दरवर्षी २१ ऑगस्ट हा दिवस ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी काहीना काही उपक्रम विविध मंडळांतर्फे आयोजित केले जातात. ज्येष्ठ नागरिकांनी आपले आरोग्य कसे सांभाळावे, उतार वयात होणाऱ्या आजारांना कसे तोंड द्यावे, आपला वेळ सत्कारणी लावण्यासाठी त्यांना काय काय करता येईल, कुठले छंद जोपासावेत, आपली दिनचर्या कशी ठेवावी, आर्थिक नियोजन कसे कारावे वगैरे विषयांतील तज्ज्ञांकडून मार्गदर्शनपार लेख लिहिले जातात आणि भाषणे केली जातात. हे सर्व अत्यंत महत्त्वाचे आणि उपयुक्त आहे, याबद्दल शंकाच नाही. पण ज्येष्ठांच्या तरुण पिढीकडून काय माफक अपेक्षा आहेत किंवा नवीन काळातील बदलते वास्तव लक्षात घेता त्यांना काय सांगावेसे वाटते, याबाबत मात्र क्वचितच ऊहापोह होतो.

दोन पिढ्यांतील अंतरामुळे होणारा वाद किंवा संघर्ष ही बाब काही नवीन नाही. काही ज्येष्ठ मंडळी आपल्या हेकेखोर, हटवादी आणि विक्षिप्त वागणुकीमुळे कुटुंब आणि समजातील आदर गमावून बसतात. पण काही प्रकरणांत असे दिसून येते, की घरातील तरुण व्यक्ती वयस्क व्यक्तींशी फार कठोरपणे, काहीवेळा दुष्टपणे वागतात. त्यातच राहत्या जागा किंवा स्थावर मालमत्तांना जे अतोनात मोल आले आहे त्यामुळे माणुसकीच नष्ट होईल की काय, अशी रास्त भीती वाटू लागली आहे.

swiggy IPO, share market,
विश्लेषण : ‘स्विगी’च्या समभागांसाठी बोली लावणे फायद्याचे की तोट्याचे?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Election Commission, maharashtra Director General of Police, Rashmi Shukla
विश्लेषण : पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना अखेर निवडणूक आयोगाने का हटविले?
nagpur pollution increased on diwali due to use of firecrackers
प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्पना हवेत ,कोट्यवधींच्या फटाक्यांचा आवाज व धूर
firecrackers of worth rs 30000 stolen after beating up seller in baner
बाणेरमध्ये फटाका विक्रेत्याला मारहाण करुन  लूट; ऐन दिवाळीत लूटमार; ३० हजारांचे फटाके चोरुन चोरटे पसार
New Home Investment, Tax Exemption,
करावे कर समाधान : नवीन घरातील गुंतवणूक आणि कर सवलत
Pune air, bad air, Pune air at hazardous levels
पुण्याची हवा धोकादायक पातळीवर, बिघडलेल्या हवेचे परिणाम काय?
Health Special Diwali for mental health
Health Special : मानसिक स्वास्थ्यासाठी दिवाळी

हेही वाचा – चिनी धमक्यांपुढे तगणारा तैवान!

तरुणांनी ज्येष्ठांच्या शारीरिक, आर्थिक आणि मानसिक हतबलतेचा विचार करून त्यांना वागणूक द्यावी असे त्यांना नम्रपणे सुचवावेसे वाटते. वृद्धांची तरुणांकडून ऐषआरामच्या साधनांची वा मानसन्मानाची अपेक्षा नसते, केवळ सहृदयतेने विचार करणेच अपेक्षित असते. आज सारे काही संगणकीकृत झाले आहे. सर्व व्यवहार ऑनलाइन चालतात. आजच्या वृद्ध पिढीला त्यासाठी आवश्यत कौशल्ये अवगत नसतात. त्यांच्या निवृत्तीच्या सुमारास संगणक युगाची सुरुवात झाली आणि बघता बघता त्याचा वेग इतका वाढला की आधीची पिढी अगदी निरक्षर म्हणावी अशी ठरली. त्यामुळे दोन पिढ्यांतील अंतराचे आयामच बदलले. त्यामुळे वृद्धांचे भांबावणे आपुलकीने समजून घेणे गरजेचे आहे.

आजच्या तरुणांचा दिनक्रम फार दगदगीचा आणि तणावपूर्ण आहे. जीवनशैली अत्यंत खर्चिक, अशाश्वत, तणावपूर्ण आहे. त्यामुळे घरी आल्यानंतर त्यांना कोणाशी साधा संवाद साधणेही नकोसे वाटते. काही वेळा घरी येऊनही परत लॅपटॉपमध्ये डोके घालून बसणे क्रमप्राप्त ठरते. अशावेळी घरी असणाऱ्यांना प्रश्न पडतो की संवाद कधी आणि कसा साधावा? शिळोप्याच्या गप्पा सोडा किमान प्रापंचिक अडचणी सोडविण्यासाठी तरी घरातील तरुणांचा वेळ कसा मिळवावा? कारण काही अडचणी दूर करणे वृद्धांच्या आवाक्याबाहेरचे असते. तरुणांच्या अनुपस्थितीत घरात दिवसभर वृद्धांनीच सर्व गोष्टी सांभाळलेल्या असतात. अशावेळी त्यांनी काही विचारलेच, तर त्यांच्यावर चिडणे योग्य नाही.

तरुण पिढी आठवडाभर दिवसरात्र कामात बुडालेली असते आणि पाश्च्यात्य देशांतील पद्धतीनुसार त्यांना विकेंड बाहेर जाऊन साजरा करायचा असतो. अशावेळी आठवडाभर घरात तरुणांच्या अनुपस्थित अडकून पडलेल्या व्यक्तींनी मोकळा श्वास कधी घ्यावा, याचाही विचार करणे गरजेचे आहे. कैक वर्षे प्रापंचिक कटकटींचा सामना करून त्यांनाही कंटाळा आलेला असतो. अशावेळी त्यांनाही ‘वीकएन्ड’ची आवश्यकता आहे, असे तरुण पिढीला का वाटत नाही?

काही कुटुंबांमध्ये वृद्ध आई-वडिलाना सांभाळण्यावरून वाद विकोपाला गेलेले असतात. आता मुलगीदेखील माहेरच्या संपत्तीत हक्कदार झाल्यामुळे त्यात भर पडली आहे. काही प्रकरणांत अमुक एक तारखेला अमुक एक भावाने किवा बहिणीने आई-वडिलांना (किवा जो मागे राहिलेला असेल त्याला) सांभाळायचे, असे ठरलेले असते. त्यादिवशी कौटुंबिक अडचण, आजारपण, पाऊस-पाणी, प्रवासातील अडचणी कशाचाही विचार न करता, त्याच दिवशी त्यांची रवानगी केली जाते. मुलांचे महत्त्वाचे शैक्षणिक वर्ष, असेल तर वृद्ध व्यक्तीचे आजारपण म्हणजे त्या कुटुंबांवर आदळणारे फार मोठे संकट ठरते. त्या व्यक्तीच्या देखतच आल्या गेल्यांसमोर तसा उल्लेख वारंवार होत रहातो. आणि परीक्षेत अपेक्षित यश नाही मिळाले, तर आजन्म त्याचा उद्धार ठरलेला. अशावेळी आधीच गलितगात्र झालेल्या वृद्धांच्या हळव्या मनाला अपराधी भावनेमुळे काय वेदना होत असतील, याचाही विचार कोणी करत नाही. वृद्धत्वामुळे व्यक्तीच्या नकळत त्याच्या वागणुकीत अकालनीय बदल होतात. या बदलांना “नाटक” संबोधणे योग्य नाही.

अलीकडे रुग्णालयात दाखल होणे भयंकर महागडे ठरत आहे. अशावेळी अनेक कुटुंबांत लोकलज्जेस्तव वृद्धांना सरकारी रुग्णालयात दाखल केले जात नाही. खासगी रुग्णालयात ठेवले जाते. दिवसभर तिथे कुटुंबातील कोणी हजर असणार नाही, हे सत्यही स्वीकारले जाते. पण रुग्णालयातून घरी जाण्याच्या दिवशी खर्चाच्या विभागणीवरून कुटुंबात होणारे वाद पाहून आणि ऐकून त्या वृद्ध व्यक्तीला, आपल्याला जगविण्याची खटपट यासाठी होती का? असे वाटू लागते.

मी असेही काही आई वडील पाहिले आहेत ज्यांनी मुलांचे भवितव्य घडविण्यात आपण पैशाच्या बाबतीत कुठेही कमी पडता कामा नये या हेतूने उमेदीचे आयुष्य आणि प्रापंचिक जबाबदाऱ्या योग्य रीतीने पडण्यासाठी आर्थिक नियोजन अतिशय काटेकोरपणे केलेले असते. स्वत:च्या आवडीनिवडी आणि हौसेमौजेला फाटा दिलेला असतो. मुलाला घर घेण्यासाठीही घसघशीत आर्थिक मदत केलेली असते आणि थोड्याच दिवसांत तो अनावश्यक खरेदीवर सढळ हाताने खर्च करू लागतो.

हेही वाचा – …गल्लीपर्यंतच्या घराणेशाहीकडे कधी पाहायचे?

खाण्या पिण्याच्या बाबतीत आमची पिढी म्हणजे पन्नासच्या दशकात जन्मलेली पिढी खरोखरच नशीबवान. आम्ही कदान्नही अनुभवले आणि आता एकपेक्षा एक उत्तम खाण्याचे प्रकार अगदी देशी आणि विदेशीही पदार्थांचा आस्वाद आम्ही मनमुराद घेऊ शकतो. ज्यांची नावेही कधी आम्ही पूर्वी ऐकली नव्हती असे पदार्थ आम्ही अगदी नित्यनियमाने खाऊ शकतो. ते फारच लज्जतदार असतात. पण त्यांच्या किमतीत आमची किती दिवासांची किती माणसांची घरी केलेली जेवणे झाली असती असे प्रश्न पडतात. आमचे असे गैरलागू प्रश्न तरुणांच्या पाकिटातील एक क्रेडिट कार्ड क्षणार्धात सोडवते. पण असे पदार्थ कितीही चविष्ट वाटले, तरीही ते रात्रीचे जेवण म्हणून स्वीकारणे आमच्या पिढीला शक्य होत नाही.

प्रत्येकजण कधी ना कधी वृद्ध होणारच असतो, मात्र याची जाणीव तरुणपणी कोणालाच नसते. त्यातूनच हे सारे प्रश्न उद्भवतात. दोन्ही पिढ्यांनी एकमेकांना थोडेफार समजून घेतले, थोड्या तडजोडी केल्या, तर सर्वांचेच जीवन सुकर होईल.

gadrekaka@gmail.com