भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांच्या ‘एकच प्याला’ नाटकातील सुधाकराच्या तोंडी सिंधूला उद्देशून एक वाक्य लिहिले आहे – ‘ज्या तुझ्या घरी सदावर्ते चालावीत त्या तुला मी घासभर अन्नाला महाग केली.’ साहित्यसम्राट न. चिं. केळकरांनी ग्रंथालयांना ‘ज्ञानाची सदावर्ते’ म्हटले आहे. त्या ग्रंथालयांना, की ज्यांनी अनेक वष्रे अखंड ज्ञानयज्ञ केला, ज्ञानाची सदावर्ते चालवली त्यांच्यावर भिक्षांदेहीची पाळी आली. याला शासनाची उदासीनता, राजकीय नेत्यांची अनास्था कारणीभूत आहेच, त्याचबरोबर गेल्या काही वर्षांत आलेल्या विविध चित्रवाहिन्यांमुळे माणसांची मनं बधिर होत चालली आहेत की काय अशी स्थिती आली आहे. ग्रंथातून ज्ञान मिळते. आज इंटरनेटच्या माध्यमातून माहिती मिळत असल्यामुळे वाचकांना ग्रंथांचे महत्त्व वाटेनासे होते की काय, अशी स्थिती आली आहे. पण माहिती आणि सर्वागीण ज्ञान यात फरक असतो. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर हे ग्रंथालय गेली १४९ वष्रे ज्ञानदानाचा घेतलेला वसा न उतता मातता जपत आली आहे. आज ग्रंथालय कठीण स्थितीतून जात आहे. २००५ साली आलेल्या महापुरानंतर अनेक ग्रंथालयं कोलमडून पडली. त्यांची स्थिती आजही अत्यंत बिकट आहे. सुदैवाने देणाऱ्यांचे हजार हात पुढे आले. अनेकांनी अर्थदान व ग्रंथदान केले आणि त्यातून ग्रंथालय पुन्हा नव्याने उभं राहिले. मात्र आज समस्त चिपळूणकरांना पुराची भीती सदैव भेडसावत असते. अथक प्रयत्नांतून जमवलेली ग्रंथसंपदा ठेवण्यासाठी जागेची आवश्यकता आहे. त्याचबरोबर कोकणची लोकपरंपरा, लोकसंस्कृती आणि कोकणचा इतिहास यांचं सम्यक दर्शन घडवणारं कला दालनही आपल्याला उभं करायचं आहे. अशा वेळी दैनिक ‘लोकसत्ता’ने सामाजिक बांधीलकीतून गणेशोत्सवानिमित्त ‘सर्वकार्येषु सर्वदा’ हा उपक्रम घेतला. त्याबद्दल त्रिवार धन्यवाद. गणपती ही विद्य्ोची देवता. अशा गणेशाच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी ‘सर्वकार्येषु सर्वदा’मध्ये लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचा परिचय देऊन आपण केलेले आवाहन, ग्रंथालयाचा परिचय करून देणारा दीर्घ लेख यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशीच असंख्यांचे फोन आले, अनेकांनी अर्थसहाय्य पाठवत असल्याचे सांगितले आणि त्यानुसार प्रत्यक्ष कृतीही केली. यासाठी वाचनालयाने स्वतंत्र खाते उघडून या देणग्यांची वेगळी नोंद ठेवली आहे. ‘लोकसत्ता’ परदेशातही वाचला जात असल्याने निरनिराळ्या देशांतूनही अनेकांचे दूरध्वनी आले.
या पाश्र्वभूमीवर ग्रंथालयाने आजवर जो वसा जपला आहे तो तसाच जपला जाईल, याची आपण खात्री बाळगावी. येथे साकारले जाणारे ‘अपरान्त संशोधन केंद्र’ कोकण भूमीच्या सर्वागीण संशोधनासाठी अभ्यासकांना उपयुक्त ठरेल. आज ग्रंथालयाला विस्तारित जागेची गरज आहे. ‘लोकसत्ता’च्या या अभिनव उपक्रमामुळे ग्रंथालय सर्वदूर पोचले. त्यातून नक्कीच दानवीरांचे हात याही कामासाठी पुढे येतील. जुनी दुर्मीळ हस्तलिखिते, दोलामुद्रिते जतन करण्यासाठी लागणारी सामग्री ग्रंथालयाला सहज उपलब्ध होईल. हे ज्ञानमंदिर सतत वर्धिष्णू राहील, असा विश्वास ‘सर्वकार्येषु सर्वदा’ने आम्हा कार्यकर्त्यांना दिला आहे. या क्षणी मनात कृतज्ञतेच्या भावना दाटून आल्या आहेत. त्यामुळे एवढेच म्हणावेसे वाटते, ‘आपला हात पाठीवर आहे. आम्ही सदैव पुढे जाणार असा आत्मविश्वास जागा झाला आहे. ज्ञानाचे सदावर्त आता अखंड देतच राहील, याची खात्री बाळगावी.’
असेच सेवाभावी उपक्रम राबवून ‘लोकसत्ता’ने अनेक संस्थांना बळ द्यावे, ही विनंती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा