राज ठाकरे व नितीन गडकरी यांच्या भेटीने अनेक गंभीर राजकीय प्रश्न निर्माण झाले आहेत. जर मनसेने लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचे उमेदवार उभे केले नाहीत तर मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या राजकीय भविष्यावर ग्रहण लागण्याची दाट शक्यता आहे. मनसे हा एक स्वतंत्र पक्ष आहे. २००९च्या लोकसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवाराने लाखाच्या घरात मतदान घेतले होते. नाशिकमधून मनसेचे उमेदवार हेमंत गोडसे हे अल्प फरकाने पराभूत झाले होते. मनसेला मिळालेली मतांची टक्केवारी व विधानसभा निवडणुकीत पक्षाचे १३ आमदार निवडून आल्यामुळेच निवडणूक आयोगाने या पक्षाला प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता दिली. राज ठाकरे यांच्याबद्दल युवकांमध्ये प्रचंड आकर्षण आहे त्यामुळेच केवळ सात वर्षांत पक्षाच्या कक्षा ग्रामीण भागातही रुंदावल्या. मागील वर्षी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्याची छाप काही प्रमाणात दिसून आली.
 मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी जर लोकसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार उभे केले नाहीत तर मराठी मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो. राज व गडकरी यांची झालेली भेट म्हणजे भाजपचाच महाराष्ट्रातील ‘गड’ राखण्याकरिता आहे याचे गुपित उघड व्हावे.
सुजित ठमके, पुणे

गडकरींच्या लोकसभा-तहात मनसेने हरू नये
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मतांचे विभाजन टाळावे व युतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत याकरिता भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची मनधरणी चालविल्याचे दिसून येत आहे. अर्थात गडकरींचे यात काहीही चूक आहे वा वावगे आहे असे मला अजिबात वाटत नाही. कारण गडकरी हे, त्यांच्याच पक्षांतील गोपीनाथ मुंडे यांच्याप्रमाणे ‘एन्रॉन कंपनी अरबी समुद्रात बुडवीन’, ‘दाऊदला फरफटत  आणीन’ तसेच ‘सत्ता आल्यास महाराष्ट्रात टोलच बंद करीन’ वगरे  राणा भीमदेवी थाटाच्या घोषणा करणारे नेते नक्कीच नाहीत. गडकरी हे विकासाचे महत्त्व जाणणारे एक प्रॅक्टिकल नेते आहेत, हे कोणीही नाकारणार नाही. त्यामुळे लोकसभेच्या या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने राज ठाकरे यांचे व मनसेचे या राज्यातील महत्त्वाचे स्थान ओळखून ते राज ठाकरे यांच्याशी समेटाची बोलणी करीत आहेत. कदाचित नितीन गडकरी यांनी, ही बोलणी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याच सूचनेनुसार सुरू केलेली असू शकतील. या चच्रेत गडकरी यांनी मनसेने आता लोकसभेची निवडणूकच न लढविण्याचा व विधानसभेच्या वेळी युतीबरोबर येण्याचा असा एक मित्रत्वाचा- पण राज ठाकरे यांच्या दृष्टीने राजकीय आत्मघात ठरावा असा- सल्लाही दिला आहे. हा सल्ला महाराष्ट्रात भाजपच्या व युतीच्या दृष्टीने फायद्याचा असू शकतो; पण राज ठाकरे यांनी राजकारणात बळीचा बकरा का बनावे?
येत्या विधानसभेच्या निवडणुकांत सत्तेच्या दिशेने वाटचाल हे राज ठाकरे व मनसेचे आज जरी एकच लक्ष्य असले तरीही आपापल्या गुडघ्याला बािशग बांधून राज्यात सत्ताग्रहण करण्याकरिता उतावीळ झालेले युतीचे उद्धव ठाकरे, मुंडे वा राजू शेट्टी हे नेते  विधानसभा निवडणुकीत मनसेला युतीत घेण्याकरिता तयार होणार आहेत का व सत्तेत राज ठाकरे यांना वाटा देण्यास नक्की राजी होणार आहेत का, याचा त्यांनी प्रथम विचार करावा. मला अगदी खात्री आहे की हे सगळे नेते त्यावेळी मोदी, गडकरींना दूर लोटून राज ठाकरे यांना वाटाण्याच्या अक्षताच लावतील. कारण राज ठाकरे हे त्यांना परवडणारे नेते नाहीत. आमदारांचा एक मोठा गट असलेले महाराष्ट्रातील ते एक स्वयंभू नेते आहेत.
त्यामुळे मला वाटते की राज ठाकरे यांनी असा सल्ला अजिबात मानता कामा नये. महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करताना मनसेचे दोनचार खासदार हे येत्या लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आले व दिल्लीत असले तर ते केवळ त्यांच्याच नव्हे, तर भावी काळात आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीनेही नक्कीच फायद्याचे ठरू शकते आणि त्यातूनही मनसे जर लोकसभेचीही निवडणूक हरली असे जरी गृहीत धरले तरीही येत्या विधानसभेच्या निवडणुकांच्या दृष्टीने मनसेकरिता ही महाराष्ट्राच्या जनमानसाची एक चाचपणी होईल व येथील जनतेचा कल राज यांच्या लक्षात येईल. त्यातूनच येत्या विधानसभेच्या निवडणुकांच्या दृष्टीने त्यांना पक्षाच्या रणनीतीची योग्य आखणी करता येईल.
 राज ठाकरे हे नेहमीच इतिहासाचे वाचन करीत असतात. त्यामुळे ‘लढाईत जिंकले पण तहात हरले’ अशी स्वतची अवस्था त्यांनी करून घेता नये व त्याकरिता त्यांनी आपली राजकीय भूमिका लवकरात लवकर जाहीर करणे आवश्यक आहे असे वाटते.  -दिलीप प्रधान, मुलुंड (पूर्व)

उद्धव यांनी तरी  अहंगंड का ठेवावा?
‘लोकसभा लढू नका’ हे गडकरी-राज ठाकरे यांच्या मुंबईतील भेटीनंतरचे वृत्त (लोकसत्ता, ४ मार्च) वाचले. मात्र गडकरी यांनी आपली भूमिका सुस्पष्टरीत्या मांडल्यानंतर उद्धव आणि इतर शिवसेना नेत्यांच्या नाराजीचे प्रयोजन समजू शकत नाही. ‘माझे सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध आहेत, मला कोणाच्याही भेटीसाठी कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही’ हे गडकरींचे प्रतिपादन अतिशय योग्य असेच आहे. सत्ताप्राप्तीचा क्षण अगदी दृष्टिपथात आला असता अशा नाराजीचे, रुसव्या-फुगव्यांचे सूर महायुतीत जाहीरपणे घुमणे म्हणजे ‘दैव देतं आणि कर्म नेतं’ अशी परिस्थिती स्वतहून स्वहस्ते ओढवून घेणे नव्हे काय? गडकरींनी असे काय विपरीत वा अनतिक केले की उद्धव आणि शिवसेना नेते नाराज व्हावेत? उलट काँग्रेस- राष्ट्रवादीविरुद्ध लढताना विरोध अधिक प्रखर व बळकट व्हावा याच स्तुत्य हेतूने त्यांनी राज यांची भेट घेतली. राज यांचा नेमका प्रतिसाद काय हा मुद्दा नंतरचा!
काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ताभ्रष्ट करण्याचे एकमेव लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीच्या िरगणात एकदा उतरायचे ठरवले की आपला अहंकार आणि अहंगंड एवढा कुरवाळत बसणे हे कितपत योग्य याचा विचार उद्धव यांनी जरूर करावा. लोकसभा निवडणुकीत मनसे तटस्थ राहिल्याने अथवा महायुतीत सामील झाल्याने जर महायुतीला सत्ताप्राप्तीचे ध्येय सहजसोप्या रीतीने गाठता येणार असेल तर सोन्याहून पिवळे नाही काय? त्यांत या निवडणुकीत ‘आप’ची लुडबूड होणार आहे आणि मतविभाजन होणार आहे ते वेगळेच! हेही उद्धव यांच्यासकट महायुतीतील इतर नेत्यांनी ध्यानात घेणे अत्यावश्यक आहे.
उदय दिघे, विलेपाल्रे (पूर्व)

अंधश्रद्धाळू महिला सक्षम  कशा होणार?
महिला दिन साजरा करताना हल्ली मला दिसतात त्या वेगवेगळ्या बुवांच्या दरबारात वाढत्या संख्येने उपस्थित राहणाऱ्या महिला, आसारामबापूच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेल्या महिला, वेगवेगळ्या कर्मकांडात गुंतलेल्या महिला आणि स्वत: उच्चशिक्षित असूनही मोठय़ा भक्तिभावाने उपासतापास करणाऱ्या तरुणी. एकीकडे महिलांच्या स्वातंत्र्याचा आग्रह धरला जात असताना आणि दुसरीकडे त्यांच्या स्वातंत्र्याला बाधक अंधश्रद्धांना कवटाळायचे!  अंधश्रद्धा ठेवणे म्हणजे मानसिक गुलामी स्वीकारणे आणि धर्म व रुढींनी लादलेली बंधने स्वीकारणे आहे. त्यामुळे अशा अंधश्रद्धाळू महिलांनी महिला दिन कितीही जोमात साजरा केला तरी त्या स्वतंत्र आणि सक्षम होऊ शकत नाहीत.
वाघेश अशोक साळुंखे, मु. पो. वेजेगाव, ता. खानापूर जि. सांगली

किळसवाणी ‘कमाई’
आसाराम लोमटे यांच्या ‘धूळपेर’ या सदरातील ‘मुकी बिचारी’ हा लेख (३ मार्च) अंतर्मुख तर करतोच पण अस्वस्थही करतो. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वष्रे होत आली तरी ‘पाण्यासाठी दाही दिशा’ ही दुर्दशा चालूच आहे. माणसांना उभा संसार मोडून तात्पुरता का होईना शहरात आश्रय घ्यायला लागतो आणि जनावरांना छावण्यांत. त्यातही ‘कमाई’ करणारे आहेतच हे वाचून तर किळस येते.
निवडणुकीसाठी अधिकृत ७० लाख (आणि गोपीनाथ मुंडेंच्या हिशेबाने आठ कोटी) खर्च करणारा खासदार ‘भ्रष्टाचारविरोधी’ अपेक्षित असेल तर टाटा, बिर्ला आणि अंबानी यांनाच एखादा उमेदवार उभा करणे परवडेल.
– सुहास शिवलकर, पुणे

Story img Loader