घराण्यांची अपरिहार्यता, सौंदर्याविष्काराच्या अंगाने आजही महत्त्वाची आहे. चार घराण्यांच्या शैली एकत्र करून एखाद्या नव्या शैलीला जन्म देणे ही सहजसाध्य गोष्ट नसते. त्यासाठी कमालीची प्रखर बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता आवश्यक असते. एवढय़ा उंचीचा कलावंत आजमितीस तरी दृष्टिक्षेपात येत नाही. केवळ चूष म्हणून काही नवे प्रयोग करण्याने शैली सिद्ध होत नाही.
ध्वनिमुद्रणाचे तंत्रज्ञान भारतात अवतरले, त्याला आता शतकभराचा काळ उलटून गेला. पण संगीताचा प्रसार मोठय़ा प्रमाणात होण्यासाठी संगणक युगातील इंटरनेटला अवतीर्ण व्हावे लागले. संगीताचे तांत्रिक वहन या नव्या तंत्रसुविधांमुळे अतिशय सुलभ झाले आणि त्याचा परिणाम संगीताचा पोहोच वाढण्यात झाला. अगदी शंभर वर्षांपूर्वी गायनकला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या कलावंताचे गाणे ऐकायचीही बंदी असे. अतिशय कडेकोट बंदोबस्तात त्यांचे शिक्षण चाले. संगीताची ही अशी तालीम मिळण्यासाठी गुरुभक्तीशिवाय अन्य मार्ग नव्हता. गुरू प्रसन्न होण्याचे भाग्य फार थोडय़ा शिष्यांच्या भाळी लिहिलेले असे. गुरूपेक्षा शिष्य सवाई असावा, अशी खात्री पटेपर्यंत गुरू अशा शिष्याला समाजासमोर आणीत नसत. संगीतातील ही एक प्रकारची हुकूमशाहीच होती, पण तिला अतिशय मूलभूत अशा कलात्मकतेच्या चौकटी होत्या. आपण ज्या प्रकारचे संगीत करतो, ते त्याच प्रकारे आपल्या शिष्यांमध्ये संक्रमित करणे ही आजही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे गुरू सगळ्याच शिष्यांची, न सांगता सतत परीक्षाच घेत असे. त्यात जो खरा उतरेल, त्याच्या वाटय़ाला मग गुरूकडून ज्ञानभांडारच खुले होई. अट एवढीच असे, की माझे संगीत त्याच प्रकारे अधिक उन्नत होऊन टिकवले जावे. हे जे ‘माझे असलेले संगीत’ असते, ते मूलत: शैलीशी निगडित असते; म्हणजेच घराण्याशी संबंधित असते. ज्या घराण्याची तालीम मिळाली, त्यामध्ये अन्य कोणत्याही शैलीची सरमिसळ होता कामा नये, हा कटाक्ष असल्यानेच अन्यांचे गायन ऐकण्यास बंदी असे. काही वेळा त्याचा अतिरेक झाला आणि त्यातून घराण्याच्या शैलीपेक्षा अभिमानाचाच डांगोरा अधिक पिटला गेला. आवाज लावण्याच्या पद्धतीपासून ते सादरीकरणाच्या अनेक पदरांपर्यंत घराण्याचे नाव धारण केलेली ही शैली चिकटलेली असते. नवी शैली विकसित करणाऱ्या अतिशय थोर अशा संगीतकारांनाही या शैलीच्या विशिष्ट ठेवणीबद्दल कमालीचा अभिमान (काही वेळा दुराभिमानही) असे. तो आपल्या शिष्यांमध्येही असावा, असे त्यांना वाटत असे. एका अर्थाने ते खरेही होते, कारण प्रत्येक शैलीचे म्हणून काही वेगळेपण असते. ते जसेच्या तसे ठेवून त्यामध्ये नवे प्रयोग करीत ती शैली विकसित करणे हे पुढील पिढीतील सर्जनशील कलावंतांचे काम असते. शैलीचा आग्रह एवढय़ासाठीच, की तिची शुद्धता टिकून राहावी. गेल्या शतकभरात भारतीय अभिजात संगीतात टिकून राहिलेल्या आणि नावारूपाला आलेल्या सगळ्या घराण्यांच्या कलावंतांनी या शुद्धतेला कमालीचे महत्त्व दिले. या काळात प्रत्येक घराण्याचे हे वेगळेपण आवडणारे रसिक होते.
तंत्रज्ञानाच्या आगमनामुळे या शैलीच्या शुद्धतेला सुरुंग लागण्याची भीती सातत्याने व्यक्त केली गेली. ती खरीही होती. ध्वनिमुद्रणाचे तंत्र आल्यामुळे गाणे ऐकणे ही फार कष्टाची गोष्ट राहिली नाही. आपले संगीत असे अन्य कुणालाही सहज ऐकता येऊ नये, म्हणून सुरुवातीच्या काळात अनेक दिग्गज कलावंतांनी ध्वनिमुद्रणाला स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे आजच्या रसिकांना त्या सगळ्यांची फक्त नावे माहीत असतात आणि त्यांच्या गायनाच्या शाब्दिक वर्णनांवरच तहान भागवावी लागते. हा नकार घराण्याच्या वृथा अभिमानातून आला होता. तो काळाच्या ओघात गळून पडणेही स्वाभाविक होते.
ज्या घराण्याची शैली एखादा शिष्य आत्मसात करू पाहात असतो, त्याला अन्य घराण्यांचे गायन ऐकण्याची सुविधा ध्वनिमुद्रण, संगीत परिषदा आणि नंतर आलेल्या नभोवाणीमुळे मिळू लागली. त्यामुळे मनातल्या मनात कलात्मकतेच्या पातळीवरील तुलना अपरिहार्यपणे होऊ लागली. दुसऱ्या घराण्याची गायनशैली गुरुमुखाशिवाय आत्मसात करणे अशक्य असले, तरीही त्यातील सौंदर्यस्थळांचा मोह पडणे ही अगदी सहज घडून येणारी गोष्ट होती. संगीताच्या प्रसारामुळे सर्व घराण्यांचे कलावंत एकाच मैफलीत सहजपणे सामावले जाऊ लागले. संगीत परिषदा आणि संगीत महोत्सवांमुळे या शैली कलावंतांसाठीही मुक्तपणे समोर येऊ लागल्या. सरमिसळ होणे ही बाब त्यामुळे सहजशक्य होऊ लागली. अशा वातावरणात शैली टिकवून ठेवण्याचे आव्हान संगीताच्या पोषकतेसाठी अधिक महत्त्वाचे ठरू लागले. अनेक घराण्यांच्या शैलींचे मिश्रण करून स्वत:ची खास शैली तयार करणे ही गोष्टही तेवढी सोपी नसतेच. कारण, या सगळ्याच्या मुळाशी असलेली सौंदर्यदृष्टी विकसित करणे सगळ्यात अवघड असते. रसिकाला गृहीत धरून असे जे जे प्रयोग झाले, ते फार काळ टिकले नाहीत. प्रत्येक शैलीमागे दडलेले सौंदर्यतत्त्व मोलाचे असते. ते निर्माण व्हायला आणि टिकून राहायलाही बराच काळ जावा लागतो. कलावंताची सौंदर्यदृष्टी व्यक्तिपरत्वे वेगवेगळी असणार हे तर उघडच आहे. मात्र, शैलीच्या मूळ साच्याला धक्का न लावता, आपल्या सर्जनाने त्यात भर घालणारे अनेक कलावंत तंत्रज्ञानाच्या विकास काळात निर्माण झाले. त्यांनी आपल्या प्रतिभेने घराण्याच्या शैलीचा नव्याने विचार केला आणि त्यामध्ये भर घातली. ही भर संगीताला आणि घराण्यालाही पुढे नेणारी होती. काळाच्या प्रत्येक टप्प्यात ज्याप्रमाणे नकलेला प्रोत्साहन मिळते, तसे संगीताच्याही बाबत घडले. केवळ नक्कल करून मोठेपणा मिरविणाऱ्यांना संगीताच्या इतिहासात कधीच मानाचे पान मिळाले नाही, हे मात्र खरे. त्याचे श्रेय उच्च प्रतीच्या कलास्वादालाच द्यायला हवे. भारतीय संगीतासाठी रसिकांचा कलास्वाद कायम उभारी देत आला. अस्सल आणि शुद्ध, सुंदर आणि कलात्मक, नक्कल आणि दिखाऊ यातील फरक नेमकेपणाने ओळखू शकणाऱ्या रसिकांनी प्रतिभावान कलावंतांच्याच पाठीशी राहण्याचे ठरवले, हे संगीतासाठी किती उपकारक ठरले!
तंत्रज्ञानाने संगीतातील घराण्यांच्या भिंती गळून पडल्या. संगीताची देवाणघेवाण सुलभ झाली आणि वहनही शक्य झाले. खिशातल्या मोबाइलमध्ये अनेक तासांचे ध्वनिमुद्रण साठवण्याची क्षमता सिद्ध झाल्याने संगीत ऐकणे पूर्वीसारखे अप्राप्य राहिले नाही. विविध शैलींच्या अनेक नव्या प्रयोगांना सामोरे जाण्यासाठीची पृष्ठभूमी तंत्रज्ञानाने साध्य केली. अमुक एका घराण्याचेच संगीत ऐकणार असे ठरवले तरी ते घडणे अशक्य व्हावे, अशी तंत्रज्ञानाची ही त्सुमानी मानवी समूहावर आदळली. त्याचा परिणाम घराण्यांच्या अस्तित्वावरच होईल, अशीही भीती व्यक्त होऊ लागली. त्यामुळे घराण्यांची आवश्यकताच काय, असा मूलभूत प्रश्नही जाहीरपणे विचारला जाऊ लागला. ज्यांनी आयुष्यभर एका विशिष्ट  अशा सौंदर्यदृष्टीने युक्त अशा शैलीचा पुरस्कार केला, असे कलावंतही तंत्रज्ञानाच्या त्सुनामीपुढे हतबल होत असल्याचे हे चित्र फारसे आशादायक नाही. जगातल्या सगळ्याच कलांमध्ये शैलीचे महत्त्व अनन्यसाधारण मानले गेले आहे. सरमिसळीतूनही नवी शैली आकाराला आल्याची अनेक उदाहरणे घडली आहेत.
एखाद्या कलावंताने स्वप्रतिभेने अशी नवी शैली स्थापन केली, तरी ती टिकून राहण्यासाठी तीमध्ये आवश्यक असणाऱ्या सौंदर्यगुणांचा समुच्चय पुढील पिढीपर्यंत पोहोचलाच नाही, तर तिचे पुनरुज्जीवनही असाध्य ठरणार हे स्पष्ट आहे. भारतीय संगीताच्या इतिहासात अशीही अनेक घराणी होऊन गेली, की ज्यांचा आज मागमूसही नाही. नव्या काळात, नव्या सौंदर्यवादी विचारांनी, नवी शैली निर्माण होणे ही आज संगीताची गरज असली, तरी ती प्रत्यक्षात प्रकट होताना दिसत नाही. ज्या शैली गेली अनेक दशके टिकून राहिल्या, त्यांना टाकून देऊन नव्याचा हव्यास धरण्याने केवळ नवतेचाच हव्यास जडेल. परंपरेची मुळे मात्र उखडली जातील. परंपरेतील आवश्यक ते गुण नवतेमध्ये सामावले गेल्याशिवाय त्यात सातत्य राहात नाही, हा तर निसर्गाचा नियम. संगीताचे क्षेत्र त्याला अपवाद असण्याचे काहीच कारण नाही. घराण्यांची अपरिहार्यता, सौंदर्याविष्काराच्या अंगाने आजही महत्त्वाची आहे. चार घराण्यांच्या शैली एकत्र करून एखाद्या नव्या शैलीला जन्म देणे ही सहजसाध्य गोष्ट नसते. त्यासाठी कमालीची प्रखर बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता आवश्यक असते. एवढय़ा उंचीचा कलावंत आजमितीस तरी दृष्टिक्षेपात येत नाही. केवळ चूष म्हणून काही नवे प्रयोग करण्याने शैली सिद्ध होत नाही. चित्रपटातील तीन मिनिटांच्या गाण्यांचे संगीत नियोजन करण्यासाठीही शैलीचे अस्तित्व आवश्यक असते. ती शैली निर्माण होणे ही एका रात्रीत घडणारी घटना नसते. त्यामुळे प्रचंड मोठा व्याप असणाऱ्या भारतीय अभिजात संगीतात शैलीबद्धतेलाच आव्हान देणे धोक्याचे तर आहेच, परंतु संगीतासाठी हानिकारकही आहे. सौंदर्यवादी दृष्टीने कलांचा वापर नियंत्रित होत असतो. त्यामध्ये असुंदरतेला अजिबात थारा नसतो. घराण्यांच्या भिंती श्रवणापुरत्याच गळून पडणे एकवेळ ठीक आहे, पण कलावंताने जर विशिष्ट  सौंदर्यदृष्टीचा पाठपुरावा करण्याचेच सोडून दिले, तर नवी त्सुनामी येईल, यात शंका नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा