व्याकरण तज्ज्ञ यास्मिन शेख वयाच्या शंभरीत पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या सुहृदांचा एक मेळावा येत्या २१ जून रोजी पुण्यात आयोजित केला आहे.

भाषेवर प्रेम असणारे कुणीही व्याकरण या शब्दाभोवती असलेले नियमांचे जंजाळ सोडवण्याच्या फंदात पडत नाही. वयाच्या शंभीरत पदार्पण करत असलेल्या यास्मिन शेख यांच्यासाठी मात्र व्याकरण एखाद्या कवितेइतकं तरल असतं. गेली ७५ वर्षे व्याकरण हाच ध्यास असलेल्या यास्मिनबाईंना अजूनही या कवितेचा सोस आहे आणि तो त्या अगदी मनापासून लुटत असतात. नावामुळे झालेल्या घोटाळ्यांवर मात करत मातृभाषेवरील आपलं प्रेम अध्यापनाच्या क्षेत्रात राहून आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यातच धन्यता मानणाऱ्या यास्मिन शेख यांची कहाणी म्हणूनच इतरांहून वेगळी. मूळ नाव जेरुशा. वडील जॉन रोबेन. आई कोकणातली पेणची – पेणकर. म्हणजे जन्माने यहुदी (ज्यू). जन्मगाव नाशिक. वडील पशुवैद्या. सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरी; त्यामुळे सतत बदली. घरात पुस्तकांचा पेटारा भरलेला असायचा. सरकारी नोकरीत असल्यानं बदलीच्या प्रत्येक ठिकाणी प्रशस्त घरं. तिथं पुस्तक वाचनाचा लागलेला छंद, आजतागायत टिकून राहिला, याचं खरं कारण त्यांचं भाषेवरलं प्रेम.

Khashaba Jadhav, Olympic , Bronze Medal ,
खाशाबा आज हयात असते तर…
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Solapur mayor Mahesh kothe death marathi news
Mahesh Kothe : कुंभमेळ्यात स्नान करताना सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचा हृदयविकाराने मृत्यू
Huppa Huiyya 2 announcement
ठरलं! १५ वर्षांनी येणार मराठी चित्रपट ‘हुप्पा हुय्या’चा सिक्वेल, दिग्दर्शकाने केली घोषणा
Stunts by bikers kill young man in road accidnet
दुचाकीस्वारांच्या स्टंटबाजीने घेतला रस्त्यावरील तरुणाचा बळी
Maha Kumbhmela 2025
Maha Kumbh Mela 2025: १४४ वर्षांनंतर येणारा महाकुंभमेळा का महत्त्वाचा? कारण काय?
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…
shani surya budha will make tigrahi yog 2025
Tirgrahi Yog 2025 : ५० वर्षांनंतरच्या त्रिग्रही योगामुळे ‘या’ राशींचे चमकणार नशीब! बुध, सूर्य अन् शनीच्या संयोगाने होतील गडगंज श्रीमंत, वाढेल मानसन्मान

वडिलांकडे हट्ट करून पुण्याच्या स. प. महाविद्यालयात बहिणीबरोबर प्रवेश मिळणं हा यास्मिनबाईंसाठी मैलाचा दगड होता. श्री. म. माटे यांच्यासारख्या प्राध्यापकाने त्यांच्यासाठी व्याकरणाचा मार्ग इतका सुकर केला की, व्याकरणाशीच त्यांची गट्टी जमली. इतकी की, बी.ए. ला संपूर्ण महाविद्यालयात सर्वाधिक गुण मिळवण्याचा मान मिळाला. के. ना. वाटवे यांच्यासारख्या गुरूनं भाषाशास्त्राचे धडे दिले आणि आपल्या मातृभाषेच्या व्याकरणाच्या त्या प्रेमात पडल्या. पुढे मुंबईत अध्यापनाला सुरुवात झाल्यावर खरा गोंधळ सुरू झाला, तो नावावरून. दरम्यान नाशिकलाच अझीझ अहमद इब्राहीम शेख यांच्याशी विवाह झाला आणि यास्मिन शेख हे नाव धारण केलं. ज्यू आणि मुस्लीम असा हा आंतरधर्मीय विवाह. पण यास्मिनबाईंशी गप्पा मारताना, या धार्मिकतेचा लवलेशही जाणवत नाही. लहानपणापासून ह. ना. आपटे वाचतच मोठे झाल्याने भाषेचे सगळे संस्कार अस्सल मऱ्हाटी. मुंबईत दरवर्षी महाविद्यालयाच्या पहिल्या दिवशी वर्गाच्या दिशेने येताना दिसताच दोन-तीन विद्यार्थी वर्गाबाहेर यायचे आणि म्हणायचे… धिस इज नॉट अॅन इंग्लिश क्लास, धिस इज लॉट अ फ्रेंच क्लास… हा मराठीचाच वर्ग आहे ना? असं विचारत जेव्हा त्या वर्गात शिरत, तेव्हा विद्यार्थी चकित होत. मुसलमान बाई शिकवायला येणार म्हणून साशंक झालेले विद्यार्थी शिकवायला सुरुवात करताच एकमेकांकडे आश्चर्यानं बघायचे. यास्मिनबाईंना त्यांचा राग यायचा नाही, पण दु:ख वाटायचं. भाषेला धर्म नसतो. तुम्ही ज्या राष्ट्रात जन्माला येता, वाढता, त्या राष्ट्राची भाषा तुमचीही मातृभाषा असते. त्या म्हणतात : मी एकच धर्म मानते – मानवता… सर्वधर्मसमभाव.

हेही वाचा >>> शेतकरी हितात मोदींचे आणि देशाचे हित

यास्मिनबाई म्हणतात की, कोणतीही भाषा मुळात ध्वनिरूप असते. त्याहीपूर्वी हातवाऱ्यांच्या साह्याने एकमेकांशी संवाद साधला जात असे. ध्वनिरूपातूनच बोली तयार होते आणि बोली तर विरून जाणारी. ती टिकवण्यासाठी लिपीचा जन्म. शब्द, त्यांची रूपं, त्यातून तयार होणारी वाक्यं, त्यांची रचना, यातून एक नियमबद्धता येत गेली. मराठी भाषेत तर ब्रिटिश येईपर्यंत व्याकरणाचा सुस्पष्ट विचार झालेलाच नव्हता. त्या काळातील संस्कृतज्ज्ञ दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना ब्रिटिशांनी मराठी व्याकरणाचं सुसूत्रीकरण करण्याची सूचना केली खरी, पण त्यांचा आदर्श होता, संस्कृत वैय्याकरणी पाणिनी. तर्खडकरांनी संस्कृत वर्णमाला जशीच्या तशी स्वीकारली. त्यामुळे मराठीत ज्याचे उच्चारही होऊ शकत नाहीत, असे वर्ण लिपीत आले. ती केवळ चिन्हंच राहिली. प्रमाण भाषा ही एक संकल्पना आहे. प्रमाण भाषेबद्दल विनाकारण उलटसुलट मतप्रवाह तयार झालेले दिसतात. यास्मिन शेख यांच्या मते औपचारिक, वैज्ञानिक, वैचारिक लेखनासाठी प्रमाण भाषा उपयोगात आणणं आवश्यक आहे. हे लेखन पुढील पिढ्यांसाठी टिकवून ठेवायचे असेल, तर त्यासाठी प्रमाण भाषेचा आग्रह सर्वांनीच धरायला हवा. पण मी जसं बोलतो, तसंच लिहिणार, असा हट्ट चुकीचाच आहे. कथा, कादंबरी यांसारख्या ललित लेखनासाठी प्रमाण भाषेचा आग्रह धरता कामा नये. बोली भाषेचे लिखित स्वरूप धारण करून असे लेखन केले जाते. त्यात त्या भाषेच्या, त्या भाषक समूहाच्या, तेथील व्यक्तींच्या भावभावनांचा उद्गार असतो. त्यामुळे प्रमाण भाषेमध्ये केवळ मराठी शब्दांचाच आग्रह धरायला हवा. इंग्रजी शब्दांचा सोस सोडून आपल्या भाषेतील शब्दांचा उपयोग करण्यावर भर दिला, तरच ती भाषा अधिकाधिक समृद्ध होत जाईल.

हेही वाचा >>> मराठी लघुपटांच्या वाढत्या दर्जाला राज्य शासनाचीही दाद हवी!

१९६० साली महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मराठी भाषा आणि साहित्य यांच्या संदर्भात कार्य करणाऱ्या तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली. ती समिती म्हणजेच मराठी साहित्य महामंडळ. मराठी लेखनात एकसूत्रीपणा यावा, शासकीय लेखन व्यवहारात मराठीचा अचूक वापर व्हावा, यासाठी या समितीला मराठी लेखनविषयक नियम नव्याने निश्चित करण्याचं काम सोपवण्यात आलं. अशा १४ नियमांची यादी १९६२ मध्ये शासनाने स्वीकारली. १९७२ मध्ये त्यात आणखी चार नियमांची भर घालून नवे नियम सिद्ध केले. या नियमांचे स्पष्टीकरण देणारे पुस्तक यास्मिन शेख यांनी सरोजिनी वैद्या यांच्या सांगण्यावरून तयार केले. त्याबरोबरच ‘मराठी शब्दलेखनकोश’ सिद्ध केला. मुद्दा प्रमाण भाषेचा आणि त्याच्या वापराचा आहे. आणि सध्याची भाषेची अवस्था भयानक म्हणावी अशी असल्याचं यास्मिनबाईंचं स्पष्ट मत आहे. इंग्रजी शाळांच्या स्पर्धेत मराठी शाळा ओस पडू लागल्याची खंत व्यक्त करतानाच यास्मिन शेख यांना या परिस्थितीला आपण सारे कारणीभूत आहोत, असं वाटतं. मराठी माणसंच मराठी भाषेची, लिहिताना आणि बोलतानाही दुर्दशा करतात. माहात्म्य ऐवजी ‘महात्म्य’, दुरवस्था ऐवजी ‘दुरावस्था’, घेऊन ऐवजी ‘घेवून’ असं लिहितात. ‘माझी मदत कर’, असं म्हणतात. दूरचित्रवाणीवरील मराठी वाहिन्यांवरचा मराठीचा वापर तर अगणित चुकांनी भरलेला असतो. इंग्रजी भाषेतून जे शब्द मराठीनं स्वीकारले आहेत, त्याला विरोध असण्याचं कारण नाही. मात्र मराठी शब्द उपलब्ध असतानाही इंग्रजीचा अतिरिक्त वापर करणं योग्य नाही… आज जे कुणी ‘मराठी असे आमुची मायबोली’, असा घोष करत असतील, त्यांच्यापर्यंत ही कळकळ पोहोचणं अधिक महत्त्वाचं आणि उपयुक्त आहे.

वयाच्या शंभरीत प्रवेश करतानाही स्मरणशक्ती टवटवीत असलेल्या आणि अजूनही नवं काही करण्याच्या उत्साहात असलेल्या यास्मिन शेख यांनी अनेक विद्यार्थ्यांना मराठी व्याकरणाची गोडी लावली. ‘बाई, तुम्ही व्याकरण, भाषाशास्त्र आमच्या तळहातावर आणून ठेवलंत’… असं म्हणत यास्मिन शेख यांचे आभार मानणारा विद्यार्थीवर्ग हे त्यांच्या जगण्याचं फलित आणि संचित. शंभराव्या वर्षातही स्वत:च्या हातानं कागदावर लेखन करण्यात त्यांना कमालीचा आनंद मिळतो, जगण्याचं नवं बळ मिळतं. व्याकरणाची कविता करत करत शतायुषी होणाऱ्या यास्मिनबाईंना मनापासून शुभेच्छा! mukundsangoram@gmail.com

Story img Loader