एफटीआयआयवरील गजेंद्र चौहान यांची नेमणूक चि. राहुलबाबांना भले सुमार वाटो पण अशा प्रकारच्या नेमणुकांच्या इतिहासाची सर्वाधिक पाने काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वकाळातच लिहिली गेली आहेत. फार जुन्या नव्हे अगदी अलीकडच्या काळातील राष्ट्रपती ते युवक काँग्रेसमधील नेत्यांच्या निवडी ही त्याची काही उदाहरणे. आसपास सुमारांचा भरणा असावा अशी जुनीच धारणा आत्ताचे सत्ताधारीदेखील बाळगून आहेत याची उमज चि. राहुलबाबांना आली नसावी..

लोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाचे काम सत्ताधाऱ्यांना विरोध करणे हे जरी असले तरी विरोधासाठी आपण कोणता विषय निवडतो याचे भान आवश्यक असते. सत्ताधाऱ्यांस विरोध करावयाचा मुद्दा जितका सुदृढ तितका विरोधाचा परिणाम लक्षणीय. सत्ताधाऱ्यांना विरोध करावयाचे कारणच जर फुसके असेल तर त्या विरोधाचा परिणामही नगण्यच असतो. असे झाले की विरोधाचे मुख्य कारण सोडून विषयांतर करावे लागते. हे सारे चि. राहुलबाबा यांच्याबाबत पुण्यात झाले. पुण्यात गेले ५२ दिवस संप करणाऱ्या चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या विद्यार्थ्यांना नतिक पाठिंबा देण्यासाठी चि. राहुलबाबा पुण्यात प्रस्थान ठेवून गेले. हे विद्यार्थी या संस्थेच्या प्रमुखपदी गजेंद्र चौहान यांची नेमणूक सरकारने केली, म्हणून नाराज आहेत. विद्यार्थ्यांच्या मते हे गजेंद्र चौहान या संस्थेच्या प्रमुखपदी नेमण्याइतके लायक नाहीत. तसे मत बाळगण्याचा अधिकार विद्यार्थ्यांना जरूर आहेच. परंतु म्हणून तो अधिकार बाळगून त्यांना बदला असा आग्रह धरण्याचा अधिकार मात्र विद्यार्थ्यांना निश्चितच नाही. याचे कारण संस्थेच्या प्रमुखपदी कोण असावे हा अधिकार संस्थाचालकांचा. त्यात वाटा मागणे ही विद्यार्थ्यांची मुजोरी झाली. तिकडे सरकारने दुर्लक्षच केले ते योग्यच. तरीही आपल्या मागणीवर विद्यार्थी ठाम असून त्यांच्या संपास लवकरच दोन महिने होतील. परंतु सरकार बधण्यास तयार नाही. त्यामुळे ही कोंडी फुटण्याची लक्षणे नाहीत. ती फोडावयाची असेल तर सरकार आणि विद्यार्थी यांतील एकास एक पाऊल मागे घेण्यास पर्याय नाही. तेव्हा चि. राहुलबाबांना या संपाबाबत सहानुभूती असेलच तर त्यांनी ती संप संपुष्टात यावा यासाठी वापरावयास हवी होती. तितका प्रौढपणा त्यांनी दाखवणे गरजेचे होते. तो त्यांनी दाखवला नाही आणि अचानक संपकरी विद्यार्थ्यांची त्यांना कणव आली. ती व्यक्त करण्यासाठी पुण्यात आल्यावर या मुद्दय़ातील फोलपणा त्यांना लक्षात आला असावा. त्यामुळे त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करीत संघ हा सुमारांना कसे उत्तेजन देतो, याचे बौद्धिक सादर केले. अशा वेळी त्यांना काही ताजे इतिहासाचे दाखले देणे आवश्यक ठरते. हे इतिहासाचे दाखले अलीकडचे अशासाठी की त्यांच्या फार खोलात जाणे चि. राहुलबाबांना कदाचित झेपणारे नाही. त्या इतिहासाचे अवलोकन त्यांनी केले असते तर कदाचित ते असे हास्यास्पद विधान करते ना. खरे तर ते करण्याआधी त्यांनी आपले गुरू बाबा दिग्विजय सिंह यांची शिकवणी घेतली असती तरी हा बौद्धिक अपघात टळला असता. तेव्हा या सुमारांच्या उगमाकडे त्यांचे लक्ष वेधणे आवश्यक ठरते. या लक्षवेधनाचा उद्देश भाजप सरकार सुमारांची भरती करीत नाही, हे सिद्ध करणे नसून काँग्रेसची सारी हयातच कशी या सुमारांना पोसण्यात गेली हे दाखवून देणे आहे.

तेव्हा चि. राहुलबाबांना झेपेल अशा बेताबेताने या इतिहासाचा आढावा घ्यायला हवा. त्याची सुरुवात माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यापासून करता येईल. इतकी सुमार व्यक्ती भारताची राष्ट्रपती करू नये असे कधी काँग्रेसजनांना वाटले होते काय? त्यासाठी चि. राहुलबाबांनी आपल्या मातोश्री सोनियाजींना कधी या संदर्भात गाऱ्हाणे घातले होते काय? त्यातही विशेषत: दिवंगत एपीजे अब्दुल कलाम यांच्या लक्षणीय कारकीर्दीनंतर या प्रतिभा पाटील यांच्यासारख्या अगदीच दुय्यमास इतक्या सर्वोच्च पदी बसवताना काँग्रेसने कोणती गुणग्राहकता दाखवली? राष्ट्रपतिपदावरून सुदैवाने दूर झाल्यानंतरही या बाईंना दिमतीला सरकारी खर्चाने गाडीघोडे आणि मानमरातब हवा आहे. हे असे करणे योग्य नाही, हे कधी चि. राहुलबाबांनी आपल्याच पक्षनेतृत्वास सांगितल्याचे ऐकिवात नाही. आता राष्ट्रपतिपदावरील या सुमार निवडीस शिवसेनेसारख्या पक्षांनी पािठबा दिला, हा मुद्दा अलाहिदा. परंतु आता मागे वळून पाहताना ही निवड योग्य होती असे चि. राहुलबाबांना वाटते काय? तसे नसेल या सुमारनिवड पापाची कबुली देण्याचा मोकळेपणा ते दाखवतील काय? त्यांच्या काळात राज्यसभेवर वा अन्यत्र झालेल्या सर्वच नेमणुका या योग्य आणि दर्जेदारांच्या होत्या असा चि. राहुलबाबांचा दावा असेल तर गोष्ट वेगळी. परंतु लाळघोटे, लांगूलचालनास सिद्ध अशांना आपल्या आसपास पाळणे हे काँग्रेसचे वैशिष्टय़ राहिलेले आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यांच्याच काँग्रेसने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी दिवंगत बाबासाहेब भोसले यांची निवड केली हे त्या पक्षाच्या गुणग्राहकतेचे उदाहरण. शिवाजीराव पाटील निलंगेकर हेदेखील याच माळेतील. केंद्रीय गृहमंत्रिपदी या पक्षाने चि. राहुलबाबांच्या डोळ्यादेखत शिवराज पाटील चाकूरकरांना नेमले. आपले माजी गृहमंत्री हे सुमार नव्हते असे चि. राहुलबाबा छातीठोकपणे सांगतील काय? ज्या चित्रपट विषयाच्या संदर्भात चि. राहुलबाबा पुण्यात आले होते त्या क्षेत्रासंदर्भात बोलावयाचे तर काँग्रेसच्या कालखंडात नेमल्या गेलेल्या अशा अनेकांचे दाखले देता येतील. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार निवड मंडळात त्या वेळी मॅकमोहन यांची निवड काँग्रेसनेच केली होती. अशी निवड करावी इतकी त्यांची योग्यता होती, असे मानावयाचे काय? या मॅकमोहन यांच्याच काळात त्यांची भाची रवीना टंडन हीस पुरस्कार दिला गेला, तोही याच गुणग्राहकतेचा निदर्शक? चि. राहुलबाबांच्या सक्रिय राजकारण प्रवेशानंतरच शर्मिला टागोर यांची चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी निवड केली गेली. या टागोरबाईंच्या कला क्षेत्रातील उंचीविषयी कोणीही आक्षेप घेणार नाही. परंतु त्यांच्याच काळात त्यांचे चिरंजीव सफ अली यांना अनेक पुरस्कार दिले गेले. इतकेच काय या सफ अली यांच्या एकंदरच कर्तृत्वास मुजरा करण्यासाठी काँग्रेसने त्यांना पद्मश्रीदेखील बहाल केली. असे अनेक दाखले देता येतील. हे सर्व उद्योग चि. राहुलबाबांच्या, सुमार नको, या तत्त्वाशी सुसंगत आहेत असे मानायचे काय? एवढेच नव्हे. तर ज्या कलाकारांना घेऊन चि. राहुलबाबा पुण्यात चित्रपट संस्थेत गेले, ते त्यांच्या गुणवंतांचे कौतुक करण्याच्या धोरणाशी सुसंगत मानता येईल? राज बब्बर, खुशबू हे असले टुकार कलाकार चि. राहुलबाबांच्या समवेत होते. त्यांचे वर्णनदेखील सुमार याखेरीज अन्य कोणत्या विशेषणाने करता येईल? इतकेच काय वयाच्या पन्नाशीकडे झपाटय़ाने निघालेले असतानाही चि. राहुलबाबा ज्या युवक काँग्रेसचे नेतृत्व करतात, त्या युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे काय? राजीव सातव हे सुमार नाहीत काय? पंजाब, केरळ वा कर्नाटक या राज्यांत चि. राहुलबाबांनी केलेल्या नेमणुकांना काँग्रेसजन याच कारणाने विरोध करीत आहेत. त्याची दखल चि. राहुलबाबा यांनी किती घेतली? गांधी घराण्याची हुजरेगिरी याखेरीज ज्यांचे काहीही कर्तृत्व नाही असे कित्येक जण काँग्रेस वा युवक काँग्रेस यांचे नेतृत्व करून गेले. त्या वेळी चि. राहुलबाबांची गुणग्राहकता का दिसून आली नाही? आणि शेवटचा निर्णायक मुद्दा. काँग्रेसला जर सुमारांचे आकर्षण नसते तर त्या पक्षाने चि. राहुलबाबांवर इतका विश्वास दाखवला असता का? असे कोणते राजकीय कर्तृत्व, नेतृत्वकौशल्य चि. राहुलबाबांनी दाखवले की वयाची सव्वाशे वष्रे पूर्ण करणाऱ्या काँग्रेससारख्या पक्षाने त्यांच्या हाती नेतृत्व द्यावे?
तेव्हा काँग्रेस असो वा भाजप. सत्ताधारी कोणीही असो. आपल्या आसपास सुमारांचाच भरणा असावा अशीच सर्वाची इच्छा असते आणि तसाच त्यांचा प्रयत्न असतो. याचे कारण खरे गुणवान हे नेहमी होयबाच राहतील याची शाश्वती नसते आणि कोणाही सत्ताधाऱ्यास स्वतंत्र बुद्धीच्या व्यक्तींचे वावडेच असते. त्यामुळे भाजपवर त्यांना टीकाच करावयाची असेल तर त्यांनी उलट भाजपस, तुम्हीही आमच्याच वाटेने का निघालात, असा जाब विचारावयास हवा. कारण ही सुमारसद्दीची सुरुवात चि. राहुलबाबा ज्या पक्षाचे नेतृत्व करतात त्याच पक्षाच्या काळात झाली. भाजप फक्त मम् म्हणत आहे, इतकेच.

Story img Loader