बर्नी मॅडॉफने देऊ केलेला गुंतवणूक-परतावा फसवाच आहे, याचा संशय अनेकांना आला खरा; पण तो बोलून दाखवणाऱ्यांना परस्परच गप्प करण्यात आले. एकाची तर नोकरी गेली. तत्कालीन अमेरिकी सिक्युरिटी एक्स्चेंज कमिशनही इतके निर्बुद्ध की, त्यांनीही याकडे लक्ष दिले नाही. अखेर डोलारा कोसळला. जाळे दिसत असूनही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे, कित्येकजण त्या अडकले होते!
बर्नी मॅडॉफचे अवाच्या सव्वा परताव्याचे आश्वासन वाटते तितके साधे नाही, असा जळका वास येणाऱ्यांची संख्या कमी नव्हती. एक उदाहरण केन नाकायामाचे. नाकायामा विकल्प बाजार (ऑप्शन मार्केट) रोज हाताळणारा तरबेज गुंतवणूकदार होता. मॅडॉफच्या गुंतवणुकीमधील करारी परतावा आणि बिनधोक वाटावे इतके कमी हेलकावे बघून त्याचेही डोळे गरगरू लागले. त्याने हरतऱ्हेने हिशोब केला, पण बाजारातील घडामोडी आणि मॅडॉफचा परतावा यांचा मेळ काही केल्या जमेना. सर्व माहितीचे स्रोत धुंडाळूनपण कोडे सुटेना. त्याने आपल्या वरिष्ठाला याबद्दल पाठपुरावा करायला सांगितले. थोडय़ाच दिवसांनी त्याच्या वरिष्ठांनी त्याला बोलावून दबक्या आवाजात सांगितले, ‘मी चौकशी केली तर कळाले की तुमचे पाय काँक्रीटमध्ये रुतलेले आणि तुम्ही ईस्ट नदीच्या बुडाशी असे व्हायला पाहिजे आहे का? नको ना? मग चूप बसा!’
दुसरा नमुना : गोल्डमन सॅक्सच्या एक प्रमुख ‘व्यापाऱ्या’ला विचारले तर तो म्हणाला, ‘मॅडॉफ? आम्ही त्याच्याबरोबर व्यवहार करणारच नाही. हौसेने मरण कवटाळायला कोण जाईल?’
तिसरा नमुना : एहरेनक्रान्झ अँड एहरेनक्रान्झ ही प्रख्यात कायदा सल्लागार कंपनी होती. अनेक ‘उच्चमत्ता’ व्यक्ती व कंपन्यांचे ते सल्लागार होते. त्यांची गुंतवणूक जमविण्याची क्षमता लक्षात घेऊन लेहमान ब्रदर्स (आता ‘स्वर्गवासी’ लेहमान ब्रदर्स!) या कंपनीने तटबंदी फंडात गुंतवणूक करण्याकरिता हातमिळवणी केली होती. एके दिवशी एहरेनक्रान्झ बंधू जे एझरा मेरकिन नामक गृहस्थांना लेहमान ब्रदर्सकडे घेऊन आले. सदर एझरा मेरकिन तटबंदी फंडाचा फंड चालविणारे गुंतवणूक सल्लागार होते. मेरकिनने आपली गुंतवणूक नीती, त्यातून येणारा परतावा याचे आख्यान लेहमान ब्रदर्सच्या गुंतवणूक अधिकाऱ्याला सुनवायला सुरुवात केली. लेहमानचा गुंतवणूक अधिकारी बाजारात सरावलेला होता. त्याने या आख्यानाला मध्येच मोडता घातला आणि विचारले, ‘हे पहा एझरा, या मॅडॉफच्या उलाढालीमागे काय गोम आहे तुम्हाला माहीत आहे, असणारच! उगाच सोंग घेऊ नका.’ यावरून लेहमान अधिकारी आणि एझरा मेरकिन यांची बाचाबाची सुरू झाली. एकमेकांची गचांडी धरण्यापर्यंत वेळ आल्यावर एहरेनक्रान्झने ही जुंपाजुंपी थोपविली आणि नंतर थोडय़ाच दिवसांत सदर लेहमान अधिकाऱ्याला नोकरीतून हाकलण्यात आले.
एवढय़ा लुबाडणुकीच्या उलाढाली मॅडॉफ लपवायचा तरी कसा? लिपस्टिक बिल्डिंगच्या अठरा आणि एकोणिसाव्या मजल्यावर मॅडॉफची अधिकृत दलाल व्यवसायाची कचेरी होती. मॅडॉफविरुद्ध काही तक्रार आली तर चौकशी, धाड, कागदपत्रे छाननी व्हायची ती या दोन मजल्यांवरील ऑफिसमध्ये. तिथली कागदपत्रे, नोंदी, अर्ज पाहून सिक्युरिटी एक्स्चेंजचे अधिकारी ‘सर्व काही ठाकठीक आहे’, ‘तक्रार खरी वाटावी असा कोणताच पुरावा नाही’ अशा धर्तीची प्रशस्तिपत्रके शेरा म्हणून द्यायचे. असे एक-दोनदा नव्हे, तर चार वेळा घडले, पण या महाघोटाळ्याची उलाढाल चालायची सतराव्या मजल्यावर! एकाही अधिकाऱ्याला (किंवा पत्रकारांनादेखील) या सतराव्या मजल्यावर चालणाऱ्या उलाढालीचा काही सुगावाच नव्हता. जणू या इमारतीला सतरावा मजलाच नव्हता! (जसा १३ क्रमांक नसतो तसा?)
या मजल्यावरच्या ऑफिसला कडेकोट बंदोबस्त होता. मोजक्या व्यक्ती आणि मॅडॉफ यांनाच इथे प्रवेश होता. हे मोजके लोक म्हणजे मॅडॉफच्या विश्वासातले संगणक-गणंग आणि मॅडॉफ. सांगेल ती आकडेवारी भरून ठरावीक तारखा आणि गिऱ्हाईकांसाठी अहवाल छापणारे कारकून. प्रत्येक गुंतवणूकदाराकरिता एकेक निराळे अहवालपत्र तयार केले जाई. त्यात दाखविलेल्या किमती आणि प्रत्यक्ष बाजारातल्या किमती याचाही पुरेसा ताळमेळ नसे! मॅडॉफ प्रत्येक बाबतीत निरनिराळी आकडेवारी पैदा करत असे आणि जणू काही अधिकृत खरेदी-विक्री झाली अशा थाटात दर महिन्याचे गुंतवणूक अहवाल पैदासत असे. गुंतवणूकदारांना परवाना मिळायचे. म्हणून ते खुशीने या अहवालाची कधी सखोल छाननी करायच्या खटाटोपातच पडले नाहीत. हे अहवाल छापले जायचे एका जुन्या आयबीएम अर/४०० संगणकावर. त्याची छपाईदेखील जुन्या वळणाच्या ऐंशी-एकशेसाठ रकान्यांसारखी. त्यामध्ये मॅडॉफला सोयीस्कर वाटणारे समभाग, त्यांच्या किमती ठोकून दिलेल्या असायच्या. उदा. मॅडॉफला २००८ मध्ये अटक होण्याअगोदर महिन्यापूर्वी सुमारे २००८ नोव्हेंबरमध्ये अॅपलचा समभाग बाजारामध्ये कधीच १३.२४ डॉलरवर गेला नव्हता. मॅडॉफच्या अहवालात मात्र त्याची किंमत शंभर डॉलर दाखविली होती. सगळाच बोलाची कढी बोलाचा भात मामला. असे असले तरी मॅडॉफकडे येणारी गुंतवणूक रक्कम तर खरी होती. ती ठेवली जायची मॅडॉफच्या खात्यात. उदा. बँक ऑफ न्यूयॉर्क मेलन खाते क्र. ८६६-९९२८-६२९ आणि जेपी मॉर्गनचेस खाते क्र. १४००८१७०३. या खात्यातील अवाढव्य जमा आणि काढणावळ न्याहाळली तरी मॅडॉफच्या सोंगाचा उलगडा झाला असता!इतकी धोक्याची निशाणे फडकत असूनही सिक्युरिटी एक्स्चेंज कमिशनच्या सगळ्या चौकशींमधून मॅडॉफ निसटला. याचे मुख्य श्रेय जाते कमिशनच्या निर्बुद्ध, सांगकाम्या आणि मुळात थातुरमातुर तपासापलीकडे रस नसलेल्या अधिकाऱ्यांना. कमिशनकडे नोकरीस येणारे कमिशनमध्ये दोन-चार वर्षे नियंत्रणाचा अनुभव आपल्या कपाळी मिरवता यावा एवढय़ाच हेतूने बव्हंशी येत. एकदा तेवढा शिक्का कपाळी लागला की अन्य वित्त कंपन्यांमध्ये ते ‘कायदापालन’ अधिकारी म्हणून तिप्पट पगारावर दाखल होत असत. प्रत्यक्ष व्यवहार कसे चालतात? त्याची देखभाल कशी करायची? चुकार सावज कसे हेरायचे, याचे त्यांना ज्ञान नव्हते, कळकळ नव्हती आणि काहींचा बुद्धीचा आवाकाही नव्हता. एडवर्ड मॅनिआन हा अपवाद वगळला तर मार्कोपोलोससारख्या जागल्याचे निशाण कुणाला कळतच नव्हते. काहींना उमगले तरी एवढे मोठे जनावर अंगावर घेऊन वित्त कंपन्यांचे कवाड स्वत:साठी बंद कशाला करायचे, असा ‘धोरणी’ विचारदेखील तेवढाच प्रबळ होता.
परिणाम काय झाला? तर मॅडॉफचे ते पॉन्झी जाळे दुसऱ्या एका अरिष्टामुळे उघडकीला आले. २००८ सालच्या झंझावातामुळे मॅडॉफला पैसे उभे करणे मुश्कील झाले आणि दारातील देणेकरी व देणी झपाटय़ाने फुगू लागली. एका मोठय़ा काटय़ाने छोटा काटापण उघडून बाहेर आला. मॅडॉफच्या निमित्ताने सिक्युरिटी एक्स्चेंज कमिशनचा मठ्ठपणा, बोटचेपेपणा आणि अकार्यक्षमता उघड झाली. नियंत्रणाचे सोंग आहे तसे चालविता येणार नाही याची तरी कबुली अमेरिकन सरकारला द्यावी लागली. अनेकांची वित्तीय वाताहत झाली. मॅडॉफचे सोंग न पारखल्याने अनेक राजघराण्यांची गुंतवणूक बेतणारा आणि सांभाळणारा रेने-थिएरी मॅगन द ला विलेउशेतला आत्महत्या करण्यापलीकडे पर्याय राहिला नाही.
..वित्त जगात संगणक युग आणण्यात हिरिरीने पुढे असणाऱ्यानेच पॉन्झी क्ऌप्ती अजरामर असल्याचा आणखी एक सज्जड मासला जगाला दिला. तोही संगणकाचा क्षुद्र वापर करून!
लेखक अर्थतज्ज्ञ असून नियोजन मंडळासह अन्य ठिकाणी ते सल्लागार होते. त्यांचा ईमेल: pradeepapte1687 @gmail.com