चीनचा उदय हा परराष्ट्र धोरणांच्या अभ्यासातील सध्याचा सर्वाधिक चर्चिला जाणारा विषय आहे. जागतिक संदर्भात चीन हे अतिशय महत्त्वाचे राष्ट्र आहे. त्याच्याकडून जी जी पावले उचलली जातात, त्यांचे दूरगामी परिणाम आणि प्रभाव पडलेले पाहायला मिळतात. जागतिकीकरणानंतर चीनची अर्थव्यवस्था ही जागतिक व्यवस्थेशी सर्वात मोठय़ा प्रमाणावर जोडली गेली आहे. विशेषत्वाने नमूद करायचे तर ज्या वेगाने चीनचे आर्थिक बळ वाढते आहे, त्याच गतीने त्यांच्या लष्करी सामर्थ्यांत आणि युद्धसज्जतेत वाढ होताना दिसते. आज चिनी सैन्य हे जागतिक अत्याधुनिक लष्करांपैकी एक म्हणून गणले जाते. चीनकडून होणाऱ्या या हालचालींचा भारत-चीन द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होताना दिसतो. चीन हा भौगोलिकदृष्टय़ा भारताचा सख्खा शेजारी आहे. स्वाभाविकच चीनशी मैत्रीपूर्ण आणि सौहार्दाचे संबंध जपण्यासाठी त्या देशाचे परराष्ट्र धोरण समजावून घेणे भारतासाठी नितांत गरजेचे आहे. चीनची उत्क्रांती आणि बदल यांचा त्यांच्या परराष्ट्र धोरणावर ठळक प्रभाव पडलेला दिसतो.
चीनचे जगाशी जोडले जाणे जितके वाढते आहे, तितकेच चीनमधील अंतर्गत परिस्थिती समजावून घेण्याचीही गरज वाढते आहे. चीनच्या देशांतर्गत घडामोडींचा थेट परिणाम परराष्ट्र धोरणावर झालेला दिसतो. विशेषत: जपान आणि अमेरिकेसारख्या देशांशी असलेल्या धोरणांमधून हे प्रतििबबित होते. चीनच्या आर्थिक आणि लष्करी सामर्थ्यांत जसजशी वाढ होत जाईल, तसतशी जागतिक व्यासपीठाला त्यांच्या भूमिकांचा-मतांचा अधिक मान राखावा लागेल. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवर याचा मोठा प्रभाव पडेल यात शंका नाही आणि म्हणूनच चीनमध्ये होणाऱ्या बदलांचा वेध घेणारे ‘चायनीज फॉरेन पॉलिसी’ हे इमिलिअन कावल्स्की यांनी संपादित केले पुस्तक वाचणे अनिवार्य ठरते.
हे पुस्तक सहा भागांत विभागलेले आहे. पहिला विभाग चीनच्या परराष्ट्र धोरणाबाबत ऐतिहासिक आणि पृथक्करणीय दृष्टिकोनांचा ऊहापोह करतो. दुसऱ्या विभागात परराष्ट्र धोरणावर प्रभाव पाडणाऱ्या देशांतर्गत घडामोडींची चर्चा करण्यात आली आहे. चिनी परराष्ट्र धोरणाचा आंतरराष्ट्रीय परिणामांचा वेध तिसऱ्या विभागात घेतला आहे. चौथा विभाग चीनच्या द्विपक्षीय संबंधांवर बेतला आहे. पाचव्या विभागात चीनच्या प्रादेशिक धोरणांचा विचार केला आहे, तर शेवटच्या विभागात चीनच्या परराष्ट्र धोरणातील कळीच्या मुद्दय़ांचा परामर्श घेतला आहे.
चीनच्या अन्य देशांशी असलेल्या संबंधांची ऐतिहासिक पाश्र्वभूमी आणि पृथक्करणीय दृष्टिकोन यांचा विचार पहिल्या विभागात करण्यात आला आहे, तर दुसरे प्रकरण चीनच्या आंतरराष्ट्रीय संबंधांवर प्रभाव पाडणारे महत्त्वाचे देशांतर्गत मुद्दे अधोरेखित करते. राष्ट्रवाद, विचारधारा, लष्करी सामथ्र्य, आर्थिक विकास हे यातील कळीचे मुद्दे आहेत. तिसरा विभाग चीनच्या परराष्ट्रनीतीचा आंतरराष्ट्रीय परिणामांचा वेध घेतो. यातील प्रकरणे सांस्कृतिक राजनीती, अन्य देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या चिनी लोकांच्या संख्येत होणारी वाढ, स्थानिक गरजांची पूर्तता करणाऱ्या साधनांचा शोध याद्वारे जागतिक आदानप्रदान प्रक्रियेवर चीनचा कितपत प्रभाव पडतो याचा आढावा घेतात.
जागतिक व्यासपीठावर महत्त्वाच्या असलेल्या देशांशी असलेले चीनचे द्विपक्षीय संबंध चीनची आंतरराष्ट्रीय उद्दिष्टे अधोरेखित करतात, असे चौथा विभाग स्पष्ट करतो. या विभागत अमेरिका, रशिया, युरोपीय महासंघ आणि भारत या देशांशी असलेल्या चीनच्या द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली आहे. पाचव्या विभागात मध्यपूर्व राष्ट्रे, मध्य आशिया, ईशान्य आशियाई राष्ट्रे, नैर्ऋत्य आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका तसेच ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या राष्ट्रसमूहांशी असलेले चीनचे प्रादेशिक संबंध चर्चिले आहेत. चिनी परराष्ट्र धोरणाची अंमलबजावणी आणि त्याचा अभ्यास या दोन्हींच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे मुद्दे सहाव्या विभागात मांडले आहेत. यावरून संपादकांनी पुस्तकाचे संपादन करताना चीनच्या बदलत्या परराष्ट्र धोरणाचा ऊहापोह करण्याबरोबरच समकालीन तसेच महत्त्वाच्या विषयांची निवड केली आहे आणि ती विचारपूर्वक केली आहे, हे लक्षात येते.
संकल्पनांची व्याप्ती आणि पुस्तकात मांडल्या गेलेल्या कल्पना यावरून असे म्हणता येईल की, चीनच्या आंतरराष्ट्रीय संबंधांची उत्क्रांती, त्याचे टप्पे, अंमलबजावणी यांबाबत एक अंतर्दृष्टी आणि चीनच्या परराष्ट्र धोरणाबाबत उत्तम ज्ञान या पुस्तकातून मिळेल, असे संपादक कावल्स्की यांनी नमूद केले आहे.
विषयाची व्याप्ती आणि सखोलता मांडण्याचा कितीही प्रामाणिक प्रयत्न या पुस्तकात केला गेला असला तरीही चीनच्या आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास करणारे विविध मतप्रवाह आणि दृष्टिकोन यांचा लहानसा कंगोराच या पुस्तकातून उलगडतो, हे मान्य करावे लागेल, असे संपादक कावल्स्कींनी शेवटी नमूद केले आहे, ते उचित आहे. चीनच्या परराष्ट्र धोरणाचा अभ्यास करणे ही विस्तारत जाणारी, बदलती अशी प्रक्रिया आहे. स्वाभाविकच सर्वच महत्त्वाच्या मुद्दय़ांचा विचार करणे, त्यांचा परामर्श घेणे अतिशय जिकिरीचे काम आहे, याबद्दल दुमत होण्याचे कारण नाही. मर्यादा मान्य करूनही असे म्हणता येईल की हे पुस्तक चीनचे परराष्ट्र धोरण आणि त्याला आकार देणाऱ्या घटकांबद्दल माहिती देणारा खजिनाच आहे. या विषयावर सध्या उपलब्ध असलेल्या साहित्यात आपली जाडी आणि विषय वैविध्य याद्वारे हे पुस्तक महत्त्वपूर्ण आहे, हे नक्की.
चीनच्या परराष्ट्र धोरणाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक महत्त्वाचे आहे.
चायनीज फॉरेन पॉलिसी :
संपा. इमिलिअन कावल्स्की,
प्रकाशक : अॅशगेट, लंडन,
पाने : ४८१, किंमत : १५४.९५ डॉलर्स.