इव्हेंट, सेलिब्रेशन यांची साथ आनंदाला हवीच असते असं कुठेय? काहीही निमित्त आणि कसलंही कारण नसताना आपण निव्र्याज आनंद मिळवू शकतो की नाही? असा उत्कट आनंद टिकाऊ असतो, त्यात पुनप्रत्ययाची शक्यता असते. केवळ जाणिवेनंही तो मिळवता येतो. मात्र त्यासाठी आपल्याला स्वत:ची तयारी करायला लागते..
दिवाळी आता सुरू होईल. सगळी बाजारपेठ त्याची साक्ष आहे. रोषणाई आणि रंगीबेरंगी झगमगाटाने काही तरी शुभ घडणार आहे, असं उगीचंच वाटायला लागतं आहे. प्रत्यक्षात तसं काही शुभ घडेलच, याची अजिबात शाश्वती नसणारा हा काळ. जणू कपडे फक्त दिवाळीतच खरेदी करतात लोक, अशा समजानं त्यांना आकृष्ट करण्याची ही स्पर्धा बाजारात चैतन्य आणतही असेल कदाचित. पण प्रत्यक्ष जगण्यात दिवाळीच्या चार दिवसांशिवाय येणाऱ्या तीनशे एकसष्ट दिवसांत काहीच घडत नाही, असं नाही. घडायचंच असेल, तर ते बहुधा त्याच काळात घडत असतं. आता तर सगळी दुकानं वर्षभर खच्चून माल भरत असतात. गिऱ्हाईकांना वेगवेगळी आमिषं दाखवून त्यांना खरेदी करायला भाग पाडत असतात. गिऱ्हाईकंही दिवाळीची खरेदी अशा भाकड काळात करून ठेवत असतात आणि स्वस्तात खरेदी झाल्याचं समाधान मिळवत असतात. असलं समाधान कितीही मिळालं, तरी ते टिकाऊ नसतं. दिवाळी आली, की काहीतरी खरेदी करायचीच असा ‘पण’ आपण सारे का करतो? जास्त पैसे हाती खेळतात म्हणून की सणाचा आनंद लुटायचाच अशी आपली मनोवृत्ती असते? फक्त सणच आपल्याला आनंद देतात आणि तेव्हाच आपण तो स्वीकारण्याच्या मन:स्थितीत असतो, असं आपण सगळ्यांनी मनाशी पक्कं धरून ठेवलं असावं. दसरा, दिवाळी, नवरात्र, गणेशोत्सव, नाताळ, ईद अशा काळातच आपण आनंदी का म्हणून राह्य़चं? सणाचा आनंद नवे कपडे, दागदागिने, अत्तरं, फराळ अशा इंद्रियांना सुख वाटणाऱ्या गोष्टीतच का साठवून ठेवायचा?
गेल्या दोन दशकांत सगळ्याच गोष्टींचा इतका अतिरेक झाला आहे, की त्यातली चिमूटही बोटांमध्ये पकडता येत नाही. वर्षांकाठी काहीशे चित्रपट निर्माण करणाऱ्या भारतात आता कोणत्याही चित्रपटाचे भवितव्य तीन दिवसातल्या गल्ल्यावरच ठरायला लागलं आहे. या चित्रपटांमधली गाणी तो येण्यापूर्वीच फक्त ऐकायला मिळतात. चित्रपटगृहातून चित्रपटाची गच्छंती होईपर्यंत मागील रांगेमध्ये गाण्यांची स्पर्धा सुरू झालेली असते. तीन तास आणि काहीशे रुपये खर्चून जो चित्रपट पाहायचा, तो पाहून बाहेर पडेपर्यंत त्याची मजा संपलेली असते. त्यातलं काहीच आठवेनासं होतं. नट-नटय़ांच्या भाऊगर्दीत कोणाचं कोण, हेही समजेनासं होतं. चार घटका करमणूक, म्हणावी, तर ती होईलच, याची शाश्वती नाही. टीव्हीवरच्या मालिकांमध्ये बरोबर दिवाळीचा मुहूर्त साधून त्यातली सगळी पात्रं फटाके, फुलबाज्या उडवतात. एकमेकांना शुभेच्छा देतात आणि जगाच्या आनंदात आपणही कसे सहभागी आहोत, याचं दर्शन घडवतात. इतक्या साऱ्या मालिका आणि त्यातली कितीतरी पात्रं रोज काही ना काही नवं नाटय़ निर्माण करण्याच्या प्रयत्नात असतात. एखाद दिवस चुकला, की सगळी गोष्टच बदलल्यासारखं वाटतं. तीच भुताटकी आणि तेच प्रेमाचे त्रिकोण, चौकोन. वेळेचं काय करायचं, असा प्रश्न पडल्यागत लोकं आपली रोज टीव्हीसमोर बसून असतात. मग त्यांना तिथल्याच फटाकेबाजीचा आनंद अपूर्व वाटायला लागतो.
सणांच्याच दिवशी खोटंखोटं आनंदी राहायची ही कल्पना आता बाद करायला हवी. एरवीही आनंदी राहण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, यावर विश्वास ठेवला, तर कदाचित तसंही घडू शकेल. मुळातच सणांचं वाढतं महत्त्व ही आता बाजारपेठीय कल्पना म्हणून स्वीकारली जाऊ लागली आहे. तुम्हाला ठरवून आनंदी करण्याचं एक नवं तंत्र विकसित करण्यासाठी जगातले सगळे उद्योग नवनव्या कल्पना लढवायला लागले आहेत. सुखी बनण्यासाठीचं हे नवं तंत्र लोकांच्या माथी मारण्यासाठी माध्यमांचा अतिरेकी वापर होऊ लागला आहे. चोवीस तास आनंदी राहायचं, म्हणजे नेमकं काय करायचं, याचं सोपं उत्तर, गाईड्स वाचून परीक्षा देण्याच्या सवयीमुळे, सहसा कोणी शोधत नाही. सगळ्यांना आता झटपट आनंदी होण्याचे मार्ग हवे आहेत. ते शारीरिक आनंद देणारे हवे आहेत. त्यापलीकडे आनंदाच्या काही परी असतात, याचं भान या नव्या बाजारपेठीय दबावामुळे हळूहळू नष्ट व्हायला लागलं आहे.
असा काही आनंद असू शकतो, याची आठवण आता होईनाशी झाली आहे. त्यामुळे मिळेल, त्या गोष्टीतून आनंद ओरबाडून घेण्याची एक नवी प्रवृत्ती दिसायला लागली आहे. शांतपणे, छानपैकी चहाचा एकेक घोट घेण्यातली किंवा चहा बशीत ओतून फुर्रफुर्र करत पिण्यातली मौज आता कुणी घेताना दिसत नाही. गुळगुळीत कागदावर थांबून थांबून सुवाच्य अक्षरं काढण्यातली मजा जशी आपण हरवून बसलो, तशीच निव्र्याज मनानं गाणं ऐकण्याचंही आपण जवळजवळ थांबवलेलं आहे. हातातला मोबाईल, मांडीवरचा लॅपटॉप, कानातला आयपॉड आपल्याला स्वस्थ म्हणून बसू देत नाही. आपण शांतताच विसरतो आहोत बहुधा! त्यामुळे संवादात यांत्रिकता आली आणि भेटण्याची असोशीही नाहीशी झाली. जुजबी वागणं आणि गरजेपुरतं बोलणं अशी नवी संस्कृती निर्माण झाली. मोबाईलमधला तोच एसेमेस शेकडोंना पाठवण्यानं आपलं संवादाचं काम हलकं होऊ लागलं. ई-मेलमधून शुभेच्छा देण्यानं अगदी मनाच्या गाभ्यातलं असं काही पोचवल्याचं तकलादू समाधानही मिळू लागलं. चॅट करतानाच्या शब्दांचे नवे अर्थ शोधत बसण्यात जसा वेळ जाऊ लागला आणि या अर्थाना खरंच आणखी काही पदर असतात का, याचा शोध घेण्याची गरजही वाटेनाशी झाली. हा संवाद कसा शारीर बनून राह्यला लागला. असं काही बदलतं आहे, बदललं आहे, हे लक्षात येण्याएवढी फुरसतही मिळेनाशी झाली आहे. हे सगळं अगदी नकळत झालं. कळूनही फार फायदा झाला असता असं नाही. पण कळण्याची गरजही कधी वाटली नाही. गोडधोड खायला मिळण्यासाठी सणांचीच वाट पाहण्याचे दिवस संपले. हे चितळे बंधू आणि हल्दीराम यांच्यासारख्यांमुळे हे घडलं. उत्तम वेष्टणात, खात्रीशीर चवीचं गोड खाणं सहजसाध्य झालं. त्यामुळे सणाच्या दिवशीही गोड खाणं, एवढाच उपचार राहिला. आता हॉटेलात जाऊन खाणं, याचा अर्थ घरात स्वयंपाक केला नाही, असा घेतला जाण्याचा काळही संपला. उलट घरात चूल न पेटवता, मुद्दामहून बाहेर खाण्याचेच दिवस आले.
उत्कटता हा मानवी मेंदूला मिळालेला वर आहे. तो वर आहे, हे ज्यांना कळलं, त्यांना जगण्यातला उत्साह, त्यातून मिळणारी ऊर्जा आणि त्या ऊर्जेतून निर्माण होणारा आनंद यांची साखळी बनवता येते. जीवनातला असा उत्कट आनंद टिकाऊ असतो, त्यात पुन:प्रत्ययाची शक्यता असते. केवळ जाणिवेनंही तो मिळवता येतो. मात्र त्यासाठी आपल्याला स्वत:ची तयारी करायला लागते. ही तयारी पाठय़पुस्तकातून किंवा क्लासमधून होत नाही. आनंद मिळवण्याच्या क्षमता वाढवण्यातूनच हे घडू शकतं. त्यासाठी गृहपाठ नाही, की परीक्षा नाही. उत्तीर्ण होण्याचंही बंधन नाही. हवी फक्त मनाची तयारी. मेंदूच्या मदतीनं आनंद मिळवायला लागलं, की मग तो किती अक्षय्य असतो, हे सहजपणे लक्षात यायला लागतं. नव्या मोटारीतून, नवे कपडे घालून, उंची हॉटेलात जाऊन, चमचमीत खाऊन मिळणारा आनंद आणि उत्कटतेतून मिळणारा आनंद यातला फरक मग सहजपणे जाणवायला लागतो. आजूबाजूला दिसणाऱ्या बाजारपेठीय कल्पनांना धुडकावून लावण्याची क्षमता आपोआप तयार होते. एकदा हे साध्य झालं, की त्या कल्पनांचे आपण दास बनत नाही आणि आपल्या हुकमावर त्या कल्पनांना नाचवण्याची ताकद आपोआप मिळायला लागते. काय हवं, ते कळण्यासाठी एवढी तरी तयारी करायलाच हवी. संपन्नता केवळ इंद्रियांतून मिळत नाही. त्यापलीकडे असलेल्या सृजनाचा अनुभव संपन्नता देतो. इंद्रियांना होणारा आनंद त्यामुळे अधिकच खुमासदार होतो. सुवास, चव, स्पर्श या प्रत्यक्ष आनंदाच्या तर श्रवण आणि दर्शन या अप्रत्यक्ष आनंदाच्या गोष्टी. त्यातलं तारतम्य कळलं की सगळंच सोपं होऊन जातं. प्रत्यक्षातल्या आनंदाला जेव्हा उत्कटतेची झालर येते, तेव्हा तोच आनंद निर्मम बनतो आणि आपल्याला संपन्न बनवतो. असं संपन्न बनण्याची इच्छा नसलेला समाज आता वाढणं हा खरा धोका आहे. समाजाला त्यातला खरेपणा समजणं आवश्यक अशासाठी आहे, की त्यामुळे त्याला भवतालाचं खरं भान प्राप्त होतं. इंद्रियांच्या आनंदाला या उत्कटतेची जोड मिळण्यासाठी पाश्चात्त्य देशात केवढे काही प्रयत्न होत असतात. आपण मात्र तिकडे ढुंकूनही पाहात नाही. मग इतिहासाची उपेक्षा होते, भूगोल ऑप्शनला पडतो, कला विषयांना उत्पन्नाची साधने उरत नाहीत, नागरिकशास्त्र तर पाठय़पुस्तकापुरतंच उरतं. असं जगायचं, तर त्याला दिवाळी कशाला हवी?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा