‘केल्याने देशाटन, पंडित मैत्री सभेत संचार’ असे एक सुभाषित मराठीत प्रचलित आहे. भ्रमंती केल्याने देशोदेशींच्या संस्कृतींची ओळख होते, तेथील ज्ञानवंतांच्या ओळखी होतात आणि आपलीही बुद्धी समृद्ध होते. असे असताना, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना परदेशात जाऊन आल्यावर नव्या कल्पना सुचतात, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटल्यावर ते उद्धव ठाकरे यांना एवढे का झोंबावे! स्वत: शरद पवार यांनादेखील अनेक कल्पना परदेशवारीत किंवा तेथून परतल्यानंतर देशातल्या प्रवासातच सुचलेल्या आहेत. लवासाची अद्वितीय कल्पनाही त्यांना अशीच एका परदेशवारीहून परतल्यानंतर सुचली अन् एक अनमोल लेणे महाराष्ट्राच्या डोंगरदऱ्यांना लाभले. देशाटनातून काही ना काही शिकावयास मिळत असते. त्यामुळेच आपल्या लोकप्रतिनिधींना करदात्या जनतेच्या पैशातून अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली परदेश वाऱ्या घडविण्याच्या कल्पनेला सर्वपक्षीय मान्यताही लाभली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेतील अनेक नगरसेवकांनीही अशा अभ्यास दौऱ्यांच्या नावाने किती तरी देशाटने केलेली असतीलच! त्यामुळे देशाटनातून नवनव्या कल्पना सुचतात, या शरद पवार यांच्या म्हणण्यामुळे उद्धव ठाकरे यांनी दुखावून जाण्याचे खरे तर काहीच कारण नाही. पण शेवटी ज्याच्या त्याच्या आकलनाचा प्रश्न असतो. समजा, हेच वाक्य शरद पवार यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना उद्देशून म्हटले असते, तर राज ठाकरेंना किंवा त्यांच्या सेनेतील कोणासही ते इतके जिव्हारी लागले नसते. त्यांच्या सेनेच्या स्थापनेनंतरच्या पहिल्याच विराट मेळाव्यात राज ठाकरे यांनीच तशी कबुलीही दिली होती. स्वित्र्झलड किंवा अशाच कुठल्या तरी देशाच्या दौऱ्यात, तेथील शेतकरी जीन्स परिधान करून शेती करतो हे पाहून ते हरखून गेले होते आणि आपल्याकडचा शेतकरीही जीन्स व टी शर्ट घालून शेत नांगरतो असे स्वप्नदेखील त्यांना त्या वेळी पडले होते. खुद्द शरद पवारांच्या पक्षाचे किती तरी नेते आणि मंत्री तर येता-जाता परदेश वाऱ्या करतच असतात. उलट, परदेशवारी म्हणजे देशाटन- करून आला नाही असा नेता किंवा मंत्री आजकाल शोधूनही सापडणार नाही. असे देशाटन करून आल्यानंतर एखादी नवी कल्पना सुचली असा एखादा नेता मात्र शोधावाच लागेल. त्यामुळे शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दिलेले एक प्रशस्तिपत्रकच आहे, असे म्हणायला हरकत नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे महाराष्ट्रवादी टगे, जे की प्रायश्चित्तपश्चात सरळमार्गी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र अलीकडच्या काळात देशाटन केल्याचे ऐकिवात नाही. खरे तर हाती राज्याचे भविष्य असलेल्या नेत्याला देशाटनामुळे मिळणाऱ्या ज्ञानविकासाच्या लाभापासून वंचित ठेवणे हा त्याच्यावर अन्याय ठरतो. जग झपाटय़ाने बदलत आहे. विकासाच्या नवनव्या कल्पना विकसित होत आहेत. बदलाच्या याच टप्प्यावर अजितदादांना एखादी परदेशवारी घडली असती, तर दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्रातील धरणे भरण्यासाठी आणखी एखादी नामी योजना त्यांना सुचली असती आणि त्याचे श्रेयही थोरल्या साहेबांनाच मिळाले असते. असो. एकंदरीत, उद्धव ठाकरेंनी साहेबांच्या बोलण्याकडे टीका म्हणून पाहूच नये, कारण राजकारण हा काही दिल्याचा, काही घेतल्याचा व्यवहार असतो. हवे तर नितीन गडकरींना विचारा आणि साहेबांकडून काही तरी बोध घेतल्याचे समाधान माना. तेच चांगले!
गेल्याने होत आहे रे..
‘केल्याने देशाटन, पंडित मैत्री सभेत संचार’ असे एक सुभाषित मराठीत प्रचलित आहे. भ्रमंती केल्याने देशोदेशींच्या संस्कृतींची ओळख होते, तेथील ज्ञानवंतांच्या ओळखी होतात आणि आपलीही बुद्धी समृद्ध होते. असे असताना, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना परदेशात जाऊन आल्यावर नव्या कल्पना सुचतात, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटल्यावर ते उद्धव ठाकरे यांना एवढे का झोंबावे!
आणखी वाचा
First published on: 10-06-2013 at 12:53 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Foreign tour and new ideas