कोणत्याही काळात नटश्रेष्ठांची टंचाई न भासलेल्या हॉलीवूड नामे चित्रनगरीने नरश्रेष्ठांचीही वैशिष्टय़पूर्ण परंपरा जपली. टारझनसारख्या पुष्ट शरीरासोबत, तल्लख-चपळ सुपरहिरोंची फौज आणि रॅम्बो-टर्मिनेटरसारखी पहाडकाय नररत्ने जगाला तंत्रज्ञानाच्या डोळेदिपवू कामगिरीहून काकणभर सरसच वाटली. जॉफ्री होल्डर हे हॉलीवूडी नरश्रेष्ठांच्या परंपरेत बसणारे असे कलाकार म्हणावे लागतील. पहिल्या जेम्स बॉण्ड चित्रपटामध्ये रॉजर मूर यांचे ‘बॉण्डपण’ आपल्या महाकाय शरीरयष्टीद्वारे खिळखिळे करून टाकणाऱ्या जॉफ्री होल्डर यांची ओळख रांगडा कृष्णवंशी कलाकार म्हणूनच महत्त्वाची नव्हती. अभिनयासोबत दिग्दर्शन, चित्रकला, नृत्य दिग्दर्शन आणि लेखन अशा अनेक प्रांतात सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी आपले प्रस्थ निर्माण केले होते.
‘द विझार्ड ऑफ द ओझ’ या नाटय़कृतीचे संपूर्ण कृष्णवंशीय रूपांतर करून ब्रॉडवेवर ते गाजविण्याची धमक त्यांच्यात होती. मुख्य धारेतील चित्रपटांसोबत छोटय़ा पडद्यावर आपल्या नरोत्तम अदाकारीचा दाखला तेवत ठेवण्याची शक्ती त्यांच्यात होती. कॅरिबियन बेटांवरील दंतकथांना लिखित आणि चित्रित स्वरूप देण्याची प्रतिभा त्यांच्यात होती. क्रिकेटसाठी ओळखल्या जाणाऱ्या त्रिनिदादच्या परिसरात जन्मलेल्या जॉफ्री यांना चेंडूफळीचे आकर्षण नव्हते. साडेसहा फूट उंची आणि खर्जातील करारी आवाज लाभलेले होल्डर नृत्यनिपुण असल्याने अमेरिकेत त्यांच्या कला-गुणांना वाव मिळाला. महायुद्धोत्तर काळात चहूदिशांनी प्रयोगांचे वारे वाहते ठेवणाऱ्या हॉलीवूड, ब्रॉडवे या अनुक्रमे चित्रपट व नाटय़ वर्तुळांच्या कक्षेत येण्याआधी त्यांनी नृत्यशिक्षक म्हणून काम केले. ऑपेरामध्ये दबदबा निर्माण झाला तेव्हा ‘वेटिंग फॉर द गोदो’चे कृष्णवंशीय कलाकारांना घेऊन रूपांतर केले. ‘ऑल नाइट लाँग’ या शेक्सपिअरच्या ऑथेल्लोवर आधारित ब्रिटिश चित्रपटापासून त्यांची चित्रपट कारकीर्द सुरू झाली. या चित्रपटात त्यांच्यासोबत सहायक भूमिकेत रिचर्ड अ‍ॅटनबरोही होते. पुढे ‘डॉक्टर डूलिटिल’पासून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये लक्षणीय भूमिकांची साखळीच पूर्ण केली. अमेरिकी नाटय़क्षेत्रातला सर्वोच्च टोनी पुरस्कार मिळविणारे ते पहिले कृष्णवंशीय. ‘टिंबक्टू’ या ब्रॉडवेवर गाजलेल्या सर्वात खर्चीक सांगीतिकेची निर्मितीही त्यांनी केली. चित्रपट, नाटय़, कला आणि साहित्य आदी सर्वच आघाडय़ांवर नावाचा सारखाच दबदबा मिळविणारे ते एकमेव कलावंत आहेत.
जगभरातील नाटय़प्रेमींची पंढरी म्हणून ओळखली जाणारी ब्रॉडवे नुकत्याच झालेल्या त्यांच्या निधनामुळे शुक्रवारी दिवे मालवून त्यांना श्रद्धांजली वाहणार आहे. कसल्याही मानवंदनेपलीकडे लोकप्रिय असलेल्या या कलावंताचे नाव कालगत होण्याची अंमळही शक्यता नाही.

Story img Loader