‘तृतीयस्तंभी’ हा अग्रलेख (१४ जून) व अभिषेक वाघमारे यांची प्रतिक्रिया वाचल्या (१५ जून). अग्रलेखाशी मी पूर्ण सहमत आहे. काही नेत्यांच्या व्यक्तिगत अहंकारातून निर्माण झालेले प्रादेशिक पक्ष, प्रत्येकांचे प्रश्न वेगळे, महत्त्वाकांक्षा वेगळ्या. कुठलेही वैचारिक अधिष्ठान नाही, राष्ट्रीय दृष्टिकोन नाही. ठाम विदेश नीती नाही. प्रादेशिक अस्मितेला फुंकर घालून संधिसाधू राजकारण करण्यासाठी केवळ एकेका बेरकी शिलेदारांनी उभे केलेले हे प्रादेशिक पक्ष एकत्र येऊन नवीन राजकीय घडी बसवतील, हा भाबडा आशावाद झाला. भूतकाळात अनेक वेळा अपयश आलेले असले तरी तिसऱ्या आघाडीसाठी जोरकस प्रयत्न सुरू आहेत. अशी आघाडी जरी झाली व तिने लोकसभेत बहुमत मिळविले तरी त्या आघाडीतील प्रत्येक क्षेत्रपाल पंतप्रधानपदासाठी आसुसलेला असल्यामुळे अशा आघाडीचे तेव्हा विघटन होणे अटळ आहे. त्यानंतर हे क्षेत्रपाल दोन प्रमुख पक्ष काँग्रेस व भारतीय जनता पक्ष यांना वेठीस धरतील. क्षेत्रीय पक्षांच्या पाठिंब्यावर उभी राहणारी केंद्रीय सरकारे किती हतबल, किती विकलांग होतात हे देशाने पाहिले आहे, पाहतो आहे. तेव्हा अशी परिस्थिती येऊ न देणे हे सुजाण भारतीय मतदारांच्या हातात आहे. दुर्दैवाने तशी परिस्थिती उद्भवलीच तर आज अशक्य वाटणारा परंतु देश हिताचा एक पर्याय सुचवावासा वाटतो : भारतीय जनता पक्ष व काँग्रेस या दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांनी आपापसातील सर्व मतभेद विसरून एकत्र सरकार स्थापन करावे. किमान एकदा तरी हा प्रयोग करावा. क्षेत्रीय पक्ष किती काळ विरोधी बाकांवर एकत्र बसू शकतात याचीही कसोटी लागेल.
– सोमनाथ देशमाने, अहमदनगर.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा