सुमारे ३६ वर्षांपूर्वी अंगारमळ्याच्या शेतजमिनीचा व्यवहार झाला. त्या जमिनीची पाहणी करीत असताना  एका ठिकाणी उभे राहून मला किडेकीटकांची माहिती आणि जमिनीची पातळी कशी काढावी याचे व्यावहारिक ज्ञान काही छोटय़ा मुलांकडून मिळाले. मात्र त्यांनी पुरवलेल्या या किरकोळ माहितीतून पुढे शेतकरी संघटनेचा महावृक्ष उभा राहील अशी शंकाही त्यांना वाटली नसेल..
सन १९७६ च्या डिसेंबर महिन्यात शेवटी आंबेठाणच्या जमिनीचा व्यवहार ठरला. पुण्यातील एक वकील एम. पी. गुणाजी यांनी साठेखत तयार करून दिले आणि १ जानेवारी १९७७ रोजी अंगारमळ्याची जमीन ताब्यात घेण्याचा विधी पार पडला. हा विधी म्हणजे जुन्या मालकाने जमिनीतील थोडीशी माती उचलून नव्या मालकाच्या हातात देणे इतका साधासोपा असतो. त्यानंतर जमीन नव्या मालकाची होते आणि तो त्या जमिनीवर कोणतेही काम करण्यास मुखत्यार होऊन जातो.
मला जमिनीचे काम करण्याची इतकी घाई होती की पहिल्याच दिवशी म्हणजे १ जानेवारी १९७७ रोजी आम्ही बांधबंदिस्तीच्या कामास सुरुवात केली. बांधबंदिस्ती आवश्यक होती, कारण अंगारमळ्याची सर्व जमीन ही दोन्ही बाजूंनी उताराची होती आणि दोन्ही उतारांच्या मध्ये एक ओढा वाहत होता. त्या उतारावर शेतजमीन करण्यासाठी जागोजाग बांध घालणे आवश्यक होते. प्रत्येक पावसात वाहून येणारे पाणी आणि माती बांधापाशी साठत जाते आणि जमिनीचे आपोआप सपाटीकरण होते. बांध घालण्याचे काम तसे सोपेच आहे. बांधाच्या रेषेच्या एका बाजूस जमीन खणून घ्यायची आणि त्यातून निघणारी माती रेषेच्या दुसऱ्या बाजूला टाकायची. या कामात सर्वात मोठे काम हे खणण्याचे असते.
खणण्याचे काम चालू झाल्यावर जमिनीतून अनेक प्रकारचे किडे आणि कीटक निघू लागले. माझी या जगाशी काहीच ओळख नव्हती. माझ्या मनात विचार आला की या किडय़ाकीटकांचा एक संग्रह करावा आणि प्रत्येक किडय़ाकीटकाचे नाव तेथे लिहून ठेवावे. माझ्या शेजारीच जमिनीचे जुने मालक हजर होते, त्यांना मी तसे म्हणताच ते म्हणाले अशा तऱ्हेचे संग्रहालय करण्याची काहीच आवश्यकता नाही. गावातल्या अगदी लहान मुलालासुद्धा या प्रत्येक किडय़ाचे आणि कीटकाचे नाव माहीत आहे, एवढेच नव्हे तर गुणधर्मसुद्धा माहीत आहेत.
त्यानंतर सगळ्या शेताचे कंटूर मॅिपग करण्याचे काम हाती घेतले गेले. यासाठी जागोजाग बांबू खोचून काही उपकरणांच्या मदतीने बांबूंची टोके समपातळीत आणावी लागतात. शेतावर काम करणारा एक मुलगा म्हणाला, ‘यासाठी एवढय़ा उपकरणांची काय गरज आहे? खाली वाकून पाहिल्यावर जमिनीची पातळी सहज लक्षात येते.’ तो मुलगा एका जागी उभा राहिला आणि खांदा कलवून डोके जमिनीच्या पातळीत आणून त्याने, तेथे पाणी सोडले तर कोणत्या दिशेने वाहत जाईल हे सांगितले. त्या वेळी मला सल्ला देण्याकरिता किलरेस्कर कंपनीचे तज्ज्ञ हजर होते. त्यांनीही त्या मुलाला सर्टििफकेट दिले की त्या मुलाने काढलेल्या जमिनीच्या पातळीत काहीही दोष नव्हता. त्यामुळे, पाण्याच्या वाहण्यावरून जमिनीची पातळी सहज काढता येऊ शकते हे कळले.
या उदाहरणांवरून मला श्रीमती ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांच्या शाळेत घडलेल्या एका प्रसंगाची आठवण झाली. त्यांच्या शाळेच्या तपासणीसाठी काही विद्वान गेले असता त्यांनी विद्यार्थ्यांना सामान्यज्ञानाचे काही प्रश्न विचारले – अमक्या खात्याचा मंत्री कोण? वगरे वगरे. विद्यार्थ्यांना उत्तरे देणे फारसे जमले नाही. ताराबाईंनी हा सगळा प्रकार पाहून घेतला आणि तपासनीसांकडून जेवणाच्या सुट्टीपर्यंत वेळ मागून घेतला. सुट्टीच्या वेळात त्यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या झाडांची पाने गोळा करून आणण्यास सांगितले. पाने गोळा झाल्यानंतर त्यांनी एकेका विद्वान तज्ज्ञाला ही पाने कोणकोणत्या झाडांची आहेत असा प्रश्न विचारायला सुरुवात केली. विद्वान तज्ज्ञ अर्थातच गडबडून गेले. याउलट, ताराबाईंच्या विद्यार्थ्यांना त्या त्या पानाच्या झाडाचे नाव एवढेच नाही तर त्या झाडांचे औषधी गुणही तोंडपाठ होते.
यावरून एक महत्त्वाचा धडा मी शिकलो आणि मनात कोठेतरी त्याची नोंद करून घेतली. शेतकरी हा अडाणी आणि अज्ञानी असतो ही गोष्ट खोटी आहे हा युक्तिवाद करण्याकरिता पुढे मला हे शहाणपण खूप उपयोगी पडले.
शेतकरी संघटना स्थापन झाल्यानंतर अनेक विद्वानांनी माझ्याशी वादविवाद करण्याकरिता अनर्गळ मुद्दे उठवले- शेतकऱ्यांच्या हाती पसा आला तर ते त्याचा उपयोग दारू पिण्याकरिता करतील वगरे वगरे. माझ्या अनुभवातून जे मला कळले होते ते हे की उत्पन्न वाढल्यानंतर सगळेच लोक काही हौसमौज करण्याकरिता त्याचा एक भाग वापरतात; त्यातल्या काहींना दारू पिण्यात हौसमौज वाटते. प्राध्यापकांचीही अशी प्रवृत्ती मला प्रत्यक्ष अनुभवाने कळलेली होती. सरकारी नोकरीत राहिल्यामुळे कलेक्टर इत्यादी उच्चपदस्थ लोकसुद्धा पहिल्या पगाराचा अशाच तऱ्हेने विनियोग करू पाहतात हेही मला अनुभवाने कळले होते. मग, शेतकऱ्यांनी त्यांची नवी मिळकत आनंदाच्या भरात थोडीशी उधळमाधळीने गरवापराने खर्च केली तर त्याबद्दल एवढे आकांडतांडव करण्याचे काहीच कारण नाही.
हाच युक्तिवाद, ‘शेतकरी लग्नात किंवा उत्सवप्रसंगी अवास्तव खर्च करतात’ या दोषारोपाची वासलात लावण्याकरिता उपयोगी पडला. त्यासाठी तर प्रत्यक्ष महात्मा जोतिबा फुले यांचाच आधार होता. अगदी श्रीमंत श्रीमंत म्हटल्या गेलेल्या पाटलाच्या घरीसुद्धा लग्नासारख्या प्रसंगी जेवणावळ म्हणजे काय असते याचे तपशीलवार वर्णन जोतिबांनी बारकाईने केले आहे. ‘.. देवकार्याचे दिवशी सर्वानी आपापल्या घरून पितळ्या घेऊन आल्यानंतर त्यामध्ये ज्वारीच्या भाकरी, कण्या अथवा बाजरीच्या घुगऱ्याबरोबर सागुतीचे बरबट, ज्यामध्ये दर एकाच्या पितळीत एकदा चार अथवा पांच आंतडी-बरगडय़ाचे रवे पडले म्हणजे जेवणारांचें भाग्य..’ असे स्वत: जोतिबा फुल्यांनीच ‘शेतकऱ्याचा आसूड’ या त्यांच्या पुस्तकात वर्णन केले आहे.
शेतकऱ्यांतील अगदी लहान मुलानेसुद्धा दाखवलेल्या सामान्यज्ञानानंतर माझ्या मनात विचार आला की आय. ए. एस.च्या परीक्षेतील सामान्यज्ञानाचे प्रश्न थोडे शेतीसंबंधित केले तर आज उत्तीर्ण होणारे बहुतेक अधिकारी सपशेल अपयशी होतील. परीक्षेतील उत्तीर्णता ही प्रश्नांच्या कलावर अवलंबून असते. प्रश्न जर या एकाच प्रकाराने विचारले गेले तर शेतकरी मुले सहज उत्तीर्ण होतील, हा निष्कर्षही मनात तयार झाला. यापुढची पायरी म्हणजे, कोणत्या गुणवत्तेच्या निष्कर्षांने कलेक्टर इत्यादी उच्चाधिकाऱ्यांची नेमणूक होते? त्यात खरोखर त्यांच्या बुद्धिमत्तेची परीक्षा होते काय? माझ्या मनात एक गमतीशीर विचार आला. सगळ्यात जास्त बुद्धी वापरण्याचे काम बसचा कंडक्टर करतो असा तो निष्कर्ष होता. एका स्टॉपवरून दुसऱ्या स्टॉपवर जाण्याकरिता प्रत्येक वेळी वेगळा हिशेब मनातल्या मनात त्याला करावा लागतो. माझी सगळी दुनिया पालटली. शेतकरी अडाणी आहे, आळशी आहे, उधळ्या आहे, व्यसनी आहे या साऱ्या कल्पना पार पुसून गेल्या आणि शेतकऱ्याचे वासाहतिक पद्धतीने शोषण होत असल्यामुळेच तो गरीब राहतो, कर्जबाजारी राहतो असा मनाशी निश्चय झाला.
यानंतरचे काम हे केवळ पुस्तकी होते. पुण्यातील गोखले इन्स्टिटय़ूटच्या ग्रंथालयात जाऊन शेतकऱ्यांच्या शोषणासंबंधातील पुरावे आणि माहिती गोळा करणे हे तसे सोपे होते. शेतीतील काबाडकष्टांच्या तुलनेने ग्रंथालयातील खुर्चीत बसून पुस्तके वाचणे, टिपणे काढणे हे काम सोपेच म्हणायचे. त्यात मला थोडी नशिबाची साथ मिळाली. रशियामध्ये स्टॅलिनच्या काळात प्रियाब्रेझेन्स्की आणि बुखारीन यांच्यात झालेल्या वादविवादाची माहिती मला अशोक मित्रा यांच्या ‘Terms of Trade and Class Relations’ या छोटय़ा पुस्तकात मिळाली. बहुतेक विद्वानांना आणि संशोधकांना अशा नशिबाच्या लाटेचा फायदा मिळतोच. माझी मांडणी कोणाही मायकेल लिप्टनसारख्या एखाद्या लेखकाच्या मांडणीवर झालेली नसून त्यासाठी अनेक संदर्भ आणि माझे शेतीतील अनुभव उपयोगी पडले आहेत. आणि, त्याखेरीज माझ्या व्यापक वाचनाचाही – त्यात अनेक विषय आले, अनेक भाषांचा अभ्यासही आला – मला उपयोग झाला. तसेच फ्रान्ससारख्या देशातील शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष केलेल्या आंदोलनाचा अनुभवही त्याच्या मागे आहे. आणि त्यातून शेतकरी संघटनेच्या अर्थविचाराची मांडणी आणि आंदोलनाची साधने तयार झाली. अंगारमळ्याच्या शेतातील एका ठिकाणी उभे राहून मला किडय़ाकीटकांची माहिती देणाऱ्या आणि जमिनीची पातळी कशी काढावी याचे व्यावहारिक ज्ञान देणाऱ्या त्या छोटय़ाशा मुलांना त्यांनी पुरवलेल्या या किरकोळ माहितीतून पुढे शेतकरी संघटनेचा महावृक्ष उभा राहील, अशी शंकाही वाटली नसेल. शेतकरी संघटनेच्या विचाराची विशेषता अशी की कांद्याच्या भावाच्या प्रश्नापासून ते विश्वाचा निर्मिक कोण, त्याचे स्वरूप काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी, कोणत्याही तऱ्हेची ठिगळे न वापरता एका धाग्याने विणलेले ते एक महावस्त्र आहे.

Sandy Irvine 100 years later
Sandy Irvine remains found:एव्हरेस्ट १९२४ सालीच सर झाला होता का? अर्विनचे सापडलेले अवशेष नेमकं काय सांगतात?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
wall-painted calendar in the Roman Republic
भूगोलाचा इतिहास : एका खेळियाने…
banana cultivation farmer kiran gadkari tried different experiment for banana farming
लोकशिवार: आंतरपिकातील यश !
Vistara Completes Merger With Air India
‘विस्तारा’ नाममुद्रा इतिहासजमा; एअर इंडियामध्ये विलीनीकरण पूर्ण
rare ornate flying snake found in Sahyadri
सावंतवाडी: सह्याद्रीच्या पट्ट्यात घोटगेवाडी येथे दुर्मिळ उडता सोनसर्प आढळला
white giant squirrel spotted in mahabaleshwar
Video : महाबळेश्वरमध्ये पांढऱ्या शेकरूचे दर्शन !
History of Geographyn History of the Earth Geological timescale
भूगोलाचा इतिहास: खडकातील पाऊलखुणा!