जयदेव रानडे

आधी नेता एखादा शब्दप्रयोग उच्चारतो, मग ते पक्षाचे- पर्यायाने सरकारचेही अधिकृत धोरण होते.. त्या शब्दप्रयोगांच्या वारंवार वापराची अघोषित सक्तीच सारे पाळतात; पण प्रत्यक्षात हे शब्दप्रयोग पोकळ ठरतात किंवा त्यांच्या उलट कारवाया चालतात. अशी स्थिती क्षी जिनपिंग यांचे नेतृत्व अधिक दृढ होत असलेल्या चीनमध्ये दिसून येत आहे!

gandhi dr babasaheb ambedkar co ordination
गांधी – आंबेडकर… समन्वयाआधीचा अंतर्विरोध
non marathi mayor mumbai
घटत्या मराठी टक्क्यामुळे मुंबईत लवकरच अमराठी महापौर?
review of maharashtra winter session Analysing of maharashtra winter session
हिवाळी अधिवेशनाचा लेखाजोखा
article about risk of one country one election to democracy
‘एक देश एक निवडणूक’ नको, कारण…
Shirish patel loksatta article
नियोजित शहराचे स्वप्न प्रत्यक्षात आणणारे शिरीष पटेल
Julio Ribeiro Christmas memories loksatta article
ख्रिसमसच्या काही आठवणी…
savitribai phule pune university in controversy over violence and increasing drug addiction among students
अविद्योचा ‘अंमल’
in Parbhani Dr Babasaheb Ambedkar Statue and Constitution Sculpture are vandalized
आंबेडकरांचे नाव घेण्याची अपरिहार्यता
India is known internationally as snakebite capital
भारत सर्पदंशाची राजधानी म्हणून का ओळखला जातो? ही ओळख बदलण्यासाठी काय करता येईल?

चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणून तिसरी कारकीर्द मिळवणारे क्षी जिनपिंग हे स्वत:चे स्थान अधिक मजबूत करण्यासाठी, सर्व उच्च पदांवर निष्ठावंतांची वर्णी लावण्यावरच थांबलेले नाहीत. आपलीच धोरणे कशी देशाचा उद्धार करणारी आहेत, अशा प्रचाराचा धडाकाच त्यांनी आता आरंभला आहे. चिनी कम्युनिट पक्षाची (यापुढे ‘सीसीपी’) राष्ट्रीय महापरिषद- नॅशनल काँग्रेस- १२ ऑक्टोबर २०२२ रोजी संपली, तेव्हापासूनच चीनमधील अधिकृत माध्यमे जिनपिंग यांची प्रतिष्ठा वाढवण्याच्या उद्देशाने काही आशयसूत्रांवर लक्ष केंद्रित करत आहेत. यामध्ये क्षी जिनपिंग यांच्या देशांतर्गत धोरणात्मक उपक्रमांना महत्त्व मिळणे साहजिक आहे.

पीपल्स डेली, गुआंगमिंग डेली आणि पक्षाचे अग्रगण्य सैद्धांतिक पाक्षिक जर्नल किउ शी (सत्य शोध) सारखी प्रमुख अधिकृत माध्यमे जवळजवळ दररोज या विषयांवरचे लेख- तेही कुणा ना कुणा उच्चपदस्थांच्या नावाने- प्रकाशित करत आहेत.  पक्षाचे प्रांतिक पातळीवरील अनेक अधिकारी, सचिव हे आपापली निष्ठा दाखवून देण्यास उत्सुक असतातच (माओच्या काळात ‘ध्वज लालच आहे हे दाखवण्यासाठी लाल ध्वज फडकवणे!’ असे याला म्हणत), ते या लेखांचे लेखक. लेखांचे विषय केंद्र आणि प्रांतातील पक्ष संघटनांनी उचललेल्या असतात, लगोलग प्रांतीय पक्ष संघटना आणि काँग्रेस त्यांचा पुनरुच्चार करत ठराव मंजूर करतात.

ही आशयसूत्रे घोषणावजा शब्दप्रयोगांतूनही व्यक्त होतात. देशांतर्गत जनतेला लुभावण्यासाठी ‘टू सेफगार्डस’ आणि ‘टू एस्टॅब्लिशेस’ (‘दुहेरी सुरक्षा’ आणि ‘दोन स्थापना’) हे शब्दप्रयोग- नेहमी एकमेकांना जोडूनच- केले जातात, तर ‘वांशिक ऐक्य’, ‘सर्वाची समृद्धी’ हेही शब्दप्रयोग वारंवार होत असतात आणि हल्ली त्यात ‘चिनी शैलीने आधुनिकीकरण’ या शब्दप्रयोगाची भर पडली आहे.

यापैकी, ‘दुहेरी सुरक्षा’ आणि ‘दोन स्थापना’ हे शब्दप्रयोग मूलत: क्षी जिनपिंग यांची स्थिती ठोस असल्याचे सांगतात. ‘नेतृत्वाचा गाभा’ म्हणून त्यांच्या स्थानाला आव्हान न देण्याचा इशारा ‘सीसीपी’चे सदस्य आणि पदाधिकारी यांना त्यातून मिळतो. या ‘दोन स्थापना’ म्हणजे : ‘कॉम्रेड क्षी जिनपिंग यांना पक्षाच्या केंद्रीय समितीचा आणि संपूर्ण पक्षाचा गाभा म्हणून दर्जा स्थापित करणे’ आणि ‘नवीन लोकांसाठी चिनी वैशिष्टय़ांसह नव्या युगाच्या समाजवादाविषयी क्षी जिनपिंग विचारसरणीची मार्गदर्शक भूमिका प्रस्थापित करणे’.  तर ‘दुहेरी सुरक्षा’ म्हणजे  : ‘‘सीसीपी’अंतर्गत सरचिटणीस क्षी जिनपिंग यांच्या ‘मुख्य’ स्थितीचे रक्षण करणे’ आणि ‘पक्षाच्या केंद्रिभूत अधिकाराचे रक्षण करणे’.

‘दुहेरी सुरक्षा’ ही घोषणा २०१८ पासूनच तयार होती, पण  ऑक्टोबर २०२२ मधील विसाव्या पार्टी काँग्रेसने तिला पक्षाच्या घटनेत समाविष्ट करून अधिकृत दर्जा दिला. पंधरवडय़ाच्या आत, ३० ऑक्टोबर रोजी, चिनी कम्युनिस्ट पार्टी (सीसीपी) च्या ‘केंद्रीय शिस्त तपासणी आयोग’ (सेंट्रल डिसिप्लिन इन्स्पेक्शन कमिशन- यापुढे ‘सीडीआयसी’) या भ्रष्टाचार तसेच पक्षशिस्तीचे उल्लंघन यांवर देखरेख ठेवणाऱ्या संस्थेने, एका वरिष्ठ प्रांतिक पदाधिकाऱ्यावर ‘दोन स्थापनांचा विश्वासघात’ केल्याच्या आरोपाखाली कारवाईसुद्धा सुरू केली. क्षी जिनपिंग यांच्याशी विश्वासघात केलात, तर पक्षाकडून दंडात्मक शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असे संकेत या पहिल्या कारवाईतून मिळाली. त्यानंतर पक्षाच्या प्रत्येक ठरावात आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लेखांमध्ये आता दुहेरी सुरक्षा’ आणि ‘दोन स्थापना’ या शब्दप्रयोगांची जोडी दिसते म्हणजे दिसतेच.

‘वांशिक एकते’च्या नावाखाली हे..

क्षी जिनपिंग यांनी २०१७ पासून चीनच्या वांशिक अल्पसंख्याकांना त्या देशातील हान संस्कृतीच्या ‘मुख्य प्रवाहा’त आणण्याच्या गरजेवर भर दिला, तेव्हापासून ‘वांशिक एकता’ हा शब्दप्रयोग ‘सीसीपी’साठी महत्त्वाचा बनला. त्याआधी २०१६ मध्ये जिनपिंग यांनी पक्षाच्या ‘युनायटेड फ्रंट’ या संलग्न आघाडय़ांच्या जाळय़ातील ‘सेंट्रल स्मॉल लीडिंग ग्रूप’ (सीएसएलजी) चे अध्यक्षपद स्वीकारल्यावर त्वरित ‘युनायटेड फ्रंट वर्क डिपार्टमेंट’ची आर्थिक तरतूद आणि कर्मचारी संख्या दुप्पट केली. हे ‘वर्क डिपार्टमेंट’च वांशिक बाबींच्या कामाचे प्रभारी असते आणि ‘सीसीपी’ नसलेल्या घटकांचे पर्यवेक्षण करते.  या डिपार्टमेंटचे संचालक तसेच ‘चायनीज पीपल्स पोलिटिकल कन्सल्टेटिव्ह कॉन्फरन्स’चे वरिष्ठ अधिकारी यांच्या जातीय अल्पसंख्याक क्षेत्रे आणि स्वायत्त प्रदेशांना ‘तपासणी’ भेटी वाढल्या. २०२१ पार्टी काँग्रेसमध्ये युनायटेड फ्रंट वर्क डिपार्टमेंटच्या प्रमुखाची वर्णी पॉलिट ब्युरोमध्ये लावण्यात आली, यातून या कामाला दिले जाणारे उच्च प्राधान्य दिसून आले. दरम्यान, जिला सामान्यत: ‘मँडरिन’ म्हटले जाते ती ‘पुटोंगुआ’ भाषा हीच वांशिक अल्पसंख्याक शाळांतही  शिक्षणाची प्राथमिक भाषा म्हणून वापरणे, सरकारी नोकऱ्यांच्या परीक्षांसाठी चिनी भाषेचीच सक्ती, इत्यादी उपाय सुरू आहेत. चीनच्या वांशिक अल्पसंख्याकांच्या इतिहासाची पाठय़पुस्तके जाऊन आता चीनच्या केंद्र सरकारने मंजूर केलेल्या सुधारित आवृत्त्या पुरवण्याचे काम ‘सीसीपी’ करत आहे. या उपाययोजनांमुळे वांशिक अल्पसंख्याकांत नाराजी पसरली आहे. पण जिनपिंग यांनी ‘सीसीपी’प्रमाणेच ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’तही वांशिक अल्पसंख्याकांचे प्रतिनिधित्व उत्तरोत्तर कमी केले आहे.

‘सर्वाची समृद्धी’ हा क्षी जिनपिंग यांचा आणखी एक उपक्रम आहे. याचा उद्देश ग्रामीण-शहरी उत्पन्न असमतोल, ग्रामीण-शहरी विकास असमानता सुधारणे हा आहे. कोणत्याही देशातील लोकांची स्थिती आर्थिक समतेपेक्षा किती दूर आहे, हे ‘जिनी गुणांक’ वापरून मोजले जाते. जिनपिंग यांनी २०२१ ‘सर्वाची समृद्धी’ हा शब्द पहिल्यांदा उच्चारला, तोपर्यंत चीनमध्ये या गुणांकाचे प्रमाण ५७.७ पर्यंत वाढले होते. वाढती विषमता असंतोषाचीही जननी असते, त्यामुळे सीसीपीच्या अधिमान्यतेवर परिणाम होऊ शकतो आणि नेतृत्वालाही आव्हान मिळू शकते, हे जिनपिंग यांनी अचूक ओळखले. मात्र हल्ली, चिनी उद्योगपतींना आश्वस्त करण्यासाठी, चीनचे नवीन पंतप्रधान ली कियांग यांनी ‘सर्वाची समृद्धी’वर दिलेला भर कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. पीपल्स डेली, गुआंगमिंग डेली आणि इकॉनॉमिक डेलीसारखी अधिकृत वृत्तपत्रे नियमितपणे ‘सर्वाची समृद्धी’चे स्पष्टीकरण देणारे भाष्य आणि लेख प्रकाशित करतात, तेव्हा ‘‘ याचा अर्थ लोकांकडून संपत्ती काढून घेऊन संपत्तीचे पुनर्वितरण असा होत नाही’’ – हेही नमूद करतात. तरीही उद्योजक आणि व्यावसायिक आश्वस्त दिसत नाहीत. गेल्या दोन वर्षांत, स्थलांतरित होऊ इच्छिणाऱ्या श्रीमंत चिनी लोकांमध्ये वाढ झाली आहे. अंदाज असा आहे की, बडय़ांच्या या स्थलांतरांमुळे चीनला ५० अब्ज अमेरिकी डॉलरवर पाणी सोडावे लागू शकते. क्षी जिनपिंग मात्र, उत्पन्नातील असमानता कमी केली पाहिजे यावर ठाम आहेत. विसाव्या पार्टी काँग्रेसमध्ये आणि पुन्हा नॅशनल पीपल्स काँग्रेस (एनपीसी) च्या मागील महिन्यात झालेल्या वर्क रिपोर्टमध्ये ‘सर्वाची समृद्धी’चा पुनरुच्चार करण्यात आला.

हे उपाय चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाची भूमिका मजबूत करण्यासाठी तसेच क्षी जिनपिंग यांच्यासमोरील संभाव्य आव्हानांना रोखण्यासाठी आहेत. चीनची बिकट आर्थिक परिस्थिती, कमी विकास दर आणि वाढती बेरोजगारी यामुळे मोठय़ा प्रमाणावर लोकांच्या असंतोषाला हातभार लागला आहे. क्षी जिनपिंग आर्थिक मंदीला आवर घालण्यासाठी आणि लोकांचे राहणीमान कोविडआधीच्या पातळीपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न करत असताना,  ‘सीसीपी’मध्ये अंतर्गत असंतोषदेखील दिसून आलेला आहे. जिनपिंग यांनी पॉलिटब्युरो सदस्यांसह आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर कडक नियंत्रण ठेवूनसुद्धा, अधिकृत माध्यमांमधील असंख्य लेखांमध्ये ‘दुतोंडी’ पदाधिकारी, ‘राजकीय खोटारडे’ आणि ‘राजकीय टोळय़ा’ किंवा ‘वर्तुळे’ यांच्या अस्तित्वाचा उल्लेख वारंवार येतो, यातून हेच असे सूचित होते की, ‘सीसीपी’मध्ये जिनपिंग यांचे विरोधी गट आजही अस्तित्वात आहेत. (लेखक भारत सरकारचे माजी अतिरिक्त कॅबिनेट सचिव असून सध्या ते ‘राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळा’चे सदस्य आहेत, तसेच ‘सेंटर फॉर चायना अ‍ॅनालिसिस अ‍ॅण्ड स्ट्रॅटेजी’चे अध्यक्ष आहेत.)

Story img Loader