आपल्या भवताली राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवर राजकीय, सामाजिक, साहित्यिक, औद्योगिक अशा विविध क्षेत्रांमध्ये अनेक घटना-घडामोडी होत असतात. त्यापैकी काही तात्कालिक, तर काही दीर्घ कालीन परिणाम करणाऱ्या असतात. भूतकाळातील अशाच काही घटना-घडामोडींचा ‘आज’च्या पाश्र्वभूमीवर लेखाजोखा घेणारे, त्यातील परस्परसंबंधांचा अन्वयार्थ लावू पाहणारे हे पाक्षिक सदर..
६ डिसेंबर १९७५. कराडच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात भव्य मंडप उभारलेला. या ठिकाणी थोडय़ाच वेळात ५१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा प्रारंभ होणार होता. मावळते संमेलनाध्यक्ष ‘महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व’ पु.ल. देशपांडे, या संमेलनाच्या अध्यक्ष दुर्गाबाई भागवत, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, संमेलनाचे स्वागताध्यक्ष केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण अशा मातब्बर मंडळींचं लवकरच या ठिकाणी आगमन होणार होतं. एखादं संमेलन म्हटल्यावर वातावरण किती उत्साहाचं, जल्लोषाचं असायला हवं ! त्या दिवशी मात्र मंडपात विचित्र तणाव भरून राहिलेला. याच वातावरणात दुर्गाबाई येतात. त्यांच्याही चेहऱ्यावर गंभीर भाव. त्यापाठोपाठ स्वागताध्यक्ष यशवंतराव चव्हाण. त्यांच्या चेहऱ्यावर मात्र कोणताही तणाव दिसत नव्हता.
देशात आणाबीणी लागू होऊन जेमतेम सहा महिने झाले होते. त्याचं मळभ या संमेलनावर होतं. चव्हाणांनी यावर काही भाष्य करणं अपेक्षितच नव्हतं. पण तर्कतीर्थ आणि पु. ल. या दोघांनीही तिथे जमलेल्या समुदायाच्या दबलेल्या भावना आपापल्या परीने व्यक्त केल्या.
आता सारं लक्ष दुर्गाबाईंवर केंद्रित झालं होतं. परंपरेनुसार साहित्यव्यवहाराचं विश्लेषण करतानाच दुर्गाबाईंनी तत्कालिन राजकीय स्थितीवरही परखड भाष्य केलं. त्यामध्ये दुर्गाबाईंनी दिलेलं एक अवतरण आजही डोक्यात घण मारल्यासारखं बसलं आहे – ‘कठीण परिस्थितीत कलावंत किंवा साहित्यिक गर्भार बाईसारखा असतो. बाहेर काय वाटेल ते होवो, त्याने आपला गर्भ जपावा,’ असं सांगून बाईंनी राज्यकर्त्यांप्रमाणेच त्यांच्या ऋणात राहण्यात धन्यता मानणाऱ्या लेखक मंडळींनाही आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली.
याच संमेलनाच्या समारोपाने कळसाध्याय गाठला. यावेळी बोलताना यशवंतरावांना भाऊ मानत असल्याचं सांगत दुर्गाबाईंनी त्यावेळी गंभीर आजारी असलेल्या जयप्रकाशांना दीर्घायुरारोग्य लाभावे म्हणून आपण सारे प्रार्थना करू या, असं भावनिक आवाहन केलं. आता यशवंतरावांची कसोटी होती. पण क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी राजकीय परिपक्वता दाखवत प्रतिसाद दिला. मंडपातील सारं वातावरण या प्रसंगाने भारून गेलं.
तब्बल सदतीस वर्षांपूर्वीचं हे साहित्य संमेलन एरवी आधीच्या पन्नास संमेलनांप्रमाणेच इतिहासात जमा झालं असतं. पण स्वातंत्र्यानंतर प्रथमच देशात लादल्या गेलेल्याआणीबाणीच्या पाश्र्वभूमीवरील हा दुर्गावतार आजही ताजा वाटतो, एवढंच नव्हे तर आजच्या परिस्थितीतही साहित्यिकांना वेगळय़ा जबाबदारीची जाणीव करून देतो. कोकणात २२ वर्षांनंतर प्रथमच चिपळूणात पुढील आठवडय़ात ८६ वं साहित्य संमेलन भरत आहे. या संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिकेवर नुसती नजर टाकली तरी १९७५ ते २०१३ या काळात पुलाखालून किती पाणी वाहून गेलं आहे, याची कल्पना येऊ शकते. त्या संमेलनापासून साहित्यिक आणि राजकारणी यांच्यात जणू फारकतच झाली होती. त्यावेळी यशवंतराव चव्हाणांच्या रूपाने राजकीय व्यक्तीच स्वागताध्यक्ष होती, पण निधीसंकलनासाठी नव्हे. कराड ही त्यांची कर्मभूमी आणि त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे, साहित्याची उत्तम जाण, रसिकता, परिपक्वता यशवंतरावांजवळ होती. चिपळूणच्या संमेलनाच्या परिसराला त्यांचं नाव देऊन आयोजकांनी या ऋणातून मुक्त होण्याचा जरूर प्रयत्न केला आहे, पण त्याचबरोबर सुमारे डझनभर आमदार-मंत्र्यांना संमेलनाच्या व्यासपीठावर आमंत्रित करून दुसरं टोक गाठलं आहे. कराडच्या संमेलनात दुर्गाबाईंच्या रूपाने साहित्यिकांचं तेजस्वी स्वत्व साकार झालं होतं, चिपळूणात मात्र संयोजक- साहित्यिक सत्ताधाऱ्यांचे जणू आश्रित झाले आहेत.
.. आणि संमेलन उधळलं !
या संदर्भात लक्षात घेण्याजोगी आणखी एक बाब म्हणजे, दुर्गाबाईंचा विरोध केवळ काँग्रेसी सत्ताधाऱ्यांपुरता नव्हता. केंद्रात त्यांना अपेक्षित असलेल्या सत्तांतरानंतर १९७७ च्या नोव्हेंबरात पुण्यात झालेल्या संमेलनातही त्यांनी हा आग्रह कायम ठेवला. पु. भा. भावे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संमेलनाचं स्वागताध्यक्षपद तत्कालीन केंद्रीय मंत्री मोहन धारिया यांनी विरोधी वातावरण लक्षात घेऊन सोडलं खरं, पण संयोजकांनी जणू दुर्गाबाईंच्या भूमिकेचा प्रतिवाद म्हणून गोव्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांना उद्घाटनासाठी निमंत्रित केलं. त्यामुळे पुन्हा वातावरण पेटलं. संमेलनाची सूत्रं भावे यांच्याकडे सुपूर्द करण्यासाठी दुर्गाबाई संमेलनस्थळी आल्या, मात्र त्यांनी आयोजकांच्या स्वागत-सत्काराचा स्वीकार केला नाही. भाषणापुरतं व्यासपीठावर येऊन, राज्यकर्त्यांपासून अंतर राखणंच श्रेयस्कर असल्याचा दुर्गाबाईंनी पुनरुच्चार केला. त्यांचं हे वक्तव्य, त्यातला एकारलेपणा मान्य करूनही, स्वत:ला साहित्यिक म्हणवणाऱ्यांनी आणि त्यांची संमेलनं भरवणाऱ्या साहित्य महामंडळाने आजही गंभीरपणे नोंद घ्यावं, असं आहे.
भाषणानंतर लगेच दुर्गाबाई संमेलनस्थळातून बाहेर पडल्या. दुसऱ्या दिवशी झालेल्या विषय नियामक समितीच्या बैठकीत, आणीबाणीच्या काळात दुर्गाबाईंनी घेतलेल्या कणखर भूमिकेबद्दल अभिनंदन, पण पुण्याच्या या संमेलनात त्यांनी उपस्थित मान्यवरांचा अपमान केल्याबद्दल निषेध, असे दोन परस्परविरोधी ठराव मंजूर करण्यात आले. ही बातमी बाहेर फुटली आणि संमेलनाच्या अखेरच्या दिवशी खुल्या अधिवेशनात दुर्गाबाईंच्या समर्थकांनी समितीला जाब विचारत संमेलन अक्षरश: उधळून लावलं. या गोंधळाला आणखी एक प्रवाह दुर्गाबाईसमर्थकांच्या नकळत येऊन मिळाला होता. संमेलनापूर्वी भावे यांनी दिलेल्या एका मुलाखतीवरुन युवक क्रांती दल आणि दलित पॅंथरचे कार्यकर्ते चवताळून उठले. खुल्या अधिवेशनात घुसून त्यांनी जणू ताबाच घेतला. सर्वत्र एकच गोंधळ माजला. कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं. अखेर भावेंनी व्यासपीठावर येऊन संमेलन बरखास्त झाल्याच जाहीर केलं. तेव्हाच सारं शांत झालं.
समांतर संमेलन
पुढे बॅ. अ. र. अंतुले यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत राज्य शासनाच्या ग्रंथपुरस्कारांसाठी शिफारस झालेल्या तीन आणीबाणीविरोधी पुस्तकांना पुरस्कारांच्या यादीतून वगळल्याचं वृत्त प्रसिध्द झालं आणि पुन्हा एकदा राज्यकत्रे विरुध्द साहित्यिक, असा संघर्ष उभा राहिला. फेब्रुवारी १९८१ मध्ये अकोल्याला कादंबरीकार गो. नी. दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली भरणाऱ्या साहित्य संमेलनावर बहिष्कार घालण्याचं आवाहन माधव गडकरी, सुभाष भेंडे, सतीश राजमाचीकर इत्यादींनी केलं, एवढंच नव्हे तर बंडखोर स्त्रीवादी लेखिका मालतीबाई बेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली १९८१ च्या जानेवारीत मुंबईत ‘समांतर संमेलन’ भरवलं. अर्थात त्याचं स्वरूप अपेक्षेनुसार प्रतीकात्मकच राहिलं.
सांस्कृतिक दहशतवाद
राज्यात १९९५ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा-सेना युती सत्तेवर आली. या शासनातर्फे पु. ल. देशापांडे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. तो स्वीकारल्यानंतर उत्तरादाखल केलेल्या भाषणात पुलंनी राज्यात सांस्कृतिक दहशतवाद वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. तसंच या संदर्भात रिमोट कंट्रोलच्या प्रभावाचाही उल्लेख केला. शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांना ते अतिशय झोंबलं. ठाण्यात एका पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये त्यावर भाष्य करताना सेनाप्रमुखांनी आपल्या ठाकरी शैलीत प्रतिक्रिया नोंदवली. स्वाभाविकपणे साहित्यिक वर्तुळात त्याचे पडसाद उमटले. प्रसिध्द कवी वसंत बापट यांच्या अध्यक्षतेखाली १९९९ मध्ये मुंबईत साहित्य संमेलन झालं. संमेलनाचे स्वागताध्यक्ष मनोहर जोशी यांचं मुख्यमंत्रीपद नुकतंच गेलं होतं. या संमेलनाच्या समारोपापूर्वी जोशीसर व्यासपीठावरुन सोयीस्करपणे बाजूला गेले आणि वसंत बापटांनी सेनाप्रमुखांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.
हा अपवाद वगळता राजकारण्यांबाबत साहित्यिकांची भूमिका पातळ होत गेली होती. दुर्गाबाईंनी लढाई पुकारली तो काळ अनन्यसाधारण होता, आता तसं वागणं हट्टीपणाचं होईल, असा युक्तिवाद त्यासाठी केला जातो. शिवाय, अखेर हे राजकारणीसुध्दा आपल्याच समाजातून निर्माण झालेले, आपणच निवडून दिलेले आहेत ना, मग त्यांच्याशी एवढा सवता सुभा राखण्याचं काय कारण, असंही विचारलं जातं. यंदाचे संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनीही तसं समर्थन केलं आहे. वरकरणी हे तर्कशुध्द वाटलं तरी राजकारण्यांना साहित्य संमेलनांमध्ये ‘उचित’ स्थान देता देता ही साहित्यिक मंडळी त्यांच्या पालख्यांची भोई कधी झाली आणि त्यांनी उधळलेल्या चवल्या-पावल्यांसाठी कशी लोटांगणं घालती झाली, याचं भानच कुणाला राहिलेलं नाही. आपल्या साहित्यिकांचा कणा किती लवचिक आहे, याची जाणीव असल्यामुळेच दुर्गाबाईंनी तशी टोकाची भूमिका घेतली असेल का, असं वाटण्यासारखं हे चित्र आहे.
लेखक विविध विषयांवरील अनुभवी बातमीदार असून ‘लोकसत्ता’चे प्रतिनिधी आहेत.
आज.. कालच्या नजरेतून : लढाई ते लोटांगण
आपल्या भवताली राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवर राजकीय, सामाजिक, साहित्यिक, औद्योगिक अशा विविध क्षेत्रांमध्ये अनेक घटना-घडामोडी होत असतात. त्यापैकी काही तात्कालिक, तर काही दीर्घ कालीन परिणाम करणाऱ्या असतात. भूतकाळातील अशाच काही घटना-घडामोडींचा ‘आज’च्या पाश्र्वभूमीवर लेखाजोखा घेणारे, त्यातील परस्परसंबंधांचा अन्वयार्थ लावू पाहणारे हे पाक्षिक सदर..
First published on: 08-01-2013 at 05:32 IST
मराठीतील सर्व आज..कालच्या नजरेतून बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fighting to adjustment