मानसिकदृष्टय़ा अपंग मुलींना खऱ्या अर्थाने हक्काचे ‘घरकुल’ उपलब्ध करून देतानाच पालकांनाही आयुष्याच्या सायंकाळी समाधान मिळवून देणाऱ्या नाशिकच्या घरकुल परिवार संस्थेच्या कार्यात निधीअभावी अवरोध आले आहेत. सध्या भाडेतत्त्वावरील जागेत कार्यरत असलेल्या संस्थेला स्वत:च्या जागेत घरकुल उभारणीसाठी आर्थिक मदतीची निकड आहे.
याशिवाय, या मुलींनी निर्मिलेल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी केंद्र सुरू करणे, विविध प्रकारच्या गृह उद्योगासाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री आणि मानसिकदृष्टय़ा अपंगांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी कला अकादमी सुरू करण्याच्या योजनाही मदतीशिवाय प्रत्यक्षात येऊ शकत नाहीत.
मानसिकदृष्टय़ा अपंग मुलींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धडपडणाऱ्या संस्थेच्या स्थापनेस केवळ सहा वर्षे झाली असून अल्पावधीतील कार्य विचार करायला लावणारे आहे. मानसिक अपंग मुलींचा सांभाळ हा पालकांसाठी सर्वाधिक चिंतेचा विषय असतो. ही बाब लक्षात घेऊन हे घरकुल आकारास आले आहे. अशा मुलींसाठी उत्तर महाराष्ट्रात निवासी स्वरूपाची कोणतीही व्यवस्था नसल्याने चार मुलींना घेऊन सुरू झालेल्या घरकुलमध्ये सध्या संपूर्ण राज्यातून वेगवेगळ्या भागांतून आलेल्या २५ मुली वास्तव्य करतात. त्यातील अनेक जणींचे पालक हयात नाहीत. काही जणींना आई किंवा वडील असले तरी त्यांची मुलींच्या निवासाचा खर्च देण्याची क्षमता नाही. मध्यमवगीय, आर्थिकदृष्टय़ा दुर्बल कुटुंबातील पालकांना डोळ्यासमोर ठेवत ज्यांचे पालक असा खर्च पेलू शकत नाहीत, त्यांच्यासाठी देणगीदारांमार्फत व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला जातो. शासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याने दात्यांनी मुलींचे पालकत्व स्वीकारून मदतीसाठी पुढे यावे, अशी अपेक्षा आहे. सध्या घरकुल भाडेतत्त्वावरील जागेत कार्यरत असून एका देणगीदारामार्फत जागाही मिळाली आहे. या मुलींची सर्वतोपरी काळजी घेताना त्यांना व्यग्र ठेवण्यासाठी वस्तुनिर्मितीचे प्रशिक्षणही दिले जाते. या विविध वस्तूंची विक्री करण्यासाठी केंद्र उभारण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. गृहोद्योगासाठी लागणारी यंत्रसामग्री संस्थेला हवी आहे. या योजनांसाठी निधीची आवश्यकता आहे. इच्छुकांनी घरकुल परिवार संस्था, नाशिक या नावाने धनादेश काढावेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा