भूतकाळाचा धांडोळा वर्तमानाच्या नजरेतून घेणं हे तर अगदी या सदराचंही काम आहे.. पण निवडणूक प्रचाराची भाषणं करताना भूतकाळाचे संदर्भ का द्यायचे आणि त्यातून कोणता अर्थ लोकांपर्यंत पोहोचवायचा, हे अधिक कसबाचं काम! गांधी घराण्याच्या तिसऱ्या पिढीच्या वारसाला ते जमलं, असं म्हणता येईल का?  ..की हा सारा प्रतिमांचाच खेळ?
दिवाळी संपून देशातल्या पाच विधानसभा निवडणुकांचं वातावरण आता चांगलंच तापायला लागलं आहे. त्यातून होणारी राजकीय घुसळण नंतरच्या लोकसभा निवडणुकीसाठी पूरक ठरणार आहे. विधानसभा निवडणुकांसाठी दोन्ही बाजूंचे (दिल्लीसारख्या ठिकाणी तीन बाजूंचे) मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार एव्हाना निश्चित झाले आहेत. त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीनंतर सत्तेवर येऊ शकणाऱ्या दोन प्रमुख राजकीय पक्षांचे पंतप्रधानपदाचे दावेदारही आपापल्या भूमिका मांडू लागले आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे भारतीय जनता पक्षाने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना केव्हाच उघडपणे मैदानात उतरवलं आहे. सत्ताधारी संयुक्त पुरोगामी आघाडीने तशी अधिकृत घोषणा केली नसली तरी काँग्रेसचे तरुण उपाध्यक्ष आणि गांधी घराण्याचे तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी राहुल गांधी यांची पक्षातर्फे तशीच प्रतिमा उभी केली जात आहे. त्यामुळे (काही जणांना प्रियांकाच्या नाटय़मय एंट्रीची अपेक्षा असली तरी) येत्या लोकसभा निवडणुकीत मोदी विरुद्ध राहुल, असा सामना जवळजवळ निश्चित आहे आणि त्याचे नमुने भारतीय मतदारांपुढे पेश होऊ लागले आहेत.
सध्या चालू असलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने राहुल यांच्या जाहीर सभा-मेळाव्यांमध्ये त्यांनी गांधी घराण्याच्या परंपरेला उजाळा देत मतदारांच्या भावनेला हात घालण्यावर जास्त भर दिल्याचं दिसून येत आहे. विशेषत: ‘दादी’ इंदिराजी आणि ‘पापा’ राजीवजी यांच्या आठवणी भावुकपणे काढताना त्यांच्याप्रमाणेच बलिदानाची शक्यताही राहुल यांनी वर्तवली आहे. ‘माँ’ सोनियाजींची राजकीय कारकीर्द तशी ताजी आहे. या तिघांचा आपल्या जडणघडणीवर झालेला प्रभाव सांगत राहुल मतांचा जोगवा मागू लागले आहेत.
या त्रिमूर्तीपैकी इंदिराजी पहिल्यांदा देशाच्या पंतप्रधान बनल्या (जानेवारी १९६६). त्यानंतर सुमारे साडेचार वर्षांनी राहुल यांचा जन्म (जून १९७०) झाला. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिराजींची दुर्दैवी हत्या झाली तेव्हा ते चौदा वर्षांचे होते. त्या वयात इंदिराजींकडून त्यांना काही राजकीय बाळकडू मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती. पण आजीच्या राजकीय कर्तबगारीचा थोडय़ा तटस्थपणे मागोवा घेतला असता तर राहुलना बरंच काही शिकायला मिळालं असतं. वयाच्या तिशीपासून तब्बल १७ र्वष पिताजी पं. जवाहरलाल नेहरू यांची कारकीर्द इंदिराजींनी जवळून पाहिली होती. तरीसुद्धा सुरुवातीपासूनच संघर्षांतून सत्तेची वाट त्यांना चोखाळावी लागली. पिताजींच्या पिढीतल्या ज्येष्ठांशी दोन हात करत त्यांनी पंतप्रधानपद मिळवलं आणि टिकवलं. त्या तुलनेत पक्षांतर्गत पातळीवर राहुल यांच्यासाठी सिंहासन रिकामं असणं, ही मोठी जमेची बाजू आहे. गेल्या महिन्यात मध्य प्रदेशातील एका सभेत बोलताना ‘माँ’ सोनियाजींचा गरिबांसाठी अश्रू ढाळण्याचा किस्सा ऐकवत राहुल यांनी देशातल्या गोरगरिबांसाठी मातृहृदय कसं विव्हळत होतं, हे बिंबवण्याचा प्रयत्न केला, तर ‘दादी’ इंदिराजी बालपणापासूनच दुबळ्यांच्या बाजूने कशा होत्या, हे दिल्लीतल्या एका सभेत सांगताना लहानपणी एका हॉकी सामन्याच्या वेळी त्यांनी प्रतिस्पर्धी दुबळ्या संघाला प्रोत्साहन दिलं होतं, अशी अगदीच गैरलागू आठवण कथन केली. मात्र मोठेपणी देशाची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर त्यांच्या ‘दादी’ने ‘गरिबी हटाओ’चा नारा देत १९७१च्या निवडणुका एकहाती जिंकल्या, तसंच त्यानंतरच्या डिसेंबरमध्ये पाकिस्तानसह अमेरिकेला अंगावर घेत केलेली बांगलादेशाची निर्मिती हा त्यांच्या आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी आणि युद्धनीतीचाही कळस होता, याचा दुर्दैवाने राहुलच्या बालमनावर काही परिणाम झालेला दिसत नाही. आपल्या ‘माँ’च्या सूचनेवरूनच आपण या कौटुंबिक घटना सांगत असल्याचं राहुल यांनी एका सभेत आवर्जून नमूद केलं. त्यानुसार मध्य प्रदेशातल्या एका सभेतल्या २० मिनिटांच्या भाषणात त्यांनी ‘मेरी माँ’ हा शब्दप्रयोग तब्बल १४ वेळा केल्याची नोंद एका ‘खोडसाळ’ पत्रकाराने करून ठेवली होती. त्याव्यतिरिक्त त्यांनी आईबद्दल ‘वो, उनको, उन्होंने’ असे संदर्भ अनेकदा दिल्याचंही त्याने म्हटलं होतं.
देशासाठी आपण आपल्या स्वप्नांचा त्याग केल्याचं राहुल यांनी एका सभेत सांगितलं. अर्थात ती स्वप्नं कोणती होती, हे गुलदस्त्यात आहे. ‘दादी’ किंवा ‘पापां’प्रमाणे आपलीही हत्या होण्याची भीती आहे, पण आपण त्याची फिकीर करत नाही, असंही त्यांनी ठासून सांगितलं. वस्तुस्थिती अशी आहे की, इंदिराजी किंवा राजीव यांच्या हत्येमागे विशिष्ट तत्कालीन राजकीय कारणं होती. राहुल यांच्याबाबतीत गांधी घराण्यातील व्यक्ती, यापलीकडे कोणतंही राजकीय कर्तृत्व किंवा कारण तूर्त तरी संभवत नाही. ‘ऑपरेशन ब्लू स्टार’नंतर इंदिराजींच्या जीविताला असलेला धोका सर्वज्ञात होता, किंबहुना त्यांनी त्या परिस्थितीत शीख सुरक्षारक्षक ठेवू नयेत, असा सल्ला अधिकृतपणे देण्यात आला होता. निधर्मवादी तत्त्वाशी ते सुसंगत नसल्याचं सांगत इंदिराजींनी तो सल्ला स्पष्टपणे नाकारला होता. मात्र अशा स्वरूपाची हत्या होण्याची भीती त्यांच्या मनात निश्चितपणे होती, हे हत्येच्या आदल्या दिवशी (३० ऑक्टोबर १९८४) ओरिसात एका जाहीर सभेत त्यांनी केलेल्या विधानांवरून उघड होतं. त्या सभेत इंदिराजी म्हणाल्या होत्या, ‘‘आज मी जिवंत आहे, उद्या नसेनही. पण अखेरच्या श्वासापर्यंत मी देशाची सेवा करत राहीन आणि मृत्यूनंतरही माझ्या रक्ताचा थेंबन्थेंब देशाला बलवान करेल आणि देशाचं ऐक्य अबाधित ठेवील.’’ इंदिराजींची ही वाक्यं दुसऱ्याच दिवशी झालेल्या हत्येमुळे जणू भविष्यवाणी ठरली. त्यातला रक्त सांडण्याचा उल्लेखही अर्थपूर्ण ठरला. त्यानंतरचा इतिहास सर्वज्ञात आहे. या घटनेपूर्वी जेमतेम वर्षभर आधी इंदिराजींना भेटण्याची संधी मिळाली होती. शंकराचार्याच्या भेटीसाठी त्या महाराष्ट्रात आल्या होत्या आणि त्याबद्दल काही समाजवादी नेत्यांनी आक्षेप घेतला होता.त्याबाबत बोलताना धर्म आणि भारतीय तत्त्वज्ञानाबाबतची त्यांची वैचारिक स्पष्टता जाणवली होती. उतरत्या वयात त्या जास्तच आध्यात्मिक होऊ लागल्यासारखंही वाटलं होतं. राजस्थानातल्या एका सभेत राहुलनी इंदिराजींच्या मारेकऱ्यांचीही आठवण काढली खरी, पण त्याचा संदर्भ देताना ‘दादी’च्या अगदी उलट प्रतिक्रिया होती. संबंधितांबद्दल मनात दीर्घ काळ राग राहिल्याचं त्यांनी नमूद केलं.
इंदिराजींच्या हत्येनंतर ‘पापा’ राजीव यांनी देशाच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारली तेव्हा त्यांचीही प्रतिमा ‘अनुत्सुक राजकारणी’ अशी होती. पण एकदा त्या भूमिकेत गेल्यानंतर इंदिराजींच्या छायेतून झपाटय़ाने बाहेर पडत एकविसाव्या शतकाची स्वप्नं पाहणारा नव्या पिढीचा, युगाचा नेता ही ओळख त्यांनी प्रस्थापित केली. त्यांच्या कारकिर्दीत सॅम पित्रोदांच्या कल्पनेतून माहिती तंत्रज्ञानाचा झालेला विस्फोट त्याचं व्यवच्छेदक लक्षण होतं आणि बोफोर्सचं भूत मानेवर बसलं नसतं तर परंपरागत मिश्र, समाजवादी अर्थव्यवस्थेचं जोखडही फेकून देण्याची तयारी त्यांनी चालवली होती, असं त्यांच्याबरोबर काम केलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी जी. पार्थसारथी यांनी नंतर एकदा अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितलं होतं. पंजाब आणि आसाममधल्या राजकीय गुंतागुंतीवर शांततामय समझोते, हे राजीव यांचं देशांतर्गत राजकारणातलं मोठं यश म्हणावं लागेल. त्या काळात काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडींच्या वेळी दिल्लीत गेलो असता संसदेत विरोधी बाकांवरील एकापेक्षा एक ज्येष्ठ संसदपटूंपुढे पंतप्रधान म्हणून वावरताना त्यांचा दिसलेला आत्मविश्वासही उल्लेखनीय होता. पण श्रीलंकेतील तमीळ संघर्षांला (हा विषय आजही देशाच्या परराष्ट्रविषयक धोरणांवर प्रभाव टाकत आहे!) आवर घालण्यासाठी भारतीय शांतीसेना पाठवण्याचा निर्णय त्यांच्या जिवावर बेतला. तत्कालीन काँग्रेस पक्षसंघटनेची स्थिती आणि सरकारी निधी सामान्य माणसापर्यंत पोहोचेपर्यंत होणारी ८५ टक्के गळती, हे राजीव यांच्या चिंतेचे विषय होते. मुंबईत १९८५ मध्ये झालेल्या काँग्रेस पक्षाच्या शताब्दी समारंभात त्यांनी तसं स्पष्टपणे बोलून दाखवलं होतं. पण राहुलच्या आठवणींमधले ‘पापा’ फक्त विमान उडवणारेच आहेत.
सोनियामाँची कारकीर्द त्या मानाने अगदीच अलीकडची. २००४च्या निवडणुकीनंतर पंतप्रधान होण्यास दिलेला नकार, हा त्यांचा समर्थकांच्या मते सर्वोच्च त्याग, तर विरोधकांच्या दृष्टीने जबाबदारीविना सत्ता उपभोगण्याची चलाखी! संपुआच्या पहिल्या पर्वात कमावलेलं सारं दुसऱ्या पर्वात गमावल्याबद्दलची जबाबदारी मात्र त्या झटकू शकणार नाहीत. जागतिक पातळीवरच्या आर्थिक वास्तवाकडे दुर्लक्ष करत कालबाह्य़ झालेल्या सबसिडय़ांचे राजकीय खेळ, हे त्यामागचं मुख्य कारण आहे आणि अशा प्रतिकूल स्थितीत निवडणुका जिंकण्याचं आव्हान ‘बेटा’ राहुलपुढे उभं ठाकलं आहे.

Story img Loader