फ्रेंच टेनिस स्पर्धेच्या लाल मातीवर राफेल नदाल आख्यायिका सदरात गणला जातो. संथ स्वरूपाच्या भूपृष्ठावर होणारी ही स्पर्धा जिंकण्यासाठी सगळ्यात कठीण समजली जाते. साहजिकच लढवय्या राफेल नदालला या लाल मातीने भुरळ घातली नसती तरच नवल. यंदाची स्पर्धा सुरू होण्यापूर्वी लाल मातीवरची नदालची कामगिरी सत्तर विजय आणि एक पराभव, अशी अचंबित करणारी होती. २००९ मध्ये एकमेव लढत गमावल्यानंतर लाल मातीवर नदाल आणि जेतेपद हे समानार्थी शब्द झाले. त्याला जेतेपदाचा चषक उंचावताना पाहणे अन्य खेळाडूंसाठी शिरस्ताच झालेला होता. यंदा हा इतिहास बदलण्याचे संकेत फ्रेंच स्पर्धेपूर्वी सराव म्हणून होणाऱ्या स्पर्धामधील नदालच्या ढासळत्या कामगिरीने दिले होते. कारकीर्दीत ग्रँडस्लॅम जेतेपदांचे वर्तुळ पूर्ण करण्यासाठी आतुर नोव्हाक जोकोव्हिचने उपांत्यपूर्व फेरीत नदालला सरळ सेट्समध्ये चीतपट केले आणि लाल मातीवरल्या अनभिषिक्त सम्राटाचे पायदेखील मातीचेच आहेत हे सिद्ध झाले; त्याच वेळी स्टॅनिसलॉस वॉवरिन्काने जिवलग मित्र आणि महान खेळाडू रॉजर फेडररचे आव्हान सरळ सेट्समध्ये भिरकावून दिले. वेळीच सन्मानाने निवृत्ती घेतली नाही तर एखाद्याचा फेडरर होतो, असे म्हणण्याइतका हा सामना एकतर्फी झाला. लाल मातीवरची दंतकथा झालेल्या नदालला त्याच्याच बालेकिल्ल्यात नमवण्याचा पराक्रम जोकोव्हिचने केला. परंतु या विजयाने आत्मविश्वास उंचावण्याऐवजी जोकोव्हिचच्या खेळात बेफिकिरी आली. नदालला नमवले, आता जोकोव्हिचच जेतेपद पटकावणार अशी भाकिते, अंदाज वर्तवण्यात आले. नेहमी चिवट आणि अव्वल दर्जाच्या खेळासाठी ओळखल्या जाणाऱ्या जोकोव्हिचची ही आंशिक बेफिकिरी वॉवरिन्काने बावनकशी कौशल्य आणि सातत्याने मोडून काढली. जोकोव्हिचला अवाक करणारा वॉवरिन्काचा एकहाती बॅकहॅण्ड चर्चा, भाकिते आणि अंदाजांना चपराक लगावणारा होता. गेले दशकभर फेडरर, नदाल आणि जोकोव्हिच या त्रिकुटाने ग्रॅण्डस्लॅम जेतेपदावर मक्तेदारी राखली. फेडररचा सूर हरपला, नदालला दुखापतींनी वेढले आणि जोकोव्हिचचे सातत्य खंडित होऊ लागले आहे. प्रदीर्घ काळ दुसऱ्या फळीत राहिलेल्या गटाचा वॉवरिन्का प्रतिनिधी. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या जेतेपदासह वॉवरिन्काने संक्रमणाची रुजुवात केली. जेतेपदाचे हे संक्रमण केवळ एका स्पर्धेच्या चमत्कारातून नाही तर प्रगल्भतेतून साकारले आहे, हे वॉवरिन्काच्या लाल मातीवरच्या जेतेपदाने सिद्ध झाले. बारा वर्षांपूर्वी पोरसवदा वॉवरिन्काने लाल मातीवर कनिष्ठ गटाचे जेतेपद पटकावले होते. एका तपानंतर टेनिसविश्वातल्या दिग्गजांना नमवत वॉवरिन्काने मिळवलेले जेतेपद प्रगल्भतेचे वर्तुळ पूर्ण करणारे आहे. योगायोगाने महिला टेनिसमध्ये प्रगल्भता ओसरत असून उथळपणा साचला आहे. जेतेपदासाठी शर्यतीत असणाऱ्या खेळाडूंना मानांकन दिले जाते. मानांकित खेळाडू प्राथमिक फेरीतच गारद होतात यावरूनच सातत्याचा अभाव किती हे स्पष्ट होते. डिझायनर वस्त्रप्रावरणे आणि मासिकांची मुखपृष्ठे यांपल्याड सेरेना विल्यम्स आहे. तिशी ओलांडलेली, विविध स्वरूपांच्या दुखापतींनी वेढलेली, मात्र प्रत्येक स्पर्धेगणिक जिंकण्याची ऊर्मी तीव्र होणारी सेरेना हा एक अपवाद आहे. प्रतिस्पर्धी खेळाडूंकडून किमान दर्जाचा खेळ होत नसतानाही जेतेपदापर्यंत स्वत:ला प्रेरित करणे हेच मोठे आव्हान. नियम अपवादाने सिद्ध होत असल्याने सेरेनाने हे आव्हान पेलत जेतेपदाचा चषक उंचावला. यास तोचतोपणा म्हणावे तर भारतीय खेळाडूंचे काय? बोपण्णा, सानिया, भूपती आणि पेस या चौकडीवरच वर्षांनुवर्षे आपली भिस्त आहे यातूनच आपली सव्‍‌र्हिस किती तोकडी याचा बोध व्हावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा