श्रीसद्गुरूंनी मला त्यांच्याजवळ ठाव दिला, त्यांच्याजवळ राहू दिलं, त्यांचा सहवास दिला. मग मी काय केलं पाहिजे? तुकाराम महाराजांनी जे केलं ते सांगितलं. ते म्हणतात, ठेवूनियां भाव ठेलों पायीं! मी पूर्ण भावानिशी त्यांच्या चरणांवर स्वत:ला लोटून दिलं! आपण सत्पुरुषाच्या किंवा भगवंताच्या सगुण मूर्तीच्या समोर दण्डवत घालतो. दण्डवत शब्दाचा अर्थ दण्डाप्रमाणे अर्थात काठीप्रमाणे पडणे. काठी एकदा खाली पडली की ती अर्धीमुर्धी पडत नाही. ती पूर्ण पडते. तसं श्रीसद्गुरूंच्या चरणांवर पूर्ण पडणं, हा झाला दण्डवत. जणू त्यांनी काहीही करो, मला त्याची फिकीर नाही, या वृत्तीनं त्या चरणांवर स्वत:ला लोटून देणं, हा झाला दण्डवत. थोडक्यात इथे ‘मी’भावाचं पूर्ण समर्पण आहे. नमाज अदा करतानाही खुदासमोर मस्तक टेकवतात. ‘मी’पणाने व्यापलेली बुद्धी, अहंकार त्याच्यासमोर सोडणं, हा त्यामागचा भाव आहे. येशूच्या समोर चार दिशांचा संकेत म्हणून कपाळ, छाती आणि दोन्ही हातांचे खांदे यांना स्पर्श करत मस्तक झुकवलं जातं. अर्थात बुद्धी, भावना आणि कर्तृत्वशक्ती ही त्या प्रभूसमोर समर्पित आहे, हाच भाव असतो. आज आपण या प्रत्येक कृतीमागचा हा भाव तरी जाणतो का? त्या भावनेनं भगवंत, खुदा किंवा येशूसमोर नतमस्तक होतो का? तो भाव आपल्यात रुजवतो का? आपण बाहेरून ती कृती करतो पण आतून तो भाव नसतो. देवळात आलो, गाभाऱ्यातही आलो, नमस्कारही केला पण त्यात तो भावच नसेल तर काय लाभ? जो देवळातही येऊ शकत नाही आणि दुरूनच कळसाला पाहून ज्याचे डोळे भरून येतात आणि मनानंच जो कळवळून भगवंताला हात जोडतो, त्याचा नमस्कार त्या गाभाऱ्यातल्या नमस्कारापेक्षा भगवंताच्या चरणी कायमचा रुजू होतो. तेव्हा सहवास आणि अंत:करणातला भाव या दोन्ही गोष्टी अत्यावश्यक आहेत. एकवेळ सहवास कायमचा लाभेलच असंही नाही तरी सहवास नसला, संयोग नसला पण अंत:करणातला भाव असला तरी ती वियोगी भक्तीही श्रेष्ठच होईल. साधं संसारातलं उदाहरण घ्या. पती-पत्नीचा सहवास आहे पण परस्परांविषयी प्रेमभाव नाही तर त्या सहवासाला काय अर्थ? तेच परिस्थितीपायी दोघांना परगावी राहावं लागत आहे, बाह्य़दुरावा आहे पण क्षणोक्षणी एकमेकांची आठवण आहे, आंतरिक ओढ आहे तर त्याला दुरावा तरी कसं म्हणावं? तेव्हा श्रीसद्गुरूंनी मला जवळ केलं तर मीसुद्धा त्यांच्या उद्दिष्टाला चिकटलं पाहिजे. मला जवळ करण्यामागे त्यांचा जो हेतू आहे, त्यांचं जे उद्दिष्ट आहे, त्यांना माझ्याकडून अभिप्रेत जे ध्येय आहे, त्यांना माझ्याकडून जी अपेक्षा आहे, त्यांची जी इच्छा आहे त्यांच्याशी मला एकरूपता साधली पाहिजे. माझी इच्छा आणि त्यांची इच्छा, माझा हेतू आणि त्यांचा हेतू, माझं ध्येय आणि त्यांचं ध्येय, माझी अपेक्षा आणि त्यांची अपेक्षा यामध्ये जेव्हा भेद उरणार नाही तेव्हाच त्यांच्या चरणांवर मी खऱ्या अर्थानं समर्पित होईन.

Story img Loader