श्रीनिवास हेमाडे
युनेस्को आणि संयुक्त राष्ट्रसंघातर्फे संत तत्त्ववेत्ता सॉक्रेटीस ( इ. स. पूर्व ४७०–३९९) च्या स्मरणार्थ दरवर्षी जगभर नोव्हेंबरचा तिसरा गुरुवार हा दिवस ‘जागतिक तत्त्वज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो. भारतातही विद्यापीठ स्तरावर आणि काही प्रमाणात महाविद्यालयीन पातळीवर हा दिवस साजरा होतो. या निमित्त भारताचे जागतिक तत्त्वज्ञान कोणते, या मुद्द्यावर चर्चा उपस्थित करणे गरजेचे आहे.

‘जागतिक तत्त्वज्ञान दिन’ २००२ पासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे साजरा करण्यात येतो. कोणत्याही प्रकारच्या तत्त्वज्ञानात्मक चिंतनाप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी नोव्हेंबरमधील तिसरा गुरुवार हा जागतिक तत्त्वज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. तत्त्वज्ञानाची काळजी वाहणाऱ्या प्रत्येकाचा हा ‘तात्त्विक सण’. तो कोणतीही तत्त्वज्ञानप्रेमी व्यक्ती आपापल्या परीने साजरा करू शकते.

Balasaheb-Thorat
Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात यांची सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावरुन सरकारवर टीका, “सरकारची मानसिकता…”
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Avimukteshwaranand Saraswati Criticized mohan bhagwat
Avimukteshwaranand Saraswati : मोहन भागवतांच्या वक्तव्यावर भडकले शंकराचार्य, “सत्ता हवी होती तेव्हा मंदिराचा जप सुरु होता, आता…”
Maharashtra Breaking News Live Updates
Maharashtra News : “छगन भुजबळांची समजूत कशामुळे काढायची?”, माणिकराव कोकाटे यांचा सवाल
Air quality index in Delhi area
शिक्षा, काळ्या हवेची!
Narayana murthy climate change threat
Narayana Murthy :…तर देशात भविष्यात मोठे स्थलांतर होईल! इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचा धोक्याचा इशारा
loksatta lokrang article
भारतीय संविधानातील भारतीयतेचा प्रश्न!
Indian Constitution, Parliament , Constitution Discuss
भारतीय संविधानातील भारतीयतेचा प्रश्न!

लोकांनी आपला तत्त्वज्ञानात्मक वारसा जगात न्यावा, जगातील नव्या कल्पनांसाठी आपली मने खुली करावीत, आणि एकूण मानवी समाज ज्या आव्हानांना तोंड देत आहे, त्याविषयी सर्वसामान्य नागरिक आणि बुद्धिमान वर्ग यांच्यात सार्वजनिक संवाद साधला जावा, असा संवाद साधण्यासाठी त्यांनी उद्युक्त व्हावे, हा हेतू या दिनाच्या प्रवर्तनामागे आहे. मानवतेला भेडसावणाऱ्या विविध आव्हानांवर परिणामकारक उपाय सुचवू पाहणाऱ्या तत्त्वज्ञानात्मक अभ्यासास, संशोधनास आणि विश्लेषणास प्रोत्साहन देणे आणि समस्यांची निवड करताना तत्त्वज्ञानाच्या चिकित्सक उपयुक्ततेविषयी व्यापक जनजागरण करणे, हे हेतू या तत्त्वज्ञानात्मक सणामागे आहेत, असे म्हणता येते.

गेल्या काही दशकांपासून भारत अनेक क्षेत्रात महासत्ता बनण्याची इच्छा बाळगून आहे. विशेषतः १९९० च्या जागतिकीकरणाच्या लाटेनंतर महासत्ताकांक्षा तीव्र झाली आणि गेल्या दशकापासून आर्थिक क्षेत्रात त्या इच्छा प्रचंड उधाणल्या आहेत, असे जाणवते. तथापि ‘जागतिक तत्त्वज्ञान दिन’ साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर तत्त्वचिंतनाच्या क्षेत्रात आम्ही जागतिक महासत्ता कसे होऊ, ही मोठी समस्या आहे. एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी असा कोणता देदीप्यमान तत्त्वज्ञानात्मक वारसा आपणापुढे आहे की जो आपण जगापुढे निःसंदिग्धपणे व सुस्पष्टपणे नेऊ शकतो, हा विचार ऐरणीवर आणला पाहिजे. या दिशेने विचार करता भारताच्या (की इंडियाच्या?) संदर्भात ‘भारताचे तत्त्वज्ञान कोणते आहे?’ आणि ‘भारताचे जागतिक तत्त्वज्ञान कोणते आहे? असे दोन कळीचे प्रश्न उपस्थित करणे युक्त व सत्य राहील.

‘भारताचे तत्त्वज्ञान कोणते आहे?’ या प्रश्नाचे उत्तर ‘अद्वैत वेदान्त हे भारताचे तत्त्वज्ञान आहे’ असे दिले जाते. पण इतिहास पहाता हे उत्तर निखालस चुकीचे आहे. कारण, भारतात प्राचीन काळापासून अनेक तत्त्वज्ञाने विकसित होत आली आहेत, हे पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे.

दुसऱ्या प्रश्नांच्या उत्तराचा थोडक्यात शोध घेऊ. भारतात प्राचीन काळापासून तत्त्वज्ञान जोडले गेले आहे. धर्म अन तत्त्वज्ञान येथे नेहमीच अविभाज्य राहिले आहेत. प्राचीन काळापासून भारतात तीन धर्म आणि चार तत्त्वज्ञाने विकसित होत गेली. वैदिक हिंदू धर्म, अवैदिक बौद्ध धर्म व अवैदिक जैन धर्म हे तीन प्रमुख धर्म आहेत. हिंदू धर्म व्यापक लोकसंख्येचा व प्रभावी आहे. त्या प्रभावाखाली पण बंडखोरी करत शीख धर्माची पंधराव्या शतकात भर पडली, एकूण चार धर्म झाले. एका बाजूला हिंदू, बौद्ध आणि जैन या तिन्ही या धर्मांची स्वतंत्र तत्त्वज्ञाने किंवा दर्शने आहेत, म्हणजेच धर्म आणि दर्शन व्यवस्था या दोन्ही वैचारिक आयुधांनी तिन्ही धर्म समृद्ध आहेत. दुसऱ्या बाजूला तिन्ही धर्मांच्या विरोधात एक वेगळे दर्शन आहे, पण तो धर्म नाही. हे चौथे तत्त्वज्ञान म्हणजे पूर्ण इहवादी चार्वाक तत्त्वज्ञान. ही सारीच तत्त्वज्ञाने विविध परंपरांनी संपृक्त समृद्ध आहेत.

तथापि तिन्ही धर्म आणि त्यांचे तत्त्वज्ञाने वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पक्षपाती आहेत, हे अनुभवाधारित सत्य आहे, यात शंका नाही. त्यातल्या त्यात बौद्ध धर्माला व तत्त्वज्ञानाला जागतिक धर्म होण्याचा सन्मान लाभला आहे. हिंदू व जैन धर्मीय लोक जागतिक पातळीवर गेले, पण त्यांचा धर्म बंदिस्त राहिल्याने त्यांचे तत्त्वज्ञानही बंदिस्तच राहिले. म्हणून कोणत्याही धर्माचे पक्षपाती तत्त्वज्ञान भारताचे आजचे तत्त्वज्ञान होऊ शकत नाही. मग, “भारताचे जागतिक तत्त्वज्ञान कोणते आहे? असे कोणते तत्त्वज्ञान आहे की जे जागतिक दर्जाचे होण्यास सर्व बाजूंनी पात्र आणि सक्षम आहे? याचे उत्तर या चारातील ‘कोणतेही भारतीय तत्त्वज्ञान ‘भारताचे जागतिक तत्त्वज्ञान’ नाही” असे येते.

मग कोणते तत्त्वज्ञान ‘भारताचे जागतिक तत्त्वज्ञान बनू शकते? तर, असे एक तत्त्वज्ञान भारताने खरे तर प्राचीन काळापासून विकसित केले आहे, ते अधोरेखित करणे अनिवार्य आहे. त्यासाठी हिंदू शब्द ‘धर्म’ आणि त्याचे भाषांतर म्हणून वापरले जाणारा इंग्लिश शब्द religion यांचे मूळ अर्थ उपयोगी आहेत. त्यांच्या विश्लेषणातून ‘आधुनिक जागतिक भारतीय तत्त्वज्ञान’ ही संकल्पना विकसित होऊ शकते, अशी आशा बाळगता येईल.

‘धर्म’ हा प्राचीन अर्थ महाभारतात आढळतो. धारणाद्धर्ममित्याहुः धर्मो धारयत प्रजाः। यस्याद्धारणसंयुक्तं स धर्म इति (महाभारत, शांति पर्व, १०९.१२ सत्य-अनृत अध्याय) सूक्त स्पष्ट करते की ‘प्रजेकडून धारण केला जातो तो (नियम-कायदा) म्हणजे धर्म, ज्यात वेगवेगळ्या लोकांना धारण करण्याची (एकत्र आणण्याचे सामर्थ्य) क्षमता असते तोच धर्म. म्हणजे असे तत्त्व की ज्यामुळे लोक समाधानाने एकत्र जगू शकतात.

religion चा मूळ अर्थ ‘एकत्र बांधणे’. ज्या religare या जुन्या फ्रेंच शब्दापासून religion शब्द बनतो, त्याचा अर्थ ‘पुन्हा (पुन्हा) एकत्र बांधणे किंवा एकत्र आणणे. काय बांधणे ? तर, खरे तर ‘लाकडाची मोळी एकत्र बांधणे. वेड्यावाकड्या, सरळ, जाड, बारीक, काळ्या-पांढऱ्या, जळाऊ सुक्या-ओल्या, रक्तबंबाळ करणाऱ्या काटेरी-बिनकाटेरी, लांब-आखूड, अशा एकत्र आणणे त्रासदायक, अतिशय कष्टदायक काटक्या एकत्र आणून त्या सुटणार नाहीत व घट्ट एकत्र रहातील अशा एका मजबूत दोरखंडाने म्हणजेच सूत्राने ती मोळी बांधणे म्हणजे religare. Ligare म्हणजे बांधणे आणि re म्हणजे पुन्हा किंवा पुन्हा पुन्हा. म्हणून ‘पुन्हा (पुन्हा) एकत्र बांधणे.

फ्रेंच समाजशास्त्रज्ञ डेव्हिड एमिल दर्खाईम (१८५८-१९१७) च्या मते ‘धर्म मूलतः सामाजिक असतो आणि व्यक्तिगत सहभाग आणि सामाजिक संघटन ही त्याची दोन वैशिष्ट्ये असतात. ती पहाता ‘धर्म’ व religion एकच अर्थ स्पष्ट करतात. मग हा धर्म कोणता?

हा धर्म म्हणजे लोकजीवन जगताना जो नियम त्यांच्यावर सामाजिक सौहार्द व मानवी विकास यासाठी एकत्र आणेल, ज्या सूत्राने लोक एकत्र बांधले जातील, असे सूत्र म्हणजे कायदा. अर्थात संविधान. म्हणून भारताचे सर्व धर्मांना सामावून घेणारे ‘संविधान’ हेच धर्मपुस्तक असले पाहिजे आणि लोकशाही हाच धर्म असला पाहिजे

‘ब्रिज ऑफ द स्पाईज’ मध्ये टॉम हँक्स सीआयएच्या एजंटला सांगतो की आपण दोघेही वेगवेगळ्या वंशाचे-जातीचे व देशाचे आहोत, तरीही अमेरिकन नागरिक आहोत. कारण आपल्याला मतभेद मिटवून एकत्र आणणारा एकच ग्रंथ या देशात आहे; तो म्हणजे ‘कायद्याचे पुस्तक’.

भारतीय कायदा सर्वांना एकत्र आणत असले तर भारताचा कायदा, भारतीय संविधान हे भारतीयांचे तत्त्वज्ञानाचे व धर्माचे पुस्तक होण्यास आणि लोकशाही हाच धर्म होण्यास हरकत नसावी. संविधान हे आधुनिक भारताचे तत्त्वज्ञान असेल. त्या तत्त्वज्ञानाला जागतिक दर्जाचे स्थान लाभू शकेल. धर्म आणि तत्त्वज्ञान एकत्र असणे हे वैशिष्ट्यही टिकेल आणि नवे अभिमानास्पद जागतिक तत्त्वज्ञानही भारताकडे असेल.

लेखक तत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक असून व्यावसायिक तत्त्ववेत्ते आणि ‘तत्त्वभान’ पुस्तकाचे लेखक आहेत.

Shriniwas.sh@gmail.com

Story img Loader