महाराष्ट्रातील फारच थोडे जिल्हे तालेवार राजकीय घराण्यांसाठी ओळखले जातात. नगर हा त्यापैकी एक. विखे पाटील, कोल्हे, गडाख, थोरात, काळे अशा आडनावांना या जिल्ह्य़ात नेहमीच लोकाश्रय मिळाला. या घराण्यातील राजकारण्यांनी आपापसात कितीही वाद असले आणि अगदी जिवाच्या आकांताची लढाई असली, तरी त्यात जिल्ह्याचे नुकसान होणार नाही, एवढी काळजी कायम घेतली. आपली कारकीर्द पुढे नेताना आपापल्या कार्यकक्षेवरील पकड जराही सैल होऊ दिली नाही. शंकरराव कोल्हे हे नगर जिल्ह्य़ातील अशा नेत्यांपैकी राज्य पातळीवरील एक महत्त्वाचे नेते. ते म्हणजे या जिल्ह्यातील सहकाराचा, राजकीय कर्तृत्वाचा आणि स्पष्टवक्तेपणाचा महत्त्वाचा चेहरा. त्यांचे कार्यक्षेत्र नगर जिल्ह्यातील कोपरगाव. साठच्या दशकात शंकररावांनी संजीवनी सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. कारखान्याच्या माध्यमातून समाजकारण आणि राजकारण करत फार कमी काळात कोपरगावाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावायला सुरुवात केली. शेतकरी सशक्त झाल्याशिवाय सहकारी साखर कारखान्याला बळकटी येणार नाही, हे लक्षात घेऊन त्यांनी परिसरात नवनवीन विकास योजना आखल्या आणि पूर्णत्वाला नेल्या. राजकारणात जाऊन, सत्ताकारण केल्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात येताच, विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याची तयारी सुरू केली. १९७२ च्या निवडणुकीत विजयी झाल्यापासून २००४ पर्यंत ते लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येत राहिले. अपवाद फक्त १९८५ ते ९० या पाच वर्षांचा. स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा गुण. विविध विषयांचा सतत अभ्यास करण्याची त्यांची वृत्तीही वाखाणण्यासारखी. विधानसभेत चांगल्या वक्त्यांपैकी एक म्हणून ते ओळखले जात. राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर कोपरगावच्या विकासाला आणखी हातभार कसा लागेल, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. फक्त कारखाना काढून उपयोगाचे नाही, हे लक्षात येताच, त्यांनी आपला मोहरा शिक्षण क्षेत्राकडे वळवला.  शेतकऱ्यांच्या मुलांना अत्याधुनिक शिक्षण मिळण्यासाठी अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण महाविद्यालये सुरू केली. ती नावारूपाला आणण्यासाठी कष्टही घेतले. कारखान्यावरील आपली पकड सतत मजबूत ठेवणे हे सगळय़ाच कारखान्यांच्या प्रवर्तकांसाठी अतिशय महत्त्वाचे. कोल्हे यांनी त्याबाबत विशेष काळजी घेतली आणि संजीवनी कारखाना सतत कार्यरत ठेवला. राजकारणातील सहा दशकांच्या कारकीर्दीत महसूल, कृषी, परिवहन, उत्पादन शुल्क अशा अनेक खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळला.  शेतकरी सहकारी संघापासून ते महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयापर्यंतच्या अनेक संस्थांमध्ये ते सहभागी झाले. सहकारातून मिळालेल्या शक्तीचा फायदा राजकारणातील आपले स्थान पक्के करण्यासाठी कसा करायचा आणि राजकीय सत्तेचा विकासासाठी कसा उपयोग करून घ्यायचा, याचे गणित शंकररावांच्या मनात पक्के होते. त्यामुळेच इतकी वर्षे नगरच्या राजकारणातील आपला दबदबा ते टिकवू शकले. शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचता यावे, यासाठी त्यांनी कोपरगावला इंटरनॅशनल फोरम फॉर इंडियन अ‍ॅग्रिकल्चर संस्थेची स्थापना केली. शेतमालाच्या जागतिक बाजारात नव्याने आलेल्या फॉरवर्ड ट्रेडिंगसारख्या व्यासपीठांना सामोरे जाण्यासाठी शेतकरीही सुसज्ज व्हावा, यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न महत्त्वाचे होते. त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्रातील एक महत्त्वाचा दुवा निखळला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा