आपापल्या समूहांत, आपापल्याच देवतांसाठी साजऱ्या होणाऱ्या उत्सवांपेक्षा कुंभमेळा निराळा.. तो प्रांतोप्रांतीच्या विविधभाषी सामान्य माणसांचा, त्याहीपेक्षा साधूंचा! सरकारी आश्रय नवा नसलेल्या कुंभमेळय़ाचे राजकीय फायदे अनेकांनी घेतले..
जगात कोणत्याही संस्कृतीतील माणसे आजही एकत्र येऊ पाहतात. एरवी एकटय़ादुकटय़ाने कुणी करणार नाही असे प्रकार ही माणसे एकत्र येऊन करतात आणि नंतर हे उत्सवी वर्तन जणू विसरून, हीच माणसे पुन्हा आपापल्या दिनक्रमाला लागतात. एरवी केले नसते, पण उत्सवात मात्र करतो आहोत, अशा या प्रकारांना कुणीही, कधीही हीन लेखत नाही. या उत्सवी वागण्याला आपापल्या परंपरांचा काही एक आधार असल्याची खात्री उत्सवात भाग घेणाऱ्यांना असल्यामुळेच ते सारे एकत्र आलेले असतात.. मग स्पेनमधल्या बुनोल गावच्या तोमातीना उत्सवात एकमेकांच्या अंगावर टोमॅटो फेकून त्या रसात न्हाऊन निघणारी माणसे असोत, की ब्रासिलियात कार्निव्हलमध्ये चित्ररथांवर नाचणाऱ्या तरुणी, चीन वा हाँगकाँगमध्ये उंच मनोऱ्यावर आपल्या इच्छापूर्तीसाठी गोलसर बन रोवण्याचा उत्सव असो, की आपल्या महाराष्ट्रातले बगाड असो.. म्हणजेच आनंदी उन्माद असो, की भक्तीच्या भावनेतून केलेले अचाट साहस.. उत्सवी वर्तन आणि एरवीचे वर्तन यांच्यात फरक असणारच, हे माणसांनी गृहीत धरलेले असते. रशियात अगदी सोविएत काळातही पहिला बर्फ पडल्यावर पुरुष मंडळी उघडय़ाने त्या हाडे गोठवणाऱ्या पाण्यात उडय़ा मारायला जात, तो निधर्मी उत्सव आजही टिकला आहेच. धर्म, कृषी संस्कृती,  ऋतुमान यापैकी कशाशीही संबंध असू शकणारे हे उत्सव. जगभरच्या उत्सवांचे पर्यटकीकरण झाले, त्यातील परंपरा संपली आणि उन्मादच उरला, पण भारतात काही उत्सव आजही श्रद्धेचा धागा टिकवून राहिले आणि आपापल्या समाजांपुरते खासगीपणही त्यांनी जपले. कोणत्याही एकाच सांस्कृतिक उतरंडीखाली येणे नेहमीच नाकारणाऱ्या या देशात, संक्रांत वा चैत्र प्रतिपदा यांसारखे दिवसही निरनिराळ्या प्रकारे साजरे करण्याइतके वैविध्य या देशाने जपले. या वैविध्याला पुरून उरणारा आणि भारताच्या अनेक प्रांतांना एकत्र आणणारा एक उत्सव म्हणजे नाशिक, उज्जैन, हरिद्वार आणि अलाहाबाद येथे दर १२ वर्षांनी भरणारा कुंभमेळा. डुबकी मारणे या एकाच उद्देशाने दूरदुरून निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक कुंभमेळय़ास येतात. त्यापैकी प्रयागचा कुंभमेळा महत्त्वाचा आणि मोठा, म्हणून त्यातील डुबकीचे महत्त्व राजकारण्यांनाही वाटतेच.
बाकीचे भारतीय उत्सव आपापल्या समूहांत, आपापल्याच देवतांसाठी साजरे होणारे, पण १२ वर्षांतून एकदा तरी जरा घरदार सोडून दूरवर जा, अमृतकुंभातील थेंब जिथे पडले, तिथेच डुबकी मारून पवित्र व्हा, असे करावयास गेल्या काही शतकांपासून सांगणारा हा उत्सव. तो जितका सामान्य माणसांचा, त्याहून अधिक साधूंचा आणि त्यांच्या शक्तिप्रदर्शनाचा. ते शक्तिप्रदर्शन पाहून धन्य होणारेही काहीजण असतील, पण फोटोग्राफीला इंटरनेटची जोड मिळाल्याने साधूंच्या शक्तिप्रदर्शनाचे हे मार्ग गेल्या कुंभमेळ्यापासून जगभर पोहोचले. पर्यटन आणि कुंभमेळा यांचा संबंध वाढतो आहे. यंदा म्हणे कुंभमेळ्यासाठी प्रयागला- म्हणजेच आजच्या अलाहाबादेत सेलेब्रिटींची गर्दी वाढते आहे. नरेंद्र मोदींसारखे राजकारणी किंवा कॅथरीन झेटा जोन्ससारखी अभिनेत्रीच नव्हे, तर दलाई लामांनासुद्धा कुंभमेळ्यास यायचे आहे. या कुंभमेळ्यातच ‘खरा भारत’ दिसतो, अशा सामाजिक अभ्यासाच्या प्रेरणेने प्रयागला येणारे जिज्ञासूही अनेक आहेत. गंगेचे पाणी किती अशुद्ध आहे हे या साऱ्यांना माहीत आहे, पण टिहरी धरणातून खास कुंभमेळ्याच्या स्नानांच्या दिवशी पाणी सोडणार, असे आश्वासन या मेळ्याला काहीही कमी पडू न देण्याच्या आणाभाका घेऊन थेट नियोजन आयोगामार्फत त्या पूर्ण करणाऱ्या केंद्र सरकारने दिले आहे. कुंभमेळ्याला अशा सरकारी आश्रयाची परंपरा जुनीच, समुद्रगुप्त आणि चंद्रगुप्त या गुप्तकालीन सम्राटांपासूनची. मग मुघल काळात सम्राट अकबराने आपल्या सार्वधार्मिक तत्त्वांचा आधार घेणाऱ्या दीन-ए-इलाही या पंथाच्या नावाचे इलाहाबाद वसवले, तेव्हा गंगेला बांधही घातला आणि शहर आणि कुंभग्राम अशी निरनिराळी व्यवस्था अकबराच्या काळापासून सुरू झाली. संगमावरच्या अकबराच्या किल्ल्यातील प्राचीन ‘अक्षयवट’ वृक्ष अकबराच्या काळात लोकांसाठी खुला होता.. तो लष्कराच्या ताब्यात जाऊन बंदिस्त झाला गेल्या शतकात! ब्रिटिशांनीही प्रयागच्या कुंभमेळ्याला आडकाठी केली नाही. या अहिंदू शासकांची श्रद्धा साधू-संत म्हणवल्या जाणाऱ्यांवर आणि कुंभमेळ्यात आपापले शक्तिप्रदर्शन करणाऱ्या अखाडय़ांच्या महंतांवर असणे अशक्यच होते, तरीही साधू-महंतांचे महत्त्व प्रयागमध्ये अबाधित राहिले. प्रयागच्या साधूग्रामात आता हे संत-महंतांचे शक्तिप्रदर्शन फक्त हठयोग वा समूहशक्तीपुरते मर्यादित राहिलेले नाही. पैसा खेळतो आहे आणि एकेक अखाडा लाख-कोटींपर्यंतची तात्पुरती बांधकामे करून येणाऱ्यांना दिपवतो आहे.
सरकार कुंभमेळ्यासाठी पैसा देते, त्यातून शहराची वाढ होते, असा स्वातंत्र्योत्तर काळात नाशिकने अनेकदा घेतलेला अनुभव प्रयागला नवा नाही आणि यंदाही तसेच होत आहे. स्वत:ला ‘प्रयागवाल’ म्हणवणाऱ्या इथल्या पंडय़ांनी १८ पैकी एक पूल कायमस्वरूपी करण्याचा आग्रह आतापासून धरला आहे. या प्रयागवालांना जमीन देऊन सरकार त्यांच्याकरवी सामान्य भाविकांसाठी मोफत कॅम्प चालविते. दुसरीकडे, धर्मात कुणाचीही दलाली नको, असाच आग्रह धरणाऱ्या इस्कॉनसारख्या संस्थाही महिना ४० हजार रुपयांपर्यंत भाडे आकारून कुंभक्षेत्री ‘कल्पवास’ करण्याचे पुण्य देशीविदेशी भाविकांना देतात. बहुराष्ट्रीय पर्यटन कंपन्यांना येथे विरोध झाला, तरीही यंदा काही संस्थांशी गोपनीय करार करून या कंपन्यांनी यंदा येथे पाय रोवले आहेत.
बाकीच्या उत्सवांपेक्षा कुंभ निराळा कसा, याची यादी संपता संपणार नाही. त्याचे राजकीयीकरण करू नका, असे तरी कुणाकुणाला सांगावे? सोनिया गांधींच्या परदेशी असण्याचा मुद्दा गाजत होता, तेव्हा त्या २००१च्या कुंभमेळ्यास येऊन डुबकी मारून बाहेर पडल्या आणि धर्मनिरपेक्षतेचा प्रसार करायला मोकळ्या झाल्या. आता नरेंद्र मोदी येणार, म्हणून भुई बडवली जात आहे. राजनाथ येऊन गेले, अमरसिंह आले आणि अखिलेश सिंह तर आपल्यामुळेच एवढय़ा साऱ्यांना मेळ्याचे पुण्य मिळते आहे, अशा थाटात अनेकदा मेळ्याची पाहणी करत असतात.
अशा गजबजाटात आपण केवळ एका डुबकीसाठी आणि आपल्या मुक्तीच्या प्रार्थनेसाठी येथे आलो होतो, की आणखी कशासाठी? असा गोंधळ होण्याची शक्यता अधिक. श्रद्धा भक्कम असेल, तर गोंधळ होत नाही. पण कुंभमेळ्यात कुणाचे वर्तन खरे मानायचे, की सारेच मेळ्यातले खेळ म्हणून सोडून द्यायचे, हा प्रश्न श्रद्धावानांनाही प्रयागहून परतताना पडावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा