आपण सध्या प्रगत तंत्रज्ञानाच्या काळात जगत आहोत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने कल्पनेपलीकडच्या गोष्टींनी जग बदलवलं आहे. पण या माध्यमाचा आपण किती परिणामकारक वापर करतो? त्याचा वापर अधिक सुखकर आणि स्वत:ला प्रगत करण्यासाठी करून घ्यायचा असेल तर गांधींच्या तत्त्वज्ञानाची कास धरल्याशिवाय आपल्याला गत्यंतर राहत नाही. ती धरली तर गांधींना अपेक्षित असलेले आणि आजही प्रस्तुत असलेले कितीतरी बदल आपण सहजगत्या कसे करू शकतो, यासाठी सुधींद्र कुलकर्णी यांचं ‘म्युझिक ऑफ द स्पिनिंग व्हील’ हे पुस्तक वाचायला हवं.
या पुस्तकाचे ‘पाथवेज् ऑफ सत्याग्रह’, ‘रोमान्स विथ सायन्स’, ‘हार्मनी सीकर’, ‘अ बिकॉन फॉर द प्रेझेंट अँड फ्युचर’ आणि ‘प्रॉमिस ऑफ द इंटरनेट’ असे एकंदर पाच भाग आहेत. कुलकर्णी यांनी म्हटलं आहे की, हे काही अॅकेडेमिक शिस्तीनं अभ्यास करून लिहिलेलं पुस्तक नाही. हे गांधींविषयीच्या उत्सुकतेनं आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाचा आजच्या काळाशी सुसंगत अन्वयार्थ शोधण्याच्या प्रेरणेतून लिहिलेलं पुस्तक आहे.
गांधींचं व्यक्तिमत्त्व आणि त्यांचे विचार यांपासून प्रेरणा घेणाऱ्या अल्बर्ट आइन्स्टाइन ते नेल्सन मंडेला यांच्यापर्यंत जगभरच्या अनेक महनीय व्यक्तींनी त्यांच्या कालातीत तत्त्वविचारांचा वारंवार पुनरुच्चार केला आहे. त्यांचाच आधार घेत कुलकर्णी यांनी या पुस्तकाचं लेखन केलं आहे. ते करताना त्यांनी अहिंसा, ब्रह्मचर्य, सत्याग्रह, नई तालीम, चरखा, अहिंसात्मक आर्थिक विकास या गांधी-संकल्पनांचा आज-उद्याच्या काळाशी असलेला अनुबंध उलगडून दाखवला आहे.
गांधी हरित चळवळीचे-पर्यावरण चळवळीचे प्रणेते कसे होते, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या वापराविषयी त्यांनी मार्गदर्शक ठरतील अशी कोणती तत्त्वं सांगितली आहेत, आण्विक अस्त्रांविषयी गांधींचा काय विचार होता, अशा गांधीविचारांचीही कुलकर्णी यांनी साधार मांडणी केली आहे. उचित छायाचित्रे व रेखाचित्रे यांची कल्पक जोडही द्यायला कुलकर्णी विसरले नाहीत.
पण या पुस्तकाचा खरा गाभा आहे शेवटचा, ‘प्रॉमिस ऑफ द इंटरनेट’ हा विभाग. त्यात कुलकर्णी यांनी गांधींच्या खादी, चरखा आणि सत्याग्रह या तीन संकल्पनांना इंटरनेटशी जोडून त्यांची आजच्या संदर्भात पुनर्माडणी केली आहे. इंटरनेट हा शब्द कुलकर्णी यांनी व्यापक अर्थाने वापरला आहे. त्यात त्यांना डिजिटल टेक्नॉलॉजी आणि त्याद्वारे निर्माण होणारं सर्व प्रकारचं मानवी ज्ञान अभिप्रेत आहे. हे माध्यम वैयक्तिक, संस्थात्मक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कम्युनिटीच्या माध्यमातून राजकीय-सामाजिक-नैतिक पर्यायांमध्ये बदल घडवून आणू शकतं. पण त्यासाठी गांधींच्या तत्त्वविचारांची काठी हाताशी धरायला हवी, असं कुलकर्णी म्हणतात.
ते कसं करायचं यासाठी ‘इट्स टाइम वुई बिकेम इंटरनेट सत्याग्रहीज्’ हा उपसंहार कुलकर्णी यांनी लिहिला आहे. त्यात ते लिहितात की, गांधींजींची अहिंसेसारखी तत्त्वं अंगीकारून काही बदल घडवायचा असेल तर ‘इंटरनेट सत्याग्रहीज्’ व्हायला हवं. इंटरनेटचे वापरकर्ते राजकीय-सामाजिक कार्यकर्ते नाहीत, पण आपली मते-भावना व्यक्त करून ते बरंच काही घडवू शकतात. हे सत्याग्रही काय करू शकतात याविषयीच्या पंधरा बदलांची तपशीलवार यादीच कुलकर्णी यांनी दिली आहे. कुलकर्णी लिहितात, की गांधीजींची महानता समजून घेण्यासाठी मला इंटरनेटचाच आधार घ्यावा लागला आणि गांधींची तत्त्वं अमलात आणण्यासाठीही चरख्याचा आजचा अवतार असलेल्या इंटरनेटचा वापर करायला हवा.
म्हणून त्यांनी ‘महात्मा गांधीज् मॅनिफेस्टो फॉर द इंटरनेट एज’ असं या पुस्तकाला उपशीर्षक दिलं आहे. इंटरनेट या माध्यमाचा वापर जबाबदारीने केला तर (अरब स्प्रिंगसारखी क्रांती होऊ शकते आणि) गांधींची अहिंसक चळवळही उभी राहू शकते, हे त्यांना सांगायचं आहे. म. गांधी आजही मानवी मूल्ये आणि प्रेरणांसाठी किती उदात्त ठरतात, याचा ‘जाहीरनामा’ या पुस्तकात वाचायला मिळतो.
थोडक्यात काय तर हे पुस्तक फॅसिनेटिंग आहे. कुलकर्णी यांनी ते काहीसं भारावून जाऊन लिहिलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडून काही छोटे-मोठे प्रमादही घडले आहेत. ‘लगे रहो मुन्नाभाई’ हा तद्दन व्यावसायिक चित्रपट अनेकांना फॅसिनेट करणारा वाटतो, पण त्याचा आणि गांधींच्या तत्त्वज्ञानाचा सुतराम संबंध नाही, उलट त्यात त्याचा विपर्यासच आहे, हे कुलकर्णी यांनी ध्यानात घेतलेलं नाही. गांधींचा विचार कालातीत आणि सर्वव्यापी असल्याने तो आज-उद्याच्या जगाशी सुसंगत ठरतोच. त्याचं कारण त्यामागे असलेलं त्यांचं द्रष्टेपण. त्यामुळे गांधी केवळ इंटरनेट वापरणाऱ्या पिढीचेच ‘महात्मा’ ठरत नसून अभिजनांपासून जनसामान्यांपर्यंत आणि अशिक्षित खेडुतांपासून शहरी सुशिक्षितांपर्यंत सर्वाचेच ‘महात्मा’ ठरतात, हेही जाणून घ्यायला हवं. असे आणखीही काही मुद्दे आहेत. पण तरीही गांधींचा तत्त्वविचार हा आजच्या काळाचा कसा ‘जाहीरनामा’ आहे, हे जाणून घेण्यासाठी या पुस्तकाचं वाचन अनिवार्य आहे, एवढं नक्की.
म. गांधींचा जाहीरनामा आजच्या इंटरनेट जगासाठी!
आपण सध्या प्रगत तंत्रज्ञानाच्या काळात जगत आहोत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने कल्पनेपलीकडच्या गोष्टींनी जग बदलवलं आहे. पण या माध्यमाचा आपण किती परिणामकारक वापर करतो? त्याचा वापर अधिक सुखकर आणि स्वत:ला प्रगत करण्यासाठी करून घ्यायचा असेल तर गांधींच्या तत्त्वज्ञानाची कास धरल्याशिवाय आपल्याला गत्यंतर राहत नाही.
First published on: 26-01-2013 at 12:20 IST
मराठीतील सर्व बुक - वर्म बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gandhi manifesto for todays internet world