दत्तात्रय पाचकवडे
संयुक्त राष्ट्रांची अन्न आणि कृषी संघटना यांच्या कडून दरवर्षी ५ डिसेंबर हा जागतिक मृदा दिवस साजरा केला जातो यंदाच्या मृदा दिनाची संकल्पना आहे ‘मातीची काळजी: मापन, देखरेख’. अरे संसार संसार या चित्रपटात एक गाणे आहे. ‘काळ्या मातीत मातीत तिफण चालते…’ पण आज बैलजोडीवर तिफनिने पेरणी करणारे शेतकरी मात्र बोटावर मोजण्याइतकेच राहिले आहेत कारण आपली काळी माती तितकी कसदार राहिलेली नाही आणि बैलजोडीही शिल्लक राहिली नाही… विविध प्रकारच्या प्रदूषकांनी मृदेची अपरिमीत हानी केली आहे. रसायनांच्या भडिमारामुळे जैवविविधता लयाला गेली आहे.
मातीचे प्रदूषण झेनोबायोटिक (मानवनिर्मित) रसायनांच्या बेसुमार वापरामुळे किंवा वातावरणातील इतर बदलांमुळे होते. यामागचे सर्वांत महत्वाचे कारण आहे, ते म्हणजे बेसुमार रासायनिक खते आणि कीटकनाशके, तणनाशके यांचा वापर. केवळ अधिकाधिक पीक हाती यावे म्हणून वाट्टेल तेवढी रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरणे ही आज सार्वत्रित समस्या आहे, मात्र या अल्पकालीन लाभावर डोळा ठेवल्यामुळे मृदेचे दीर्घकालीन नुकसान आपण करून ठेवत आहोत, याविषयी बरेच शेतकरी आजही अनभिज्ञ असतात. रसायनांच्या या वारेमाप वापरामुळे जमिनीतील सूक्ष्म जीव लयास जातात. परिणामी जमिनीचा पोत दिवसेंदिवस बिघडत चालला आहे.
मृदा प्रदूषणामुळे कोणत्या स्वरूपाचे नुकसान होते?
जिथे मातीचे प्रदूषण झाले आहे तिथे सेंद्रिय कर्बाचे प्रमाणही कमी असते. तसे पाहिले तर भारतीय शेती मध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण हे आधीच अतिशय कमी आहे. स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांत ते १ टक्क्यावरून ०.३ टक्क्यापर्यंत कमी झाले आहे. जेव्हा मृदेतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण योग्य असते तेव्हा तिची जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असते आणि जमीनही सुपीक असते. भारतीय जमिनीत प्रामुख्याने नत्र, फॉस्फरस आणि पोटॅशियमची कमतरता आहे आणि बेसुमार रासायनिक खते वापरल्यामुळे ही समस्या अधिक वाढत गेली आहे
मृदा प्रदूषणाचे परिणाम
मानवाच्या आरोग्याविषयी समस्यांनादेखील मृदा प्रदूषण मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. अनेक प्रदूषके ही कर्सिनोजेनिक असतात. कार्सिनोजेनिक घटक म्हणजे ज्यांच्या सेवन वा संपर्कामुळे कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते, असे घटक. मृदा प्रदूषणाचे परिणाम हे निसर्गातील अन्नसाखळीवरही होतात. अन्न साखळीमध्ये मोठ्या प्रमाणात परस्परावलंबित्व. अन्नसाखळीतील अगदी प्राथमिक स्तरावरील कीटकसदृश जीव ही हानिकारक रसायने गिळकृंत करतात. इथूनच पुढील अन्नसाखळी प्रदूषित होण्यास सुरुवात होते. हे घातक घटक अन्नावाटे अन्य मोठ्या प्राणीमात्रापर्यंत पोहचून त्यांचा मृत्यूदर वाढतो. हे प्रदीर्घकाळ सुरू राहिल्यास अन्नसाखळीतील एखादी कडी गळून पडू शकते.मृदा प्रदूषण होऊन जमिनीची क्षारता वाढते ज्यामुळे जमिनी नापीक होत आहेत आणि तशा जमिनीत पिके योग्य प्रमाणात वाढण्यात अडथळे येतात. जे पीक हाती येते तेदेखील मानवी आरोग्यास हानिकारक असते.
मृदा प्रदूषण टाळण्यासाठीच्या उपाययोजना
विषारी रसायने ही मातीच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत आणि माती प्रदूषणाचे प्रमुख कारण आहे. हे कारण दूर ठेवण्यासाठी काही गोष्टी निश्चितच करता येऊ शकतात.कमी प्रमाणात वापर – रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर पूर्णच बंद करणे आता, या टप्प्यावर पोहोचल्यानंतर शक्य नाही. मात्र तो हळूहळू कमी करत नेणे शक्य आहे.फेरवापर- सेंद्रीय खत हे पुनर्वापराचे उत्तम उदाहरण आहे. शेतीत निर्माण होणारा कचरा, पालापाचोळा, धान्यांची देठे, फोलपटे, भाज्यांचा टाकाऊ भाग, गुरांचे शेण, गांडुळ इत्यादींचा वापर करून अत्यंत उत्तम दर्जाचे पोषण देणारी सेंद्रीय खते, शेणखत, गांडुळखत तयार करता येऊ शकते. त्याच्या नियमित वापरामुळे शेतीचा गेलेला कस भरून काढण्यास हातभार लावता येऊ शकतो.
या उपायांचे तिहेरी फायदे आहेत. एक म्हणजे यासाठी फारसा खर्च करावा लागत नाही. कचरा जाळल्यामुळे होणारे प्रदूषण टळते आणि मातीवर कोणतेही दुष्परिणाम न होता, हळूहळू तिचे आरोग्य सुधारण्यास हातभार लागतो.पीक फेरपालट हादेखील एक महत्त्वपूर्ण उराय आहे. आपण एकच पीक वर्षानुवर्षे त्याच जमिनीत जर घेतले तर जमिनीचा पोत बिघडतो. पीक फेरपालट केल्याने जमीना पोत सुधारते. शेंगवर्गिय भाज्या किंवा डाळींचे उत्पादन घेतल्यास नैसर्गिक पद्धतीने जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढते.पाण्याचा अतिवापर हेदेखील मृदा प्रदूषणाचे एक महत्त्वाचे कारण आहे. विहीर आणि बोअरवेलमध्ये मुबलक पाणी आहे, म्हणून कितीही पाणी देणे, रात्री मोटार चालू केली की ती थेट सकाळीच बंद करणे यामुळे जमिनीत ओल कायम राहते. पोषक घटक वाहून जातात किंवा त्यांची परिणामकारकता कमी होत जाते. त्यामुळे वाफसा अवस्थेत पाणी देणे हे कधी चांगले. माती प्रदूषणाचे एक मुख्य कारण म्हणजे जंगलतोडीमुळे होणारी मातीची धूप.
शहरीकरण करायच्या हव्यासापोटी अतिप्रमाणात जंगलतोड झालेल्या भागात वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देणे, हाच त्यावरचा उत्तम उपाय आहे.एकंदरीत आपण विचार केला तर मृदा प्रदूषण ही पर्यावरणीय समस्या तर आहेच पण यात मानवी हस्तक्षेप खूप आहे. मानवाच्या चुकीच्या कृतींमुळे पर्यावरण, शेती आणि माणसांच्या आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होत आहेत. माती प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी तांत्रिक नवकल्पना, शाश्वत पद्धती आणि सार्वजनिक सहभागासह बहुआयामी दृष्टिकोन आवश्यक आहे आहे. प्रभावी उपाय योजना करून त्या अमलात आणून आणि मृदा आपल्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे व याबद्दल जागृती करून मातीचे प्रदूषण मर्यादित राखण्यासाठी हातभार लावता येऊ शकतो.
मृदा प्रदूषण रोखणे हे सरकार किंवा एकट्या-दुकट्या शेतकऱ्याचे काम नाही. ती सर्वांनी एकाच वेळी आणि सातत्याने, संयम राखून करण्याची प्रदीर्घ प्रक्रिया आहे. आपण आपल्या हव्यासापोटी जर निसर्गाकडे दुर्लक्ष केले तर त्याचे दुष्परिणामही आपल्यालाच भोगावे लागतील.