मराठी लोक हुशार आहेत, त्यांचे शिक्षण चांगले असते. त्यांनी सनदी सेवेत यायला हवे, देशाची सेवा करायला हवी. तामिळ, मल्याळी कुठेही जाऊन काम करतात. पण आपले लोक कचरतात. त्यांना मुंबई, पुणे आणि कल्याणबाहेर पडायची इच्छा नसते, अशी खंत ४० वर्षे सनदी सेवेत काढलेल्या प्रदीप व शीला भिडे या दाम्पत्याला वाटते..
त्या दोघांची ओळख झाली ती मसुरीतील लालबहादूर शास्त्री नॅशनल अ‍ॅकेडमी ऑफ अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमधील प्रशिक्षणादरम्यान. १९७३ साली. त्यांचे आई-वडील एकमेकांना ओळखत होते. पण ते दोघे पूर्वी कधी भेटले नव्हते. त्या भेटीची परिणती सहजीवनात होऊन आज चार दशके लोटली आहेत. प्रदीप भिडे केंद्रीय महसूल सचिव म्हणून निवृत्त झाले, तर शीला (ठकार) भिडे वाणिज्य मंत्रालयाच्या इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनच्या (आयटीपीओ) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून.
आंध्र प्रदेश कॅडरचे आयएएस अधिकारी प्रदीप भिडे हे उत्तर भारतीय वातावरणात लहानाचे मोठे झालेले. त्यांचा जन्म दिल्लीतला. वडील वासुदेव महादेव भिडे उत्तर प्रदेश कॅडरचे सनदी अधिकारी म्हणून निवृत्त झाल्यावर बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष होते. भिडे यांचे शालेय शिक्षण लखनौमध्ये ला मार्टिनेअर कॉलेज आणि सेंट कोलंबसमध्ये झाले. १९७० साली सेंट स्टीफन्समध्ये केमिस्ट्री ऑनर्स आणि १९७३ साली दिल्ली विद्यापीठातून एलएलबी केल्यानंतर ते प्रशासकीय सेवेत रुजू झाले. हिंदी, इंग्रजी, मराठी आणि तेलुगु भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे. पी. चिदम्बरम आणि प्रणब मुखर्जी अर्थमंत्री असताना जून २००७ ते जानेवारी २०१० दरम्यान ते महसूल सचिव होते. अरुण शौरींच्या काळात निर्गुतवणूक खात्यात संयुक्त सचिव, शिवराज पाटील गृहमंत्री असताना गृह मंत्रालयात विशेष सचिव आणि इंदिरा गांधी- राजीव गांधी सरकारमध्ये वित्त मंत्रालयात संचालक अशी पदे त्यांनी दिल्लीत भूषविली. १९८८ ते ९२ या काळात ते वॉशिंग्टनमध्ये जागतिक बँकेत तांत्रिक सल्लागार होते.
शीला भिडे यांचा जन्म चीनच्या नॅनकिंगमधला. त्यांचे वडील ब्रिगेडियर दामोदर नारायण चीनमध्ये भारताचे पहिले लष्करी अटॅची होते. वडिलांच्या बदल्यांच्या निमित्ताने नॅनकिंग, पॅरिस, मुंबई, दिल्ली, पुणे अशा विविध शहरांमध्ये वास्तव्य करणाऱ्या शीला भिडेंचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. त्यांनी फग्र्युसन महाविद्यालयातून राज्यशास्त्रात बी. ए., पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम.ए., रानडे इन्स्टिटय़ूटमधून फ्रेंच भाषेचा डिप्लोमा, हार्वर्ड विद्यापीठातून सार्वजनिक प्रशासनात मास्टर्स, जिनेव्हा विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय व्यापारात पीएचडी आणि दिल्लीतील वास्तव्यादरम्यान एमबीए केले. त्या आणि त्यांच्या भगिनी अरुणा एकाच वेळी, १९७३ साली आयएएसमध्ये पात्र ठरल्या होत्या. सात महिने गुजरात कॅडरमध्ये राहिल्यावर विवाहानंतर त्यांचे कॅडर आंध्र प्रदेश झाले. मराठीव्यतिरिक्त इंग्रजी, फ्रेंच, हिंदी आणि तेलुगु भाषांची जाण असलेल्या शीला भिडे यांची परराष्ट्र मंत्रालयात आर्थिक सल्लागार आणि विशेष सचिव, संरक्षण मंत्रालयात अतिरिक्त सचिव आणि आर्थिक सल्लागार, कंपनी व्यवहार मंत्रालयात संयुक्त सचिव, आंध्र प्रदेश सरकारमध्ये वित्त तसेच उद्योग आणि वाणिज्य खात्याच्या सचिव अशी वाटचाल झाली. २००७-०८ मध्ये त्यांना सार्वजनिक प्रशासनात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पंतप्रधानांच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. जून २००९ मध्ये निवृत्त झाल्यानंतर कोल इंडिया, नॉर्दर्न कोलफिल्डस्, एल अँड टी मेट्रो रेल्वे (हैदराबाद) आणि बेलापूरमधील सूर्योदय मायक्रो फायनान्समध्ये त्या स्वतंत्र संचालक म्हणून कार्यरत आहेत. शीला भिडे यांच्या तीन बहिणी. थोरल्या डॉ. उषा सरैया मुंबईत स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. दुसऱ्या अनुराधा कुंटे दिल्लीत स्थायिक झाल्या आहेत. तिसऱ्या अरुणा बागची महाराष्ट्र कॅडरच्या आयएएस होत्या. डीएफआयडीमधून निवृत्त झाल्यावर आता त्या पुण्याला असतात. भिडे दाम्पत्याच्या तीन मुली, सर्वात थोरल्या रोहिणी प्रणव मुक्केन दिल्लीत ताज हॉटेलमध्ये संचालक (मार्केटिंग) आहेत. त्यांची तीन वर्षांची लेक सायरा आजी-आजोबांसोबतच असते. दुसऱ्या कन्या अश्विनी अजय वर्मा अमेरिकेत सीएटलला मायक्रोसॉफ्टमध्ये मोबाइल टेलिफोन सॉफ्टवेअर तज्ज्ञ आहेत. तिसऱ्या अंजली आयआयटी मद्रासमधून केमिकल इंजिनीअरिंग आणि रिन्यूएबल एनर्जी अँड क्लायमेट चेंजमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून दिल्लीत सध्या जर्मन सरकारच्या विकास विभागात सौर ऊर्जेच्या व्यापारीकरणाची जबाबदारी सांभाळत आहेत.
प्रदीप भिडे यांचे कुटुंब मूळचे राजापूरच्या अडिवरेचे. तिथून त्यांचे कुटुंब वाईला गेले. आजोबा नोकरीसाठी पुण्यात आले. त्यांची नोकरी गेल्यानंतर वडील आणि काकांना बालपणातच कुटुंबाची जबाबदारी सांभाळावी लागली. शिकत असताना सदाशिवपेठेत राहणाऱ्या आजी-आजोबांकडे उन्हाळ्यात सुटीत जावे लागल्याने ते मराठी बोलायला शिकले. भिडे यांच्या आई सुशीला बापट रत्नागिरीच्या. त्यांच्या भगिनी मंगला हयात नाहीत.
केंद्रात महसूल सचिव असताना प्रदीप भिडे यांच्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीत सरकारचा महसूल साडेतीन लाख कोटींवरून सात लाख कोटी असा दुप्पट झाला. वित्तीय सुधारणा आणि मंत्रालयाच्या विविध प्रक्रिया सुटसुटीत करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. जसवंत सिंह, पी. चिदम्बरम आणि प्रणब मुखर्जी अशा तीन अर्थमंत्र्यांसोबत काम केलेल्या प्रदीप भिडे यांना चिदम्बरम व्यावसायिकदृष्टय़ा सर्वात चाणाक्ष वाटतात. त्यांच्या मते जसवंत सिंहही व्यावसायिक होते आणि प्रणब मुखर्जी सर्वाना विश्वासात घेऊन काम करायचे.
भिडे दाम्पत्याची सर्वाधिक कारकीर्द आंध्रमध्ये गेली. आंध्राविषयी त्यांना आदर आणि आत्मीयता वाटते. तेथील लोक देवभोळे आणि शिस्तप्रिय आहेत. प्रशासनात काम करताना भरपूर समाधान मिळते कारण लोकांचे आणि राजकीय व्यवस्थेचे तुम्हाला समर्थन असते. तसे काम दिल्लीतही करता येते, पण दिल्लीतील प्रशासन प्रचंड आहे. दिल्लीतील मोठय़ा यंत्रणेत तुम्ही एक व्यक्ती ठरत असल्यामुळे कामे आणि परिणाम हवे तसे होत नाही. पण देशाविषयीचा दृष्टिकोन दिल्लीत व्यापक होतो, असा त्यांचा अनुभव आहे.
गेल्या ४० वर्षांत दिल्लीच्या पायाभूत सुविधांमध्ये प्रचंड सुधारणा झाल्या, पण दिल्लीच्या नागरिकांमधील मूलभूत शिस्त ढासळली आहे. कायदा पाळण्याची, शहर स्वच्छ ठेवण्याची सर्वसामान्यांची इच्छा दिसत नाही. मुंबईत जी वाहतुकीची शिस्त आहे ती दिल्लीत नाही. दक्षिणेत भ्रष्टाचार कमी आहे, असे कुणी म्हणणार नाही. पण रस्त्यावरील व्यक्ती कायदा मानते. दिल्लीत कायद्याचे पालन व्हावे, असे कुणालाही वाटत नाही. दररोज पाच लाख लोकांचे लोंढे दिल्लीत शिरत असल्यामुळे या शहराच्या समस्या मुंबईपेक्षा जटिल झाल्याचे मत ते व्यक्त करतात. एकेकाळी अतिशय सक्रिय असलेले दिल्लीतील महाराष्ट्र मंडळाच्या कामात शैथिल्य आल्याचे त्यांना जाणवते.  
मुली स्थिरस्थावर होईपर्यंत दोन-तीन वर्षे दिल्ली सोडण्याचा विचार नसला तरी संधी मिळताच पुण्यात स्थायिक होण्याचा त्यांचा बेत आहे.
प्रदीप भिडे यांनी महाराष्ट्र सदैव बाहेरूनच पाहिला असला तरी त्यांच्या मते आता महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य राहिलेले नाही. मुंबईत अनेकांना ९० मैल अंतरावरून कामाच्या ठिकाणी यावे लागते. येण्याजाण्यालाच साडेचार तास लागतात. शिवाय आठ तास काम करावे लागते. त्यामुळे नोकरदार वर्गावरील दडपण सातत्याने वाढतच आहे. सनदी अधिकारी राज्यात खूष नसतील तर ‘राष्ट्रीय दृष्टिकोन’ लाभावा म्हणून दिल्लीत येतात, असे शीला भिडे यांना वाटते, तर प्रचंड स्पर्धा असलेल्या दिल्लीतील सनदी अधिकाऱ्यांमध्ये दखलपात्र ठरण्यासाठी तुम्हाला चांगलेच असावे लागते, असे प्रदीप भिडे यांचे मत आहे. महाराष्ट्रातील लोकांनी आपल्या राज्यातून बाहेर यायला हवे. मराठी लोक हुशार आहेत, त्यांचे शिक्षण चांगले असते. त्यांनी सनदी सेवेत यायला हवे, देशाची सेवा करायला हवी. तामिळ, मल्याळी कुठेही जाऊन काम करतात. पण आपले लोक कचरतात. त्यांना मुंबई, पुणे आणि कल्याणबाहेर पडायची इच्छा नसते, अशी खंत भिडे दाम्पत्य व्यक्त करतात. शीला भिडे यांच्या मते सनदी सेवेत महिलांना समाजासाठी मोठे योगदान देण्याची खूपच चांगली संधी असते. मंत्री आणि राजकीय नेत्यांशी फार जवळ जाण्याचा प्रदीप भिडे यांचा स्वभाव नाही. हा स्वभाव ‘वडिलोपार्जित’ असल्याचे ते अभिमानाने सांगतात. ३७ वर्षांच्या कारकिर्दीत जे मिळाले त्याबद्दल ते समाधानी आहेत.  त्यांना एवढय़ातच पुस्तक लिहायचे नाही. पण सनदी सेवेतील गमतीदार अनुभवांवर पुस्तक लिहून लोकांना हसविण्याचा त्यांचा विचार आहे.
निवृत्तीनंतर आठवडय़ातून तीन वेळा योगासने, वीकएंडला टेनिस, गोल्फ आणि व्यायाम असा भिडे दाम्पत्याचा दिनक्रम असतो. वैयक्तिक आवडीनिवडीतील भिन्नत्व आणि समानतेमुळे प्रदीप आणि शीला भिडे यांचा चार दशकांचा सहवास वैशिष्टय़पूर्ण ठरला आहे. प्रदीप भिडे यांना उत्तर भारतीय आहार आवडतो, तर शीला भिडेंना मराठी जेवण. टेनिस आणि जलतरण हे त्यांचे आवडते खेळ. प्रदीप भिडे ब्रिजमध्ये रमणारे. पण शीला भिडेंना त्यात फारशी रुची नाही. पण दोघांनाही अर्थविषयक नियतकालिकांची आवड. हिंदूस्थानी शास्त्रीय संगीत आणि भीमसेन जोशींचे दोघेही चाहते. आंध्रात आणि केंद्रात जबाबदारीच्या पदांवर काम करताना अतिशय महत्त्वाच्या आणि गोपनीय मुद्दय़ांवर एकमेकांशी सल्लामसलत करून निर्णय घेण्याचा फायदा उभयतांना मिळाला. सनदी सेवेत अनेक संवेदनशील आणि गुंतागुंतीचे निर्णय घेण्यात परस्परांचा हा अनुभव अतिशय उपयुक्त ठरला आणि चाळीस वर्षांच्या व्यक्तिगत जीवनातही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा