अंधेरीची एक ६७ वर्षीय भगिनी त्यांच्या तीव्र मानसिक अपंगत्व आलेल्या मुलीला घेऊन आल्या. घरात दोघी मायलेकीच. मुलीला घरात कुलूप लावून ठेवल्यावरच त्या तीन ते चार तास स्वयंपाकाच्या कामाला जातात. त्यापेक्षा जास्त काळ जाता येणे शक्य नाही. अशा मुलीची जबाबदारी आणि मिळकत केवळ तीन हजार रुपये. घर कसं चालविणार ? बाई, आता थकले हो, शरीर व मनानेही. काहीही करा, पण मुलीला घरकुलात सामावून घ्या..
‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमात मानसिक अपंग मुलींसाठी कार्यरत घरकुल परिवाराच्या कार्यावर प्रकाशझोत टाकण्यात आल्यानंतर मन अस्वस्थ करणारे असे असंख्य अनुभव आले. ‘घरकुल’ पाहिलेले नसताना, या संस्थेच्या चालकाविषयी माहीत नसताना ‘लोकसत्ता’तील लेखाआधारे हितचिंतकांनी ‘घरकुल’च्या छोटय़ाशा कार्याची दखल घेतली. मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाने आम्ही थक्क झालो.
अंबरनाथहून एका कंपनीतून दूरध्वनी आला. माझ्याकडे एक कर्मचारी आहे. त्यांना तीन प्रौढ मानसिक अपंग मुले (दोन मुली व एक मुलगा) आहेत. उद्या ते तुमच्याकडे येत आहेत. दुसऱ्या दिवशी आई-वडील तीन मुलांसह खास गाडी करून ही मंडळी आली. सर्व कौटुंबिक स्थिती मांडताना बाबांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या होत्या. पण, गृहस्थ शांत, संयमी, कष्टाळू व विचारी वाटले. मुलांचा बराचसा खर्च साहेबच उचलतात. ‘मॅडम, एका मुलीला तरी ठेवून घ्या, म्हणजे भार हलका होईल.’ पालकांशी सविस्तर बोलणे झाले. प्रवेशाची प्रक्रिया समजावून एका मुलीला दिवाळीनंतर ‘घरकुल’मध्ये प्रवेश देण्याविषयी ठरले.
७५ वर्षांच्या आजींची वेगळीच समस्या. त्यांना ४२ वर्षांची मानसिक अपंग मुलगी. वडील नुकतेच गेलेले तर भाऊ परदेशात. आजींनी ‘लोकसत्ता’ वाचून फोन केला. ‘मुलीला घेऊन एकटीने येणे शक्य नाही. काय करू ?’ त्यांच्याशी सविस्तर बोलणे झाले. त्यानंतर त्यांच्या भाच्याने ‘घरकुल’ला भेट दिली.
एका मुलीच्या पालकांना डॉक्टरांनी सांगितलेल्या सल्ल्यामुळे धडकीच भरली. ‘तुमच्या मुलीला ‘घरकुला’त ठेवता येणार नाही. कारण, तुमची मुलगी मानसिक अपंग नाही, ‘स्किझोफ्रेनी’ आहे. दोन्ही समस्या वेगळ्या आहेत. उपचार वेगळे आहेत, तेव्हा घरकुलात प्रवेश देता येणार नाही..’ पालक लगेच भेटायला आले. ‘मॅडम, तुम्ही अशा मुलींसाठीही सुरू करा ना काहीतरी. आम्ही जाणार कुठे ?’ त्यांच्या जीवाची तगमग समजत होती, पण नाईलाज होता. त्यांना थोडा धीर दिला.
एक दिवस साधारणत: ३० ते ३२ वर्षांचा तरुण भेटायला आला. त्याची व्यथा जरा नाजूक. ‘बाई, काही करा पण माझ्या बहिणीला किमान एक वर्षांसाठी तरी ठेवून घ्या.’ त्याच्याशी बरेच बोलल्यावर तो भाऊ मोकळा झाला. म्हणाला, ‘बाई, माझी बहीण तीव्र मानसिक अपंग आहे. तिच्यामुळे माझे लग्न ठरत नाही. लग्न होईपर्यंत व त्यानंतर थोडे दिवस ठेवा. मी नंतर घेऊन जाईल..’
प्रत्येकाची व्यथा आणि कथा वेगळी. अनेक हितचितकांनी, देणगीदारांनी अत्यंत विश्वासपूर्वक प्रतिसाद देऊन शक्य असेल त्याप्रमाणे देणगी दिली.
मुंबईतील एक हितचिंतक फोन करून कुटुंबासह भेटायला आले. मुलींशी गाणी, गप्पा-गोष्टी केल्या. त्यांनी तयार केलेल्या वस्तूंची खरेदी केली. घरकुलात भोजन करून जाताना गरजू विद्यार्थिनींच्या खर्चाची जबाबदारी स्वीकारली. आम्ही थक्क झालो. असाच एक अनुभव मुंबईच्या गोल्डन ग्रुपचा. या ग्रुपने सहकुटुंब घरकुलास भेट दिली. मुलींशी गप्पा मारल्या. जाताना भरीव अशी देणगी दिली. एका देणगीदाराने महिनाभर पुरेल असा किराणा पाठवून दिला.
अनुभवातून एक सांगते. मानसिक अपंग मुलींबरोबर राहण्यात, काम करण्यात खूप आनंद आहे. या मुली खूप प्रेमळ, निरागस, प्रामाणिक, कष्टाळू व भाबडय़ा आहेत. तुमच्यावर भरभरून प्रेम करतात आणि त्यांना आपल्यावरही खरं प्रेम कोण करतं हेही कळते. या मुलींचे भाबडेपण ‘लोकसत्ता’ने व आपण सर्व वाचकांनी, देणगीदारांनी जाणून घेतले आणि प्रत्येकाने शक्य त्याप्रमाणे मदत केली, हाकेला साद घातली, त्याबद्दल ‘घरकुल’ परिवारातर्फे हा कृतज्ञतेचा नमस्कार आणि घरकुलास भेट देण्याचे आग्रहाचे निमंत्रण.
दातृत्वाने फुलले ‘घरकुल’
अंधेरीची एक ६७ वर्षीय भगिनी त्यांच्या तीव्र मानसिक अपंगत्व आलेल्या मुलीला घेऊन आल्या. घरात दोघी मायलेकीच. मुलीला घरात कुलूप लावून ठेवल्यावरच त्या तीन ते चार तास स्वयंपाकाच्या कामाला जातात.
आणखी वाचा
First published on: 10-11-2012 at 11:11 IST
मराठीतील सर्व रविवार विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gharkul glow because of doner