअर्स सोल्यूशन्सची निर्यात रोखली गेली. ट्रम्प यांच्याच कारकीर्दीत गुगलची चौकशी सुरू झाली असली तरी आपल्या या वेळच्या निवडणुकीच्या प्रचारात ट्रम्प यांनी यासंदर्भात बायडेन प्रशासनालाच बोल लावले. अमेरिकेतील टिकटॉकच्या भवितव्याबद्दल त्यांची भूमिकाही अनिश्चित राहिली आहे आणि चीनविरूद्धची त्यांची संरक्षणवादी भूमिका ॲपलसारख्या कंपन्यांना आव्हानात्मक ठरू शकते.
हेही वाचा >>> राज्यातील हवामान कृती कक्ष कसा करणार हवामान बदलांचा सामना?
काही वाद ट्रम्प यांच्यासाठी नवीन असतील. २०२० मध्ये ते पायउतार झाले तेव्हा कृत्रिम बुद्धिमत्ते (AI) ला आजच्यासारखी गती मिळालेली नव्हती. आज ते त्यांची अध्यक्षपदाची दुसरी कारकीर्द सुरू करत असताना सगळे जग कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाबद्दल बोलत आहे. आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचे कठोर नियमन करणार नाही, असे प्रारंभिक संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. शिवाय सिलिकॉन व्हॅलीतील काही प्रभावशाली लोक त्यांच्या मागे उभे आहेत, त्यामुळे त्यांची ही भूमिका कदाचित बदलणार नाही.
ट्रम्प यांच्या विजयाने आणखी कुणाला नाही तर एलॉन मस्क यांच्यासारख्या बलाढ्य व्यावसायिकाला हायसे वाटले असेल. कारण त्यांनी आपली संपूर्ण ताकद ट्रम्प यांच्या मागे ज्या प्रकारे लावली होती तसे आजवर कोणत्याही व्यावसायिकाने कोणत्याही अध्यक्षीय उमेदवारासाठी केले नव्हते. मस्क यांनी ट्रम्प यांच्या मोहिमेला निधी तर पुरवलाच शिवाय एक्स हे आपले समाजमाध्यम ट्रम्प यांच्या पाठीशी पूर्ण सामर्थ्याने उभे केले होते. त्यामुळेच आता अशी अटकळ बांधली जात आहे की ट्रम्प प्रशासनात मस्क यांच्याकडे महत्त्वाची भूमिका असू शकते. ट्रम्प त्यांना ‘सरकारी कार्यक्षमता’ या नव्या विभागाची जबाबदारी देऊ शकतात अश शक्यता आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या कमी होईल, असे सांगितले जात आहे.
हेही वाचा >>> दुर्बलांची काळजी घेणारे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व: रतन टाटा
अविश्वास
बायडेन-युगात सिलिकॉन व्हॅलीतील मोठ्या टेक कंपन्यांमध्ये करण्यात आलेल्या ज्या नियुक्त्यांबाबत ट्रम्प यांना अविश्वास आहे, त्या ते रद्द करू शकतात. तसेही ट्रम्प यांनी आधीच सांगितले आहे की ते फेडरल ट्रेड कमिशनच्या प्रमुख लीना खान यांना काढून टाकतील. लीना खान यांनी ॲमेझॉन आणि मेटा यांसारख्या कंपन्यांविरुद्ध एजन्सीची जी प्रकरणे होती ती हाताळली होती.
सर्व मोठ्या टेक कंपन्यांच्या प्रमुखांनी ट्रम्प यांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे, तर काहींनी निवडणुकीआधीच ट्रम्प यांचे कौतुक करणे सुरू केले होते. ॲमेझॉनचे जेफ बेझोस यांच्या मालकीच्या वॉशिंग्टन पोस्टने या निवडणुकीत कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दिला नव्हता. याकडे ट्रम्प यांना दिलेले स्पष्ट समर्थन या अर्थानचे पाहिले जात होते.
निवडणुकीच्या काळात एलॉन मस्क यांनी गूगल आणि मायक्रोसॉफ्टसारख्या टेक कंपन्यांच्या कामगारांमधील पूर्वाग्रह आणि त्यांची काही उत्पादने याबद्दल इंटरनेटवर लिहिले होते. या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी गोळा केलेल्या राजकीय निधीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सिलिकॉन व्हॅलीतील कर्मचारी आणि नेते यांचा डेमोक्रॅटिक पक्षाकडे पारंपरिक झुकाव आहे झुकले आहेत आणि ट्रम्प यांची ही दुसरी कारकीर्द त्यांच्यासाठी कठीण ठरणार आहे.
दर आणि व्यापार युद्ध
आपल्या प्रचारादरम्यान, ट्रम्प यांनी चीनमधून आयात वस्तूंवर ६० टक्के आणि इतर ठिकाणांहून आयात सर्व गोष्टींवर २० टक्के कर असा प्रस्ताव मांडला होता. अमेरिकेतील उत्पादनाचा मोठा आधार असलेल्या ॲपलसारख्या कंपन्यांसाठी हा मुद्दा मोठ्या प्रमाणावर अडथळा ठरणार आहे. ॲपलने आपल्या उत्पादनाचा काही भाग व्हिएतनाम आणि भारतासारख्या देशांमध्ये हलवला आहे, परंतु आजही त्यांचे उत्पादन बऱ्याच मोठ्या प्रमाणात चीनमध्ये केले जाते. ट्रम्प यांनी चीनचा बदला घेण्यासाठी बीजिंगविरोधात केलेली कोणतीही कारवाई ॲपलच्या पुरवठा साखळीला आव्हान देऊ शकते.
चीनविरुद्धच्या ट्रम्प यांच्या विरोधाला असलेला आणखी एक पैलू म्हणजे त्यांचा नवीन मित्र एलॉन मस्क. मस्कच्या टेस्लाचे चीनमध्ये मोठे व्यावसायिक हितसंबंध आहेत. तिथे कंपनीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या चीनवरील कोणत्याही कारवाईचा बीजिंगमधील टेस्लाच्या व्यवसायावर संभाव्य परिणाम होऊ शकतो. अमेरिकी मतदारांमधील संरक्षणवादी आणि राष्ट्रवादी भावनांचा वापर करून ट्रम्प पुन्हा सत्तेवर आले आहेत. त्यामुळे त्यांनी आता चीनविरोधात संयमी भूमिका घेतली तर ते त्यांच्यासाठी थोडे अडचणीचेही असू शकते.
कृत्रिम बुद्धिमत्ता
ट्रम्प यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेसंदर्भातील बायडेन यांच्या कार्यकाळातील आदेश रद्द करण्याचे मतदारांना वचन दिले आहे, कारण ते बायडेन सरकारचा ठसा पुसून टाकण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. गेल्या ऑक्टोबरमध्ये जारी करण्यात आलेल्या यासंदर्भातील आदेशानुसार, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रारुप विकसित करणाऱ्या कंपन्यांनी अमेरिकी सरकारला त्या प्रारुपाचे प्रशिक्षण आणि सुरक्षितता कशी दिली आहे याची माहिती द्यावी आणि असुरक्षा तपासण्यासाठी त्यांची प्रणाली खुली केली पाहिजे.
टेक क्षेत्रातील ट्रम्प यांच्या सरकाऱ्यांच्या मते या आदेशाने कृत्रिम बुद्धिमत्ता कंपन्यांवर कठोर बंधने घातली आहेत. ती मागे घ्यावीत अशी मागणी या कंपन्यांनी तेव्हाच केली होती. मार्क अँड्रीसेन हे प्रसिद्ध तंत्रज्ञान गुंतवणूकदार आणि सर्वात प्रभावशाली सिलिकॉन व्हॅली व्हेंचर फंडांपैकी एकाचे सह-संस्थापक आहेत. त्यांनी ट्रम्प यांना अध्यक्षपदासाठी समर्थन दिले होते. कृत्रिम बुद्धिमत्तेवरचे असे नियमन ते बराच काळ नाकारत आहेत. त्यांनी ट्रम्प यांना पाठिंबा दिला कारण ट्रम्प देशाच्या तंत्रज्ञान परिसंस्थेला, विशेषत: स्टार्ट-अपला समर्थन देतील, असे मार्क यांना वाटते.
या सगळ्यामुळे ट्रम्प यांच्या राजवटीत पुढील चार वर्षांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रामध्ये कोणतीही मोठी नियामके दिसण्याची शक्यता नाही.
अनिश्चितता आणि मोठे बदल
अध्यक्षीय निवडणुकीच्या धामधुमीत तंत्रज्ञान कंपन्यांच्या नियमनासंदर्भातील आपल्या भूमिकेबद्दल ट्रम्प यांचे अनेक चढउतार दिसून आले. अमेरिकेतील जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांनी गूगल मक्तेदारीच्याबद्दल भाष्य केले तेव्हा ट्रम्प यांनी सूचित केले की हे पाऊल खूप पुढे जाऊ शकते. वास्तविक गूगलची चौकशी त्यांच्या मागील कार्यकाळातच सुरू झाली होती तरीही ट्रम्प यांनी असे विधान केले होते.
गूगलपाठोपाठ येते टिकटॉक. ते तरुण अमेरिकन मतदारांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. २०२० मध्ये, जोपर्यंत टिकटॉकचे चीनी पालक, बाइटडान्स यांनी ते अमेरिकन मालकाला विकले नव्हते, तोपर्यंत टिकटॉकवर बंदी घालावी अशी ट्रम्प यांची भूमिका होती. त्या वेळी, ओरॅकलसारख्या कंपन्या टिकटॉक विकत घेण्यासाठी रांगेत उभ्या होत्या. त्यामुळे या संभाषणाला थोडा तरी वाव मिळाला. त्यानंतर ही संभाषणे लवकरच संपुष्टात आली आणि काही काळातच ट्रम्प यांनीही असे बोलणे थांबवले.
बायडेन प्रशासनाने फक्त ट्रम्प यांच्या पावलावर पाऊल टाकले नाही तर आणखी एक पाऊल पुढे टाकत असा कायदा केला की त्यामुळे बाइटडान्सला पुन्हा आपले ॲप विकावे लागेल किंवा बंदीला सामोरे जावे लागेल. पण मग पुन्हा ट्रम्प यांनी उलटसुलट भूमिका घेत असे म्हटले की ते या कायद्याचे समर्थन करत नाहीत. एवढेच नाही तर त्यानंतर जूनमध्ये ते लगेचच टिकटॉकमध्ये सामील झाले. त्यामुळे अध्यक्षपदावर परत आल्यावर ते कोणत्या दिशेने झुकतील हे सांगता नाही.
परदेशातील तंत्रज्ञान कंपन्या
भारतीय तंत्रज्ञान क्षेत्राची व्याप्ती २४५ अब्ज डॉलर्स एवढी असून ते सुमारे ५.४ दशलक्ष लोकांना रोजगार देते. अमेरिकेचे पुढील अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्या शानदार विजयाबद्दल हे क्षेत्र एकाचवेळी सावध आणि आशावादी आहे. ट्रम्प यांच्या पुनरागमनामुळे अमेरिकी कंपन्यांच्या वाढीव खर्चाला चालना मिळू शकेल, त्यामुळे भारतीय टेक कंपन्यांना अधिक महसूल मिळण्याची शक्यता आहे.
विश्लेषक तसेच तज्ञांच्या मते भारतीय टेक कंपन्यांना कशा आणि किती संधी मिळतील याबाबत अनेक किंतुपरंतु आहे. ट्रम्प प्रशासनाच्या मागील कारकीर्दीकडे नजर टाकली तर भारतीय तंत्रज्ञान कंपन्या ट्रम्पच्या नवीन योजनांमधून फायदा मिळवू शकतील असे दिसते. तर दुसरीकडे एचवन-बी व्हिसा धारकांना काही प्रमाणात अनिश्चिततेचा सामना करावा लागेल अशी शक्यता आहे. पुन्हा निवडून आल्यावर ट्रम्प एचवन-बी व्हिसाच्या संदर्भात कठोर भूमिका घेऊ शकतात याबद्दल चिंता व्यक्त केली जात असली तरी, भारतीय आयटी सेवा कंपन्यांवर त्याचा तितका लक्षणीय परिणाम नसेल, असेही मानले जात आहे. समाप्त