अंतरंगात आत्मज्ञान आहेच. ते ‘आपैसयाचि’ म्हणजे आपलंसं असल्यानं सद्गुरुबोधाच्या प्रकाशात मोहाचा अंधार दूर होऊ लागताच आपोआप उजळू लागतं. साधकाच्या मनात मात्र तरीही शंका येते की, हाडामांसाच्या या देहात आत्मज्ञानाचा हा साठा असेल का? ते ज्ञान बाहेरून मिळवावं लागणार नाही का? मी विकारांनी भरलेलो असताना या विकारी अंतरंगात तो ज्ञानसाठा असेल का? अशाश्वत अशा माझ्यात शाश्वत असे ज्ञान कसे असेल? त्यावर स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील ५६ ते ५९ या चार ओव्या विकारांचं खरं स्वरूप, देहाची नश्वरता आणि नश्वर देहातील शाश्वत आत्मतत्त्वाचा बोध करतात. या ओव्या, त्यांचा ज्ञानेश्वरीतला क्रम आणि त्यांचा प्रचलितार्थ व विवरण पाहू. या ओव्या अशा :
सांगें अग्नीस्तव धूम होये। तिये धूमीं काय अग्नि आहे। तैसा विकारू हा मी नोहें। जरि विकारला असे।। ५६।। (अ. ७ / ५९). देह तंव पांचाचें जालें। हें कर्माचे गुणी गुंथलें। भंवतसे चाकीं सूदलें। जन्ममृत्यूच्या।। ५७।। (अ. १३ / ११०२). हें काळानळाच्या तोंडीं। घातली लोणियाची उंडी। माशी पांख पाखडी। तंव हें सरे।। ५८।। (अ. १३/११०३). या देहाची हे दशा। आणि आत्मा तो एथ ऐसा। पैं नित्य सिद्ध आपैसा। अनादिपणे।। ५९।। (अ. १३/ ११०६).
प्रचलितार्थ :  हे पार्था, सांग, अग्नीपासून धूर तयार होतो, त्या धुरांत अग्नी आहे काय? त्याप्रमाणे जरी विकार माझ्यापासून झाले तरी मी विकारी होत नाही (५६). हा देह तर पंचमहाभूतांचा बनला आहे व कर्माच्या दोराने गुंफलेला आहे आणि जन्ममृत्यूच्या चाकावर घातलेला असून गरगरा फिरत आहे (५७). माशी जशी क्षणार्धात पंख फडफडवते तितक्या अल्पावधीत, अग्नीच्या तोंडात लोण्याचा गोळा ज्या वेगाने नष्ट व्हावा त्याप्रमाणे, हा देह नाश पावतो (५८). या देहाची अशी अवस्था आहे आणि आत्मा तर असा आहे, की अनादिपणामुळे तो स्वभावत: नित्य व सिद्ध आहे (५९).
विशेषार्थ  विवरण :  अग्नीपासूनच धूर उत्पन्न होतो, पण त्या धुरात अग्नी नसतो. धूर हवेत विरून जातो, पण अग्नी प्रदीप्त राहातो. जसा अग्नीशिवाय धूर नाही, तसेच विकारही ‘माझ्या’तूनच उत्पन्न होत असले तरी ते माझ्याहून वेगळे आहेत. विकार उत्पन्न होतात आणि मावळतात, मात्र या मधल्या काळातच ते मोठे उत्पात घडवितात. ते माझं खरं स्वरूप नसतानाही माझ्याकडून विसंगत कृत्य घडवतात. म्हणून तर आपल्याला राग येतो आणि तो ओसरल्यावर दुसऱ्यावर अकारण रागावल्याच्या भावनेनं वाईटही वाटतं. म्हणजेच दुसऱ्याविषयीची अनुकंपा, कुणाशीही आपण वाईट वागू नये, आपल्याकडून कुणी दुखावला जाऊ नये, ही वृत्ती ही आपली खरी वृत्ती असते. विकारांचा जोर उत्पन्न झाला की या वृत्तीचा तोल ढळतो.  यातून भलेभलेही सुटत नाहीत. ‘साईसच्चरित्रा’त साईबाबा सांगतात की, ‘‘सत्त्वादि त्रिगुण त्रिप्रकारें। शब्दादि विषय नाना विकारें। उपस्थ आणि जिव्हाद्वारें। ब्रह्मादि सारे ठकियेले।।’’ (अध्याय ५०, ओवी ९७).

Story img Loader