ज्ञानेंद्रच्या प्रश्नावर विठोबादादा थोडं अंतर्मुख होऊन बोलू लागले..
बुवा – संतांच्या अभंगात विसंगती कुठेच नाही. वरकरणी तसं भासलं तरी खोलवर गेलात तर सारं काही एकाच दिशेनं प्रवाहित होताना दिसेल. तुकाराम महाराज ‘जोडुनिया धन उत्तम वेव्हारें’ म्हणतात त्यापुढचं कुणी लक्षात घेतं का? अर्धवट वाक्यच आपण ऐकतो आणि अर्धवट बुद्धीनं त्याचाच आधार घेतो. ‘जोडुनिया धन उत्तम वेव्हारें। उदास विचारें वेंच करी।।’ हे पूर्ण लक्षात घ्या ना! आपली वृत्ती कशी आहे? कसंही करून पैसा मिळवावा. गर्भश्रीमंतांना तृप्ती नाही आणि नवश्रीमंतांनाही तृप्ती नाहीच. त्यांना आणखी आणखी हवंच आहे. इथे तुकाराम महाराज तर सांगतात, धन जोडा पण ते मिळवण्याचा, जोडण्याचा, कमावण्याचा व्यवहार उत्तम असला पाहिजे! उत्तम व्यवहारानं जेवढं कमवाल तेवढंच योग्य आहे आणि उत्तम व्यवहारानं, शुचिर्भूत-नीतीयुक्त व्यवहारानं जे मिळेल त्याचाही दर्प नको! उदास विचारें वेंच करी! अगदी त्याचप्रमाणे ‘कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी’ असं सावतामाळी म्हणतात त्यामागची व्यापकता आपल्यात आहे का हो? लोक म्हणतात, कर्तव्यं हीच परमेश्वराची भक्ती आहे. माझा व्यवसाय, माझी नोकरी उत्तम करणं, हीच भक्ती आहे. त्यातच मी परमेश्वराला पाहातो. असं म्हणणारे खरंच त्या पद्धतीनं वागतात का? कर्तव्यरत राहाणं ही भक्ती असेल तर त्यात मग मीपणा कसा काय येईल? आपल्या व्यवसायातच मी परमात्म्याला पाहात असेन तर मग दुसऱ्यावर अन्याय करून, लबाडी करून मला व्यवसाय साधेल का? तेव्हा सर्वत्र विठाबाईला पाहाणाऱ्या सावता माळी महाराजांना फकिरीचंच मागणं मागावंसं वाटलं, यात नवल नाही.. तेव्हा ज्ञानोबा, संतांनी कधीही भौतिकातच गुंतून राहायला सांगितलेलं नाही..
हृदयेंद्र – काहीजण म्हणतात, समर्थानीही प्रपंच करावा नेटका, म्हटलंय. आता नेटका म्हणजे भरभरून नव्हे! नेटका म्हणजे आवश्यक तितकाच, आटोपशीर!
कर्मेद्र – संसार किती का आटोपशीर असेना, संसार म्हटला की त्यात मन गुंतणारच ना? संसारात असताना, चार लोकांसोबत वावरताना, एखादं काम करताना त्याच्याशी मनानं चिकटणं अटळच आहे.  काही संतांनीही किती कामं केल्येत. गाडगे महाराजांचंच पाहा. रुग्णांच्या नातेवाईकांसाठी रुग्णालयांच्या आवारात धर्मशाळा बांधण्यापासून धर्मक्षेत्रांतही त्यांनी किती कामं केली.. त्यात त्यांचं मन नसेल का?
बुवा – ‘आत्मप्रभे’त गजानन महाराजांनी सांगितलेला बोध आठवतो. ते म्हणाले, ‘‘संतांना कर्मच नसतं. कर्म देहाला असतं आणि संत तर देहातीत असतात.’’ तसं देहातीत झाल्यावर कर्म होऊनही कर्मातीत होता येतं! जो कर्मात गुंतून असतो त्याची सर्व र्कम ही स्वार्थप्रेरित आणि स्वार्थसाधकच असतात. संतांची र्कम ही नि:स्वार्थ होती आणि लोकहितकारकच होती.
हृदयेंद्र -आणि कर्मातीत झाल्यावरच खरा धुरीण मी नव्हे, परमात्मा आहे, हे उमगतं. ‘ऐकावे विठ्ठल धुरे। विनंती माझी हो सत्वरें।।’ या चरणात सावता माळी धुरीण अशा परमात्म्याला साकडं घालत आहेत..
बुवा – ज्याला आपल्या जीवनावर परमात्म्याची सत्ता आहे, याची स्पष्ट जाणीव झाली आहे, त्या साधकाची ही स्थिती ते सांगत आहेत. परमात्माच खरा धुरीण आहे, हे उमगल्यावर मीपणानं आयुष्यातली किती र्वष वाया गेली, याची जाणीव साधकाला तीव्रपणे होते. ही र्वष का वाया गेली, मीपणानं काय झालं, हे तीव्रपणे उमगलं की लक्षात येतं, या मीपणानं संसाराची आसक्तीच वाढत गेली आणि त्या आसक्तीनं मीपणाच वाढत गेला. त्या आसक्तीचा नाश व्हावा, ही तळमळ लागते. म्हणून सावता माळी महाराज म्हणतात, ‘‘करी संसाराची बोहरी। इतुकें मागतों श्रीहरी।। कष्ट करितां जन्म गेला। तुझा विसर पडला।।’’ त्या संसाराच्या आसक्तीचा नाश कर. कारण त्या आसक्तीपायी इच्छा, आशा, वासना, विकार, ऊर्मीच्या मागे वाहावत जाऊन अनंत कष्ट मी उपसत राहिलो. त्यात निव्वळ वेळ गेला आणि तुझं विस्मरण फक्त साधलं! या जाणिवेनं तळमळ लागते..
हृदयेंद्र – त्याच तळमळीनं समर्थही सांगतात.. जळत हृदय माझे, जन्म कोटय़ानुकोटी। मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी!! स्वत:ला धुरीण मानण्यात अनंत जन्म वाया गेले, आता धुरीण राघवा माझ्यावर करुणेचा पूर लोट!
चैतन्य प्रेम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा