निखिलेश चित्रे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘विज्ञानकथां’सारख्याच परग्रहांवरल्या वगैरे असल्या, तरी या दहाही कथांमध्ये राजकीय वास्तवाचं भान असल्यानं त्या फक्त ‘कल्पनारम्य’ नव्हेत..

युरी हरेरा (uri Herrera) या मेक्सिकन लेखकानं गेल्या दशकात सातत्यानं दर्जेदार लेखन करून जागतिक साहित्यात ठळक ओळख निर्माण केली आहे. त्याच्या ‘साइन्स प्रिसीडिंग द एन्ड ऑफ द वल्र्ड’, ‘किंगडम कॉन्स’ आणि ‘द ट्रान्समायग्रेशन ऑफ बॉडीज’ या कादंबऱ्या जिवंत शैली, अर्थपूर्ण प्रयोगशीलता आणि निवेदनातल्या ताजेपणामुळे चर्चेत राहिल्या. त्याचा ‘टेन प्लॅनेट्स’ हा कथासंग्रह २०२३ मध्येच इंग्रजीत उपलब्ध झाला आहे.

प्रथमदर्शनी या कथांचं ‘विज्ञानकथा’ प्रकारात वर्गीकरण करता येतं. मात्र तोंडवळा विज्ञानकथांचा असला तरी कथांमध्ये विलक्षणाचं तत्त्वही अंतर्भूत आहे. त्यामुळे हल्ली ज्याला ‘स्पेक्युलेटिव्ह फिक्शन’ वा कल्पनाशील साहित्य म्हणतात, तो साहित्यप्रकार या कथांना अधिक जवळचा म्हणता येईल.

ताजेपणा, आटीवपणा आणि नेमकेपणा ही या कथांची वैशिष्टय़ं. विज्ञानकथेसारख्या लोकप्रिय वाङ्मयप्रकाराची बुंथी घेऊन त्याआडून काही गंभीर विधान करणाऱ्या कादंबऱ्या आणि कथांची दीर्घ परंपरा जागतिक साहित्यात आहे. रे ब्रॅडबरीचं ‘मार्शियन क्रॉनिकल्स’, इतालो काल्विनेचं ‘कॉस्मिकॉमिक्स’, स्तानिस्लाव लेमचं ‘हिज मास्टर्स व्हॉइस’ अशी उदाहरणं चटकन आठवतात. हरेराच्या या कथा याच परंपरेतलं पुढचं पाऊल आहे.

हेही वाचा >>>मुलांना औपचारिक शिक्षणाबरोबरच जगण्याचे शिक्षण द्यायला हवे…

या सगळय़ा कथांमध्ये शैली, अवकाश (जागा आणि अंतराळ या दोन्ही अर्थानी), भाषा आदी घटकांच्या पुनरावृत्तीमधून एक सूक्ष्म एकसंधता साधलेली आहे. या घटकांची वीण एवढी घट्ट आहे की वाचकाला सगळय़ा कथांना जोडणारे हे घटक कायम जाणवत राहतात आणि एका दीर्घ फिक्शनचे विविध भाग वाचतो आहोत असं वाटतं.

‘भाषे’चं राजकारण

‘भाषा’ या सगळय़ा कथांच्या आशयाच्या केंद्रस्थानी आहे. जगण्यातलं भाषेचं स्थान हा या आशयाचा गाभा. या संग्रहातल्या पहिल्या कथेत (सायन्स ऑफ एक्स्टिन्क्शन) पृथ्वीवरून मानवजात नष्ट होण्याचा संबंध भाषेच्या क्रमश: नष्ट होण्याशी जोडला जातो. वस्तूंची, सजीवांची, क्रियांची नावं नष्ट होणं ही माणूस नष्ट होण्याची सुरुवात असल्याचं भेदक भाष्य या कथेतून केलेलं आहे. भाषेचं मानवी जगण्याशी असलेलं असं सेंद्रिय नातं ‘कॉन्स्पिरेटर्स’ या कथेतून अतिशय प्रभावीपणे व्यक्त होतं. या कथेत पृथ्वीवरून माणसाचं उच्चाटन झाल्यानंतर दोन माणसं एकाच वेळी नव्या ग्रहावर पोहोचतात. त्यापैकी एकाकडे दुसऱ्यापेक्षा प्रगत तंत्रज्ञान असतं. मात्र त्या दोघांमध्ये वर्चस्व कोण गाजवणार हे त्यांच्या तंत्रज्ञानावरून नाही, तर भाषेवरून ठरतं. अर्थात, या संग्रहातल्या इतर कथांप्रमाणे या कथेलाही एका अन्वयाच्या वर्तुळात बंदिस्त करता येत नाही. ती अर्थाच्या अनेक पातळय़ा सुचवते.

भाषा फक्त शब्दांपुरती मर्यादित नसते, तर रंग, चव, स्पर्श, ध्वनी आदी पंचेंद्रियांच्या माध्यमातूनही संवाद साधला जातो, हे अनेक भाषाविदांनी सांगितलं आहे. ‘अ‍ॅनेक्स १५, सेक्शन २’ नावाच्या कथेतल्या मुख्य पात्राला परग्रहवासीयांच्या भाषेचा शोध घेण्यासाठी दुसऱ्या ग्रहावर पाठवलं जातं. तिथे त्याला ‘भाषा’ या संकल्पनेलाच आव्हान देणारं काहीतरी सापडतं.

हेही वाचा >>>देशाच्या ‘विकास इंजिना’ला गती..

या संग्रहातल्या काही कथा जागतिक साहित्यातल्या काही अभिजात कथांचं वेगळं रूप सादर करतात. उदा. ‘स्पिरिच्युअल कन्सॉलिडेशन’ या कथेत हर्मन मेलविलच्या ‘बार्टलबी, द स्क्रीव्हनर’ या कथेचा संदर्भ आहे. मेलविलच्या त्या कथेतला सरकारी नोकर बार्टलबी मृत अक्षरांच्या संपर्कात आहे, तर हरेराच्या कथेतला बार्टलबी मृतात्म्यांच्या संपर्कात! ‘कॅटलॉग ऑफ ह्यूमन डायव्हर्सिटी’ ही कथा काफ्काच्या ‘रिपोर्ट टू अकॅडमी’च्या उलट दिशेनं जाते. या कथांचं मूळ कथांशी संवादी नातं आहे. त्या मूळ कथेच्या आशयात नवी भर घालतात.

हरेराची तिरकस विनोदबुद्धी गंभीर आशयघटकांना एक तिरकस मिती देते. उदाहरणादाखल या संग्रहातली ‘द होल एन्टेरो’ ही कथा पाहाता येईल. ही माणसाच्या छोटय़ा आतडय़ात वास्तव्याला असणाऱ्या परजीवी जिवाणूची गोष्ट आहे. हा जिवाणू एलएसडी या मादक पदार्थाच्या संपर्कात येतो. त्यानंतर तो आतडय़ात राहूनच विश्वाची चिंता करायला लागतो. जोनाथन स्विफ्टच्या जातकुळीचा हा विनोद या कथांना एकसंधता देण्यात महत्त्वाची भूमिका निभावतो. विनोदामुळे निवेदकाला कथेपासून प्रवाही अंतर राखणं सुलभ जातं. शिवाय गंभीर आशय निराशावादाकडे झुकणं टाळलं जातं.

या कथांमध्ये रूढ संकल्पनांच्या वर्चस्ववादाला आव्हान दिलं जातं. ‘झॉर्ग’ या कथेतल्या ग्रहावर स्त्री आणि पुरुष याशिवाय इतर बारा लिंगप्रकार अस्तित्वात आहेत. तिथल्या रहिवाशांना यापैकी कोणताही पर्याय निवडण्याचं स्वातंत्र्य आहे.

या संग्रहातल्या बहुतेक सर्व कथांमधून सूक्ष्म पण टोकदार राजकीय भाष्य केलं आहे. ‘द कॉन्स्पिरेटर्स’ या कथेत जनतेनं राजकीय बंड करू नये म्हणून लस शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.याच कथेत भाषिक वर्चस्वाच्या राजकारणाचाही मुद्दा अतिशय प्रभावीपणे व्यक्त होतो. जेत्यांनी जितांना नियंत्रणात ठेवण्यासाठी वापरलेल्या विविध मार्गाची चिकित्सा करणारी ही कथा आहे.

एकटेपणा ही या कथांमधील मध्यवर्ती संकल्पना. हा एकटेपणा कधी अदृश्य माणसाचा असतो, कधी गर्दीतल्या माणसाचा, तर कधी अनोळखी वैराण अवकाशातला. या एकटेपणाची चिकित्सा संग्रहाताल्या अनेक कथांमधून होते. ‘द अर्थिलग’ ( The Earthling) या कथेत ती अधिक काव्यात्म पद्धतीनं येते. या कथेत मंगळवासीयांमध्ये अडकून पडलेल्या एकटय़ा माणसाची व्यथा आहे. त्याचं परकेपण अनेकस्तरीय रुपक म्हणून पाहता येतं. यातलं एकटेपण सामाजिक तर आहेच, पण ते भाषिक पातळीवर अधिक तीव्रतेनं जाणवतं. हा एकटेपणा स्वत:च्या भाषेचा शोध घ्यायला आणि नवी भाषा घडवायला उद्युक्त करतो.

सत्तेची उतरंड, पाळत, हिंसा

विज्ञानकथांचा तोंडवळा वापरणाऱ्या, विविध काल्पनिक ग्रहांवर घडणाऱ्या या कथा वास्तववादाच्या संकल्पनेसमोरच प्रश्नचिन्ह उभं करतात. वास्तववादी साहित्याचा संबंध वास्तवाशी किती आणि वास्तवाविषयीच्या अश्मीभूत संकल्पनांशी किती असा प्रश्न या कथा विचारतात. त्या सभोवतालाच्या सूक्ष्म अवलोकनातून नवा भोवताल घडवतात.

ही कथानकं रचताना लेखक विज्ञानकथेच्या संकल्पनेविरुद्धही बंड करतो. विज्ञानकथेत अपेक्षित असलेली कथानकाची तर्काधिष्ठित विचारसरणी नाकारून या कथा स्वत:चं तर्कट निर्माण करतात आणि पुढे तेही नष्ट करुन नव्या आख्यान-व्यवस्था घडवत राहतात.

सत्तेची उतरंड आणि त्यातून उद्भवणारी हिंसा हासुद्धा या कथांमधला केंद्रीय आशय आहे. या संग्रहात ‘ऑब्जेक्ट्स’ नावाच्या दोन कथा आहेत. त्यापैकी एक कथा पाळत ठेवण्याच्या तंत्रज्ञानाशी संबंधित आहे, तर दुसऱ्या कथेत कॉर्पोरेट विश्वाची पार्श्वभूमी आहे. या कथेत कर्मचारी जेवढा उच्च पदावर असेल तेवढा तो अन्नसाखळीतला वरचा प्राणी बनतो. या दोन्ही कथा तंत्रज्ञानातून होणाऱ्या माणसाच्या अ-मानवीकरणावर भाष्य करतातच, पण रचनेतली कल्पनाशीलता गमवत नाहीत.

या कथा आशयाच्या पातळीवर एकमेकींशी जोडलेल्या आहेत. हा आशय त्यांच्या एकत्रित वाचनामुळे अधिक समग्रतेनं जाणवतो. कथांचा हा समूह ही एक कौशल्यपूर्ण रचना आहे. त्यामुळे प्रत्येक कथा या रचनेचा क्रियाशील घटक म्हणून कार्य करते. वास्तव हे सूक्ष्मातिसूक्ष्म तपशिलांचं संयुग आहे आणि या तपशिलांचं समग्र आकलन झाल्याशिवाय वास्तवाचं स्वरूप लक्षात येणार नाही, अशी लेखकाची भूमिका या रचनेतून प्रतिबिंबित होते.

लिसा डिलमन या कुशल अनुवादिकेनं या कथा इंग्रजीत आणल्या आहेत. संग्रहाच्या शेवटी तिनं या अनुवादाची प्रक्रिया विशद केली आहे. हा अनुवाद अनुवाद-कौशल्याचा कस पाहणारा असल्याचं तिनं नमूद केलं आहे. या कथांमध्ये भाषा महत्त्वाची भूमिका बजावत असल्यामुळे आणि शब्दांच्या विविध अर्थाचा लेखकानं सर्जनशील वापर केल्यामुळे हा अनुवाद कसा आव्हानात्मक होता हे तिनं सोदाहरण सांगितलं आहे.

उदा. ‘अपाइस’ (á pice)या स्पॅनिश शब्दाचे इंग्रजीत टोक, शिखर, वरचा भाग असे अनेक अर्थ आहेत. मात्र डिलमन हिने त्यासाठी ‘आयोटा’ हा शब्द वापरला आहे. कारण त्याचा अर्थ ‘फार थोडा’ असा तर आहेच, शिवाय ते एका ग्रहाचं नावही आहे. त्यामुळे विज्ञानकथेला हा पर्याय अधिक योग्य वाटतो, असं ती मनोगतात म्हणते.

या कथांची वीण अभिजात साहित्याच्या धाग्यांनी विणलेली आहे. कल्पित साहित्यात नवं सांगण्यासारखं काही उरलं नाही असं वाटण्याच्या काळात या कथा नवं सांगण्यासारखं किती आहे आणि ते किती प्रकारे सांगता येऊ शकतं हे सोदाहरण सिद्ध करतात. या कथा वास्तवाच्या दडपशाहीचा कल्पनेच्या शस्त्रानं विरोध करतात. नैतिकतेचा ऱ्हास, वर्णवाद, वर्चस्ववाद, चंगळवादातून होत असलेलं सजीवांचं वस्तूकरण अशा गंभीर संकल्पनांचा कल्पकतेनं धांडोळा घेतात आणि असं करताना कल्पित साहित्याच्या घट्ट होत चाललेल्या सीमा उद्ध्वस्त करतात. युरी हरेरा हा लेखक महत्त्वाचा ठरतो तो यासाठी.

युरी हरेरा हे कथालेखनाला ‘राजकीय कृती’

का मानतात? त्यांच्या २०१७ मधल्या मुलाखतीचा दुवा :

https:// latinamericanliteraturetoday. org/2017/04/ literature- political- responsibility- interview- yuri- herrera- radmila- stefkova- and- rodrigo/

‘टेन प्लॅनेट्स’

लेखक : युरी हरेरा

प्रकाशक : ग्रेवूल्फ प्रेस

पृष्ठे : ११२ ; किंमत : ९२७ रु.

satantangobela@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yuri herrera mexican author world literature signs preceding the end of the world amy