गेल्या आठ दशकांहून अधिक काळ कल्याण गायन समाज कार्यरत आहे. कल्याण शहरातील कलाप्रेमी रसिकांची चौथी पिढी सध्या संस्थेची धुरा वाहत आहे. शास्त्रीय संगीताचे सादरीकरण, प्रशिक्षण आणि दस्तऐवजीकरण अशा तीन पद्धतीचे कार्य संस्थेतर्फे केले जाते. गेली काही वर्षे संस्थेच्या तरुण कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन संस्थेची नवी देखणी वास्तू उभारली आहे. अंतर्गत दालनांची काही कामे सुरू आहेत. त्यासाठी निधीची चणचण असतानाच ऐन गणपतीत ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमात संस्थेविषयीचा सविस्तर लेख छापून आला. त्या दिवसापासून संस्थेविषयी माहिती जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागांतून अखंडपणे दूरध्वनीवरून संपर्क साधणे सुरू झाले. लेखात मदतीचे धनादेश ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र तरीही काही रसिकांनी थेट संस्थेच्या कार्यालयात मदतीचे धनादेश पाठविले. नंतर आम्ही ते ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात पाठविले. संस्थेच्या नव्या वास्तूत कलादालन, वाचनालय, अद्ययावत ध्वनिमुद्रण कक्ष आदी कामे बाकी आहेत. आता या उपक्रमातून मिळणाऱ्या निधीतून ती कामे मार्गी लागतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या लेखामुळे देशातील सर्व संगीत रसिकांपर्यंत संस्थेचे कार्य पोहोचले. संस्थेच्या गुरुकुल उपक्रमाविषयी अनेकांनी आस्थेने चौकशी केली. कारण नव्या पिढीला त्याविषयी कुतूहल दिसले. संस्थेकडे निवासाची कशी व्यवस्था आहे, कशा प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते, याबाबत अनेकांनी विचारले.
कोल्हापूरहून आलेला जमेनीस नावाच्या महिलेचा फोन महत्त्वपूर्ण होता. कारण ज्यांच्या स्मरणार्थ कल्याण गायन समाज संस्थेची स्थापना झाली, त्या पं.भास्करबुवा बखले यांच्या त्या नात! आजोबांचा देदीप्यमान संगीत कारकीर्दीचा वारसा कल्याणमधील एक संस्था चालवीत असल्याचे पाहून त्यांना आनंद वाटला. त्यांनी संस्थेच्या कार्यास मन:पूर्वक शुभेच्छा देत मदत पाठवीत असल्याचे सांगितले.   
एका गृहस्थाने देणगी देण्याची इच्छा व्यक्त केलीच, शिवाय परिचितांकडे असलेल्या दुर्मीळ रेकॉर्ड्स संस्थेच्या संग्रहासाठी विनामूल्य देण्याची तयारी दाखवली. अनेकांनी त्यांच्याकडचे तानपुरे, तबले, हार्मोनियम ही वाद्ये संस्थेस देऊ केली. भिवंडीतील एका वयोवृद्ध गृहस्थांनी तब्येतीमुळे फारशी हालचाल करता येत नाही. तुम्ही संस्थेचा बँकेतील खाते क्रमांक कळवा, मी थेट खात्यात पैसे भरतो, अशीही विनंती त्यांनी केली. ‘लोकसत्ता’तील लेख वाचून कळव्यातील वेबसाइट आणि सॉफ्टवेअर डेव्हलप करणाऱ्या स्मिता मनोहर यांनी फोन करून संस्थेचे संकेतस्थळ विनामूल्य अपडेट करण्याची तयारी दाखवली. ठाण्यातील कविता तिवारी यांनी लेख वाचून त्यांच्या रफी फाऊंडेशन ग्रुपतर्फे संस्थेसाठी निधी जमविण्याची तसेच कार्यक्रम करण्याची तयारी दाखवली.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक संगीतप्रेमी मंडळींनी कल्याण गायन समाजात सभासद म्हणून कार्य करण्याची तयारी दाखवली. संस्थेला अशा प्रकारे चांगल्या कार्यकर्त्यांची साथ मिळणे ही या उपक्रमाची मोठी उपलब्धी आहे, असे आम्हाला वाटते. कारण संस्थेला चांगल्या कार्यकर्त्यांची नेहमीच आवश्यकता असते. कल्याण गायन समाज संस्थेचा लेख वाचल्यानंतर संस्थेशी संबंधित असणाऱ्यांनी सर्वकार्येषु सर्वदा उपक्रमातील इतर संस्थांची माहिती मिळवून त्यांनाही मदत देण्याची तयारी दाखवली.
विशेष म्हणजे गणपतीत हा लेख प्रसिद्ध झाला. त्यानंतर आता दीड महिना झाला तरीही वाचकांचे फोन येत आहेत. आर्थिक मदतीमुळे नव्या इमारतीतील रखडलेले प्रकल्प मार्गी लागतील, याचा आनंद आहेच, पण यानिमित्ताने गाण्यावर प्रेम करणाऱ्या मंडळींचा गोतावळा या लेखाने जमून आला हे विशेष आहे. काहींनी आम्हाला उपयुक्त सूचना केल्या. संस्थेच्या भावी वाटचालीत त्या आम्हाला निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहेत.

Story img Loader