मुंबईतील मानखुर्दचे नवजीवन महिला वसतिगृह गेले काही दिवस सतत चर्चेत आहे. पोलिसांनी वेश्या व्यवसायातून तसंच बारवर छापे घालून सोडवून आणलेल्या मुलींना त्यांच्या घरी पुन्हा पोहोचवेपर्यंत न्यायालयाच्या आदेशानुसार इथे ठेवले जाते. या सुधारगृहातून पुन्हा नऊ मुली पळून गेल्या आहेत. त्याआधीही काही मुली पळून गेल्या, त्यांच्यातील काही मुलींनी पत्रकारांकडे सुधारगृहातील नरकाचे वर्णन केले आणि मग या सुधारगृहात काय चालले आहे याची माहिती जगापुढे आली. उच्च न्यायालयाने स्वत:हून (स्युओ मोटो) या प्रकरणाची दखल घेऊन, एक त्रिस्तरीय समिती नेमण्याचे आदेश सरकारला दिले. या समितीने आपला अहवाल उच्च न्यायालयासमोर सादर केल्यानंतर तर सुधारगृहाचे आणखीच काळेकुट्ट चित्र पुढे आले आहे. १०० माणसांना राहता येईल अशा जागेत दोन ते अडीचशे मुलींना कोंबणे, तेवढय़ा मुलींसाठी आठपकी फक्त दोनच स्वच्छतागृहे उपलब्ध करून देणे, कच्चे, बेचव अन्न, चार-पाच खोल्यांच्या सुधारगृहात एवढय़ा सगळय़ा मुलींना कुलूप लावून जवळपास कोंडून ठेवणे अशा वातावरणातून या मुली पळून जातील नाही तर दुसरे काय करतील? रात्रीच्या वेळी परिसरातील गुंड वसतिगृहात शिरून छतावर वावरून आम्हाला घाबरवतात अशी त्यांची तक्रार आहेच. शिवाय एक बलात्काराचे प्रकरण, एका मुलीला दिवस जाणे असे प्रकारही इथे घडल्याचे या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल सांगतो. या मुलींची त्यांच्या घरी रवानगी करण्यासाठी गेले वर्षभर कोणतेच प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. या मुलींमध्ये बहुतांश मुली या २० ते २५ वयोगटातल्या आहेत. त्या कोलकाता, आसाम, गुजरात, केरळ, हिमाचल प्रदेश, ओरिसा, आंध्र प्रदेश अशा देशातल्या वेगवेगळय़ा राज्यांमधल्या एवढेच नाही, तर बांगलादेशमधल्याही आहेत. त्यांच्यासाठी सुधारगृहाला सरकारकडून अनुदान मिळते. पण या मुलींच्या वाटय़ाला किमान सुविधाही येत नाहीत. या मुली वेश्या व्यवसायातून आलेल्या आहेत. त्यांच्या लंगिक गरजा तीव्र आहेत. त्याचबरोबर छानछोकी राहणे, चांगलंचुंगलं खाणं यासाठी त्या इथून पळून जात आहेत, असा या सुधारगृहातील कर्मचाऱ्यांचा हास्यास्पद आणि कोडगा युक्तिवाद आहे. उच्च न्यायालयाच्या समितीने दिलेला अहवाल एकांगी आहे असाही एक छुपा प्रचार त्यातूनच सुरू झालेला आहे. बांगलादेशातून आलेल्या, वेश्या व्यवसाय करणाऱ्या या मुलींकडे काय एवढे लक्ष द्यायचे असाही एक तुच्छतादर्शक सूर उमटतो आहे.. पण आंध्र असो की बांगलादेश, तिथल्या कुठल्या तरी अत्यंत गरीब खेडय़ात राहिलेली, जेमतेम चार इयत्ता शिकलेली मुलगी वयाच्या पंधराव्या वर्षी अचानक उठून मुंबईत येऊन वेश्या व्यवसाय करत असेल तर तिला इथे पोहोचवणाऱ्यांची किती मोठी साखळी असेल? त्या साखळीतले कुणीच कधीच पकडले जात नाही. त्या काळय़ा व्यवस्थेचा चेहरा या मुली आहेत, पण त्यांचे करविते धनी कायमच मोकाट राहत आले आहेत त्याचे काय? सुधारगृहात ठेवल्या जाणाऱ्या मुली अशा रीतीने पळून जात असतील तर त्यामागे काय कारणे आहेत हे समजून घेण्यासाठी आमच्या महिला बालकल्याण मंत्र्यांना तिथे जाण्याची, मुलींना भेटण्याची गरज वाटत नाही. विरोधी पक्षांना या सगळय़ा प्रकाराबाबत आवाज उठवावा असे वाटत नाही. कारण या मुली यांच्या कुणाच्याच व्होट बँक नाहीत. त्यांना अशा पद्धतीने डांबून ठेवून आपले आणखी हसे करून घेण्यापेक्षा सरकारने लवकरात लवकर कारवाई करून या मुलींना त्यांच्या घरी पाठवण्याची व्यवस्था करावी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा