जगातील सात बडय़ा राष्ट्रांनी आपल्या शिखर परिषदेतून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर डोळे वटारले असून, त्यांनी युक्रेनमधील उद्योग थांबवावेत, असा इशारा दिला आहे. हे सगळेच गमतीशीर आहे. पुतिन हे धटिंगण आहेत. त्यांचे चेचेन्यातील पराक्रम सगळ्या जगाला माहीत आहेत. आताही युक्रेनचा क्रायमिया हा प्रांत तोडून, रशियाला जोडून त्यांनी आपला धटिंगणपणा जगाला दाखवून दिला आहे. तरीही अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि कॅनडा या सात राष्ट्रांचा गट त्यांना केवळ आíथक र्निबध लादण्याचे इशारे देत आहे. क्रायमिया प्रकरणानंतर मार्चमध्ये जी-८ मधून रशियाला काढून टाकण्यात आले. उरलेल्या सातांनी आणि युरोपीयन युनियनने रशियावर काही र्निबध लादले, पण त्याचा काहीही दृश्य परिणाम झालेला नाही. उलट क्रायमिया प्रांत रशियाला जोडला गेल्यानंतर आता पुतिन यांची नजर युक्रेनकडे वळली आहे. तेथील रशियावादी बंडखोरांना ताकद देण्याचे काम त्यांनी चालविले आहे. तरीही ओबामा त्यांना ‘दोन, तीन, चार’ महिन्यांची मुदत देत आहेत आणि पुतिन त्यांना, ‘ब्रुसेल्समध्ये शिखर परिषदेच्या निमित्ताने एकत्र जमून भोजन वगरे घेत आहात, तर त्यासाठी माझ्या शुभेच्छा,’ असे म्हणत खिजवत आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी िक्लटन यांनी अलीकडेच पुतिन यांची तुलना हिटलरशी केली. त्यावर बायकांच्या तोंडी लागण्यात अर्थ नसतो, अशा आशयाचे तद्दन पुरुषी विधान करून त्यांनी िक्लटन यांची खिल्ली उडवली. एवढे सगळे झाल्यानंतर, ब्रुसेल्स शिखर परिषदेनंतर दोनच दिवसांनी जेव्हा पुतिन आणि ओबामा फ्रान्समध्ये ‘डी डे’ स्मृतिदिनाच्या निमित्ताने एकत्र आले, तेव्हा काय झाले, तर ओबामा हे पुतिन यांना टाळत होते, ते दोघेही एकमेकांच्या नजरेला नजर न भिडेल असे प्रयत्न करीत होते. त्या सोहळ्यानंतरच्या भोजन समारंभापूर्वी ते दोघे एकमेकांना भेटले, पण फक्त १५ मिनिटे. त्यातील चच्रेचा तपशील नंतर पुतिन यांच्या प्रवक्त्याने जाहीर केला. त्यानुसार, त्या दोघांत युक्रेनच्या पूर्व भागातील िहसाचार शक्यतो लवकर थांबला पाहिजे यावर एकमत झाले! हे सर्व पाहता दबाव पुतिन यांच्यावर आहे की जी-७ वर अशी शंका यावी. पुतिन हे मुळातच असा दबाव घेणाऱ्यांतील नाहीत. याचे कारण अमेरिकादी पाश्चात्त्य देशांच्या हितसंबंधी नतिकतेचा खेळ त्यांना माहीत आहे. या देशांच्या लोकशाही, स्वातंत्र्य, समता आदी घोषणांना आíथक स्वार्थाची मर्यादा असते. याचा दुसरा अर्थ जेथे हा स्वार्थ साधला जाणार नसतो तेथे काहीही चालले तरी हे देश ढुंकूनही पाहात नसतात. हे पुतिन जाणून आहेत. बोरिस येल्त्सिन आणि त्यांच्यानंतर पुतिन यांनी चेचेन्यात दमनशाहीचा हैदोस घालूनही तेव्हा अमेरिका, ब्रिटनने दुर्लक्ष केले होते. जॉर्ज बुश आणि टोनी ब्लेअर यांच्यासाठी ती ‘छोटीशी स्थानिक समस्या’ होती. ते का, हे पुतिन ओळखून आहेत. आता युक्रेनच्या बाजूने हे देश का उभे आहेत, ते तेलाचे राजकारणही पुतिन यांना माहीत आहे. मात्र युक्रेनमध्ये स्वार्थ असला, तरी त्यासाठी आपले अर्थकारण तारण ठेवण्यास हे देश तयार होणार नाहीत आणि र्निबध लादले गेले तरी ते काही महिने पचविण्याची ताकद रशियात आहे, याचीही जाणीव पुतिन यांना आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे युक्रेन आणि क्रायमियाच्या बाबतीत रशियन जनता पुतिन यांच्या बाजूने आहे. खुद्द मिखाईल गोर्बाचेव्ह यांनीही क्रायमियातील जनादेश म्हणजे सोव्हिएत काळातील चुकीची दुरुस्ती असे म्हणत त्याचे स्वागत केले आहे. जी-७ देश नुसतीच इशारेबाजी करीत आहेत, तेव्हा त्याची पाश्र्वभूमी ही आहे.

Story img Loader