२०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य म्हणजे यूट्यूबर्सनी उमटवलेला ठसा. अपवाद वगळता इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर पत्रकारिताधर्म विसरल्याचा आरोप होत असताना, निवडणुकीसंबंधी चर्चा किंवा संपादकीय ऐकण्यासाठी जनतेने मोठ्या प्रमाणात यूट्यूब वाहिन्यांना प्राधान्य दिले. त्यामध्ये रविशकुमार यांच्यासारख्या नावाजलेल्या, अतिशय लोकप्रिय आणि विश्वसनीय पत्रकाराच्या वाहिनीपासून ‘सत्य हिंदी’सारख्या काही पत्रकारांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या उपक्रमापर्यंत अनेक व्यासपीठांचा समावेश आहे.
पुण्यप्रसून वाजपेयी, अजित अंजुम हे स्वतंत्र पत्रकार; सत्य हिंदी, ४ पीएम, न्यूजलाँड्री, द वायर, द रेड माईक, द पब्लिक इंडिया यासारख्या वाहिन्यांनी मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांना आकर्षित केले. त्याशिवाय डीकोडरच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आलेले ज्येष्ठ पत्रकार डॉ. प्रणॉय रॉय यांना ऐकणे हाही अनेक प्रेक्षकांसाठी समाधानकारक अनुभव होता. या पत्रकारांच्या एकेका कार्यक्रमाला मिळणारे लाखो व्ह्यूज एकाच वेळी त्यांची विश्वसनीयता आणि मुख्य माध्यमांची ढासळणारी विश्वासर्हता अधोरेखित करतात. त्याशिवाय मराठीमध्ये प्रशांत कदम यांची स्वतंत्र वाहिनी, द इंडी जर्नल, थिंक बँक यांचीही कामगिरी उल्लेखनीय ठरली. या वाहिन्यांवर चर्चात्मक कार्यक्रमांना चांगला परिणाम मिळाला. प्रत्यक्ष दौरे करून माहिती मिळवणाऱ्या पत्रकारांशी चर्चा, स्थानिक व अनुभवी पत्रकारांच्या मुलाखती किंवा थेट लोकांमध्ये जाऊन सर्वसामान्यांची मते जाणून घेणे असे साधारण या कार्यक्रमांचे स्वरूप होते. रविशकुमार, वाजपेयी, आनंदवर्धन सिंह यांनी ठाम पण संयत शैलीत विविध घटनांचे अनेक पैलू समोर आणले. तर ‘द वायर’च्या आफसा खानम शेरवानी, न्यूजक्लिकचे अभिसार शर्मा यांनी आक्रमकपणे महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. विशेषतः शेरवानी यांनी मुस्लीम समाजाचे प्रश्न ज्या तळमळीने मांडले ते महत्त्वाचे मानले पाहिजे.
हेही वाचा…मोदी हे सर्वसमावेशक नेते…
व्यवसायाने पत्रकार नसलेल्या- तरीही प्रभावी ठरलेल्या अशा एका यूट्यूबरचा उल्लेख आतापर्यंत केलेला नाही, तो अर्थातच ध्रुव राठी! अनेक वर्षांपासून विविध विषयांवर कार्यक्रम करणाऱ्या राठीने गेल्या काही महिन्यांपासून भारताच्या राजकारणावर लक्ष केंद्रित केले. एकेका कार्यक्रमाला कोट्यवधी प्रेक्षक मिळवणाऱ्या मोजक्या यूट्यूबरमध्ये त्याचा समावेश होतो. त्याचे तब्बल २.२० कोटींपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत. त्याने मुख्यतः सत्ताधारी पक्षाला अडचणीत टाकणारे अनेक कार्यक्रम केले. निवडणूक रोखे घोटाळा, देशाची हुकूमशाहीकडे होऊ घातलेली वाटचाल, व्हॉट्सॲपसारख्या समाजमाध्यमांवरून पसरवल्या जाणाऱ्या अफवा, मोदींची प्रतिमानिर्मिती असे अनेक मुद्दे तो उपस्थित करत राहिला. याच यादीत आकाश बॅनर्जीची वाहिनी, लल्लनटॉप यांचाही समावेश करता येईल.
ध्रुव राठी असो किंवा वर उल्लेख केलेले यूट्यूब पत्रकार, या सर्वांनी प्रेक्षकांची जितकी वाहवा मिळवली तितकाच समाजमाध्यमांवर जल्पकांचा- ‘ट्रोल’चा त्रासही सहन केला. वैयक्तिक शेरेबाजीपासून थेट हल्ल्यांच्या धमक्यांपर्यंत त्यांचा सर्व प्रकारचा ऑनलाईन छळ करण्यात आला. मात्र त्याला पुरून उरत हे पत्रकार आपले काम करत राहिले. थोडे बारकाईने पाहिले तर एखाद दुसरा अपवाद वगळता, यापैकी बहुसंख्य पत्रकार गेल्या चार-पाच वर्षांमध्ये मुख्य माध्यमांमधून बाहेर पडलेले किंवा त्यांना बाहेर पडण्यास भाग पाडण्यात आले, असे आहेत. त्यांना यूट्यूबवर मिळालेले यश हे दुसरीकडे सध्याच्या मुख्य माध्यमांची मर्यादा दाखवून देणारेही आहे.
हेही वाचा…आम्ही छोटे काजवे, पण अंधाराशी लढलो..
मुख्य इलेक्ट्रॉनिक माध्यमांची, विशेषतः राष्ट्रीय, काय अवस्था आहे ते वेगळे सांगायला नको. पूर्णपणे सरकारधार्जिणी पत्रकारिता (?) करण्याच्या धोरणामुळे भल्याभल्या पत्रकारांची तारांबळ उडताना प्रेक्षकांनी पाहिली. सरकारला अडचणीत आणणारे प्रश्न टाळायचे, पंतप्रधान जेव्हा कधी मुलाखत देतील तेव्हा त्यांना केवळ प्रतिमानिर्मिती करणारे प्रश्न विचारायचे, त्यांच्या उत्तराला प्रतिप्रश्न करायचे नाहीत या अलिखित/ अघोषित धोरणामुळे त्यांची मुलाखत घेणाऱ्या पत्रकारांची कुचंबणाही झाल्याचे पाहायला मिळाले.
निवडणूक प्रचार सुरू असताना एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना नरेंद्र मोदींनी एक वक्तव्य केले. ते म्हणाले की, जोपर्यंत गांधींवरचा सिनेमा आला नव्हता तोपर्यंत बाहेरच्या जगाला गांधीजी कोण हे माहीतच नव्हते. इतका धक्कादायक दावा भारताच्या पंतप्रधानपदी दहा वर्ष असलेली व्यक्ती कशी काय करू शकते असा प्रश्न मुलाखत घेणाऱ्या पत्रकारांना पडला नसेल का? पत्रकारांचा पडलेला चेहरा सांगत होता की त्यांना हा प्रश्न पडला आहे, पण मोदींना अडवण्याची किंवा त्यांची तथ्यात्मक चूक दुरुस्त करण्याची एक तर त्यांची हिंमत नव्हती किंवा कोणत्याही परिस्थितीत मोदींना प्रतिप्रश्न करायचा नाही याचे त्यांना स्पष्ट आदेश असावेत. नंतर या वक्तव्याबद्दल पंतप्रधानांवर समाज माध्यमांमधून टीका झाली, खिल्लीही उडवली गेली; तो भाग वेगळा. परंतु या कसरतीमध्ये मुलाखतकार पत्रकारांची उरलीसुरले विश्वासार्हता आणखी खालावली.
हेही वाचा…शंभर दिवसांसाठीचा कृती कार्यक्रम
अशा प्रकारांमुळे प्रेक्षक पर्यायी माध्यमांकडे वळत आहेत, अनेकजण स्वतःचे यूट्यूब चॅनेल काढत आहेत. यामध्ये काही धोके सुद्धा आहेत. जसे की हातामध्ये साधा मोबाइल फोन असला तरी कोणालाही पत्रकार होणे शक्य आहे, असा गैरसमज होऊ शकतो. यूट्यूब ब्लॉगरने एखादा विषय घेऊन त्यावर भाष्य करणे किंवा अन्य तज्ज्ञांशी चर्चा करून तो विषय समजावून सांगणे हा पत्रकारितेचा एक भाग झाला. संपूर्ण पत्रकारिता नव्हे. बातमीदारी हा वृत्तवाहिन्यांचा कणा आहे. बातम्या नसतील, तर केवळ विश्लेषण आणि चर्चा ऐकण्यात लोक वेळ वाया घालवणार नाहीत. वृत्तपत्रांची आणि वृत्तवाहिन्यांची ही ताकद यूट्यूब ब्लॉगर्सकडे नाही. त्यामुळेच, मुख्य प्रवाहातील माध्यमांचे आता केवळ काही दिवसच उरले आहेत असे मुळीच नाही. हे क्षेत्र खूप मोठे आहे, त्यामध्ये विविध व्यासपीठ आहेत आणि सत्य, तथ्य व प्रश्न यावर ते आधारलेले आहे. ही सर्व माध्यमे एकमेकांना पूरक म्हणून काम करू शकतात. अट एकच आहे, पत्रकारिता धर्म पाळण्याची!
nima.patil@expressindia.com