किशोर कोकणे
पुण्यातील घटनेनंतर राज्यभरातील आणि त्यातही मुंबई महानगर प्रदेशातील बेकायदा पब, हॉटेल, हुक्का पार्लरवर कारवाईचा धडाका सुरू झाला. सध्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईदर, कल्याण-डोंबिवलीत एकामागोमाग एक बेकायदा हॉटेल, बार पाडले जात आहेत. गेल्या गेल्या चार-पाच वर्षांपासून ठाणे आणि परिसरातील तरुणाईला अमली पदार्थांचा कसा विळखा बसला आणि तो सोडविण्यात स्थानिक यंत्रणा कशा कुचकामी ठरल्या याच्या कहाण्या आता पुढे येत आहेत.
संरक्षण देणारी साखळी
ठाण्यापासून भिवंडी, अंबरनाथ, बदलापूरपर्यंत विस्तारलेल्या ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात पोलिसांनी गेल्या दीड वर्षात ६० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. यामध्ये गांजा, चरस आणि एमडी या अमली पदार्थांचा सर्वाधिक समावेश आहे. पण गेल्या पाच ते सात वर्षांत हे प्रमाण उघडकीस आले त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक असल्याचे माहीतगारांचे म्हणणे आहे. गेल्या काही वर्षांत ठाण्यात रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पब, लेडीज बार, हुक्का पार्लर यांना अक्षरश: ऊत आला आहे. परमबीर सिंह यांच्याकडे ठाण्याचे पोलीस आयुक्तपद असताना हे प्रकार वाढीस लागले. आता तर कोठारी कंपाऊंडसारख्या परिसरात या धंद्यांची लांबलचक साखळीच उभी राहिली आहे. ठाणे महापालिकेत तर रात्रभर चालणाऱ्या पब, हॉटेलांना संरक्षण देणारी एक मोठी यंत्रणाच कार्यरत आहे. ठाणे शहरातील भाजप आमदार संजय केळकर गेली अनेक वर्षे शहरातील वाढत्या अमली पदार्थांच्या वापराविषयी कंठशोष करत आहेत. पण तरीही हे धंदे का थांबले नाहीत हा प्रश्न सुजाण ठाणेकरांना सतावतो आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयात मोक्याच्या जागा मिळाव्यात यासाठी ठरावीक पोलीस अधिकाऱ्यांकडून केली जाणारी मोर्चेबांधणी आणि याच यंत्रणेचा या धंद्यांना असलेला आशीर्वाद आतापर्यत सरकारी यंत्रणेला ठाऊक नव्हता का, हा खरा प्रश्न आहे.
हेही वाचा >>> नागपूर : कुणाच्या ‘आशीर्वादा’ने?
ठाण्यात अमली पदार्थ येतात कसे?
ठाणे शहरात मुंबई नाशिक महामार्ग, घोडबंदर, मुंब्रा बाह्यवळण, शिळफाटा अशा महत्त्वाच्या मार्गांचे जाळे आहे. ठाणे शहराला मिरा भाईंदर, नवी मुंबई, मुंबई ही शहरे जोडली जातात. त्यामुळे तस्करांना मुख्य मार्ग आणि महामार्गांवरून सहज वाहनाने शहरात दाखल होता येते.
जिल्ह्यात अमली पदार्थ पोहोचविण्यासाठी पान टपऱ्या आणि महामार्गालगतच्या ढाब्यांचा वापर अधिक होत होता. या घटकांवर पोलीस, महापालिका कारवाई करतात. त्यापासून सुटका करून घेण्यासाठी अमली पदार्थांचा व्यापक करणारे म्होरके समाजमाध्यमांवर संदेश पाठवून कुरिअरच्या माध्यमातून अमली पदार्थांची वाहतूक करू लागले आहेत. ठाण्यातील सुशिक्षित तरुणांना कुरिअरद्वारे अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी अटक झाली आहे.
परवलीचे शब्द कसे?
समाजमाध्यमांवरून अमली पदार्थ मागविण्यासाठी परवलीचे शब्द वापरले जातात. तसेच रेव्ह पार्ट्यांच्या निमंत्रणासाठीदेखील वेगवेगळ्या आकृती, चित्रांचा वापर होत असतो. रेव्ह पार्टीच्या आयोजनाची माहिती विशिष्ट संदेश पाठवून दिली जाते. समजा, संदेशामध्ये वाघ, साप, जंगलाचे छायाचित्र असेल, तर ती पार्टी जंगलात आयोजित असेल. तसेच रशियन भाषेचादेखील मोठ्या प्रमाणात वापर होतो. उत्तर प्रदेश येथे एमडीची निर्मिती केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ठाणे पोलिसांच्या पथकाने तेथे जाऊन ही प्रयोगशाळा उद्ध्वस्त केली होती. आरोपींमध्ये विज्ञान शाखेतील तरुणाचा सामावेश होता. एमडी पावडर तयार करण्यासाठी कोणत्या रसायनांचा वापर केला जातो याची माहिती त्याला होती. इतर काही राज्यांमध्येही अशा टोळ्या सक्रिय आहेत. त्या निर्जनस्थानी बंद कारखान्यांत, गोदामांमध्ये या प्रयोगशाळा सुरू करतात. जिथे पोहोचणे पोलिसांना कठीण असते. ३१ डिसेंबरच्या रात्री घोडबंदर भागात आयोजित एका रेव्ह पार्टीमध्ये पोलिसांनी १०० तरुणांना ताब्यात घेतले. ही मुले कॉलसेंटर, आयटी क्षेत्र किंवा विद्यार्थीदशेतील होती.
kishor. kokane@expressindia.com