राष्ट्रवा देश म्हणवण्यासारखे काहीच सिंगापूरकडे नसताना ली कुआन यू यांनी त्या शहरराज्यवजा देशाची उभारणी केली. प्रेमाऐवजी भीती, स्वातंत्र्याऐवजी प्रगती यांना पसंती देणारा हा नेता जगावेगळा होता.. त्यामुळे त्यांचा मानवी स्खलनशीलपणा उत्तरायुष्यात दिसलाच असला तरी त्यांचे मूल्यमापन पारंपरिक निकषांवर करता येणार नाही..
‘दोन शुभ्र घोडय़ांची संतती शुभ्रच असते, वेगळ्या रंगाचे पोर झाल्यास तो एखाददुसरा अपवाद’ इतक्या थेटपणे घराणेशाहीचे समर्थन करणारे, विरोधकांना गप्पच करायला हवे असे म्हणणारे, प्रेम आणि भीती यांत मी भीतीला अधिक पसंती देतो, माझी कोणाला भीती वाटलीच नाही तर मी काय साध्य करू शकणार? असे विचारणारे कर्तबगार पण तितकेच वादग्रस्त ली कुआन यू यांचे सोमवारी निधन झाले. स्वातंत्र्य आणि कार्यक्षमता यात महत्त्व असते ते कार्यक्षमतेला, स्वातंत्र्य देऊन काय उपयोग असे त्यांचे मत होते आणि अखेपर्यंत ते बदलले नाही. पण ली कुआन यांच्याबाबत जगाची पंचाईत ही की इतकी एकांगी भूमिका असूनही ली यांना जगाने हुकूमशहा म्हटले नाही. ली यांच्या भूमिकेवर टीका झाली, अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. परंतु तरीही जगाने त्यांच्याशी संपर्क तोडला नाही आणि ते जगासाठी क्रूरकर्मा झाले नाहीत. याचे कारण एकच. ते म्हणजे ली यांनी जे काही केले ते स्वत:साठी नव्हते. ली यांच्या प्रत्येक कृतीतून कोणत्याही निकषावर देश असे म्हणवून घेण्यास असमर्थ असलेल्या प्रदेशाची एकेक वीट रचली गेली आणि त्यातूनच सिंगापूर नावाचे आश्चर्य उभे राहिले.
पर्यटक असो वा उद्योगपती वा राजनतिक अधिकारी असो वा राजकारणी. जो कोणी सिंगापुरात पाऊल टाकतो तो थक्क होऊन परततो. जमीन नाही, पाण्यासारखा साधा जीवनावश्यक घटक नाही, खनिज संपत्तीची बोंब आणि इतकेच काय एकधर्मी वा एकभाषी जनताही नाही. अशा वेळी सिंगापूर हा देश म्हणून उभा राहायलाच नको होता, असे ली म्हणत. पण तो उभा राहिला तो आपण घेतलेल्या कष्टांमुळे असे सांगण्यात ते कचरत नसत आणि आपण आत्मस्तुतीचा धोका पत्करीत आहोत असेही त्यांना वाटत नसे. या माणसाचे सारे आयुष्यच सिंगापूर घडवण्यात गेले. जन्म एका चिनी विस्थापिताच्या पोटी. बालपण काळे धंदे करण्यातच गेलेले. पण तरीही ली यांना शिकायची प्रचंड आस होती आणि अभ्यासातही उत्तम गती होती. त्याचमुळे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी पदव्या घेतल्या. इंग्लंडमधील वास्तव्यात त्यांचा परिचय दोन गोष्टींशी झाला आणि दोहोंचीही साथ त्यांनी शेवटपर्यंत सोडली नाही. एक म्हणजे राजकारण आणि दुसरी, पत्नी क्वा गिओक चु. या दोन्हींवर त्यांचे निस्सीम प्रेम होते आणि माझ्या दुसऱ्या प्रेमाने पहिल्या प्रेमाराधनेसाठी उसंत दिली, असे ते म्हणत. क्वा चार वर्षांपूर्वी गेल्या. शेवटची दोन वष्रे त्या आजारी होत्या तर हा आधुनिक सिंगापूरचा जनक दररोज पत्नीच्या उशाशी बसून तिला अभिजात वाङ्मय वाचून दाखवत असे. हे दोघे पन्नाशीच्या दशकात मायदेशी परतले. नंतर पीपल्स अ‍ॅक्शन पार्टीची त्यांनी स्थापना केली आणि ते या पक्षाचे तहहयात सचिव राहिले. १९५९ साली त्यांच्या पक्षाला निवडणुकीत बहुमत मिळाले ते अगदी आजतागायत.
याचे कारण ली यांची शैली. सिंगापूर घडवणे हे त्यांनी आपले एकमेव ध्येय मानले. त्या ध्येयपूर्तीसाठी त्यांनी निवडलेले मार्ग विचित्र होते. सिंगापुरात चिनी, भारतीय आणि मलय नागरिक मोठय़ा प्रमाणावर असतात. तेव्हा तो प्रदेश बहुभाषिक व्हायचा धोका होता. ली यांनी तो टाळला. इंग्रजीचे शिक्षण अनिवार्य केले. आपल्या प्रत्येक नागरिकास उत्तम इंग्रजी बोलता यायला हवे, असा त्यांचा आग्रह होता आणि तो त्यांनी सक्तीने राबवला. नागरिकांनी एकमेकांशी हसतमुखच बोलायला हवे, हा त्यांचा आणखी एक नियम. तसेच त्यांनी देशात सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी आणली. च्युईंग गम चघळा, पण थुंकताना दिसलात कोठे तर याद राखा, असा दमच त्यांनी देशवासीयांना देऊन ठेवला होता. शिस्त आणायची असेल तर फटके देण्यास पर्याय नाही, यावर त्यांचा ठाम विश्वास होता आणि तो वारंवार अमलात आणून दाखवला. इतका की आजही सिंगापूरच्या घटनेत जवळपास ४० गुन्हय़ांसाठी जाहीर फटके मारण्याची शिक्षा दिली जाते. शिक्षेखेरीज नियमन व्यवस्थेस पर्याय नाही, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांची जीवनशैली पाश्चात्त्य होती. पण त्यातील उदारता काहीही कामाची नाही, असे त्यांना वाटे. लहानपणी आपणासह अनेकांना शिक्षकांनी शाळेत चांगले बदडून काढले आहे, त्यामुळे काय बिघडले आमचे, असे ते विचारत. त्यामुळे सिंगापुरातील पाश्चात्त्य शाळांत त्यांनी छडी लागेची परंपरा चालूच ठेवली. सार्वजनिक पातळीवर आपल्या देशवासीयांनी कसे वागावे याच्या काही ठाम संकल्पना त्यांच्या होत्या. त्यामुळे त्यांनी अगदी विधीसाठी स्वच्छतागृहात जाऊन आल्यावर पाणी किती टाकावे याचेही नियम करून दिले. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही पातळीवर भ्रष्टाचार होऊ द्यायचा नाही, असा त्यांचा पण होता. तो त्यांनी यशस्वीपणे पाळला. सत्ताधीशांना भ्रष्टाचाराचा मोह होऊच नये यासाठी त्यांनी अभिनव मार्ग पत्करला. तो म्हणजे मंत्री आदींना खासगी क्षेत्राच्या तोडीस तोड वेतन द्यायला त्यांनी सुरुवात केली. देश हा एका कंपनीसारखाच आहे. त्यामुळे तो चालविणाऱ्यास खासगी कंपनीच्या प्रमुखाएवढे वेतन का नसावे, असा त्यांचा प्रश्न होता. ही असली धोरणे राबवायची तर अधिकारास आव्हान असून चालत नाही. ती व्यवस्था ली यांनी केली होती. सर्व प्रकारचा विरोध त्यांनी सढळपणे मोडून काढला. विकसनशील देशांना प्रगतीच्या मार्गाने जावयाचे असेल तर त्यांनी स्वातंत्र्याकडे जरा काणाडोळाच करावयास हवा, असा त्यांचा सल्ला असे. इतक्या अतिरेकी व्यक्तीचे सर्व निर्णय योग्यच होते का? त्यांनाही हा प्रश्न पडे. पण त्याचे उत्तर त्यांनी स्वत:च देऊन ठेवले. नसतीलही माझे काही निर्णय योग्य. पण मी करतो ते सिंगापूरच्या भल्यासाठीच आणि योग्य की अयोग्य ते आम्हीच ठरवणार. इतरांना जे काही वाटायचे ते वाटो, असे त्यांचे राजकीय तत्त्वज्ञान होते. अशा विचारांच्या व्यक्तीसाठी प्रसारमाध्यमे ही साहजिकच अडथळा ठरणार. ली यांच्यासाठी अर्थातच ती तशी होती. आपली राजकीय ताकद वापरून त्यांनी कंबरेत वाकावयास लावले नाही असे जगातील एकही बलाढय़ वर्तमानपत्र नाही. प्रसारमाध्यमांना त्यांनी विरोधकांप्रमाणेच नेस्तनाबूत करण्यात धन्यता मानली. आपले पंतप्रधानपद वापरून ते टीका करणाऱ्या वर्तमानपत्रांवर बदनामीचे खटले भरत. ही माध्यमे माझ्या विरोधकांच्या हातातील बाहुले आहेत, असा त्यांचा ग्रह होता.
ही अरेरावी काही काळ खपतेदेखील. परंतु सद्दीची साथ काही अमर्याद असत नाही. ली यांना उत्तरायुष्यात याची जाणीव व्हायला लागली होती. आपल्या कुटुंबकबिल्यातच सत्ता राबवल्याचा त्यांच्यावर आरोप होत असे आणि तो रास्तही होता. परंतु तसे म्हणणाऱ्यांना त्यांनी तुरुंगात डांबले. तरीही सत्य पुरून उरतेच. ते म्हणजे त्यांचा एक मुलगा सिंगापूरचा विद्यमान पंतप्रधान. दुसरा सिंगापूर नागरी हवाई खात्याचा प्रमुख. पंतप्रधानपुत्राची पत्नी हो चिंग हे तामासेक या बलाढय़ वित्तसंस्थेची प्रमुख. कन्या डॉ. ली िलग हे त्या देशाच्या एका वैद्यक सेवेची प्रमुख अणि स्वत: ली यांच्याकडे पंतप्रधानपद सोडल्यानंतरही मंत्र्यांचा मार्गदर्शक हे पद. या सगळ्यामुळे घराणेशाहीचा आरोप झाला तर ते म्हणत: मी गुणवान असल्यामुळे माझी संततीही गुणवानच असणार. शुभ्र घोडा-घोडीच्या पोटी काळा घोडा कसा निपजेल?
तर ली हे असे प्रकरण होते. खिजगणतीतही नसलेल्या शहरातून सिंगापूर नावाची बलाढय़ अर्थसंस्था उभी करण्याचे त्यांचे कर्तृत्व विसरून चालणार नाही. परंतु अखेर ली हे माणूस होते आणि मर्त्य मानवाच्या स्खलनशीलतेस अपवाद नव्हते. तेव्हा त्यांचे मूल्यमापन हे पारंपरिक निकषांतून करता येणार नाही. जगावेगळे काही करून दाखवणाऱ्याच्या ऊर्मीही जगावेगळ्याच असू शकतात. परंतु केवळ ऊर्मी जगावेगळ्या आहेत म्हणून कृतीही जगावेगळी घडतेच असे नाही, हे आपण पाहतोच. अशा वेळी ली कुआन यू यांचे मोठेपण उठून दिसते. इतिहासात त्यांची नोंद कल्याणकारी कर्दनकाळ अशीच होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा