खरा सहवास घडला तर त्याच्यासारखं दुसरं भाग्य नाही! श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘‘संतांचा सहवास। याहून भाग्य नाही दुसरे खास।। संतचरणी विश्वास। त्याने भगवंत जोडला खास।।’’ (प्रवचन, २० एप्रिल). सद्गुरूचा खरा सहवास, सद्गुरूच्या चरणी दृढ विश्वास कसा असतो हे तुकाराम महाराज एका ओळीत सांगतात, ‘ठेवूनियां भाव ठेलों पायीं’! अंत:करणातला संपूर्ण भाव त्यांच्या चरणी ठेवून मी स्वत:लादेखील त्यांच्या चरणी संपूर्ण समर्पित केलं. या संपूर्ण समर्पणालाच शरणागती म्हणतात आणि गीतेत अठराव्या अध्यायात भगवंतानं त्या शरणागतीचं महत्त्व सांगितलं आहे. ‘तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत।’ (श्लोक ६२) आणि ‘सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज।’ (श्लोक ६६). हे अर्जुना सर्वभावानिशी मला शरण ये आणि सर्व धर्म सोडून देऊन फक्त मला शरण ये! या शरणागतीचं फळ काय आहे? ‘तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत। तत् प्रसादात् परां शांतिम् स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्।।’ हे अर्जुना सर्व भावानिशी मला शरण ये. मग तुला अपार शांतीचं स्थान कायमचं प्राप्त होईल. ‘सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज। अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच:।।’ सर्व धर्म सोडून देऊन मला शरण ये. मग समस्त पापापासून मी तुला मुक्त करीन, तू काळजी करू नकोस! भगवान सर्व भावानिशी शरण यायला सांगतात. आपली स्थिती कशी असते? आपला भाव दुनियेकडे असतो आणि आपल्या भौतिक जीवनातला अभाव संपावा, एवढाच आपला भाव असतो! मन दुनियेकडे आणि शरीर महाराजांच्या सेवेत कसंबसं वावरत आहे, अशी स्थिती. खिरीच्या पात्रातल्या चमच्याला खिरीची चव कळत नाही तसेच साक्षात ज्ञानस्वरूपाच्या जवळ असूनही आपलं अज्ञान सुटत नाही. तेव्हा दुनियेकडची ओढ, दुनियेकडचा भाव सुटला आणि सर्व भाव त्यांच्या चरणी एकवटला तर अशा शरणागताला शाश्वत शांतीचं स्थान लाभतं. आता हे ‘स्थान’ म्हणजे काय? आपण एखादं घर शोधत असतो. ते घर त्याच परिसरात असतं पण ते सापडत नसतं. जसं आपल्याला सापडत नाही म्हणून घर त्या परिसरात नाहीच, असं काही म्हणता येत नाही. जेव्हा घर सापडतं तेव्हा आपल्याला आनंद वाटतो. तसंच शाश्वत शांतीचं स्थान काही या जगाबाहेर नाही! ते या जगातच आहे पण ते आपल्याला सापडत नाही. आपलं जगणं चिंता, भय आणि अशांतीनं व्यापून आहे. सत्पुरुषांचं जगणं हे निश्चिंती, निर्भयता आणि अखंड शांतीनं व्यापून आहे. दोघेही एकाच जगात आहेत पण दोघांची आंतरिक स्थिती वेगवेगळी आहे. एक अशांत आहे. शांतीचं स्थान त्याला सापडलेलं नाही. दुसरा अखंड शांतीचा सागरच जणू. तेव्हा सर्व भावानिशी मला जर सद्गुरूंच्या चरणी समर्पित होता आलं तर माझी आंतरिक स्थितीच ते पालटतील आणि मग जग आहे तसंच राहूनही याच जगात मला अखंड शांती, अखंड निर्भयता, अखंड निश्चिंतीचा लाभ होईल!
१६४. सर्वभावेन!
खरा सहवास घडला तर त्याच्यासारखं दुसरं भाग्य नाही! श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘‘संतांचा सहवास। याहून भाग्य नाही दुसरे खास।। संतचरणी विश्वास।
First published on: 21-08-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Full feeling