मॅडॉफची अशी तटबंद निधी कंपनी होती का? तर नाही. तो फार तर गुंतवणूक सल्लागार म्हणून अनधिकृरीत्या काम करत असणार! पण मग तो पैसे गुंतवतो कुठे? खरेदी-विक्री कुठल्या खात्यावरून करतो? एवढय़ा मोठय़ा रकमेची उलाढाल होते तर ती नजरेस यायला हवी? कुठल्याच प्रश्नाला समाधानकारक उत्तर नव्हते.
अकरा डिसेंबर दोन हजार आठ. सीएनबीसी वाहिनीवर धावती वृत्तपट्टी एक सनसनाटी बातमी दाखवत होती. ‘बर्नार्ड मॅडॉफला पॉन्झी छाप गुंतवणूक सापळा चालविल्याबद्दल अटक!’ ही बातमी अवघ्या वित्तसृष्टीला हादरवणारी होती. या पॉन्झी व्यवहारातील रक्कम किती हे अजून निश्चित कळले नव्हते, पण २० ते ५० अब्ज डॉलरचा मामला असणार अशी अटकळ होती. बर्नी मॅडॉफ हे वॉल स्ट्रीटमधले बडे दलाल. नॅसडॅकचे माजी संचालक, अध्यक्षही. वित्तीय बाजारात त्यांचा मोठा दबदबा होता. न्यूयॉर्कमधला एक धनाढय़ बांधकाम व्यावसायिक आपल्या विमानातून लॉस एंजलिसला बायकोसह चालला होता. तो ही बातमी वाचून हादरला. आपल्या बायकोला त्याने ती बातमी सांगितली. तिने डास हाकलल्यासारखा हात हलवला आणि म्हणाली, ‘शक्यच नाही!’ तो व्यावसायिक मात्र पार हबकला होता आणि आत्महत्येच्या विचाराने घेरला जाऊ लागला होता.
त्याच वेळी हॅरी मार्कोपोलोस हा एक गुंतवणूक सल्लागार आणि वित्तीय गैरव्यवहारातला ‘जागल्या’ (व्हिसल ब्लोअर) ही बातमी ऐकून अतिउत्साहाने गदगदू लागला. बर्नी मॅडॉफ हा वित्तीय लफंगा आहे याची त्याला खात्री होती. मॅडॉफविरोधात त्याने सिक्युरिटी अॅण्ड एक्स्चेंज कमिशनकडे रीतसर तक्रार नोंदवली होती. पुरावे देऊन शाबित केले होते. एकदा नव्हेतर तिनदा. पण सिक्युरिटी अॅण्ड एक्स्चेंजने थातूरमातूर चौकशी दाखवत दुर्लक्ष केले होते. कारण? मॅडॉफ म्हणजे एवढे प्रतिष्ठित दबदबा, आदर असणारे व्यक्तिमत्त्व, त्याला हात लावणारा आपली बोटे गमावून बसण्याची शक्यता!
हॅरी मार्कोपोलोसला तरी या लफंग्याचा सुगावा कसा लागला? हॅरी ‘रॅम्पार्ट’ नावाच्या गुंतवणूक आणि गुंतवणूक सल्लागार कंपनीत ‘विश्लेषक’ आणि ‘गुंतवणूक योजनाकार’ म्हणून काम करीत होता. अलीकडच्या तीस वर्षांत गणित आणि संख्याशास्त्रावर बेतलेली गुंतवणुकीची प्रतिमाने (मॉडेल्स) हा शिरस्ता बनला आहे. बाजारातील आकडेवारीमधील कल आणि हालचाल संख्याशास्त्रीय धाटणीने पारखायची आणि त्यानुसार गुंतवणूक नक्षी बदलायची. या धाटणीची गुंतवणूक नक्षी आखणारे गणित आणि संख्याशास्त्रीय प्रतिमानबाजीमध्ये तरबेज असतात. त्यांच्या प्रतिमानानुसार होणारे व्यवहार संगणकामार्फत झपाटय़ाने आणि क्षणोक्षणी पार पडत असतात. पण या उलाढालीतून फायदा कमवायला गुंतवणूकदार आणि त्यांच्याकडील गुंतवणूक पुंजी तर मिळाली पाहिजे.
या कंपनीचे बाजारातील गुंतवणूक इच्छुक हेरणे, अशा इच्छुकांना गुंतवणूक आपल्या कंपनीमार्फत करायला लावण्याची मनधरणी करणारे असे बाजारहस्तक असतात. फ्रँक नावाचा असा एक बाजारहस्तक होता. तो इच्छुक गुंतवणूकदार हेरत असे आणि त्यांच्याशी वाटाघाटी करत असे. त्या वाटाघाटी करताना त्याला अनेक वजनदार गिऱ्हाइकांनी विचारले, की तुमची कंपनी मॅडॉफसारखे जवळपास स्थिर, अगदी कमी हेलकावे , पण पुरेसा चढा परतावा देऊ शकते का? फ्रँकने मॅडॉफच्या परताव्याची जंत्री मिळवली आणि हॅरीला आणून दाखवली. त्याचा हॅरीला सवाल होता, ‘हे बघ बाजारात गुंतवणूकदाराला असा परतावा मिळतो आहे, आपण नाही का असे काही देऊ शकत? तू अशा धाटणीची गुंतवणूक योजना का नाही तयार करत? असे काही दिले तर अनेक इच्छुक आपल्याकडे वळवीन मी.’ हॅरी मार्कोपोलोसने ते आकडे पाहिले आणि तो थक्क झाला. बाजारात कितीही उलथापालथ झाली, हेलकावे आले-गेले तरी मॅडॉफ त्याच्या गुंतवणूकदारांना बऱ्यापैकी सुस्थिर दराने परतावा देतच होता. अगदी जुजबी दोन वर्षांतून एक-दोन महिन्यांत उणे परतावा एरवी एकदम निर्धास्त वाटावे असा वर्षभरात बारा- साडेबारा टक्के निव्वळ परतावा. म्हणजे मॅडॉफचे कमिशन, सल्लाशुल्क, व्यवस्थापनशुल्क धरले तर जवळपास सोळा टक्के परतावा.
हॅरीचे डोके गरगरू लागले. कुठल्या कंपनीचे सहभाग किती प्रमाणात एकत्र राखून खरेदी-विक्री करत राहायचे, त्यावरच्या ऑप्शन्सची खरेदी-विक्री करत राहायची, ही गुंतवणूक योजनाकाराची रोजची जबाबदारी असते. बाजारामधील किमती तर सतत बदलत वर-खाली होत असतात. योग्य वेळ, योग्य आकारमानाने साधणे ही कसरत त्या व्यवसायाचा कणा असते. हॅरी त्यात चांगलाच पारंगत होता. पण मॅडॉफचे परताव्याचे आकडे कसे येतात? काय केव्हा खरीदले, केव्हा विकले हे तर ‘बाजार’ ठरवतो. काहीही आटापिटा केला तरी बाजारातल्या किमतीच्या आधाराने असा परतावा मिळूच शकत नाही याची त्याला खात्री होती. तो आपल्या बाजारहस्तकांना पटवायला जिवाचे रान करत होता. पण ते म्हणायचे पण आमच्या गिऱ्हाइके आहेत. त्यांना हा परतावा मिळतो आहे. ते गिऱ्हाईक छापलेले परताव्याचे कागद आमच्या डोळय़ांसमोर नाचवून विचारत आहेत. ‘तुम्ही असे काही निदान एवढे तरी देणार का?’ रॅम्पार्टच्या वरिष्ठांनीदेखील हॅरीवर दबाव आणला. ‘मॅडॉफला जमते ते आपल्याला का जमू नये?’
हॅरी आपली सगळी आकडेबाजी पणाला लावून हररीतीने जुळवणी करून पाहात होता. पण बाजारातील किमती आणि समभागाच्या आधाराने मॅडॉफसारखा परतावा काही करून मिळत नव्हता. त्याच्या बाजारहस्तकांनादेखील उमगत होते. ‘हॅरी म्हणतो आहे त्यात तथ्य आहे, पण मग मॅडॉफ असा करारी बिनधोक परतावा पैदा करतो कसा? आणि कुठून?’ बाजारहस्तक सहकारी आणि हॅरी अशी चौकडी होती. त्यांना या मॅडॉफ कोडय़ाने पार घेरून टाकले. त्यातल्या एकाने शंका धरली की मॅडॉफ ‘फ्रंटरनिंग’ करत असेल त्यातून होणारी किफायत तो गुंतवणूकदारांना थोडी देत असेल. फ्रंटरनिंग म्हणजे गुंतवणूकदाराने खरेदी-विक्रीचा इशारा दिला की दलाल अंदाज घेतो की बाजार कसा वळणार. त्यानुसार अगोदर स्वत:च गुंतवणूक करून किफायत मिळवतो. मग गिऱ्हाइकाची खातीर करतो. कायद्यानुसार असा व्यवहार अवैध आहे. अंतर्गत माहितीचा स्वार्थी दुरुपयोग या सदरात मोडणारा गुन्हा आहे. पण दलाल अनेक चतुर मार्गानी असा व्यवहार करतात. बर्नी मॅडॉफ असेच काहीतरी उद्योग करीत असणार. असाही एक संशय होता. मॅडॉफचा अधिकृत प्रतिष्ठित आणि ख्यातनाम उद्योग दलालीचा होता. त्यामुळे या संशयाला थोडी जागा होती.
म्हणून हॅरीने तसाही हिशोब करून पाहिला. तरी ताळा जमेना. त्यात आणखी एक गोम होती. धनवान गुंतवणूकदार, व्यावसायिक, छोटय़ामोठय़ा बँक यांच्याकडे गुंतवणूक करण्याजोगती मोठी रक्कम असते. त्याचे व्यवस्थापन करणे, त्यातील जोखीम अगदी कमी ठेवणे, परतावा जमेल तेवढा उंचावणे अशी कसरत करून देणाऱ्या, गल्ला जोखीममुक्त तटबंदीत ठेवणाऱ्या कंपन्या असतात. त्यांना ‘हेज फंड’ (शब्दश: तटबंद निधी) म्हणतात.
मॅडॉफची अशी तटबंद निधी कंपनी होती का? तर नाही. तो फार तर गुंतवणूक सल्लागार म्हणून अनधिकृरीत्या काम करत असणार! पण मग तो पैसे गुंतवतो कुठे? ठेवतो कुठे? खरेदी-विक्री कुठल्या खात्यावरून करतो? खरेदी-विक्रीतले वैकल्पिक (ऑप्शन) मार्ग कुठल्या खात्यातून खरेदी करतो आणि विकतो? एवढय़ा मोठय़ा रकमेची उलाढाल होते तर ती बाजारामध्ये कुठे ना कुठे नजरेस तर यायला पाहिजे? यातल्या कुठल्याच प्रश्नाला पुरेसे आणि समाधानकारक उत्तर नव्हते. बाजारात कुणाला असे प्रश्न केले तर लोक फक्त खांदे उडवत. पण मॅडॉफविरुद्ध संशय घेऊन तक्रार करण्याची कुणाची इच्छा नसे, पर्वा नसे, हिंमत नसे! संगणकावर आधारलेले स्वतंत्र नासडॅक एक्स्चेंज उभारणीत वाटा असलेला, नॅशनल सिक्युरिटी डिलर असोसिएशनचा अध्यक्ष, सचिव असणारा, ज्यू श्रीमंतांचा गुंतवणूक आश्रयकर्ता मॅडॉफ! त्याच्याविरुद्ध दंड थोपटण्यामध्ये वॉल स्ट्रीटवर कुणाला वेळ असणार आणि रस असणार? हॅरीची तर खात्री पटत चालली होती की बर्नार्ड मॅडॉफ हा लफंगा पॉन्झी सापळा चालवतो आहे.
..कसा ते पुढच्या लेखात.
* लेखक अर्थतज्ज्ञ असून नियोजन मंडळासह अन्य ठिकाणी ते सल्लागार होते. त्यांचा ईमेल: pradeepapte1687 @gmail.com
लफंग्याविरुद्ध दंड कोण थोपटणार?
मॅडॉफची अशी तटबंद निधी कंपनी होती का? तर नाही. तो फार तर गुंतवणूक सल्लागार म्हणून अनधिकृरीत्या काम करत असणार! पण मग तो पैसे गुंतवतो कुठे? खरेदी-विक्री कुठल्या खात्यावरून करतो? एवढय़ा मोठय़ा रकमेची उलाढाल होते तर ती नजरेस यायला हवी?
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 04-06-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five things about investment fraud by bernard madoff in ponzi scheme