edt02गांधीजींच्या विचारांमध्ये अंतर्विरोध होते आणि त्यामुळे त्यांवर टीका होणे स्वाभाविक आहेच. गांधीवादी आदर्शाची ऐशीतैशी कुणी, कशी केली हेही सर्वाना माहीत आहे; परंतु गांधीविचाराचे मर्म आजच्या काळात काय असू शकते, हे समजून घेतले तर पर्यावरणनिष्ठ विकास, ग्रामसभांचे अधिकार अशा गोष्टी आजही दिसू लागतील. त्या सर्वानीच पाहाव्यात, यासाठी नव्या प्रतीकांची गरज आहे..
३० जानेवारीला शहीद पार्कमध्ये भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या पुतळ्यासमोर उभा होतो, त्या वेळी त्यांनी आपल्यासाठी जो वारसा ठेवला आहे, त्याचा विचार मनात आला. हुतात्म्यांच्या स्मृती या आगीसारख्या असतात, काही वेळा त्या भडकतात तर काही वेळा भडकवतात. काळाच्या ओघात कधी तरी त्याच्यावर राखेचे थर जमून निखारे विझतात. नंतर हे हुतात्मे त्यांच्या तसबिरींमधून, चित्रांमधून आपल्या दिवाणखान्याची शोभा वाढवतात. शेवटी राजकीय नेत्यांच्या खिशात विसावतात.. म्हणजे, त्यांच्या विचारांचा वारसा नुसता सांगत फिरणे, एवढेच उरते.
गांधीजींच्या स्मृतींचेही आज हेच झाले आहे. आपल्या नोटांवर गांधीजींची छबी आहे. इंग्रजांच्या काळात मॉल रोड नावाच्या रस्त्यांची जी शान असे ती आता महात्मा गांधी मार्ग नावाच्या रस्त्यांवर शहरोशहरी, गावोगावी दिसते आहे. प्रत्येक सरकारी कार्यालयात गांधीजींची तसबीर असते आणि तेथेच अनेक गैरव्यवहार खुलेआम होत असतात. गांधीजींचा चष्मासुद्धा आता, स्वच्छता अभियानाची शोभा वाढवत आहे. अर्थात, असे असले तरी गांधीजींचा विचार आज कुणाला आठवतच नाही, असेही नाही. ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांना शरीराने संपवले खरे, पण त्यामुळे गोडसेला जे पाहिजे होते ते साध्य झाले नाही.. उलट गांधीजींचा विचार संपूर्ण भारतवर्षांला व्यापून राहिला. काँग्रेस पक्ष व सरकार गांधीजींच्या नावाने माळ जपतच होते पण गांधीजींच्या हत्येनंतर कम्युनिस्ट व समाजवादी टीकाकारांवरही गांधी विचारांची छाप पडली.
आज गांधींचे सगुण रूप सर्वव्यापी आहे, पण त्यांच्या आत्म्यावर म्हणजे विचारांवर सतत हल्ले होत आहेत. सर्वधर्मसमभावाच्या जागी ‘बळी तो कान पिळी’ असे चित्र आहे. गांधीजींच्या हिंदू वैष्णव जन सनातनी परंपरेची मोडतोड करून हिंसेचा मार्ग अवलंबला जात आहे. दरिद्रीनारायणाच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याऐवजी राजसत्ता म्हणजे लक्ष्मीची पूजा करणे असा संकुचित अर्थ उरला आहे.
स्वराज्याच्या जागी आता घराणेशाही व एकाधिकारशाही वाढत आहे. काँग्रेस राजवटीने गांधीजींच्या नावाचा वापर केला पण त्याचबरोबर त्यांच्या विचारांना तिलांजली देण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. आता गांधी विचारांवर शेवटचा हल्ला करण्याची तयारी चालू आहे ते नथुराम गोडसे याने त्यांच्यावर झाडलेल्या गोळ्यांपेक्षा किती तरी घातक आहे.
या काळात गांधीजींच्या विचारांना वाचवणारा धर्म कसा असला पाहिजे?
तर प्रथम या लोकांनी गांधीजींची पूजाअर्चा करणे बंद करावे. आज युवकांना अशा परिपाठांमध्ये अजिबात रस नाही. गांधीजींची प्रतिमा लाचार, बिचारा अशी मर्यादित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही लोकांसाठी महात्मा गांधी हीच ‘मजबुरी’ झाली आहे, त्यांनी गांधीजींच्या विचारालाच समूळ उखडून टाकण्याचा प्रयत्न चालवला आहे.
जर गांधी समर्थकांनी त्यांची पूजा करणे बंद केले, तर त्यांची विनाकारण होणारी निंदासुद्धा बंद होईल. गेली अनेक दशके गांधीजींच्या सर्वव्यापक विचारांमुळे त्यांच्यावर डावे व आंबेडकरवादी यांनीही अनेक प्रकारचे आरोप केले. त्यांच्याविरोधात गैरप्रचार केला गेला. गांधीजींची पूजाअर्चा बंद झाली, तर हे सर्व प्रकार बंद होतील.
जे लोक गांधीजींचा वारसा जपू इच्छितात, त्यांना गांधीजींच्या निर्गुण रूपाकडे वळावे लागेल. मोहनदास करमचंद गांधी यांच्या विचारांवर होणाऱ्या टीकेला तोंड द्यावे लागेल. वर्णव्यवस्थेचे समर्थन व स्पृश्यास्पृश्यता यात गांधीजी ताळमेळ घालू शकले नाहीत. त्यामुळेच आज, नवीन पिढीतील दलित युवक ‘हरिजन’ शब्दाने चिडून उठतो. हा आजचा तरुण गांधींवर चिडतो. गांधीजी दरिद्रीनारायणाला आणखी दरिद्री बनवणाऱ्या भांडवली व्यवस्थेचे पूर्ण आकलन करून देऊ शकले नाहीत. गांधीजींनी आधुनिक संस्कृतीला पर्याय देण्याचे स्वप्न पाहिले; पण त्या पर्यायी संस्कृतीचा नकाशा अथवा आराखडा ते देऊ शकले नाहीत. स्त्रियांच्या व्यथा व आकांक्षा ते समजू शकले नाहीत. ही टीका मान्य करून गांधीजींच्या विचारांचा वारसा जपला जाऊ शकतो.
राममनोहर लोहिया यांनी गांधीवाद्यांचे तीन प्रकार पाडले होते एक म्हणजे ‘सरकारी गांधीवादी’, जे गांधीजींची माळ जपत सरकारी मलई खाण्यात मश्गूल असत. दुसरे ‘मठाधीश गांधी’ ज्यांनी गांधी विचारांचा स्वीकार करून आश्रम बनवले पण गांधीजींचा खरा वारसा चालवला नाही, त्यांना संतपद देऊन मर्यादित करून टाकले. तिसरे गांधीवादी हे ‘कडू बेण्या’सारखे आहेत! लोहिया स्वत:ला खरे गांधीवादी मानत होते, ते गांधीजींचे खरे अनुयायी होते; पण त्यांना गांधीवाद्यांनी बहिष्कृत केले होते.
आज गांधीजींचे विचार वाचवण्यासाठी गांधीवाद्यांच्या ‘कडू बेण्या’च्या परंपरेशी आपल्याला जोडून घ्यावे लागेल. गांधीजी एक संत व तत्त्ववेत्ते होते यापेक्षा त्यांचे राजकीय विचार काय होते ते अंगी बाणवावे लागतील. राजकारणी नेता म्हणून त्यांना सामोरे आणावे लागेल. अन्यायाविरुद्ध संघर्ष करणारे गांधी आठवावे लागतील. धार्मिकता व धर्मनिरपेक्षता यांच्या जागी सर्वधर्मसमभावाची परंपरा जोपासावी लागेल. केंद्रात झालेले सत्तेचे केंद्रीकरण सोडून ग्रामसभांना अधिकार देण्याची तयारी ठेवावी लागेल. विकासाच्या नावावर होणारा विनाश थांबवावा लागेल. विकासाची समतोल प्रारूपे शोधावी लागतील ज्यात पर्यावरणाचे संतुलनही राखले जाईल.
हाडामांसाचे गांधीजी विसाव्या शतकातच संपले पण एकविसाव्या शतकात गांधी विचार जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला त्यांच्या निर्गुण निराकार रूपाचेच रक्षण करावे लागणार आहे. त्याची नवी प्रतीके तयार करावी लागणार आहेत. गांधीजींचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी नव्याने प्रयत्न करावे लागतील. गांधीजी एक ज्वाला होते पण तो अंगार आता सत्ताधीशांच्या दावणीतून मुक्त करायला हवा, तरच आपल्याला उज्ज्वल भविष्याचा रस्ता दिसेल. गोडसेंची मूर्ती व मंदिरे बनवण्याच्या मागे लागलेल्यांचे मी आभारच मानतो, कारण त्या निमित्ताने गांधीजींच्या विचारांच्या विस्तवावरची राख उडवून त्याचा अर्थ समजून सांगण्याची संधी मिळाली आहे.
* लेखक आम आदमी पक्षाचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते व पक्षाच्या राजकीय सल्लागार परिषदेचे सदस्य आहेत व त्यासाठी दिल्लीतील ‘विकासशील समाज अध्ययन पीठा’तून (सीएसडीएस) सध्या सुटीवर आहेत.
योगेंद्र यादव
त्यांचा ई-मेल  yogendra.yadav@gmail.com

Story img Loader