मनाच्या सवयींना आवर घालण्याचा अभ्यास केवळ श्रीसद्गुरूंच्याच आधारावर होऊ शकतो. तुम्ही सद्गुरूंची कितीही चरित्रे पाहा. शिष्यांना त्यांनी केलेला बोध असो की प्रत्यक्ष प्रसंग असोत, त्या सर्वाचा अंतिम हेतू शिष्याला घडविणे हाच असतो. शिष्याला असलेल्या सवयींची घडण बदलूनच ही जडणघडण साधली जाते. ही शिकवण असते ना, ती उघड मात्र नसते. सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गाने वाटचाल करताना आपल्यातल्या कोणत्या सवयी आड येतात, हे शिष्याला उमगतच असते. त्या सवयी सोडणं मात्र त्याला साधत नसतं. त्या सोडण्याचे उपाय सद्गुरू अनेक प्रसंगांतून, बोधातून, सहज म्हणून सुरू झालेल्या गप्पांतून प्रकट करीत असतात. ते ज्याचे त्याला समजतात. श्रीमहाराज गोंदवल्यास होते तेव्हा तिथे अनंत प्रकारच्या वृत्ती-प्रवृत्तीचे तसेच विभिन्न आर्थिक, बौद्धिक, सामाजिक थरांतले लोक एकत्र नांदत असत. त्यांच्याशी श्रीमहाराजांचा सहजवावर कसा असे याचं फार मार्मीक वर्णन पू. बाबा बेलसरे यांनी चरित्रात केलं आहे. पू. बाबा लिहितात, ‘‘श्रीमहाराजांच्या वागण्यामध्ये फार खुबी होती. अगदी ब्रह्मानंदांपासून तो थेट व्यसनी माणसापर्यंत त्यांची वागणूक समान असे. माझ्यावर श्रीमहाराजांचे प्रेम आहे, असे प्रत्येकास वाटे. त्यांचे बोलणे सारखेच गोड, कळकळीचे, प्रपंच व परमार्थ यांची जोड घालणारे आणि अत्यंत नि:स्वार्थीपणाचे असे. शिवाय त्यांच्या आवाजामध्ये मोठे आर्जव आणि अति नम्रता होती, म्हणून त्यांच्या बोलण्याने कोणीही मनुष्य अगदी मोहून जात असे. ज्याची त्याची शक्ती पाहून श्रीमहाराज त्याला उपासना सांगत, या कारणाने एकाला जे सांगितले तसेच दुसऱ्याला सांगतील असा नियम नव्हता. जी गोष्ट माणसाच्या परमार्थाच्या आड येत असेल तेवढीच नेमकी त्याला सांगत.  प्रत्येकाचा दोष ते समजावून देत, पण त्यामध्ये त्याचा कधीही अपमान होत नसे व पुष्कळ वेळा विनोदच असे. बहुधा श्रीमहाराज अशा खुबीने भाषण करीत की ते कोणाला उद्देशून आहे हे ज्याचे त्याला सहज कळे.’’  सवयींना मुरड घालण्याच्या तपश्चर्येची सुरुवात महाराज कशी करीत हे सांगताना पू. बाबा लिहितात, ‘‘परमार्थाच्या बाबतीत मात्र ते अगदी स्पष्टपणे सांगत. जो वाचाळ असेल त्याला मौन पाळण्यास सांगत, जो माणूसघाणा असेल त्याला लोकांत मिसळण्यास सांगत, जो प्रपंचात चिकटलेला असेल त्याला त्यातून बाजूला सरण्यास सांगत, पण जो वाह्य़ात असेल त्याला प्रपंच नीट करायला सांगत. जो मानासाठी हपापलेला असेल त्याला अपमान होईल अशा ठिकाणी मुद्दाम जाण्यास सांगत. जो उद्धट आहे त्याला अत्यंत लीन बनण्यास सांगत. जो फार लोभी आहे त्याला दान करण्यास सांगत. जो फार उधळ्या आहे त्याला संग्रह करण्यास सांगत. जो आळशी आहे त्याला देहकष्ट करण्यास सांगत. जो हठयोगी आहे त्याला मनाकडे जास्त लक्ष देण्यास सांगत. ज्याला अध्यात्मग्रंथ नुसते वाचण्याचाच नाद असे त्याला वाचन थांबवून मनन करण्यास सांगत. जो नुसत्या गप्पा ठोकण्यात वेळ घालवी त्याला पोथी वाचायला सांगत.’’