सौदीचे फाहद यांना आणि अमेरिकेलाही योजना पटली, म्हणून त्या वेळी- ३० ते ३५ देशोदेशींच्या तुरुंगांतून अनेक मुस्लीम तरुणांना सोडण्यात येतं..
आणि अलीकडेच, विश्वचषकाच्या वेळी गडबड नको म्हणून एक देश मुस्लीम तरुणांना उचलून तुरुंगात डांबतो..
मैदान इकडे-तिकडे.. पण खेळ तोच..
फुटबॉलप्रेमींना दोन नावं माहीत असतातच असतात. त्यातला एक तर बऱ्याच जणांचा आदर्श वगरे असतो. त्याचं नाव झिनादिन झिदान. आणि दुसरा रिबरी.
या दोघांत दोन गोष्टी समान आहेत. एक म्हणजे दोघेही फ्रान्सचे. आणि दुसरं म्हणजे दोघेही धर्मानं मुसलमान. आता खेळाडूंचा धर्म पाहू नये वगरे सर्व तत्त्वज्ञान ठीकच. पण काही गोष्टी तशा डोळ्यांवर आल्याशिवाय राहत नाहीत. उदाहरणार्थ पाकिस्तानच्या संघात कुठे लक्षणीय भूमिकेत हिंदू खेळाडू असतात? ते लक्षात येतंच की. झिदान आणि रिबरी यांचादेखील धर्म तसा चर्चेचा मुद्दा झाला नसता. पण पॅरिसमध्ये परवा जे काही घडलं त्यामुळे त्या देशातील मुसलमान हा मुद्दा गंभीरपणे बोलला जाऊ लागलाय. यातला झिदान हा मूळचा अल्जिरियाचा. हा अफ्रिकी देश एके काळी फ्रेंचांची वसाहत होता. त्यामुळे फ्रान्समध्ये आज बरेच अल्जिरियन आढळतात. ते तिथल्या समाजजीवनाचा भागच बनून गेलेत. रिबरी हा धर्मातरित मुसलमान. मूळचा फ्रान्सचा. पण नंतर मुसलमान झाला. आता का, वगरे तपशिलाची चर्चा काही आपल्याला इथे करायची नाही. मुद्दा आहे तो फ्रान्समधल्या मुसलमानांचा.
अनेकांना कदाचित माहीतही नसेल युरोप खंडात सर्वात जास्त मुसलमान फ्रान्समध्ये आहेत. लोकसंख्येच्या साधारण आठ टक्के इतके. म्हणजे पंचावन्न लाख वगरे मुसलमान आज फ्रान्समध्ये आहेत. त्या खालोखाल जर्मनीत पाच टक्के किंवा चाळीस लाख. आणि मग इंग्लंड. त्या देशातही पाच टक्केच. पण साधारण तीस लाख. यातली गंभीर बाब फ्रान्समधले मुसलमान किती, ही नाही. तर ते कुठे राहतात ही आहे.
लोकसंख्येच्या आठ टक्के मुसलमान फ्रान्समध्ये आहेत. पण त्यातले निम्म्याहून अधिक म्हणजे तीसेक लाख वगरे चक्कतुरुंगात आहेत. वेगवेगळ्या गुन्हय़ांच्या आरोपांखाली. म्हणजे एखाद्या समुदायाची निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही तुरुंगात असेल तर जरा काळजीचंच कारण मानायला हवं. फ्रान्समध्ये नेमकं हेच झालंय. या इतक्या लोकांमधले तब्बल ११०० जण हे थेट दहशतवादाच्या आरोपांसाठी तुरुंगात आहेत. खटले सुरू आहेत त्यातील काहींवर. याकडेही एकवार दुर्लक्ष करता आलं असतं. पण या गंभीर तपशिलातली अधिक गंभीर बाब ही की फ्रान्समधले तुरुंग हे इस्लामी दहशतवादासाठी भरती केंद्र बनले आहेत. युरोपीय समुदायाच्या पाहणी अहवालात ही माहिती आहे. म्हणजे इतके मुसलमान, तेही गुन्हेगार म्हणून तुरुंगात असल्यामुळे त्यांना गळाला लावणं हे धर्मभडकावू मंडळींना सोपं जातं.
यातली वेदनादायी बाब ही की ही इतिहासाची पुनरावृत्ती आहे.
या वेळी खंड बदलला इतकंच.
१९८० च्या दशकात जेव्हा सोविएत फौजा अफगाणिस्तानात घुसल्या त्या वेळी त्यांना बेजार करण्याच्या पद्धतींवर अमेरिका आणि तिच्या बगलबच्च्या देशांत व्यापक चर्चा झाली. त्यात आघाडीवर होता सौदी अरेबिया. आता तो देश का? तर मुसलमानांसाठी अत्यंत पवित्र धर्मस्थानं मक्का आणि मदिना ही त्या देशात आहेत. तेव्हा निधर्मी तत्त्वज्ञान सांगणाऱ्या साम्यवादावर त्या देशाचा राग असणं साहजिकच. त्यामुळे सौदीनं या रशियन घुसखोरीविरोधात लढण्यासाठी चांगलीच तयारी दाखवली होती.
त्या वेळी एक तरुण त्या वेळचे सौदी राजे फाहद यांच्याकडे गेला आणि म्हणाला, मला आवडेल सोविएत युनियनविरोधी लढय़ाचं नेतृत्व करायला.. इस्लामविरोधकांना धडा शिकवायलाच हवा. त्या तरुणाच्या वडिलांचं सौदी राजघराण्याशी चांगलंच सख्य होतं. कारण फाहद यांच्या आधीचे राजे फैझल आíथक संकटात असताना या तरुणाच्या वडिलांनी त्यांना मदत केली होती. मक्का, मदिनेतील धर्मस्थळाच्या उभारणीचं काम या तरुणाच्या वडिलांनी केलं होतं. राजे फैजल यांना कर्ज दिलं होतं. त्यामुळे या कुटुंबाची सौदी राजघराण्याशी चांगलीच घसट होती. त्याचमुळे तर तो थेट राजासमोर जाऊ शकला. तेव्हा राजे फाहद यांना या तरुणाची कल्पना आवडली. आणि दुसरं असं की राजे फाहद हे तसे डोक्याने बेतास बातच होते. राजे फैझल यांच्यासारखं द्रष्टेपण वगरे काही त्यांच्याकडे नव्हतं. त्यामुळे ते सहज अमेरिकेच्या तालावर नाचत. त्यामुळे अमेरिकेनंही भरीस घातलं त्यांना या उद्योगासाठी. पण पंचाईत ही होती की अमेरिका त्या तरुणाला थेट मदत करू शकत नव्हती. कारण अमेरिकी कायदा. तेव्हा मार्ग असा निघाला की सौदीनं लागेल ती मदत या तरुणाला द्यायची आणि अमेरिकेनं लागेल ती मदत सौदीला द्यायची.
या मदतीत दोन गोष्टी गरजेच्या होत्या. एक म्हणजे शस्त्रास्त्रं. ती अमेरिका पुरवणार. आणि दुसरी माणसं. ती पुरवण्यासाठी सौदीनं मदत करायची. हे म्हणायला ठीक. पण ती आणणार कुठनं? तेव्हा कल्पना अशी सुचवली गेली की आशियातल्या ज्या ज्या देशांतल्या तुरुंगात मुसलमान गुन्हेगार कैदी आहेत, त्यांना सोडायचं आणि त्यांच्यावर धर्माचं गारूड करून त्यांना अफगाणिस्तानात मुजाहिदीन म्हणून पाठवायचं. दुर्दैव हे की इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, पाकिस्तान आदी अनेक देशांतल्या तुरुंगांत गंभीर गुन्हय़ांसाठी शिक्षा भोगत असलेल्या शेकडो कैद्यांची त्या त्या सरकारांनी सुटका केली, या तरुणाला मदत करणाऱ्या अमेरिकेनं या मुक्त कैद्यांना किमान शस्त्रास्त्रं चालवण्याचं प्रशिक्षण दिलं आणि एकजात हे सगळेच्या सगळे धर्मसेवक बनून अफगाणिस्तानात दाखल झाले. धर्मविरोधी सोविएत रशियाच्या विरोधात लढण्यासाठी.
ही सुपीक कल्पना ज्यानं सौदी अरेबिया आणि अमेरिका यांच्या कानात घातली, अमलात आणली त्याचं नाव ओसामा बिन लादेन.
असं म्हणतात की त्या वेळी ओसामाच्या वतीनं भारतातल्या मुसलमान गुन्हेगारांच्या भरतीसाठीदेखील प्रयत्न झाले. पण आपलं सरकार ही अशी कोणतीच माहिती उघड करत नाही. त्यामुळे तो तपशील काही ठामपणे उपलब्ध नाही.
तर आता तोच खेळ सुरू आहे. फ्रान्समधल्या तुरुंगात मुसलमान कैद्यांच्या धार्मिक भावना भडकवायच्या आणि त्या भडकल्या की स्वर्गप्राप्तीचं आमिष दाखवत त्यांना प्रगत देशांविरोधात वापरायचं. हे कसं होतं ते आता फ्रान्सला कळायला लागलंय. १९९८ साली त्या देशानं फुटबॉलचे विश्वचषक सामने भरवले होते. त्या वेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अनेक तरुण गुंडपुंडांना फ्रान्स सरकारनं ताब्यात घेतलं होतं. पॅरिसच्या आसपास असे अनेक आहेत. एका अर्थानं पॅरिस.आणि फ्रान्ससुद्धा.आपल्यासारखाच आहे. अजागळ, अस्ताव्यस्त आणि बराचसा बेशिस्त. ते आयफेल टॉवर, शाँझ एलिझे रस्ता, कॅबरे वगरे ठीक आहे. पण खुद्द पॅरिसात चांगल्याच झोपडपट्टय़ाही आहेत आणि लोक दारूबिरू पिऊन पडलेले आढळतात. अशा कंगालतेत गुंडगिरी अर्थातच वाढते. फ्रान्समध्ये ती चिक्कार आहे. त्याचमुळे विश्वचषकाआधी सरकारनं बऱ्याच गुंडांना डांबून ठेवलं. छोटय़ा-मोठय़ा गुन्हय़ांत नाही तरी त्यांचा हात होताच. विश्वचषकानंतर त्यातले बरेचसे सुटलेदेखील.
फ्रान्स सरकारच्या आता लक्षात येतंय. तुरुंगात जाण्यापूर्वीचे हे तरुण आणि तुरुंगातून बाहेर आल्यानंतरचे ते यात आमूलाग्र बदल झालाय. यातले बरेच तरुण कर्मठ, कर्कश धर्मवादी झालेत. त्यातले काही तर थेट पश्चिम आशियाच्या वाळवंटात जिहादसाठी दाखल झालेत. अगदी तसेच. तीन-साडेतीन दशकांआधी आशियाई तुरुंगातून अफगाणिस्तानात रशियाविरोधात लढायला दाखल झालेल्या तरुणांसारखे.
शार्ली एब्दोवर हल्ला करणारे तरुण हे अशांतल्यापकीच. काही वर्षांपूर्वीच तुरुंगवास भोगून आलेले. तुरुंगात जाताना फक्त मुसलमान होते. बाहेर आले ते जिहादी बनून.
तीन-साडेतीन दशकांपूर्वी हा खेळ खेळला गेला. पहिल्यांदा. आताही तोच खेळला जातोय. त्या वेळी या खेळात एक पिढीच्या पिढी बरबाद झाली. आताही तेच होणार आहे.
या अशा खेळांचं तेच तर विशेष. खेळतंय कोण? हरतंय कोण? जिंकतंय कोण? आणि त्याहूनही महत्त्वाचं मरतंय कोण? कोणीच काही बघत नाहीये. कोणालाच विचार त्याचा नाहीये. खेळ मात्र अव्याहत सुरू आहे.. तोच खेळ पुन्हा पुन्हा..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा